- सोमा घोष
मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री रसिका सुनील मुंबईची आहे. तिने वयाच्या १८व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबातच ती जन्मली. रसिकाला अभिनयाव्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात जाण्याची इच्छा नाही, कारण लहानपणापासून तिने आपली आजी आणि आई यांना रंगमंचावर अभिनय करताना पाहिले होते. लहान वयातच ती नृत्य आणि संगीत शिकली. कॉलेजमध्ये गेल्यावर ती रंगमंचावर काम करू लागली. स्वभावाने हसरी असलेली रसिका सध्या लॉकडाऊन काळात आपले छंद पूर्ण करत आहे. तिच्याशी बोलणे रोमांचक होते. या जाणून घेऊ, काय सांगते रसिका आपल्या एकूणच अभिनयसफरीबाबत :
अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?
माझी आजी कल्पना आणि आई मनीषा यांना मी लहानपणापासून नाटकात काम करताना पाहिले आणि तेव्हापासूनच माझ्यात अभिनयकलेप्रति आवड निर्माण झाली. पण मी स्वत: अभिनयाची सुरूवात कॉलेजला गेल्यापासून केली, कारण तेव्हा मला वाटले की मी या दिशेने मेहनत करू शकते आणि मी तसे केले.
प्रथम जेव्हा अभिनय करण्याबाबत तुझ्या पालकांशी बोललीस, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?
सुरूवातीपासूनच त्यांचा मला पाठींबा होता, कारण लहानपणापासून माझी आई मला नृत्य आणि संगीताच्या क्लासला घेऊन जायची. याच कारणामुळे मी भारतीय शास्त्रीय संगीतात विशारद केले आणि भरतनाट्यमची पदविका घेतली आहे. घरातून मला कोणीच अडवले नाही. माझी आई खूपच खंबीर व्यक्तिमत्त्वाची आहे. तिच्याकडून मला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते.
पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?
मी कॉलेजमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. त्याआधी मी नृत्य आणि संगीतात व्यस्त होते. मराठीत मी प्लेबॅक सिंगर होते. अभिनयाची सुरूवात मी एका व्यावसायिक नाटकाने केली. त्यानंतरचा माझा मोठा ब्रेक टीव्ही मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हा होता, ज्यामुळे मी लोकप्रिय झाले.
अभिनय करत असताना नृत्य आणि संगीत सुटेल याची भीती वाटली नाही का?
मला असे कधीच वाटले नाही, कारण असे वाटताच मी नवेकाही शिकायला क्लासला जाते. मला नवीन काही शिकण्यात खूप मजा वाटते. मी अनेक वाद्य वाजवायला शिकले आहे. मला तबला आणि हार्मोनियमसुद्धा वाजवता येते. अभिनय करत असताना माझे गायन जवळपास सुटले होते, पण आता परत मी गायनाकडे वळते आहे. मी काही व्हिडिओज आणि शोजही केले आहेत. मी ५व्या इयत्तेत असल्यापासून स्टेजवर वाद्य वाजवण्यास सुरूवात केली.