* सोनिया राणा

‘सेल’ हा शब्द ऐकताच आनंद आणि उत्साह वाटू लागतो. सवलती आणि ऑफरची जादू अशी असते की, आपण नको असलेल्या वस्तूदेखील खरेदी करण्यास तयार होतो, पण कधीकधी सेलचा आनंद खिशावर आणि मनावरही ताण आणू शकतो. व्यवस्थित काळजी न घेतल्यास ही खरेदी आपल्यासाठी फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणारी ठरू शकते. म्हणूनच चला, काही महत्त्वाच्या टीप आणि सावधानतेबद्दल जाणून घेऊया, ज्या तुम्ही सेलमध्ये खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला चांगला अनुभव मिळेल आणि नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

वस्तू परत न घेण्याच्या अटीकडे लक्ष द्या

विक्रेते अनेकदा विक्री दरम्यान अशी उत्पादने विकतात जी परत न घेण्याचे त्यांचे धोरण असते. याचा अर्थ असा की, एकदा खरेदी केल्यानंतर, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ती वस्तू परत करू शकत नाही किंवा ती बदलता येत नाही. म्हणूनच काहीही खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही खरेदी करत असलेले उत्पादन परत केले जाऊ शकणारे आहे की नाही, याची खात्री करा.

ऑफलाइन स्टोअर्स : विकलेल्या वस्तूंसाठी परतावा धोरण नाही, हे बऱ्याचदा, किरकोळ विक्रेते स्पष्टपणे सांगत नाहीत. म्हणून, खरेदीपूर्वी यासंदर्भात आधीच विचारा आणि पावती सांभाळून ठेवा.

ऑनलाइन खरेदी : घाईघाईने किंवा गोंधळलेल्या अवस्थेत ऑर्डर देणे टाळा. ‘परतावा नाही’ हे धोरण बहुतेकदा उत्पादनावर लहान अक्षरात लिहिलेले असते, म्हणून काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला ‘नो-रिटर्न पॉलिसी’ म्हणजे ‘परतावा नाही’ हे धोरण असल्याचे लक्षात आले तर उत्पादनाच्या गुणवत्तेची कल्पना येण्यासाठी ग्राहकांनी दिलेले पुनरावलोकन वाचा.

कपड्यांवर विशेष लक्ष द्या

सेलमध्ये खरेदी करणे, ही एक उत्तम संधी असू शकते, परंतु कपड्यांच्या गुणवत्तेकडे आणि फिटिंगकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

ऑफलाइन खरेदी : खरेदी करण्यापूर्वी नेहमी कापडाची गुणवत्ता तपासा. कधीकधी, सेलमध्ये लावलेले कपडे चांगले दिसतात, पण प्रत्यक्षात ते लवकर खराब होऊ शकतात. कपडे घरी आणल्यानंतर धागे ओढलेले किंवा शिवण उसवलेले आढळू शकतात.

ऑनलाइन खरेदी : ऑनलाइन खरेदीत कपडा कसा आहे, हे प्रत्यक्ष पाहाता येत नाही. त्यामुळे खरेदी केल्यानंतर येणारी निराशा टाळण्यासाठी उत्पादनाच्या वर्णनात दिलेला कापडाचा तपशील काळजीपूर्वक वाचा. कापड खराब दर्जाचे आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी कपड्यांचे फोटो, ग्राहकांचे पुनरावलोक याकडे बारकाईने लक्ष द्या.

बूट खरेदी करताना सावधगिरी बाळगा

अनेकदा सेलमध्ये आकर्षक सवलतींमध्ये बूट मिळतात, परंतु येथेच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

ऑफलाइन स्टोअर्स : दुकानदार बूट असलेल्या डिस्प्लेमध्ये म्हणजे काचेच्या कपाटात दोषपूर्ण किंवा मिश्र जोड्या ठेवू शकतात. म्हणून बुटांची जोडी व्यवस्थित तपासल्यानंतरच खरेदी करा. बऱ्याचदा सेलमध्ये चांगले बूट दाखवले जातात, पण देताना वर्षानुवर्षे सेलमध्ये ठेवलेले आणि जीर्ण झालेले बूट विकले जातात, जे नंतर परत करता येत नाहीत.

विक्री दरम्यान, आपण अनेकदा सवलतींच्या आमिषाने हुरळून जातो आणि आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टी देखील खरेदी करतो. अशा प्रकारची खरेदी टाळण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा :

* खरेदीला जाण्यापूर्वी, तुम्हाला काय खरेदी करायचे आहे, याची यादी बनवा.

* सेल संपेल असे समजून घाबरून जाऊ नका. दरवर्षी एकतरी सेल लागतोच, त्यामुळे तुम्ही यावेळी खरेदी करू शकला नाहीत तरी पुढच्या वेळेची वाट तुम्ही नक्कीच पाहू शकता.

सवलतींच्या जाळ्यात अडकू नका

बरेच किरकोळ विक्रेते आणि ऑनलाइन पोर्टल अनेकदा मोठ्या सवलतींचा प्रचार करतात, परंतु प्रत्यक्षात मिळणारे फायदे तितकेसे जास्त नसतात. काही किरकोळ विक्रेते प्रथम उत्पादनाची किंमत वाढवतात आणि नंतर सवलत दिल्यासारखे दाखवून मूळ किंमतीलाच वस्तू विकतात.
ऑनलाइन स्टोअरमधील किंमत ट्रॅकिंग टूल्सचा वापर करा आणि त्याद्वारे प्रत्यक्षात सवलती दिल्या जात आहेत की नाही, ते तपासून पाहा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...