* सोमा घोष
कोविड -१९ नंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल झाला. आज कोणीही १० वर्षांपूर्वीसारखे नियोजन करत नाही, कारण जीवन खूप अस्थिर आहे, जिथे पैसा आणि सत्ता असूनही लोक आपल्या प्रियजनांना गमावत आहेत. अशा परिस्थितीत सर्व वयोगटातील लोक आरोग्य आणि त्याच्या काळजीबाबत जागरूक झाले आहेत. याबाबत मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयातील सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कहाळे सांगतात की, कोविडमुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, परंतु नवीन वर्षात प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक असलेल्या काही गोष्टी आहेत, ज्या खालीलप्रमाणे :
* तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. तुमचे वजन योग्य आहे की नाही याकडे लक्ष द्या. यासाठी तुम्हाला अतिरिक्त कॅलरीज टाळाव्या लागतील आणि नियमित व्यायाम करावा लागेल. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करण्यासारखा सोपा उपाय तुम्ही दररोज करू शकता. ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ करण्याइतकेच बसणे हे तुमच्यासाठी नुकसानकारक आहे. सतत बराच वेळ बसल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. लाकडांच्या धुरात श्वास घेण्यामुळे जितके नुकसान होते तितकेच जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमच्या शरीराचे होते. त्यामुळेच व्यायाम न करणे किंवा बसणे हे ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ मानले जाते.
* पाकीट बंद पदार्थ खाणे कमी करा किंवा बंद करा आणि निरोगी आहार घ्या. रोजच्या आहारात भरपूर भाज्या असाव्यात. मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा.
* आहारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच व्यायामावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जास्त व्यायामामुळे अनेकदा समस्या उद्भवतात.
* मुलांना डिजिटल जगापासून दूर ठेवा, त्यांना खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी प्रोत्साहित करा. बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट आणि फुटबॉल यांसारखे मैदानी खेळ खेळण्यास त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
* जीवनशैलीत हे महत्त्वाचे बदल करण्यासोबतच चांगली गाढ झोप घेणेही खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला किती झोप येत आहे यासोबतच झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टेलिव्हिजनपासून दूर राहा, कारण ते तुमची ‘सर्केडियन रिदम’ म्हणजेच दैनिक लयबद्धतेत व्यत्यय आणते किंवा ती बिघडवते, जी चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. या काही प्रतिबंधात्मक उपायांचा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता.