* दीपान्विता राय बॅनर्जी
कॉलेजच्या दिवसांत सुभाष नेहाला नोट्स वगैरे देऊन तिची खूप मदत करायचा. त्यानंतर नेहाचे लग्न ठरले तरी तो बिनधास्त तिच्या घरी जायचा. तिचा भावी पती आणि सासरच्यांसमोरही कधीही तिला फोन करायचा. हे सर्वांना खटकू लागताच नेहाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुभाष रागावला आणि विनाकारण नेहावर भावनिक दबाव आणू लागला.
तिकडे नेहाच्या भावी पतिनेही नेहाला सुभाषसोबतचे नाते संपवण्यास सांगितले. नेहा दोन्ही बाजूंनी अडकली. शेवटी तिला सुभाषला कायमचे गुडबाय करावे लागले. साधी मैत्री ती का टिकवू शकली नाही, हे सुभाष समजू शकला नाही.
श्वेता आणि आकाश एकाच शाळेत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. लग्नानंतरही आकाशचे तिच्या घरी येणे-जाणे होते. सोशल मिडियावर श्वेताने प्रायव्हसी शेअर केल्याने आकाशची हिंमत वाढली.
श्वेताचा पती उदारमतवादी होता. पण त्याला वाटले की आपले घर तुटत आहे. त्यामुळे त्याने आकाशसोबतच्या श्वेताच्या मैत्रीवर निर्बंध घातले.
या दोन्ही घटनांमध्ये मदत करणाऱ्या आणि चांगल्या मित्राला गमवावे लागले, कारण त्यांना त्यांच्या सीमांचे भान ठेवता आले नाही.
आजची शिक्षणप्रणाली, धावपळीचे जीवन आणि विचारांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे स्त्री-पुरुषामधील मैत्री ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ती टिकवताना काही खास गोष्टींवर लक्ष न ठेवल्यास हीच मैत्री दु:ख किंवा अपमानास कारणीभूत ठरते.
हे खरे आहे की आपण ज्या समाजात राहतो तो वैचारिकदृष्टया कितीही प्रगत झाला असला तरी त्याची दोरी अजूनही मध्ययुगीन अंधसंस्कारांच्या हातात आहे. या व्यवस्थेत स्त्रीच्या मर्यादा आधीपासून ठरवल्या आहेत. त्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री निभावणे हे मोठे आव्हान आहे.
शाळा, कॉलेजमध्ये अशी मैत्री ग्रुपला सोडून दोघांमधील वैयक्तिक गाठीभेटीत अडकते, तेव्हा धोका वाढतो. ते वयच असे असते, ज्याला मुलेही काहीच करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत सोशल मिडियासुद्धा एक मोठे आव्हान आहे. शाळेच्या दिवसांत मिळालेला एकांत मुला-मुलीतील साध्या मैत्रीला धोकादायक वळणावर घेऊन जातो. आपसात समजूतदारपणा नसेल आणि मजामस्ती, फ्लर्टच्या सीमेचे लग्नानंतरही भान ठेवले नाही तर मैत्री भारी पडू शकते.