सोपी नाही ही मैत्री

* दीपान्विता राय बॅनर्जी

कॉलेजच्या दिवसांत सुभाष नेहाला नोट्स वगैरे देऊन तिची खूप मदत करायचा. त्यानंतर नेहाचे लग्न ठरले तरी तो बिनधास्त तिच्या घरी जायचा. तिचा भावी पती आणि सासरच्यांसमोरही कधीही तिला फोन करायचा. हे सर्वांना खटकू लागताच नेहाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुभाष रागावला आणि विनाकारण नेहावर भावनिक दबाव आणू लागला.

तिकडे नेहाच्या भावी पतिनेही नेहाला सुभाषसोबतचे नाते संपवण्यास सांगितले. नेहा दोन्ही बाजूंनी अडकली. शेवटी तिला सुभाषला कायमचे गुडबाय करावे लागले. साधी मैत्री ती का टिकवू शकली नाही, हे सुभाष समजू शकला नाही.

श्वेता आणि आकाश एकाच शाळेत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. लग्नानंतरही आकाशचे तिच्या घरी येणे-जाणे होते. सोशल मिडियावर श्वेताने प्रायव्हसी शेअर केल्याने आकाशची हिंमत वाढली.

श्वेताचा पती उदारमतवादी होता. पण त्याला वाटले की आपले घर तुटत आहे. त्यामुळे त्याने आकाशसोबतच्या श्वेताच्या मैत्रीवर निर्बंध घातले.

या दोन्ही घटनांमध्ये मदत करणाऱ्या आणि चांगल्या मित्राला गमवावे लागले, कारण त्यांना त्यांच्या सीमांचे भान ठेवता आले नाही.

आजची शिक्षणप्रणाली, धावपळीचे जीवन आणि विचारांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे स्त्री-पुरुषामधील मैत्री ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ती टिकवताना काही खास गोष्टींवर लक्ष न ठेवल्यास हीच मैत्री दु:ख किंवा अपमानास कारणीभूत ठरते.

हे खरे आहे की आपण ज्या समाजात राहतो तो वैचारिकदृष्टया कितीही प्रगत झाला असला तरी त्याची दोरी अजूनही मध्ययुगीन अंधसंस्कारांच्या हातात आहे. या व्यवस्थेत स्त्रीच्या मर्यादा आधीपासून ठरवल्या आहेत. त्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री निभावणे हे मोठे आव्हान आहे.

शाळा, कॉलेजमध्ये अशी मैत्री ग्रुपला सोडून दोघांमधील वैयक्तिक गाठीभेटीत अडकते, तेव्हा धोका वाढतो. ते वयच असे असते, ज्याला मुलेही काहीच करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत सोशल मिडियासुद्धा एक मोठे आव्हान आहे. शाळेच्या दिवसांत मिळालेला एकांत मुला-मुलीतील साध्या मैत्रीला धोकादायक वळणावर घेऊन जातो. आपसात समजूतदारपणा नसेल आणि मजामस्ती, फ्लर्टच्या सीमेचे लग्नानंतरही भान ठेवले नाही तर मैत्री भारी पडू शकते.

स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत स्पर्श आणि डोळे हे आव्हान आहे. त्याच्या चुकीच्या प्रयोगाने मैत्रीचा अर्थ बदलतो. अशा मैत्रिला रोमान्स आणि सेक्समध्ये बदलणे शक्य नसेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवा किंवा अशा मैत्रीला गुडबाय करणेच चांगले.

आजकाल दृश्य माध्यमांत स्त्री-पुरुषातील मैत्री मीठ-मसाला लावून दाखवली जाते. याचा सर्वसामान्यांवर खोलवर परिणाम होतो. लोक स्त्री-पुरुषाच्या सामान्य मैत्रीवरही उलटसुलट प्रश्न करतात.

या सर्वांव्यतिरिक्त वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या विरुद्ध लिंगी व्यक्तिची मैत्री मोठे आव्हान असते. ही मैत्री निभावणे आणि वैवाहिक जीवनही आनंदी ठेवणे सर्वांसाठीच शक्य नसते.

आजही लॉजिक आणि उपयोगापेक्षा पूर्वापारच्या प्रथांनुसारच मत व्यक्त केले जाते. त्यामुळे अशाप्रकारच्या मैत्रीला गैरसंबंधांचेचे नाव दिले जाते. समाज आणि नातेवाईकांकडे दुर्लक्ष करून मैत्री निभावणे योग्य नाही. त्यामुळे पतिला सोबत घेऊनच पुढे जाणे, सत्य सांगणे हेच योग्य.

