* अनुराधा
भारत देशात वेगवेगळ्या रितीभातींबरोबरच विविध प्रकारचे पेहरावदेखील आपल्याला पाहायला मिळतात. भारत वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, आहार आणि पेहरावांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा एक असा देश आहे जिथे पावलोपावली फॅशनचे अनेक रंग आपल्याला पाहायला मिळतात.
फक्त पेहरावाबद्दल म्हणावं तर भारतात प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळे पेहराव घातले जातात. पण जेव्हा ट्रेण्ड आणि स्टाइल यांचा मेळ होतो, तेव्हा आउटफिटचा म्हणजे पेहरावाचा आराखडा बदलतो आणि पारंपरिक वेशभूषेला फॅशनेबलचं लेबल लागतं.
पेहराव जुना अंदाज नवा
खरंतर भारतात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या देशांतील राजांनी शासन केलं आहे आणि प्रत्येक शासनात त्या त्या काळचा वेगळा पेहराव भारतात आला आहे. रझिया सुलतानच्या पेहरावापासून प्रभावित होऊन रझिया सूट आणि मोगल काळातील अनारकलीचा सूट आजपर्यंत भारतात स्त्रियांच्या फॅशनचा विस्तार करत आहेत.
म्हणायला तर हे सगळे फार जुने पेहराव आहेत, पण फॅशनने यांना एक वेगळीच चमक दिली आहे आणि त्यांचा पूर्ण कायापालट केला आहे. आपल्या नवीन रूपात अशा प्रकारचे पेहराव लग्न आणि लहानसहान घरगुती समारंभांसाठी ठीक आहेत पण तुम्ही एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा एखाद्या ऑफिशियल पार्टीला अशाप्रकारचा सूट घालून जाल तर ही फॅशन मूर्खपणाचीच ठरेल.
पाश्चिमात्य फॅशन
भारतात आलेल्या ब्रिटिशांनीदेखील भारतीयांचा फॅशन सेन्स वाढवला आहे आणि त्यामुळेच आज आपण भारतीय स्त्रियांना पाश्चिमात्य पेहरावांमध्येच जास्त पाहातो.
विनीता सांगतात की आता दर महिन्याला नवीन फॅशन मार्केटमध्ये येत आहे. प्रत्येक नवीन गोष्ट एकदा स्वत:वर जरूर अजमावून पाहावी. कोणत्या प्रसंगी कोणता पेहराव घालावा ही गोष्ट लक्षात घेणंही फार महत्त्वाचं आहे.
अनेक मुली दुपारी होणाऱ्या पार्टीमध्ये इव्हनिंग गाउन घालून जातात. पण खरंतर हे नावानेच स्पष्ट होत असतं की इव्हनिंग गाउन फक्त इव्हनिंग पार्टीसाठी आहेत. अलीकडेच इबे कंपनीने १००० स्त्रियांचं सर्वेक्षण केलं तेव्हा जवळपास १५ टक्के स्त्रिया हीच चूक करत असल्याचं निदर्शनास आलं.
तरुण दर्शवणारी फॅशन
फॅशन अशी जी तुम्हाला अपटुडेट ठेवेल. पण अपटुडेट होण्याच्या नादात अनेकदा स्त्रिया या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत की वयानुसार त्यांच्यावर कोणता पेहराव शोभेल. विशेष म्हणजे घरगुती स्त्रियांसाठी फॅशन म्हणजे रंगीबेरंगी साड्या किंवा एखादा साधासा सलवार कुरताच असतो.