* प्रियंका यादव
प्रत्येकाला वयाच्या २४व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे वाटत असते. पण, तुम्ही पलंगावर लोळत पडला असाल तर तुम्हाला चांगला पगार मिळणार नाही. चांगला पगार तर दूरच, तुम्हाला चांगली नोकरीही मिळणार नाही. त्यामुळे अंथरूण सोडून ध्येयाच्या दिशेने धाव घ्या, तरच तुम्ही भरघोस उत्पन्नाचे मोठे, ऐशीआरामी आयुष्य जगू शकाल.
याउलट, आळसामुळे तुम्ही अंथरुणावर पडून राहिलात तर तुम्हाला कधीही ऐशोआराआमाचे जीवन जगता येणार नाही. तुमच्या मित्रांना असे आयुष्य जगताना पाहून तुम्ही तुमचे डोकं खाजवत बसाल आणि स्वत:ला दोष देत बसाल की, आपणही वेळीच अशी मेहनत करायला हवी होती. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ येण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला वेळेत कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देतो. जर तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम केले तर तुम्ही तुमची स्वप्नं तर पूर्ण करालच सोबतच प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे खरेदी करण्यास देखील सक्षम असाल.
जर तुम्ही मेहनत करत असाल तर यश नक्कीच तुमच्या पायांवर लोळण घेईल. मधुरिमा चतुर्वेदी ही याचेच ज्वलंत उदाहरण आहे. मधुरिमा ३६ वर्षांची आहे. ती व्यवसायाने डेटा विश्लेषक असून गाझियाबादच्या इंदिरापूरम सोसायटीत राहाते. आज मधुरिमाकडे स्वत:च्या कमाईतून घेतलेली २ घरं आहेत. तिने स्वकमाईतून एक मर्सिडीजही घेतली आहे. पैसे कसे कमवायचे, हे तिला माहीत आहे, म्हणूनच तिने शेअर बाजारातही गुंतवणूक केली आहे.
मेहनत तर करावीच लागेल
मधुरिमा जन्मजात श्रीमंत होती, असे मुळीच नाही. तिने लहानपणी खूप संघर्ष केला. मधुरिमाच्या लहानपणीच तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. आईने कशीबशी छोटी-मोठी नोकरी करून मधुरिमाला वाढवले. सरकारी शाळेत शिकलेली मधुरिमा अभ्यासात खूप हुशार होती. तिला हे चांगलंच माहीत होतं की, स्वत:ला बदलायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल.
मधुरिमाने तिच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक बनवले होते. दहावीपासूनच तिने करिअरच्या नियोजनाला सुरुवात केली. तिला माहीत होते की, भविष्य घडवायचे असेल तर तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल.