सोशल मिडियाचा गैरवापर

सोशल मिडियावर खासगी चॅटिंग खूपच धोकादायक आहे. जेव्हा दोघेही नादानपणे वागतात, तेव्हा चांगली मैत्री तुटण्याच्या मार्गावर असते.

नाते आकर्षणाचे

स्त्री-पुरुषामध्ये स्वाभाविक संबंध आकर्षण हा आहे. छोटीशी जरी चूक झाली तरी दोघांमध्ये शारीरिक, मानसिक आकर्षणाचे हार्मोन्स उत्तेजित होतात. ही चूक मैत्रीवरच प्रश्न उपस्थित करते.

डोळे बोलतात

डोळे बोलतात आणि स्पर्श मेलेल्यालाही जिवंत करतो. यामुळे स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत डोळयांचे भाव अर्थाचा अनर्थ करू शकतात. स्पर्श भावनेत वाहवत जाण्यास भाग पाडतो. ही मैत्री रोमांसमध्ये बदलू शकत नसेल तर वेळीच सांभाळा. अशावेळी उपाय हाच आहे की त्याच्या कथित गोष्टीवर जास्त लक्ष देऊन टेंशन घेण्याऐवजी तुमचे हावभाव स्वच्छ ठेवा. शक्य असेल तर जवळच्या लोकांना मैत्रीची स्पष्ट कल्पना द्या.

लग्नानंतर आणि लग्नासोबतच भिन्न लिंगी व्यक्तिशी मैत्री चांगल्याप्रकारे टिकवण्याबाबत रिलेशनशिप प्रशिक्षक आणि लेखक रशेल डी आल्टो यांचे म्हणणे आहे की मैत्री रोमांसमध्ये बदलणे शक्य नसेल तर मैत्रीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हे स्पष्ट करा. लग्न झाले असल्यास ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे.

वैवाहिक जीवन निभावतानाच विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री कशी टिकवाल :

* तुम्ही पती असाल किंवा पत्नी, विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री करायचीच असेल तर मित्र असा हवा, जो तुमचे वैवाहिक संबंध अधिक मजबूत करू शकेल. जसे की तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र तुमच्या पत्नी किंवा पतिचा चांगला मित्र बनून त्याला योग्य सल्ला देण्यास लायक असेल. त्याच्यात एवढा समजूतदारपणा हवा की तो दाम्पत्याच्या नात्याला महत्त्व देईल आणि स्वत:चे नाते तुमच्या नात्यावर ओझे होऊ देणार नाही.

* लग्न संबंध कायम ठेवणे केवळ स्वत:साठीच नाही तर मुलांचे सुरक्षित भविष्य आणि सामाजिक हितासाठीही गरजेचे आहे. अशा वेळी पती किंवा पत्नीला आपल्या जोडीदाराच्या विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री आवडत नसेल आणि लाखो प्रयत्नांनंतरही जोडीदार समजून घ्यायला तयार नसेल तर वैवाहिक जीवनालाच महत्त्व द्या.

* वैवाहिक नात्यात राहून विरुद्ध लिंगी व्यक्तिच्या मैत्रीबाबत असूया महत्वाची गोष्ट आहे, जी पती किंवा पत्नीला जोडीदाराच्या मित्राबाबत वाटू शकते किंवा मित्राला आपल्या मित्राच्या पती किंवा पत्नीबाबत. अशा वेळी पती किंवा पत्नीच्या रूपात आपली परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होते.

* लग्नानंतर अशा विरुद्ध लिंगी मैत्रीत स्पर्श, द्विअर्थी बोलणे, भावनात्मक मागणी आणि फ्लर्ट वगैरे यापासून सांभाळा. मैत्री सहज, सरळ आणि निखळ ठेवा. तुमच्या मित्राकडून चुकीचा संकेत मिळाल्यास हे तुमचे कर्तव्य आहे की ते वेळीच रोखा. तुमची बाजू स्पष्टपणे मांडा.

लग्नासोबतच विरुद्ध लिंगी मैत्री टिकवण्यात खूप आव्हाने असतात. प्रत्यक्षात लग्न असो किंवा मैत्रीची माळ, दोन्ही भावना आणि त्यागाच्या छोटया छोटया मोत्यांनी बनते. यातील काही मोती निखळले तर नाती सांभाळणे कठीण होते.

चला, एकमेकांना समजून घेऊया

– गीता शिंदे

मला आजपर्यंत समजू शकला नाहीस’ ‘तुला समजून घेणं खूप अवघड आहे, तू मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केलास,’ ‘मी तुला कधीही समजू शकणार नाही. ‘तू मला समजून घेऊ शकली असतीस तर किती बरं झालं असतं.’

अशा प्रकारचे संवाद अनेक दाम्पत्यांमध्ये वेळोवेळी होत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवल्यानंतरही दाम्पत्यांची एकमेकांबद्दल तक्रार असते की अजूनही ते एकमेकांना समजून घेऊ शकले नाहीत. रोजच्या आयुष्यातही ते वारंवार एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून दोष देताना दिसून येतात. कधीकधी तक्रारींच्या रूपात मनातला क्षोभ बाहेर पडतो. तर कधी ओल्या लाकडाप्रमाणे आयुष्यभर दोघेही मनातल्या मनात धुमसत राहतात.

‘अ’ यांना असं वाटत की त्यांची पत्नी गमतीने बोललेली एखादी गोष्टही गंभीरपणे घेते, खरी मानते आणि मग रुसून बसते. ‘‘आम्ही दोघं आता वयस्कार होऊ लागलो तरी अजूनपर्यंत ती मला समजू शकलेली नाही. मी गमतीने बोललेल्या गोष्टीही ती उगाचच गंभीरपणे घेऊन मनाला लावून घेते.’’

‘ब’ यांना वाटतं की त्यांचे पती त्यांची निष्ठा आणि समर्पण आजपर्यंत समजूच शकलेले नाहीत. ‘‘कोणत्याही पुरुषाबरोबर मग भले तो नात्याने माझा भाऊ का असेना, बोलणं, भेटणं ते सहन करू शकत नाहीत. शेवटी मी दोन मुलांची आई आहे. आणि संपूर्ण प्रामाणिकपणे मी त्यांना समर्पित केलं आहे तरीही हा माणूस मला समजून घेऊ शकत नाही.’’

‘क’ यांची तक्रार आहे की, माहेरची श्रीमंत असणारी त्याची पत्नी माहेरच्यांसमोर तोरा मिरवण्यासाठी माझं संपूर्ण बजेट खलास करते. ते म्हणतात, ‘‘माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत हे तिला समजत का नाही? मोठ्या लोकांशी स्पर्धा करण्यासाठी देखावा करणं योग्य नाही. मी माझ्या आयुष्यात कसाबसा जमाखर्चाचा मेळ घालतोय आणि हिला मात्र आपल्या देखाव्यापुढे मुलांच्या भविष्याचीही चिंता नाही.’’

‘डी’ यांना आपल्या पत्नीबद्दल सेक्ससंबंधी खूप तक्रारी आहेत. ‘‘सेक्ससारख्या नाजूक, सुंदर आणि आयुष्यातला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला ती एक कर्तव्य समजते आणि एखादं काम उरकून टाकल्याप्रमाणे वागते. आज आम्हाला मुलं झाल्यानंतरही ते परमोच्च सुख मात्र मला मिळालं नाही जे कुणाही पुरुषाला हवंहवसं वाटतं. ती माझ्या शारीरिक गरजा कधी गंभीरपणे समजूनच घेत नाही.’’

‘‘ई’ हिला वाटतं की, तिचा पती अन्य पतींप्रमाणे सर्वांसमोर आपलं प्रेम प्रकट का करत नाही?’’ मी जेव्हा एखाद्या पार्टी किंवा समारंभात इतर पुरुषांना आपापल्या पत्नीचे नखरे सांभाळताना पाहते तेव्हा मलाही वाटतं की, त्यांनीही माझ्यासोबत अशा दिलखेचक ढंगात वागावं. पण ते माझी ही रोमॅण्टिक इच्छा कधी समजूनच घेत नाहीत. ते नेहमीच सभ्यपणे आणि गंभीरपणे वागतात.

दोघंही एकेक पाऊल पुढे टाका

लग्नानंतर वर्षभराने कोणत्या तरी समारंभात दिव्याने जेव्हा आपल्या धाकट्या जावेला पाहिलं तेव्हा ती तिच्याकडे पाहतच राहिली. घट्ट जीन्सवर अगदी नाममात्र स्तिव्हलेस टॉप, रंगवलेले रूक्ष केस, अनावश्यक मेकअपचे थर दिलेला चेहरा. कुठे तिचे सभ्य, सौम्य आणि गंभीर स्वभावाचे प्राध्यापक दीर आणि कुठे ही चटक चांदणी. विवेकना तर केवळ साडी नेसणारी, लांब केसांची भारतीय पारंपरिक स्त्री आवडत होती. मग हा कायापालट कसा? इथेही तोच हताश स्वर, ‘‘काय सांगू, मी तर तिला समजावून थकलो. आपण ज्या समाजात राहतो तशीच वागणूक, कपडे हवेत ना?

जोडीदार स्वत:विषयी काही सांगू पाहतो आणि दुसरा मात्र त्याच्याबद्दल सर्व काही जाणत असूनही अज्ञानीपणाचा बुरखा पांघरून आपल्या जोडीदाराची उपेक्षा करतो, तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते. खरं तर अशा प्रकारची अवहेलना कोणत्याही संवेदनशील माणसाला आतून उद्ध्वस्त करते. पतिपत्नी दोघं आपापल्या आवडीनिवडीनुसार दोन वेगवेगळ्या बाबींवर अडून राहतात तेव्हा नातं तुटायला वेळ लागत नाही. मात्र, दोघांनी आपले विचार आणि आवडीनिवडींमध्ये थोडी तडजोड केली आणि दोन दोघंही २-२ पावलं मागे सरकले तर नातं तुटण्यापासून वाचू शकतं.

जोडीदाराचे विचार जाणून घ्या

अत्यंत लाडात वाढलेली आईवडिलांची एकुलती एक मुलगी श्वेता काहीशी लाजरीबुजरी होती. तिचा पती विकास प्रत्येक छोट्याटोट्या गरजांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचा. तरीही विकासला आपली पर्वाच नाही असं श्वेताला वाटायचं. तो आईबाबांसारखी आपली ‘काळजी’ घेत नाही वगैरे. मात्र, दुसरीकडे विकासला वाटायचं की तो श्तेवावर इतकं प्रेम करतो, तिची इतकी काळजी घेतो, पण श्वेताकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. वरून फटकळ असणारी श्वेता सतत तक्रारी करून त्याचं भावुक मन दुखावते.

पत्नीच्या सततच्या अवहेलना आणि दोष देण्याच्या स्वभावामुळे विकास आतून कोलमडून गेला आणि त्याला हृदयरोग जडला. आज लग्नाला १५ वर्षं झाल्यानंतरही त्याला सतत गुदमरतच जगावं लागत आहे. ‘यू एस रिव्ह्यू ऑफ द हार्ट असोसिएशन’ने संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला आहे की, वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून न घेतल्याने होणारी गुदमरलेपणाची भावना बहुदा हृदयासंबंधीच्या समस्यांना जन्म देते. खरं तर जी व्यक्ती दुसऱ्यांच्या भावनांची कदर करते ती इतरांकडूनही तशीच अपेक्षा ठेवते. पतिपत्नीचं नातं तर पूर्णपणे देवाणघेवाणीवर आधारलेलं असतं. कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.

पतिपत्नींनी एकमेकांच्या वागणुकीपेक्षा एकमेकांचे विचार समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. कधीकधी आपण प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराची इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण आपले प्रयत्न तर प्रामाणिक असतात. म्हणूनच जोडीदाराने दुसऱ्याची अगतिकता आणि मर्यादा समजून घ्यायला हव्यात.

भावनांचा आदर करायला शिका

लग्नाच्या २५व्या वाढदिवशी जेव्हा सुनंदाच्या मुलीने तिला सतार भेट दिली तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. पतीने नाही, पण मुलीने तरी आपल्या भावना जाणल्या. लग्नापूर्वी सुनंदा एक उत्तम कलावती होती. सतार वाजवणं हा केवळ तिचा छंद नसून तिच्या आनंदाचा एक भाग होता. पण लग्नानंतर तिचा हा ‘मानसिक खुराक’ बनलेला छंद नजरेआड झाला. सतारीचं तुणतुणं वाजवून काय उपयोग? व्यवसाय म्हणूनही याचा वापर केलास तरी काही फायदा नाही. काही करायचंच असेल तर एखादी चांगली नोकरी कर. तेवढाच कुटुंबाला हातभार..’’ पतीने तिला सांगितलं.

मग काय, सुनंदाने आपल्या छंदाला तिथेच गाडून टाकलं. मुलांच्या चांगल्या पालनपोषणासाठी पतीसोबत स्वत: चांगली नोकरी स्वीकारली आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहिली. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिची ही सुंदर इच्छा कुठेतरी जागृत होती.

केवळ शरीराचं नाही, मनोमीलनही आवश्यक

जर थोडंसं समजूतदारपणे वागलं तर पतिपत्नींनी एकमेकांना समजून न घेण्याचं दु:ख बऱ्याच अंशी कमी होईल. लग्नानंतर पतिपत्नीचं शारीरिक मीलन तर होतं, पण बऱ्याच वेळा समजूतदारपणाच्या अभावामुळे त्यांचं मनोमीलन होऊ शकत नाही. मग इथूनच अनेक समस्या सुरू होतात. माणसाचं सर्वात संवेदनशील अंग, जे माणसाचं मन अस्पर्शितच राहतं. म्हणूनच लग्नानंतर सर्वात आधी आपल्या जोडीदाराचं मन, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी आणि सवयी जाणून घ्यायचा प्रयत्न करावा.

