* पारूल भटनागर

जितका लग्नासाठी खास पोशाख आवश्यक असतो, तितकाच मेकअप आर्टिस्टही गरजेचा असतो, कारण तो आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवून त्याद्वारे पोशाखाचीही शोभा वाढवतो. परंतु जर त्याच्या निवडीमध्ये चूक झाली, तर तो आपला अविस्मरणीय दिवस खराब करेल. म्हणूनच जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्टची निवड कराल तेव्हा नीट माहिती काढा.

सौंदर्य तज्ज्ञ पूजा नागदेव सांगतात, यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीने फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाइटवरून त्यांचे संपर्क क्रमांक घ्या आणि भेटीची वेळ ठरवून त्यांच्याशी थेट बोला. त्यांनी यापूर्वी कोणत्या प्रकारचा मेकअप केला आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल की, त्या खास दिवशी कशा प्रकारचा मेकअप केला जाईल.

मेकअप ट्रेंडची माहिती हवी

मेकअप आर्टिस्ट असणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण मेकअप करण्यामध्ये स्वत:ला अपडेट ठेवणे प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या हातात नसते आणि आज तीच या क्षेत्रात स्वत:चा जम बसवू शकते जी मेकअपच्या नवनवीन तंत्रांचा अवलंब करून स्वत:ला कायम अपडेट ठेवते. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वत:साठी मेकअप आर्टिस्ट निवडाल तेव्हा सर्वात आधी त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, त्याला नवनवीन मेकअप ट्रेंडबद्दल किती माहिती आहे.

त्यासाठी तुम्हालाही थोडी माहिती घ्यावी लागेल, जसे की, त्या खासदिवशी मेकअप आर्टिस्ट तुमच्या चेहऱ्यावर काय मेकअप करणार आहे. मेकअपचे अनेक प्रकार आहेत, पण ते प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी भिन्न आहेत. त्यांना या आणि अशा इतर गोष्टींची माहिती आहे का, हे विचारा. जसे की :

हाय डेफिनिशन मेकअप : हा मेकअप तुम्हाला नॅचरल लुक देण्याचे काम करतो. तुमची त्वचा बेढब न बनवता त्वचेवरील डाग लपवून तिला नैसर्गिक स्वरूप देण्याचे काम करतो. जेव्हा चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसते, तेव्हा फोटोही खूप चांगले येतात, जी प्रत्येक वधूची इच्छा असते. त्यामुळे सेलिब्रिटी आणि मेकअप आर्टिस्ट अशा प्रकारच्या मेकअपला अधिक प्राधान्य देतात.

एअरब्रश मेकअप : डागविरहित आणि निरोगी त्वचेबद्दल बोलायचे झाल्यास एअरब्रश मेकअपपेक्षा काहीही चांगले नाही, कारण यात एअर गनच्या मदतीने मेकअप चेहऱ्यावर पसरवला जातो, ज्यामध्ये स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते. यात आधी सौंदर्य प्रसाधनाचा पातळ थर लावला जातो, ज्यामुळे चेहऱ्याला आकार येतो तसेच छिद्र आणि डागही सहज झाकले जातात. हा तुमच्या त्वचेला दीर्घकाळ वॉटरप्रुफ इफेक्ट मिळवून देतो.

मिनरल मेकअप : हा मेकअप चेहऱ्याला प्लॅस्टर केल्यासारखे दिसण्याऐवजी नॅचरल लुक देण्याचे काम करतो. खनिज घटकांपासून बनवलेल्या क्रीममध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतात. चेहऱ्यावरील छिद्रांना बंद होण्यापासून रोखण्यासोबतच तो वॉटरप्रुफही आहे. पुरळ येणारी त्वचा आणि संवेदनशील त्वचेसाठी याला सर्वोत्तम म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नैसर्गिक मेकअप : हा मेकअप त्वचेच्या प्रत्येक प्रकारासाठी अनुकूल आहे, कारण तो चेहरा भपकेबाज न करता उठावदार करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कमीत कमी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून चांगला परिणाम देण्याचा प्रयत्न केला जातो. नववधूला नैसर्गिक लुक हवा असेल, तर तिच्या चेहऱ्याला उठावदार करण्यासाठी या प्रकारच्या मेकअपचा वापर केला जातो.

हाय शाइन मेकअप : बऱ्याचदा या प्रकारचा मेकअप त्यांच्यासाठी केला जातो जे अधिक कोरडया आणि उच्च चमकदार मेकअपची मागणी करतात, कारण त्यात जास्त उजळपणा आणि चमक असते, जी चेहरा पूर्णपणे हायलाइट करण्याचे काम करते.

