* शोभा कटारे
जेव्हा कधी आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे मॉर्निंग वॉकला म्हणजे सकाळी चालायला जायला हवे. मॉर्निंग वॉक हा सुदृढ आणि निरोगी राहाण्यासाठीच्या काही नियमांपैकी एक आहे. सकाळची ताजी हवा, स्वच्छ वातावरण आणि सूर्यकिरणांपासून मिळणारे ड जीवनसत्त्व, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मॉर्निंग वॉक तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निरोगी बनवतो आणि तुमच्या आत एंडोर्फिन आणि डोपामाइन हे आनंदी हार्मोन्स सोडतो, ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्यदेखील सुधारते, त्यामुळेच शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉकचा समावेश केला पाहिजे.
परंतु, काही लोक मॉर्निंग वॉक दरम्यान योग्य पोशाख किंवा कपडे निवडत नाहीत आणि त्यामुळे ते इतर लोकांचे लक्ष वेधून घेतात, शिवाय त्यांना आरामदायीदेखील वाटत नाही. म्हणून, व्यायाम कोणताही असो, योग्य पोशाख निवडणे आवश्यक आहे.
मॉर्निंग वॉकला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा :
* मॉर्निंग वॉकला जाताना तुमचा पोशाख हवामानानुसार असावा, जेणेकरून हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि तुम्ही व्यायाम करताना आरामदायी राहाल.
* नैसर्गिक सुती कापडाऐवजी, पॉलिस्टर, लाइक्रा आणि सिंथेटिक ब्लेंड अॅक्टिव्ह वेअर आउटफिट्स चांगले असतात, कारण ते लवकर सुकतात. तसेच, ते उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात.
* जर उन्हाळा असेल तर असे कपडे निवडा, जे सैल असतील आणि घाम सहज शोषू शकतील, जेणेकरून मॉर्निंग वॉक करताना घामामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटणार नाही आणि तुम्ही आरामदायीदेखील राहाल.
* हिवाळ्यात मॉर्निंग वॉक करताना उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. त्यामुळेच, हिवाळ्यात असे कपडे खरेदी करा जे तुमचे थंडीपासून रक्षण करतील, पण लक्षात ठेवा की, स्वत:ला इतके झाकून घेऊ नका की, तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी एकावर एक कपडे (अनेक प्रकारचे पातळ कपडे, उबदार आतील कपडे) घाला. त्यामुळे तुमचे थंडीपासून रक्षण होईल आणि तुम्ही मॉर्निंग वॉक योग्यरित्या करू शकाल, तसेच सर्दीशी संबंधित आजारांपासून स्वत:ला दूर ठेवू शकाल.
* पावसाळ्याच्या दिवसात ओलावा आणि घाम शोषून घेणारे कपडे निवडा.
* पावसातही तुम्हाला सक्रिय ठेवणारे कपडे निवडा.
हे देखील लक्षात ठेवा :
झाडे आणि वनस्पती असलेल्या ठिकाणी जा : मॉर्निंग वॉकसाठी अशी जागा निवडा जिथे भरपूर हिरवळ आणि झाडे असतील. वॉक दरम्यान, फक्त चालत जाऊ नका तर त्या दरम्यान थोडे धावणेदेखील गरजेचे आहे. जर तुम्ही योग आणि ध्यान केले तर ते आणखी चांगले होईल, कारण असे केल्याने तुम्ही स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकाल.
सामाजिक संवाद वाढवा : सकाळी फिरताना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी सामाजिक संवाद वाढवा, एकमेकांशी बोलल्याने सकारात्मकता पसरेल. यामुळे आनंदाचे हार्मोन्स बाहेर पडतील आणि तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. तुम्ही तुमच्या मित्रांशी संवाद साधत, चालत देखील जाऊ शकता.
हायड्रेटेड राहा : सकाळी फिरायला जाताना, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत सतत पाणी पित राहा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत राहील.
मेकअपशिवाय जा : जर तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप असेल तर मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी तो काढून टाका, जेणेकरून जर तुम्हाला वॉक दरम्यान घाम येत असेल तर तुमचा चेहरा विचित्र दिसणार नाही आणि तुमची त्वचा देखील योग्यरित्या श्वास घेऊ शकेल.
स्पोर्ट्स ब्रा
मॉर्निंग वॉक करताना मुलींनी स्पोर्ट्स ब्रा घालणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून त्या त्यांचे स्तन योग्य स्थितीत ठेवू शकतील. जर तुम्ही धावत असाल तर तुम्ही हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स ब्रा घालावी. ती स्तनांना आधार देते, जेणेकरून तुमच्या स्तनांच्या ऊतींचे नुकसान होणार नाही आणि स्तनांचा आकार चांगला राहील. याउलट स्पोर्ट्स ब्रा न घातल्याने स्ट्रेच मार्क्स येण्याची भीती निर्माण होऊ शकते. यासोबतच, स्पोर्ट्स ब्रा तुमचा लूक आणखी चांगला बनवते.
योग्य पादत्राणे निवडा : बऱ्याचदा मॉर्निंग वॉकला जाताना काही महिला चप्पल किंवा हिल्स घालतात आणि नंतर त्यांच्या पायांना वेदना होतात. म्हणून, बूट हलके, आरामदायी, लवचिक आणि आधार देणारे असावेत. कधीकधी योग्य पादत्राणे निवडली नाहीत तर त्याचा गुडघ्यांवरही परिणाम होतो.
लोअर्स किंवा ट्रॅक पॅट
मॉर्निंग वॉक करताना असा पोशाख निवडा ज्यामुळे कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्ही सहज व्यायाम करू शकाल. यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, योगा पॅन्ट, स्ट्रेच पॅन्ट, स्पोर्ट्स लेगिंग्ज, हे केवळ आरामदायीच नाहीत तर ते घातल्यानंतर स्टायलिश देखील दिसतात.
मोजे
मॉर्निंग वॉक करताना पायांनाही घाम येतो, म्हणून असे मोजे निवडा, जे घाम चांगल्या प्रकारे शोषू शकतील.