एकदुसऱ्यांना समजून घेतल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयी यांच्यासोबतच त्यांच्यातील कमतरतेबाबतही तडजोड करणं आवश्यक आहे. कारण निसर्गात परिपूर्ण असं काहीच नसतं. म्हणूनच पतिपत्नीनी एकमेकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नये.

एकमेकांच्या मर्यादा आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे समजुतीने आणि मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या जोडीदाराला योग्य प्रकारे समजून घेऊन आपण एक निरोगी आणि यशस्वी वैवाहिक आयुष्य जगू शकता.

पती जेव्हा विश्वासघात करतात…

– सरस्वती

आयशाला आपल्या पतीकडून घटस्फोट घ्यायचा आहे. कारण तिच्या पतीचे कोणा दुसऱ्या स्त्रीशी संबंध आहेत. आयशाने २ वर्षांपूर्वीच आयुषशी लग्न केलं होतं. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण एकेदिवशी आयशाला कळलं की तिचे पती ऑफिसमधून बाहेर पडून कोणा दुसऱ्या स्त्रीकडे जातात. आयशा अजून आई झाली नाहीए. त्यामुळे आयुषपासून वेगळं व्हायला तिला कसलीच अडचण नाही. पण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या सगळं काही जाणूनसुद्धा आपले कुटुंबीय आणि मुलांखातर घटस्फोट घेऊ शकत नाहीत.

हे सत्य आहे की विश्वासघातकी जोडीदार कधीच खरा जोडीदार बनू शकत नाही. एकदा विश्वास गमावला की नात्यामध्ये कायमस्वरूपी कडवटपणा निर्माण होतो. आणखी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की पतीचा विश्वासघात सोसणारी स्त्री फक्त एक पत्नीच नसते, तर आईदेखील असते. त्यामुळे पतीशी संबंध बिघडण्याचा मुलांच्या संगोपनावरही वाईट प्रभाव पडतो. विश्वासघात किंवा कृतघ्नपणा प्रत्येक स्त्रीला बोचतो. मग ती कितीही वयाची असो. कृतघ्न जोडीदाराशी कसं वागायचं याचा निर्णय फारच विचारपूर्वक आणि समजूतदारपणे करावा.

योग्य निर्णय घ्या

तुमच्यासोबत विश्वासघात होत आहे या गोष्टीची जेव्हा तुम्हाला जाणीव होते तेव्हा एक आई असल्यामुळे तुम्हाला कधीकधी एखादा कठीण निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही अविश्वासयुक्त वातावरणात राहाण्याऐवजी वेगळं राहाणंच पसंत कराल आणि नातं तोडण्याचा प्रयत्न कराल. पण तुम्ही तुमच्या मुलांसमोर आपल्या अयशस्वी नात्याचं उदाहरण ठेवू इच्छित नसाल,  कुटुंबीयदेखील असा विचार करत असतील की तुम्ही नातं तुटू नये, तुम्ही दडपण आणि नैराश्यात जगत असाल आणि तुमचं आयुष्य फारच कठीण झालं असेल तर समजून जा की आता निर्णयाची वेळ आहे. मग एक तर तुम्ही पतीकडून वचन घ्या की भविष्यात त्यांनी तुमचा विश्वासघात करू नये किंवा त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घ्या. तुमचा योग्य निर्णय तुमचं आयुष्य पुन्हा रूळावर आणू शकतं.

मुलांना आश्वासित करा

तुम्ही जर तुमच्या पतींची वागणूक आणि त्यांच्या कृतघ्नतेला वैतागून त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेत असाल तर तुमचा हा निर्णय आपापसांतील संगनमताने व्हायला हवाय. आपल्या मुलांना तुम्ही विश्वासात घेऊन सांगा की तुमच्या घटस्फोटाच्या निर्णयाचं त्यांच्या आयुष्याशी काहीच देणंघेणं नाहीए. त्यांना आधीपेक्षाही जास्त चांगलं जीवन देण्याचं आश्वासन द्या. त्यांना सांगा की, वेगवेगळे राहूनसुद्धा तुम्ही त्यांना पूर्वीसारखंच भरपूर प्रेम कराल.

लक्षात ठेवा, तुमचं नातं तुटल्याने जितका त्रास तुम्हाला होईल त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तुमच्या मुलांना होईल. एक तर आपल्या आईचा घटस्फोट होण्याचं दु:ख आणि दुसरं आपल्या वडिलांपासून दूर जाण्याचं दु:ख, जर लहान मुलं आपल्या आईजवळ असतील.

मुलांच्या प्रश्नांसाठी तयार राहा

लक्षात ठेवा, मुलं या गोष्टीचा आधी विचार करतात की त्यांचे आईवडील वेगळे झाल्यावर त्यांचं आयुष्य कसं होईल. म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आधीपासूनच तयार राहा. जसं की, घर सोडून कोण जाईल, आमच्या सुट्टया कशा जातील? बाबांच्या वाटणीचं काम आता कोण करेल, इत्यादी.

तुम्ही माफ करू शकता का?

जर तुमच्या पतींना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होत असेल आणि ते तुम्हाला वारंवार सॉरी बोलत असतील तर एकदा थंड डोक्याने विचार करून बघा की तुम्ही त्यांना माफ करू शकता की नाही? तुम्ही भविष्यात त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? तुम्ही झालेल्या गोष्टी विसरू शकता का? हे असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि आपल्या भावनांचा मान राखून निर्णय घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, सगळं काही विसरून नातं टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पतींना त्यांच्या कृत्याची शिक्षा देऊ शकणार नाही.

नातं वाचवण्याचा प्रयत्न करा

तुमच्या पतींनी जर फक्त एकदाच चूक केली असेल आणि ते त्यासाठी माफी मागत असतील तर घटस्फोटासारखा कठीण निर्णय तुमच्या आयुष्यासाठी चांगला होऊ शकत नाही. हे तुम्हाला ऐकायला चांगलं वाटत नसलं तरी हेच सत्य आहे. काही लोकांचं असं मत असतं की त्यांनी एकदा विश्वासघात केला म्हणजे तो कायम करणार. पण हा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचं नातं टिकवून ठेवून आपल्या आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात बरंच काही वाचवू शकता.

मुलांना सांगू नका

आपल्या मुलांना हे कधीच सांगू नका की, तुम्ही त्यांच्या वडिलांना कोणा दुसऱ्या स्त्रीबरोबर असलेल्या संबंधामुळे सोडत आहात. असंही होऊ शकतं की ते तुमच्यासाठी एक चांगले पती ठरले नसतील, पण आपल्या मुलांसाठी कदाचित ते एक चांगले वडील ठरतील. म्हणून तुम्ही जर त्यांना त्यांच्या वडिलांच्या अफेअरबद्दल सांगाल तर त्यांच्या बालमनाला ठेच लागेल आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागेल.

मुलांना माध्यम बनवू नका

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पतींना हर्ट करण्यासाठी आपल्या मुलांचा वापर करू शकता, जे योग्य नाही. असं करून तुम्ही तुमच्या मुलांचं त्यांच्या वडिलांशी संबंध बिघडवत आहात. मुलांना स्वत: निर्णय घेऊ द्या की त्यांचा त्यांच्या वडिलांच्या बाबतीत काय विचार आहे. थोडे मोठे झाल्यावर ते असं करू शकतात.

आज शहरांमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांत फार वाढ होऊ लागली आहे, ज्यामध्ये ८०टक्के कारणं जोडीदाराची कृतघ्नता असते. आज स्त्रिया आत्मनिर्भर होऊ लागल्यात. नात्यांमध्ये असा कडवटपणा घेऊन जगणं त्यांना अजिबात मान्य नाही. हे सत्य आहे की, कृतघ्न जोडीदाराबरोबर राहाण्याचा निर्णय घेणं फारच कठीण आहे, पण एका नात्यामुळे इतर नात्यांचाही उगाच बळी जात असेल तर कदाचित हा विचार करून शक्यतो नातं टिकवण्याचा एक प्रयत्न जरूर करावा. पतीपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबरोबरच पतींचं संपूर्ण कुटुंबदेखील वेगळं होत असतं. मुलांपासून त्यांचे वडील तर दुरावतातच शिवाय त्यांचे आजीआजोबा, आत्या, काका म्हणजे संपूर्ण कुटुंबच त्यांच्यापासून दुरावतं. घटस्फोटाच्या कठीण निर्णयामुळे फक्त तुमच्या एकटीचंच नव्हे, तर इतरही अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. त्यामुळेच नातं वाचवण्याचा पुढाकार घेणं ठीक नाही. लक्षात ठेवा, जो आनंद सर्वांसोबत जगण्यात आहे तो एकटे जगण्यात अजिबात नाही.

