* पारूल भटनागर
पावसाळा सुरूच होणार आहे, पाऊस सुरू होताच रखरखीत उन्हापासून दिलासा मिळतो. या ऋतूत मौजमजा करण्याची मनापासून इच्छा होते. मित्र-मैत्रिणी आणि प्रियजनांसोबत मजा करायला मन आतूर होते. या ऋतूत खाण्यापिण्याचीही वेगळीच मजा असते, पण या ऋतूत तनामनाला जितका दिलासा मिळतो तितकीच तुमची प्रतिकारशक्ती वाढवणेही गरजेचे असते, कारण पावसाळयात संसर्ग आणि फ्लूसारखे आजार वाढतात. आजारांचा धोका सर्वात जास्त असतो.
अशा परिस्थितीत, मजबूत प्रतिकारशक्ती असलेली व्यक्तीच निरोगी जीवन जगू शकते, सोबतच रोगांना शरीरावर ताबा मिळवण्यापासून रोखू शकते.
चला तर मग यासंबंधी वाशीतील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाचे इंटरनल मेडिसीनचे संचालक डॉ. फराह इंगळे, यांच्याकडून जाणून घेऊयात :
रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय?
प्रतिकारशक्ती म्हणजे ज्याला रोगप्रतिकार शक्ती असेही म्हणतात. ही शरीराची अंतर्गत रोगप्रतिकारकशक्ती आहे, जी शरीराला बाह्य घटकांपासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करते. विषाणू, जीवाणू शरीरावर हल्ला करताच ही रोगप्रतिकारकशक्ती त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सक्रिय होते. ही प्रक्रिया थोडी अवघड असते, कारण या कामात वेगवेगळया प्रकारच्या पेशींचा सहभाग असतो, ज्या शरीराला बाह्य घटकांपासून वाचवून निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रतिकारशक्ती अनेक प्रकारची असते जसे की, सक्रिय प्रतिकारशक्ती. ही आपल्या शरीराला तेव्हा मिळते जेव्हा आपण कोणत्याही जीवाणू, विषाणूंच्या संपर्कात येतो. अशावेळी, आपल्याला आधीच मिळालेल्या अँटीबॉडीज आणि रोगप्रतिकारक पेशी त्या बाह्य घटकांचा नाश करण्यात गुंततात.
रोगप्रतिकारशक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे निष्क्रिय प्रतिकारशक्ती, ज्यामध्ये विषाणूंपासून संरक्षण देण्यासाठी बाह्य रूपात अँटीबॉडीज पुरवल्या जातात. परंतु तेव्हाच शरीर बाह्य घटकांशी लढण्यास सक्षम होते जेव्हा ते आतून मजबूत असते आणि शरीर आतून मजबूत बनवायचे असेल तर चांगल्या आहारासोबत काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आवश्यक असते, विशेषत: पावसाळयात.
पोषक आहार घ्या
शरीराची भूक भागवण्यासाठी प्रत्येकजण अन्न खातो, परंतु आपण हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की, केवळ पोट भरल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते असे नाही, तर योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून शरीराचे पोषण होईल. आहाराद्वारे शरीराशी संबंधित गरजा पूर्ण करून प्रतिकारशक्तीही वाढवता येते.