मॅट मेकअप : हा मेकअप चेहऱ्याला आरामदायक करून मॅट लुक देण्याचे काम करतो. तो बऱ्याचदा तेलकट त्वचा असलेल्या नववधूंना केला जातो. या मेकअपमध्ये तेल नसलेल्या उत्पादनांचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील डाग लपवताना फक्त ती उत्पादने त्वचेला चमकदार बनवण्याचे काम करतात. जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्ट निवडता तेव्हा त्याला विचारा की त्याला या सर्व गोष्टींची माहिती आहे की नाही.

ओळखीतला असायला हवा

हे शक्य आहे की, काही महिन्यांपूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली होती आणि तुम्हाला तिचा मेकअप खूप आवडला होता. आता संधी तुम्हाला मिळाली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी नवीन मेकअप आर्टिस्ट निवडण्यापेक्षा तुमच्या मैत्रिणीच्याच मेकअप आर्टिस्टला बोलावण्याची ही उत्तम संधी आहे, कारण तिने कोणत्या प्रकारचा मेकअप केला होता आणि त्या मेकअपमध्ये तुम्ही कशा दिसाल, हे तुम्हाला माहीत असेल.

ट्रायल मेकअप करेल तुमची मदत

तुम्ही हे ऑनलाइन ऐकलेच असेल की, ट्राय करा आणि खरेदी करा. मग मेकअपसाठीही याचे पालन करून फायदा घ्या. तुम्हाला जो कोणी मेकअप आर्टिस्ट निवडायचा असेल, त्याआधी ट्रायल मेकअप करून घ्या आणि शक्य असल्यास असा मेकअप आर्टिस्ट निवडा, जो ट्रायल मेकअप करत असेल, कारण याद्वारे ती मेकअप आर्टिस्ट कशा प्रकारे मेकअप करते हे तुम्हालाही माहीत होईल. शिवाय तिने केलेला मेकअप तुम्हाला न आवडल्यास तुमच्याकडे दुसरा मेकअप आर्टिस्ट निवडण्याचा पर्यायही असेल.

सौंदर्य प्रसाधनांबाबत जाणून घ्या

हे शक्य आहे की, तुम्ही निवडत असलेल्या मेकअप आर्टिस्टला ट्रेंडची चांगली माहिती असेल, परंतु ती नेहमी स्थानिक उत्पादने किंवा सौंदर्य प्रसाधने वापरत असेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्टची निवड करता तेव्हा ती मेकअप करताना कोणती सौंदर्य प्रसाधने वापरते हे विचारायला अजिबात संकोच करू नका, कारण केवळ सुंदर दिसणे हा उद्देश नसून प्रश्न त्वचेचा आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी तुम्ही सौंदर्य प्रसाधनांशी तडजोड करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही स्वत: तिच्याकडील सौंदर्य प्रसाधने, मेकअप किट पाहून घ्या. त्यावरून तुम्हाला बऱ्याच अंशी अंदाज येईल की, ती कोणत्या प्रकारच्या उत्पादनांचा किंवा सौंदर्य प्रसाधनांचा वापर करते, त्यांच्या स्वच्छतेची ती किती काळजी घेते.

२-३ मेकअप आर्टिस्टचे शुल्क तपासा

जेव्हा तुम्ही तुमच्या खास दिवसासाठी मेकअप आर्टिस्ट निवडता तेव्हा फक्त एका मेकअप आर्टिस्टशी बोलून निर्णय घेऊ नका, तर २-३ मेकअप आर्टिस्टशी बोला. ते कोणत्या प्रकारचे पॅकेज देतात, कोणता मेकअप करतात, कोणती सौंदर्य प्रसाधने वापरतात, हे पाहून त्या आधारावर, तुम्ही मेकअप आर्टिस्टची तुलना करून त्यानंतरच त्यांची निवड करा. यामुळे तुम्हाला योग्य मेकअप आर्टिस्ट निवडणे सोपे होईल, सोबतच तुम्ही तुमच्या बजेटचीही काळजी घेऊ शकाल.

सोशल मीडियावर सक्रिय आहे का?

आज बहुतेक जण सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांच्या मदतीने ते स्वत:चा आणि त्यांच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, तुम्हाला या माध्यमाद्वारे बरीच मदतही मिळू शकेल जसे की, पॅकेजबद्दल संपूर्ण तपशील, लोकांची त्याबद्दलची मते आणि वधूचे फोटो इत्यादी. यामुळे तुम्हाला मेकअप आर्टिस्ट निवडणे सोपे होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...