सासूसुनेचे नाते नवे

– पूनम अहमद

संडे होता. फुटबॉलची मॅच चालू होती. विपिन टीव्हीला डोळे लावून बसला होता. रियाने अनेक वेळा प्रयत्न केला की विपिनने टीव्ही पाहणे सोडून तिच्यासोबत मूव्ही पाहायला यावे, पण तो काहीही प्रतिक्रिया देत नव्हता.

अधुनमधून एवढेच म्हणत होता, ‘‘मॅच संपू दे, मग बोलतो.’’

तिथे जवळच बसून मासिक वाचणारी मालती मुलगा व सुनेचे बोलणे ऐकून हळूच हसत होती. सुधीश म्हणजेच तिचे पतीही मॅच पाहण्यात व्यस्त होते. मालतीला आपला भूतकाळ आठवला. सुधीशनाही टीव्हीवर मॅच पाहणे खूप आवडत होते. मालतीलाही मूव्ही पाहण्याचा फार शौक होता. खूप हट्ट केल्यानंतर सुधीश तिला घेऊन जात असत, परंतु चांगल्यातली चांगली मूव्ही पाहूनही सुधीश ज्याप्रकारे प्रतिक्रिया देत, ते पाहून मालतीला वाटत असे, यांना सोबत न्यायलाच नको होते.

मालतीने गुपचूप रियाला आत चलण्याचा इशारा केला, तेव्हा रियाला आश्चर्य वाटले. मग मालतीच्या मागोमाग ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि विचारले,‘‘आई काय झाले?’’

‘‘कोणती मूव्ही पाहायची आहे तुला?’’

‘‘सुलतान.’’

मालती हसली, ‘‘तिकिटे मिळतील का?’’

‘‘जाऊन पाहावे लागेल, पण विपिन जागचा हलेल, तेव्हा ना…’’

‘‘त्याचे सोड, तो हलणार नाही. तू तयार हो.’’

‘‘मी एकटी?’’

‘‘नाही गं बाई, मलाही बघायची आहे.’’

‘‘काय?’’ रियाला आश्चर्य वाटले.

‘‘म्हणजे काय मलाही खूप शौक आहे. या बाप-लेकाला मॅच सोडून जबरदस्ती मूव्ही पाहायला नेले, तरी तिथेही हे दोघे एन्जॉय थोडेच करणार आहेत. आपल्याही उत्साहावर पाणी फेरतील. चल, निघू या. मूव्ही पाहू आणि मग डिनर करूनच परत येऊ.’’

रिया मालतीच्या कुशीत शिरली आणि खूश होत म्हणाली, ‘‘थँक्यू आई, किती बोअर वाटत होतं मला. संडेचा संपूर्ण दिवस विपिन टीव्हीला चिकटलेले असतात.’’

दोघी सासू-सून तयार झाल्या.

सुधीश आणि विपिनने विचारले, ‘‘कुठे निघालात?’’

‘‘मूव्ही पाहायला.’’

दोघांना जणू करंटच लागला. सुधीश म्हणाले, ‘‘एकटी?’’

मालती हसून म्हणाली,‘‘एकटी कुठे आहे, सुन आहे ना सोबत. चला बाय, तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवलेय. आम्ही बाहेरच जेवू,’’ एवढे बोलून मालती रियाला घेऊन झपझप पावले टाकीत निघून गेली.

सासू-सुनेने अगदी मैत्रिणींप्रमाणे ‘सुलतान’ चित्रपटाचा आनंद लुटला. त्या कधी सलमानच्या बॉडीवर चर्चा करीत होत्या, तर कधी एखाद्या सीनवर मोकळेपणाने बोलून हसत होत्या. खूप चांगल्या मूडमध्ये मूव्ही पाहून दोघींनी छानपैकी डिनर केले. रात्री १० वाजता दोघी आनंदात घरी परतल्या. आता बापलेकाची मॅच संपली होती आणि दोघे बोअर होत होते.

त्यानंतर रिया आणि मालतीमधील सासू-सुनेचे नाते दोन मैत्रिणींमध्ये बदलले. जेव्हा सुधीश आणि विपिन एखादा प्रोग्राम बनविण्यात टाळाटाळ करायचे, तेव्हा दोघी त्यांना विचारतही नसत. त्या शॉपिंगला एकत्र जाऊ लागल्या. कारण दोघे पुरुष लेडीज शॉपिंगमध्ये बोअर होत असत. दोघींनाही दुसऱ्या कुणा मैत्रिणीची गरजच वाटत नव्हती. रियाही ऑफिसला जात असे. सुट्टीच्या दिवशी तिला बाहेर एन्जॉय करायचे असायचे आणि विपिनला मॅच बघायची असायची. बाप व मुलगा दोघांनाही फूटबॉलचे वेड होते. रिपिट मॅचही ते आवडीने पाहात असत. त्यांना मूव्हीज, शॉपिंगचे अजिबात वेड नव्हते. रिया आणि विपिन आता या गोष्टीवरून मूड खराब करीत नव्हते. चौघेही आपापला शौक पूर्ण करीत होते.

एकमेकींबरोबर वेळ घालविल्यामुळे एकमेकींचा स्वभाव, आवडनिवड जाणून घेतल्यानंतर दोघी एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असत.

आता स्थिती अशी होती की, विपिन कधी फ्री असे, तेव्हा रिया म्हणत असे, ‘‘तुझं राहू दे. मी आईसोबत जाईन. तू तर शॉपच्या बाहेर फोनवर बिझी होतोस. मग मला बोअर वाटतं.’’

विपिन मग त्रस्त होत असे. सुधीशसोबतही असेच होऊ लागले. रिया फ्री असे, तेव्हा मालतीला रियाचीच कंपनी जास्त आवडत असे. सासू-सुनेचे बाँडिंग पाहून दोघे बाप-मुलगा चकित होत असत.

अनेक वेळा ते बोलूनही दाखवित, ‘‘तुम्ही दोघी आम्हाला विसरलात.’’

घरातील वातावरण हलकेफुलके आणि आनंदी राहात होते.

प्रत्येक घरात सासू-सुना मैत्रिणी बनल्या, तर जगण्यात आणखी मजा येईल. म्हणूनच दोघींनीही एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवून, एकमेकांचे सुख-दु:ख, आवडनिवड मनापासून जाणून घेतली पाहिजे. पतिपत्नीचे शौक एकसारखे असावेत, हे आवश्यक नाही. दोघांनी आपले मन मारणे योग्य नाही. जर पिता-पुत्राचे शौक सासू-सुनेशी जुळत नसतील आणि सासू-सुनेची आवड एकमेकींशी जुळत असेल, तर आपल्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी एकमेकींना साथ अवश्य द्यावी.

अजून एक उदाहरण पाहू. एका हिंदू कुटुंबात जन्मलेली आणि वाढलेली सुमन जेव्हा एका मुस्लीम मुलाशी समीरशी आंतरजातीय विवाह करून सासरी गेली. तेव्हा सासू अबिदा बेगमला सुमन शाकाहारी आहे हे कळलं, तेव्हा ती केवळ शाकाहारीच जेवण बनवू लागली.

सुमन समीरसोबत राहात होती. ती जेवढे दिवस सासरी कानपूरला राहात असे, तेवढे दिवस घरात केवळ शाकाहारी जेवणच बनत असे. या गोष्टीमुळे सुमनच्या मनात सासूबद्दल एवढे प्रेम आणि आदराचे बीज रोवले गेले की काळानुसार सुमनच्या मनात त्याची पाळे-मुळे घट्ट झाली. दोन वेगळया वातावरणात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सासू-सुनेमधील ताळमेळ पाहून सर्वजण कौतुक करू लागले.

खूप शांत आणि अतिगंभीर दिसणारी अबिदा बेगम जेव्हा हसऱ्या सुमनसोबत हसून बोले, तिच्यासोबत आनंदाने बाहेर जाई, तेव्हा तिचे पती आणि मुलगा चकित होत असत.

आजकालच्या बहुतेक सासवा जुन्या चित्रपटातील ललिता पवारसारख्या नाहीत. त्यांनाही सुनांसोबत हसत-खेळत जीवन जगायचे आहे. जीवनात अपूर्ण राहिलेले शौक आणि आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत.

आजच्या बहुतेक सुनाही शिकलेल्या आणि समजदार आहेत. त्या आपली कर्तव्ये आणि अधिकारांबाबत जागरूक आहेत. त्या नोकरदार आहेत. सुट्टीच्या दिवशी त्यांना रिलॅक्स व्हायची इच्छा असते. सासूची प्रेमळ साथ मिळाली, तर त्यांच्यातही उत्साह संचारतो.

आजच्या सासू-सुना दोघीही जाणतात की, एकमेकींसोबत मिळतंजुळतं घेण्यातच खरा जीवनाचा आनंद आहे. भांडणे करून स्वत:चे आणि दुसऱ्याचे आयुष्य संकटात टाकण्याने काहीही फायदा नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने त्रास वाढणार, एवढे नक्की.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें