एकांत कमजोर क्षण

कथा * कैहकशां सिद्दीकी

वकील साहेबांचे हसतेखेळते घर होते. त्यांची पत्नी एक साधीभोळी गृहिणी होती. वकील साहेब काहीसे बाहेरख्याली आहेत हे तिला माहिती होते, पण एक दिवस सवत घेऊन येतील असे तिला वाटले नव्हते. त्या दिवशी ती खूप रडली.

वकील साहेबांनी समजावले. ‘‘बेगम, तू तर घरातली राणी आहेस. या बिचारीला एखादी खोली दे. निमूटपणे पडून राहील. तुला घरकामात मदत करेल.’’

ती रडत राहिली. ‘‘मी असताना तुम्ही दुसरे लग्न का केले?’’

वकील साहेब बोलण्यात कोणालाही ऐकणारे नव्हते. समजूत काढत म्हणाले, ‘‘बेगम, माफ कर. चूक झाली. आता तू सांगशील तसेच होईल. फक्त हिला घरात राहू दे.’’

बेगमला वाटत होते, मुलांना घेऊन माहेरी निघून जावे. पुन्हा वकील साहेबांचे तोंड पाहू नये. पण माहेरी जायचे तर कोणाच्या आधारावर? वडील नाहीत. आई आधीच भावंडांवर ओझे बनून राहत आहे. तिने कधी विचारही केला नव्हता की, लग्नाच्या १४ वर्षांनंतर ४०व्या वर्षी वकील साहेब असे गुण उधळतील. एवढया वर्षांचा संसार उद्धवस्त झाला.

वकील साहेबांनी खाली, आपल्या कार्यालयाच्या शेजारच्या खोलीत दुसऱ्या पत्नीचे सामान ठेवले. त्यांनतर वरती आपल्या पहिल्या पत्नीकडे आले, जसे की काही घडलेच नाही. पहिल्या पत्नीचे मन दुखावले गेले. कष्टाने पैसे जमवून घर बांधले होते. संसार दुसरीसोबत वाटून घ्यावा लागेल असा विचारही मोठया बेगमने केला नव्हता.

दिवस सरले. आठवडे निघून गेले. मोठी बेगम बरीच रडारड करून अखेर शांत झाली. सुरुवातीला वकील साहेब एक दिवस वरती आणि एक दिवस खाली जेवत असत. नंतर हळूहळू त्यांचे वर येणे बंद झाले. नवीन पत्नीमध्ये ते एवढे गुंतले की, त्यांचे वकिलीतले लक्षही उडाले. उत्पन्न कमी झाले आणि कुटुंब मात्र वाढू लागले. छोटी बेगम दरवर्षी एका मुलाला जन्म देऊ लागली. परिणामी ते मोठया बेगमला कमी पैसे देऊ लागले.

मोठया बेगमने परिस्थितीला सामोरे जायचे ठरविले होते. शिक्षणाच्या जोरावर ती गल्लीतीलच एका शाळेत शिकवू लागली. मुलांच्या लहानमोठया गरजा पूर्ण करू लागली. संध्याकाळी ती घरी शिकवणी घेत असे. या पैशांतून स्वत:च्या मुलांच्या शिकवणीचा खर्च भागवत असे. आपला मुलगा, मुलीला भरपूर शिकवून स्वत:च्या पायावर उभे करायचे, एवढेच तिचे ध्येय होते. मुलांचे चांगले पालनपोषण व्हावे केवळ म्हणूनच पती आणि सवतीसोबत राहण्याचा निर्णय तिने घेतला होता. मुलांना आई-वडील दोघांचीही गरज असते, याची तिला जाणीव होती.

आता संपूर्ण घरावर छोटया बेगमचे राज्य होते. मोठी बेगम आणि मुले एका खोलीत राहत होती, जिथे कधीतरीच काही विशेष कारणासाठी आणि तेही बोलावल्यानंतरच वकील साहेब येत असत.

अशा प्रकारे दिवस चालले होते. त्यानंतर एके दिवशी आपल्या ५ मुली आणि छोटया बेगमला सोडून वकील साहेबांनी जगाचा निरोप घेतला. छोटया बेगमने कसेबसे मुलींचे लग्न लावून दिले. घरही विकले.

मोठया बेगमची मुलगी सनोबर एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली होती. ती दिसायला सुंदर होती, पण लग्नाचा विषय काढताच रागवायची. तिने आपल्या आईचे दु:ख पाहिले होते, म्हणूनच तिला लग्न करायचे नव्हते. मोठया बेगमने बरीच समजूत काढल्यानंतर ती लग्नाला तयार झाली. साहिल चांगला मुलगा होता. त्यांच्या नात्यातलाच होता.

सनोबर लग्नासाठी तयार झाली, पण आपल्या अटी तिने निकाहनाम्यात ठेवायला सांगितल्या.

साहिल म्हणाला, ‘‘मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत.’’

सनोबरने स्पष्टपणे सांगितले, ‘‘केवळ तोंडी बोलून चालणार नाही. मी असताना तू दुसरे लग्न करणार नाहीस आणि जर आपण वेगळे झालोच तरी मुले माझ्यासोबत राहतील, असे निकाहनाम्यात लिहावे लागेल.’’

सनोबरला साहिल लहानपणापासून ओळखत होता. तिला वाटणारी भीती तो समजू शकत होता. म्हणाला, ‘‘सनोबर, निकाहनाम्यात हे तसेच तू आणखी जे काही म्हणशील ते सर्व लिहूयात. आतातरी माझ्याशी लग्न करशील का?’’

सनोबरने होकार दिला. त्यांचे लग्न झाले. दोघांची चांगली नोकरी, चांगले घर, एक गोंडस मुलगीही होती. एकंदरच सनोबरचा संसार सुखात सुरू होता. लग्नाला १२ वर्षे कधी झाली हे समजलेदेखील नाही.

सनोबरला बढती मिळणार होती. त्यामुळे ती कार्यालयातील कामावर जास्त लक्ष देऊ लागली. कामवाली बाई घर सांभाळत होती. मुलगी मोठी झाली होती. ती स्वत:चे काम स्वत:च करायची. तिचा अभ्यास घेण्याइतकाही वेळ सनोबरकडे नव्हता. म्हणूनच तिला शिकवणीला पाठवित होती. सनोबरचे सर्व लक्ष कार्यालयीन कामावर केंद्रित झाले होते. कामवाली बाई सर्व सांभाळत असल्याने घराबाबत ती निश्चिंत होती.

कार्यालयीन कामानिमित्त सनोबर २ दिवस बाहेर गेली होती. आज रात्री ती घरी परतणार होती. पण तिचे काम सकाळीच पूर्ण झाले. त्यामुळे लगेचच ती विमानाने घरी निघाली. यावेळी मुलगी शाळेत असेल. साहिल कामाला गेला असेल आणि कामवाली बाई तर ५ वाजता येईल, असा विचार करून आपल्याकडील चावीने तिने दरवाजा उघडला. आत लाईट सुरू होती. बेडरूममधून आवाज येत असल्याने ती दबक्या पावलांनी तेथे गेली आणि अवाक झाली. साहिल, कामावली बाई एकत्र…

ती धावतच बाहेर आली. साहिलही तिच्या मागोमाग धावत आला आणि बाई गुपचूप निघून गेली.

साहिल सनोबरची समजूत काढू लागला. ‘‘माझ्या मनात कुठलेच वाईट विचार नव्हते. माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ती डोके दाबू लागली आणि माझा स्वत:वर ताबा राहिला नाही. तिनेही नकार दिला नाही.’’

साहिल बरेच काही सांगत होता. सनोबर मात्र एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध होती. तो माफी मागत होता.

सनोबर शांतपणे उठली. आपले आणि मुलीचे कपडे बॅगेत भरू लागली. मुलगी आल्यावर तिच्यासोबत आपल्या अम्मीकडे निघून गेली. साहिल तिला थांबवत होता. सतत माफी मागत होता, पण सनोबरला जणू काहीच ऐकू येत नव्हते.

घरी आल्यावर तिने अम्मीला सर्व सांगितले आणि हुंदके देऊन रडू लागली.

‘‘साहिलने मला फसवले. आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही.’’

मोठया बेगमला अश्रू अनावर झाले. काही वर्षांपूर्वी ज्या आगीत तिचा संसार जळाला होता आज त्याच आगीच्या ज्वाळांमध्ये मुलीचा संसारही धगधगत होता. लग्नात अटी ठेवून काय झाले? सर्व पुरुष सारखेच असतात. जेव्हा कोणाला संधी मिळते ती सोडत नाहीत.

मोठया बेगमने मुलीला सावरले. ‘‘मुली, मी तुझे दु:ख समजू शकते. झोप आता.’’ तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन मोठी बेगम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली.

दुसऱ्या दिवशी सनोबर कामाला आणि मुलगी शाळेत जाताच साहिल आला. मोठी बेगम एकटी असणार, हे त्याला माहीत होते. मोठया बेगमला सलाम करून तो बसला. खालच्या स्वरात म्हणाला, ‘‘खालाजान, माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला. एका कमजोर क्षणी मी बहकलो. माझी चूक झीली. मी शपथ घेतो की, यापुढे कधीच असे होणार नाही. मला माफ करा. सनोबरलाही मला माफ करायला सांगा.’’ एवढे सर्व त्याने एका दमातच सांगितले होते.

मोठी बेगम गप्प होती. तिला खूप दु:ख झाले होते आणि रागही आला होता. साहिलच्या बोलण्यात आणि डोळयात लाज तसेच पश्चाताप दिसत होता. ती शांतपणे म्हणाली, ‘‘मी काहीच करू शकत नाही. सनोबरला वाटेल तसेच होईल.’’

‘‘खालाजान, माझा संसार उद्धवस्त होईल. माझी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल? सनोबरशिवाय मी जगू शकत नाही.’’

मोठी बेगम काहीच बोलू शकली नाही.

संध्याकाळी सनोबर कामावरून आली तेव्हा मोठया बेगमने सांगितले की, साहिल आला होता. माफी मागत होता.

सनोबर रागावली. ‘‘तू त्याला घरात का घेतलेस? माझे त्याच्याशी कुठलेच नाते राहिलेले नाही. मी तलाक घेणार आहे.’’

मोठया बेगमला आठवले, जेव्हा वकील साहेब दुसरी बेगम घेऊन आले होते तेव्हा तिलाही माहेरी जायचे होते. पण तिला कोणाचा आधार नव्हता. ती स्वत:च्या पायावरही उभी नव्हती. आज सनोबर स्वत:च्या पायावर उभी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. पण नंतर विचार आला, त्यांच्या निरागस मुलीचे काय होईल? आई किंवा वडील, यापैकी एकाच्या प्रेमाला ती मुकेल. दोघांनीही दुसरे लग्न केले तर मुलीचे काय? ती मनोमन घाबरली. मुलाला सनोबर आणि साहिलबाबत सांगितले. तो दुसऱ्याच दिवशी आला. बहीण, भावाचे हेच म्हणणे होते की तलाक घ्यायलाच हवा.

साहिल रोज फोन करीत होता. मेसेज पाठवित होता, पण सनोबर उत्तर देत नव्हती.

साहिल मोठया बेगमकडे सतत विनवण्या करीत होता. ‘‘खालाजान तुम्ही सर्व ठीक करू शकता. फक्त एकदा मला माफ करा आणि सनोबरलाही मला माफ करायला सांगा. झालेल्या चुकीची मला खूपच लाज वाटत आहे.’’

एके दिवशी सनोबर कामावरून घरी आपले काही सामान घेण्यासाठी गेली तेव्हा तिने पाहिले की, घर अस्ताव्यस्त झाले होते. स्वयंपाकघरातही बाहेरून आणलेले काही जेवण तसेच पडले होते. तिने अंदाज लावला की, कामवाली बाई येत नसावी. घरात सर्वत्र लिहिले होते, ‘‘मला माफ कर, परत ये सनोबर.’’ सनोबरला असे वाटले की, साहिल ४० वर्षांचा नाही तर एखादा तरुण आहे आणि तिची मनधरणी करीत आहे.

हळूहळू अनेक प्रयत्नांनंतर साहिलने मोठया बेगमचा विश्वास जिंकला की, एका कमजोर क्षणी झालेली ती चूक होती. त्याने आधी कधीच विश्वासघात केलेला नाही. मोठया बेगमने विचार केला की, साहिल सांगतोय ते खरे आहे. त्याच्या हातून चूक झाली आणि त्याला त्याचा पश्चातापही झाला आहे. शिवाय तो माफी मागत आहे. प्रश्न मुलीच्या भविष्याचा आहे. दोघांपैकी एकाचे प्रेम तिला मिळणार नाही. त्यामुळे साहिलला एखादी संधी द्यावी का?

सनोबर तलाकची तयारी करीत आहे, असे मोठ्या बेगमने साहिलला सांगितले. ते ऐकून साहिल धावतच आला. ‘‘खालाजान, जर सनोबरने घटस्फोटासाठी अर्ज केला तर मी मरून जाईन. मला एक संधी द्या,’’ अशी विनवणी करीत लहान मुलांसारखा रडू लागला.

मोठया बेगमला दया आली. ‘‘तू रडू नकोस. मी आज रात्री सनोबरशी बोलते.’’

सनोबर आल्यावर मोठी बेगम म्हणाली, ‘‘मी तुझ्याशी बोलू शकते का?’’

‘‘हो अम्मी,’’ सनोबर म्हणाली.

मोठी बेगम सांगू लागली, ‘‘जेव्हा तुझे अब्बू दुसरी बायको घेऊन आले होते तेव्हा मलाही त्यांना सोडून द्यायचे होते. पण मग तुम्हा मुलांचा विचार आला.’’

‘‘तुझी गोष्ट वेगळी होती. मी स्वत:ला आणि माझ्या मुलीलाही सांभाळू शकते. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच हवी,’’ सनोबरने सांगितले.

‘‘त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्यासोबत त्याच्या मुलीलाही भोगावी लागेल. तिची आई किंवा वडील, तिच्यापासून हिरावले जातील. जर तुम्ही दोघांनी दुसरे लग्न केले तर तिचे काय होईल?’’

‘‘अम्मी, एकच लग्न मला नकोसे झाले आहे, मग दुसरे कशाला करेन? आता राहिली गोष्ट मुलीला वडिलांचे प्रेम मिळणार नाही याची. पण असे वडील असण्यापेक्षा नसलेलेच बरे.’’ सनोबरच्या मनात साचलेला राग ओठांवर आला.

तिचा राग बाहेर पडणे गरजेचे आहे, हे मोठ्या बेगमला माहीत होते. तिने वाद घातला नाही. म्हणाली, ‘‘तू एकटीच मुलीला चांगले सांभाळू शकतेस, असे तुला वाटत असेल तर ठीक आहे. पण मला वाटते की, तू तलाकचा अर्ज ६ महिन्यांनंतर दे. थोडा वेळ दे, मग तू जे सांगशील ते मला मान्य असेल.’’

‘‘नाही अम्मी. मी ६ दिवसही देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा मला आठवते साहिल आणि कामवाली बाई… किळस येते त्याच्या नावाची. असे कसे काय वागला तो?’’

मोठया बेगमने जग पाहिले होते. आपल्या पतीला अनेक मुलींसोबत पाहिले होते. आपल्या अनुभवातून तिने सांगितले, ‘‘ती त्या क्षणी घडलेली चूक होती. त्याचे कोणासोबतही संबंध नाहीत. जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष एकांतात असतात तेव्हा असा एखादा कमजोर क्षण येऊ शकतो.’’

‘‘मीही कामावर एकटीच अनेक तास पुरुषांसोबत काम करते. माझ्यासोबत तर कधीच असे घडले नाही. आत्मसंयम आणि मर्यादा हीच खरी माणूस असल्याची ओळख आहे. अन्यथा पशू आणि माणसात काय फरक आहे?’’

‘‘मी आतापर्यंत तुला काहीच सांगितले नाही, पण आता खूप विचारपूर्वक तुला थोडा वेळ द्यायला सांगत आहे. पुढे जशी तुझी मर्जी.’’

‘‘ठीक आहे. तुला वाटत असेल तर मान्य करते, पण माझा निर्णय बदलणार नाही.’’

सनोबरने असा विचार करून अम्मीचे म्हणणे मान्य केले की, तिलाही काही उरलेली कामे पूर्ण करायला वेळ मिळेल. मालमत्तेची कागदपत्रे स्वत:च्या नावावर करायची होती, वारस बदलायचा होता. कामाचाही ताण होताच. रात्री नेहमीप्रमाणे साहिलने फोन केला आणि सनोबरने तो उचलला.

आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना लपवित साहिल म्हणाला, ‘‘सनोबर मला माफ कर. परत ये.’’

सनोबरने गंभीर स्वरात तटस्थपणे सांगितले, ‘‘मला तुला भेटायचे आहे.’’

साहिल म्हणाला, ‘‘हा, हा… तू म्हणशील तेव्हा.’’

सनोबर म्हणाली, ‘‘उद्या कार्यालयानंतर घरी.’’ एवढेच बोलून तिने फोन ठेवला.

कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सनोबर घरी गेली. साहिल तिची वाट पाहात होता. त्याने घरही थोडेसे नीटनेटके ठेवले होते. साहिलने सनोबरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा हात झटकून टाकला आणि लांब जाऊन बसली.

‘‘साहिल, मला तमाशा करायचा नाही. शांतपणे सर्व ठरवायचे आहे. आपले संयुक्त खाते बंद करायचे आहे. इन्शुरन्स पॉलिसीतील वारस बदलायचा आहे. या घरासाठी तुळा जो पैसे लागला तो तू घे. मला हे घर माझ्या नावावर करायचे आहे. मला तुझ्याकडून काहीच नको. मी काकाकडे जाऊन खुला (पत्नीकडून निकाह तोडणे) अर्ज देणार आहे.’’

थोडा वेळ साहिल गप्प राहिला. नंतर म्हणाला, ‘‘सनोबर, माझे जे काही आहे ते सर्व तुझे आणि आपल्या मुलीचे आहे. तू सर्व घे, फक्त मला माझी सनोबर दे. मला एकदा माफ कर. माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. तू जर माझ्या जीवनात नसशील तर मी हे जीवनच संपवून टाकेन,’’ सनोबरला माहीत होते की साहिल भावूक आहे, पण इतका जास्त असेल याची तिला कल्पना नव्हती. ती तेथून उठून निघून गेली.

कामाला जायचे, मन लावून काम करायचे, मुलीसोबत खेळायचे यातच तिचा वेळ जाऊ लागला. मोठया बेगमने सांगितल्यामुळे तसेच मुलीच्या हट्टापुढे अखेर सनोबरने आठवडयातून एकदा मुलीला भेटण्याची, तिला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी साहिलला दिली. मुलीला वडिलांच्या कृत्याबाबत कळावे, असे तिला वाटत नव्हते. एवढया लहान वयात तिला वडिलांनी केलेले दुष्कर्म समजले तर ती काय प्रतिक्रिया देईल?

साहिल आठवडयातून एकदा २ तासांसाठी मुलीला फिरायला न्यायचा. तिला भेटवस्तू द्यायचा. सनोबरच्या आवडीची एखादी गोष्ट मुलीसोबत पाठवायचा, पण सनोबर त्याकडे ढुंकूनही बघत नसे.

दरम्यान सनोबरला बढती मिळाली. तिची मुख्यालयात बदली झाली. मनात नसतानाही तिला दिल्लीला जावे लागले. मुलीला अम्मीकडेच ठेवावे लागले. शाळेचे वर्ष संपायला फक्त २ महिने शिल्लक होते. मोठया बेगमने सांगितले, ‘‘काळजी करू नकोस. मी मुलीला सांभाळेन. तू जा, पण दर सुट्टीच्या दिवशी आठवडयातून एकदा तरी ये.’’

मुख्यालयात तिच्या ओळखीचे काही जुने सहकारी होते. सर्वांनी तिचे स्वागत केले. एका प्रोजेक्टसाठी तिला समीरसोबत काम करायचे होते. समीर तिचा पूर्वीचा सहकारी होता. त्याला सनोबर आवडायची.

एकत्र काम करताना समीर आणि सनोबर बराच वेळ एकमेकांसोबत घालवायचे. सनोबरने साहिल आणि तिच्यात जे सुरू होते त्याबद्दल समीरला काहीच सांगितले नव्हते. त्यांना क्लाइंटकडेही जावे लागायचे. दोघे सोबतच जायचे. हॉटेलमध्ये रहायचे आणि काम पूर्ण झाल्यावरच यायचे. तासोनतास एकत्र काम करायचे. आजही सकाळच्या फ्लाइटने दोघे गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी हॉटेलवर गेले. समीर म्हणाला, ‘‘फ्रेश हो, मग खाली जेवायला जाऊया.’’

सनोबर म्हणाली, ‘‘तू जा, मी माझ्या खोलीतच काहीतरी मागवून घेईन.’’

समीर म्हणाला, ‘‘ठीक आहे, माझ्यासाठीही काहीतरी मागव. एकत्रच जेवूया.’’

समीरला सनोबर मनापासून आवडायची. तिच्याबद्दल त्याला आदरही होता. सनोबर मुख्यालयात आल्यानंतर कधीही त्याने तिच्याकडे आपले प्रेम व्यक्त केले नव्हते. आपली पत्नी आणि मुलांसोबत तो सुखी होता.

समीर सनोबरच्या खोलीत आला. जेवण यायला वेळ असल्यामुळे दोघे कामाबाबत चर्चा करू लागले. तितक्यात समीरच्या पत्नीचा फोन आला. दोघांमधील संभाषण ऐकून असे वाटत होते की दोघेही सुखी, समाधानी आहेत.

समीरने साहिलबाबत विचारले. सनोबरने विषय टाळला. तेवढयात जेवण आले. जेवताना दोघेही जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले.

समीरने सनोबरला विचारले, ‘‘साहिलशी लग्न झाले नसते तर तू माझ्याशी लग्न केले असतेस का?’’

सनोबर काही वेळ शांत राहिली, त्यानंतर म्हणाली, ‘‘कदाचित हो.’’

समीरने गमतीने म्हटले, ‘‘अगं आधी सांगितले असतेस तर मी त्याला गोळी घातली असती,’’ विषय तेथेच संपला. जेवण झाल्यावर समीर त्याच्या खोलीत निघून गेला.

सनोबर विचार करू लागली, समीर चांगला मित्र आहे. अचानक तिला साहिलची आठवण झाली. ती खूपच थकली होती. थोडया वेळातच झोपली. दुसऱ्या दिवशीही दोघे कामात प्रचंड व्यस्त होते.

‘‘आजही जेवण खोलीतच मागवूया का?’’ समीरने विचारले. सनोबर म्हणाली, ‘‘हो, ठीक आहे.’’

समीर फ्रेश होऊन सनोबरच्या खोलीत आला. जेवताना गप्पा सुरू झाल्या. अचानक सनोबरला ठसका लागला. समीरने लगेचच तिला पाणी दिले. ते प्यायल्यानंतर तिला बरे वाटले. जेवल्यानंतर समीर सनोबरसाठी चहा घेऊन आला. तो देताना दोघांच्या हातांचा एकमेकांना स्पर्श झाला. दोघेही शांतपणे चहा पिऊ लागले.

खोलीत सर्वत्र शांतता पसरली होती. दोघे जवळच बसले होते. एक विचित्र ओढ सनोबरला जाणवू लागली. जणू समीरच्या छातीवर डोके टेकून तिला रडायचे होते. तिने पाहिले की, समीरची नजरही तिच्यावरच खिळली होती. कदाचित त्यालाही सनोबरला आपल्या मिठीत घ्यावेसे वाटत होते. तितक्यात तिला वाटले हा तोच एकांत कमजोर क्षण तर नाही ना, ज्याचा उल्लेख अम्मीने केला होता. तिने स्वत:ला सावरले. ती उठली. उगाचच इकडे तिकडे काहीतरी ठेवू लागली. समीरला म्हणाली, ‘‘चल, उद्या भेटूया.’’

समीरही उभा राहत म्हणाला, ‘‘हो, उशीर झालाय, शुभ रात्री.’’

दुसऱ्या दिवशी काम संपल्यामुळे दोघे घरी परतले. सनोबर अम्मीकडे गेली. अम्मीने सांगितले की, तिची मुलगी जेवताना हट्ट करते. साहिल मुलीची खूपच काळजी घेतो. आपल्यासोबत घेऊन जातो. सतत फोन करतो. अम्मी साहिलचे कौतुक करीत होती.

सनोबरने साहिलला फोन केला. ‘‘मला आताच्या आता तुला भेटायचे आहे.’’ साहिलला भेटण्यासाठी ती निघाली. साहिल आतुरतेने तिची वाट पाहात होता. घर पाहून वाटत होते की, ते साहिलनेच स्वच्छ केले असावे. तिचे बेडरूमकडे लक्ष गेले. त्यात बदल करण्यात आला होता, असे सनोबरला वाटले. साहिल प्रेमाने म्हणाला, ‘‘आतातरी परत ये. मला माफ कर.’’

एकांत कमजोर क्षण काय असतो, हे आता सनोबरला समजले होते. तिने साहिलला माफ केले. साहिलने सनोबरचा हात धरला. दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले.

भीष्म प्रतिज्ञा

कथा * शलाका शेर्लैकर

माझा नवरा अपूर्व आणि दोन्ही मुलांना माझी टिंगल करायची चांगली संधी मिळाली होती. तसेही ते तिघं एक होऊन नेहमीच माझी फिरकी घ्यायला बघतात. धाकट्या ऋतिकनं मोबाइल हातात घेतला अन् म्हटलं, ‘‘मम्मा, मी आजीला फोन करून सांगून टाकतो की तू मामाच्या लग्नाला येणार नाहीस. कारण तू भीष्म प्रतिज्ञा केली आहेस की आमच्यासोबत कुठंही जाणार नाहीस.’’

त्याच्या हातून फोन घेत नवरा, म्हणजे अपूर्वनं म्हटलं, ‘‘अरे बाळा, मी असताना तुम्ही आजीशी बोलावं हे मला योग्य वाटत नाही. फोन मलाच करू दे. मी आजीला नीट समजावून सांगतो की तुमची लाडकी लेक लग्नाला येणार नाही. तिनं कुठंही न जाण्याची प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा लग्नाची सगळी तयारी एकट्यानं करायची तयारी ठेवा.’’

माझ्या चढलेल्या पाऱ्यावर आईच्या फोननं थंड पाण्याचं काम केलं होतं. पण या तिघांच्या या अशा वागण्यानं माझा पारा पुन्हा चढायला लागला.

मुळात झालं असं होतं की आम्ही एक आठवडा सिमल्याला जाऊन आलो होतो. मुलांना सुट्या होत्या. अपूर्वनंही रजा घेतली होती. प्रवास छान झाला. सिमल्याचा मुक्कामदेखील सुखद होता. परतीचा प्रवास करून आम्ही तासाभरापूर्वीच आपल्या घरात आलो होतो. घरात शिरताच अपूर्व अन् दोन्ही मुलं टीव्ही अन् एसी सुरू करून सोफ्यावर, खुर्च्यांवर पसरले होते. आल्या आल्या अपूर्वनं हुकूम सोडला, ‘‘बबिता पटकन झकास चहा कर बरं, कधी एकदा घरचा चहा मिळेल असं झालंय.’’

‘‘मम्मा, प्लीज चहाबरोबर गरमागरम कांदाभजीही कर ना, कधीची इच्छा आहे मला. तिथं सिमल्याहून निघताना तो टपरीवाला तळत होता ना, तेव्हापासून नाकात वास घुमतोय माझ्या…’’ गौरवनं, मोठ्या चिरंजीवांनी म्हटलं.

‘‘मम्मा, तू मला प्रॉमिस केलं होतं, घरी पोहोचलो की तू मला मस्त थालीपीठ करून खायला घालशील म्हणून, तू तुझं प्रॉमिस विसरली तर नाहीस ना? धाकटे चिरंजीव ऋतिकनं, हम भी कुछ कम नहीं, हे सिद्ध केलं.’’

मी त्यांचं बोलणं ऐकत होते, पण माझं सगळं लक्ष घरातल्या पसाऱ्यावर होतं.

बाल्कनीत वर्तमान पत्रांचा ढीग साठला होता.

कारण आम्ही पेपरवाल्याला ‘पेपर टाकू नकोस’ हे सांगायलाच विसरलो होतो. ती रद्दी जागेवर ठेवणं गरजेचं होतं. मागच्या अन् पुढच्या बाल्कनीला कुंड्यांमधल्या झाडांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. त्यांना आधी पाणी द्यायला हवं होतं. घरात भरपूर धूळ साठली होती. सखूबाई उद्या सकाळी येणार म्हणजे आत्ता निदान घराचा केर काढायलाच हवा. अंथरूणाच्या (बेडवरच्या) चादरी बदलायच्या, स्वयंपाकाचा ओटा निदान पुसून काढायचा. प्रवासातल्या बॅगा रिकाम्या करायच्या. प्रवासात न धुतलेले कपडे मशीलना घालायचे. धूवून झाले की वाळायला घालायचे.

त्या खेरीज हॉटेलचं जेवण जेवून कंटाळलेल्या नवऱ्याला अन् मुलांनाही चवीचं काहीतरी स्पेशल स्वयंपाक हवाच. नुसत्या खिचडीनं किंवा पिठलंभातानं भागणार नाही.

चार दिवसही घराबाहेर राहून आलं की आल्यावर हा जो कामाचा डोंगर समोर दिसतो ना की जीव घाबरा होतो. असं वाटतं कशाला गेलो आपण बाहेर? नवरा अन् मुलांचं बॅगा घरात आणून आपटल्या की काम संपतच. त्यानंतर त्यांना काही काम नसतं. ते तिघं त्यांच्या कोषात, त्यांच्या विश्वात दंग अन् मी एकटी सर्व कामं करता करता मेटाकुटीला येते.

आपापल्या फर्माइशी सांगून ते तिघं टीव्हीपुढे बसलेले अन् मी स्वयंपाकघरात ओट्याशी विचार करत उभी की कामाला सुरूवात कुठून करू?

त्यांची पोटपूजा झाल्याखेरीज ती शांत होणार नाही अन् तोपर्यंत मलाही काही सुचू देणार नाहीत हे मला माहीत होतं. खरंतर प्रवासातून आल्या आल्या आधी स्वच्छ अंघोळ करायची इच्छा होती, पण तो विचार बाजूला सारून मी फक्त हातपाय, तोंड धुतलं अन् पदर खोचून कांदा चिरायला घेतला. एकीकडे कढईत तेल तापत ठेवलं, दुसरीकडे तव्यावर थालीपीठ लावलं, तिसऱ्या शेगडीवर चहाचं आधण चढवलं. भरभरा कांदा भजी, थालीपीठ, चहा अन् बिस्किटं असा सगळा सरंजाम टेबलावर मांडला. मंडळी त्यावर तुटून पडली. मीही शांतपणे चहा घेतला अन् लगेच कामाला लागले.

सगळ्यात आधी धुवायचे कपडे मशीनला घालावे म्हणजे मशीन कपडे धुवेल तेवढ्यात मला इतर कामं उरकता येतील.

मशीन सुरू करायचं म्हणताना मला पाण्याची टाकी आठवली. ओव्हरहेड टँकमध्ये किती पाणी असेल कुणास ठाऊक, कारण आठ दिवस आम्ही इथं नव्हतो. मी ऋतिकला म्हटलं, ‘‘जरा गच्चीवर जाऊन बघ टाकीत पाणी आहे की नाही तर तो दिवटा तोंडावरून पांघरूण घेऊन झोपला. त्यापूर्वी त्यानं मोठ्या भावाकडे बोट दाखवून त्याला वर पाठव एवढं मात्र सुचवलं.’’

मला भयंकर राग आला. धाकट्याकडे दुर्लक्ष करून मी बाहेर आले तोवर मोठ्याला काही तरी जाणीव झाली. तो पटकन् उठला, ‘‘मम्मा, मी बघून येतो अन् गरज असली तर मोटरही सुरू करतो.’’ त्याच्या बोलण्यानं मला बरं वाटलं. चला, कुणाला तरी दया आली म्हणायची. मी प्रवासातल्या बॅगा, सुटकेस रिकामी करायला लागले.

‘‘मम्मा, टाकी पूर्ण भरलेली आहे…आता कृपा करून एक तासभर तरी मला टीव्हीवरचा माझा अगदी आवडता कार्यक्रम बघू दे. प्लीज डिस्टर्ब करू नकोस.’’ त्यानं वरून आल्यावर मला सांगितलं अन् तो टीव्हीपुढे बसला.

सगळ्या पसाऱ्याचा, कामाचा मला इतका ताण येतोय अन् नवरा आणि मुलं मात्र बिनधास्त आहेत. कुणी तोंडदेखलंही मदत करायला म्हणत नाहीएत. बाहेर कुठं जायचं तर हीच तिघं आघाडीवर असतात. उत्साह नुसता फसफसत असतो. पण जाण्याच्या तयारीतही कुणी मदत करत नाहीत की प्रवासातून परतून आल्यावर आवरायलाही मदत करत नाहीत.

आता मात्र अति झालं हं. मी फार सरळ साधी आहे ना, म्हणून यांचं फावतंय. मी एकटी मरते खपते अन् यांची प्रत्येक गरज, मौज, इच्छा पूर्ण करते. पण यांना माझी अजिबात पर्वा नाहीए. आपलं काही चुकतंय याची एवढीशीही जाणीव नाहीए. यांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून द्यायलाच हवीय. मी मनोमन विचार करत होते. कपडे मशीनमध्ये धुतले जात होते. घराचा केर काढून झाला होता. बेडवरच्या चादरी बदलल्या गेल्या होत्या. रद्दी जागेवर गेली होती. कुंड्यांना पाणी घातल्यामुळे मातीचा सुंदर वास सुटला होता. मी पुन्हा हॉलमध्ये पोहोचले.

‘‘ऐकताय का? मी ही तुमच्यासारखा प्रवास करून आलेय. तुमच्यासारखीच मीही दमलेय. मलाही आराम करावासा वाटतोय. पण मला तो हक्क नाही. कारण घरातली सगळी कामं मीच करायला हवीत हे तुम्ही गृहित धरलयं. म्हणूनच मी आता ठरवलंय की यापुढे मी कधीही तुमच्याबरोबर कुठंही येणार नाही. कार्यक्रम ठरवताना तुम्ही पुढाकार घेता, पण तयारी करताना मात्र अजिबात उत्साह नसतो. तिच तऱ्हा परतून आल्यावरही असते. प्रवासाला जाताना, तिथं गेल्यावर आपण काय कपडे घालायचे आहेत ठरवावं लागतं. कोणते कपडे बरोबर घ्यायचे हे बघावं लागतं. तुम्ही तिघंही ते ठरवत नाही. स्वत:चे कपडे बॅगेत भरण्यासाठी काढून देत नाही. मी माझ्या मनानं कपडे घेतले तर तिथं गेल्यावर, ‘‘मम्मा, हा शर्ट मला आवडत नाही, हाच का आणलास? मम्मा, ही जिन्स लहान झालीय. ही मी घालणार नाही, बबिता अगं, हे कुठले सोंगासारखे कपडे मला घालायला देते आहेस? कमालच करतेस…’’ हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. का नाही तुम्ही आपापले कपडे निवडून, मला ठेवायला देत? आतासुद्धा तुम्ही तिघंही मला कामात मदत करू शकला असता, अजूनही करू शकता, पण तुम्हाला कुणाला ती जाणीवच नाहीए. तुम्हाला सगळ्यांना आराम हवाय…मला नको का विश्रांती.’’

माझ्या भाषणाचा थोडा परिणाम झाला. गौरवनं पटकन् टीव्ही बंद केला. एसी बंद करून पेपर बाजूला टाकून नवरा उठला. धाकट्यानं अंगावरचं फेकून दिलं. तोही येऊन उभा राहिला.

तिघंही आपल्याला काय काम करता येईल याचा अंदाज घेत इथं तिथं बघत असतानाच माझा मोबाइल वाजला. रागात होते म्हणून फोनही उचलायची इच्छा नव्हती. पण माझ्या आईचं नाव दिसलं म्हणून पटकन् फोन घेतला. ‘‘हॅलो बबिता, अगं आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. अगं, अभिषेकचं लग्न ठरलं हं! मुलीकडची मंडळी आता इथंच आहेत. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवतोय. अजून लवकरचीच तारीख बघतोय तारीख नक्की झाली की पुन्हा फोन करते. तुला तयारीला वेळ मिळावा म्हणून घाईनं फोन केलाय. तू लवकर आलीस तर मलाही इथं कामं सुधरतील. एकटीला तर मला घाबरायलाच होतंय.’’ आईनं फोन बंद केला.

माझा फोन स्पीकरवर असल्यानं तिघांनीही आईचं बोलणं ऐकलं होतंच. तरीही मी आनंदाने चित्कारले, ‘‘बरं का, अभिषेकचं लग्न ठरलंय. लग्नाची तारीख लवकरचीच निघतेय. आईनं आपल्याला तयारीला लागा म्हणून सांगितलं.’’

‘‘पण मम्मा,’’ धाकटा अत्यंत निरागसपणे म्हणाला, ‘‘तू जाशील मामाच्या लग्नाला?’’

‘‘म्हणजे काय? मी का जाणार नाही? अन् तुम्हीदेखील याल ना मामाच्या लग्नाला?’’ मी आश्चर्यानं म्हटलं.

‘‘अगं, पण एवढयात तू म्हणाली होतीस की यापुढे तू आमच्याबरोबर, कुठंही, कधीही जाणार नाहीस म्हणून?’’ थोरल्यानं म्हटलं.

अन् मग सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे संवाद झाला. तिघंही माझी चेष्टा करू लागले. मघाच्या माझ्या रागावण्याचा जो परिणाम तिघांवर झाला होता. माझी मदत करायला ते तयार झाले होते, त्यावर आईच्या फोननं पाणी फिरवलं.

माझा मूड चांगला झालाय बघून पुन्हा तिघंही आपापल्या खोलीत गेले अन् मीही आरडाओरडा न करता आपल्या कामाला लागले.

दुसऱ्या दिवसापासून अपूर्वचं आफिस, मुलांच्या शाळा वगैरे रूटीन सुरू झालं. मी माझी कामं सांभाळून अभिषेकच्या लग्नाचं प्लॅलिंग सुरू केलं.

पण अभिषेकच्या लग्नाला जायचं, लग्नासाठी लागणारे आपले कपडे, पोषाख वगैरेची खरेदी, शिंप्याकडच्या फेऱ्या, जाताना बॅगा भरणं, आल्यावर बॅगा उपसणं वगैरे सर्व मनात येताच मला टेन्शन आलं.

अपूर्व अन् दोन्ही मुलांच्या असहकारामुळेच मला हल्ली कुठं जाणं नको वाटायला लागलं होतं. खरंतर नवरा अन् मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात. पण मला अपेक्षित असलेली लहानलहान कामाची मदत मात्र ते करत नाहीत. सगळ्यात मोठी अडचण असते ती त्या तिघांच्या कपड्यांच्या बाबतीत. कुठल्या दिवशी, कोणत्या प्रंसगाला कुणी काय घालायचं हेसुद्धा मलाच ठरवावं लागतं. मुलांना म्हटलं, ‘‘चला, आपण दुकानातून तयार शर्ट, पॅन्ट, जीन्स, ट्राउझर्स विकत आणूयात,’’ तर म्हणणार, ‘‘प्लीज मम्मा, आम्हाला शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही. तूच जा अन् घेऊन ये.’’

‘‘अरे पण मला तुमची निवड, आवड समजत नाही…’’

‘‘तू व्हॉट्सएॅपवर फोटो पाठव. आम्ही पसंत करतो.’’ हे उत्तर मिळतं.

दुकानातून मेसेज केला, फोटो पाठवले तर त्यावर उत्तरच येत नाही. शेवटी मी माझ्या बुद्धिप्रमाणे खरेदी करून घरी येते, तेव्हा एकाला रंग आवडलेला नसतो, दुसऱ्याला कॉलरचं डिझाइन. मला वैतागलेली बघून म्हणतात, ‘‘जाऊ दे गं! नको टेन्शन घेऊस, आम्ही आहेत तेच कपडे घालू…रिलॅक्स!’’

आता यांना कसं समजावून सांगू की जोपर्यंत नवरा आणि मुलं नवे कपडे घालत नाही, तोवर बायको किंवा आई स्वत:च्या अंगावर नवे कपडे घालूच शकत नाही. मुलांची वागणूक आणि त्यांची चांगली राहणी यावरूनच तर गृहिणीची, आईची ओळख पटते. त्यामुळेच अपूर्व आणि ऋतिक, गौरव यांचे कपडे स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रसंगानुरूप असावेत म्हणून मी खूप काळजी घेते. मुलं लहान असताना एक बरं होतं. ती ऐकायची.

पण आता ती मोठी झाली आहेत. पूर्वीप्रमाणेच मी शिंप्याकडून शिवून घेतलेले किंवा तयार विकत आणलेले कपडे ती घालंतच नाहीत. त्यांना जे आवडतं, तेच ती घालणार. कित्येकदा मी चिडून म्हणालेसुद्धा, ‘‘तुम्हा दोघांच्या ऐवजी दोघी मुली असत्या तर हौशीनं माझ्याबरोबर खरेदी करायला आल्या असत्या. शिवाय घरकामांतही मला मदत केली असती.’’

मुद्दाम करतात असंही नाही, पण मला गोत्यात आणायची कला बापाला अन् लेकांनाही उपजत असावी. कुठं लग्नाला गेलो असताना नेमक्या प्रसंगी घालायचे कपडे दोन्ही मुलांनी रिजेक्ट केले. एकाची झिप (चेन) खराब झाली होती. दुसऱ्याला झब्बा टाइट होत होता. त्या परक्या ठिकाणी मी कुणी ऑल्टर करून देणारा भेटतोय का किंवा पटकन् झब्बा मिळेल असं दुकान शोधत होते.

यावेळी मी मनातल्या मनात ठरवलं की मी असं काही तरी केलं पाहिजे, ज्यामुळे यांना माझ्या मन:स्थितीची, माझ्या टेन्शनची, माझ्या काळजीची कल्पना येईल. आपण बेजबाबदार वागतो त्याचा हिला त्रास होतो ही जाणीव होईल…अन् मला एक कल्पना सुचली. अंमलात आणायलाही सुरूवात केली.

एकुलत्या एका मामाच्या लग्नाला जायला ऋतिक आणि गौरव उत्सुक असणार अन् एकुलत्या एक धाकट्या मेहुण्याच्या लग्नात ज्येष्ठ जावई म्हणून मिरवायला यांनाही आवडेल हे मी जाणून होते. माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाला जायला मी ही खूपच उत्साहीत असणार हे त्यांनाही माहीत होतं. माझी आयडिया यावरच आधारित होती.

अभिषेकच्या लग्नाला बरोबर एक महिना होता. तेवढ्या वेळातच मला स्वत:ची तयारी करायची होती. शिवाय आईनं सांगितलेल्या अनेक गोष्टी, ज्या इथं मिळतात त्याही खरेदी करायच्या होत्या. वेळ म्हटलं तर कमीच होता. ही तिघं घराबाहेर असायची, तेवढ्या वेळात मी बाजारात जाऊन खरेदी करून घरी यायची. आणलेलं सामान व्यवस्थित कपाटात रचून ठेवायची. बाहेर कधीच कुठल्या पिशव्या नव्या वस्तू कुणाला दिसत नव्हत्या. मी ही घरातच दिसायची. माझ्या मनाजोगती माझी खरेदी अन् तयारी झाल्यामुळे मी खुश होते. पण वरकरणी तो आनंद दिसू न देता मी अगदी नॉर्मल वागत होते. लग्नाचा विषयसुद्धा मी एवढ्या दिवसात काढला नाही.

१५-१७ दिवस असेच निघून गेले. लग्नाचा विषय कुणाच्या डोक्यात नव्हता. मी अगदी शांत आहे हेसुद्धा कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं. मग एक दिवस रात्री जेवायच्या टेबलावर अपूर्वनं विषय काढला. माझी प्रतिक्रिया अत्यंत थंड होती…सगळेच दचकले. तिघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मी शांतपणे भात कालवत होते. ‘‘बबिता, अगं मी अभिषेकच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझ्या डोक्यात शिरतंय का? तू इतकी थंडपणे बसली आहेस? लग्नाची तयारी करायची नाहीए का? तुझी तब्येत बरी आहे ना?’’ अपूर्वनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘मी बरी आहे की!’’ मी बोलले.

माझा निर्विकार प्रतिक्रिया बघून अपूर्व सावधपणे माझ्याकडे बघत म्हणाले, ‘‘काही प्रॉब्लेम आहे का?’’

माझा बाण बरोबर लक्ष्यावर लागलाय हे बघून मला खूपच आनंद झाला. माझी योजना यशस्वी होतेय तर! मनातून वाटणारं समाधान चेहऱ्यावर न दिसू देता मी निर्विकारपणे म्हटलं, ‘‘मी लग्नाला जात नाहीए.’’

‘‘काय म्हणतेस? काय झालंय…काय,’’ तिघंही उडालेच!

‘‘माझी भीष्मप्रतिज्ञा विसरलास का?’’ मी ऋतिककडे बघत विचारलं.

‘‘अगं मम्मा, अभिषेक मामाचं लग्न होऊन जाऊ दे. मग पुन्हा कर भीष्म प्रतिज्ञा.’’ तो चेष्टेच्या सुरात म्हणाला. खरं तर मला हसायला येत होतं, पण मी गंभीरपणे म्हणाले, ‘‘मी सीरीयसली बोलतेय. उगाच काहीतरी कॉमेडी करू नका,’’ मी पटापट जेवले अन् आपलं ताट सिंकमध्ये ठेवून आपल्या खोलीत निघून गेले.

जाता जाता मी ऐकलं, गौरव अपूर्वला म्हणत होता, ‘‘पप्पा, आई बहुतेक आपल्यावर रागावली आहे. दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी आईचा राग घालावतो.’’ अपूर्वनं मुलांना आश्वस्त केलं.

दुसऱ्या दिवशी दुपारीच अपूर्वनं ऑफिसातून फोन केला, ‘‘बबिता, अगं, आज मी ऑफिसातून लवकर घरी येतोय. आपण अभिषेकच्या लग्नासाठी खरेदी करूयात. माझ्याकडे लग्नात घालण्यासारखे कपडे नाहीएत. काही कपडे मी घेतो विकत. तुझ्यासाठीही काही नवीन साड्या घेऊयात. एकुलत्या एका भावाच्या लग्नात तुला जुन्या साड्या नेसताना बघून बरं वाटेल का?’’

मला त्यांचं बोलणं ऐकून खरं तर हसायला येत होतं. कसंबसं मी स्वत:ला आवरत होते. इतकी वर्ष मी जेव्हा मनधरणी करत होते, तेव्हा माझ्याबरोबर दुकानात यायलाही ते तयार नव्हते अन् मी माझा पवित्रा बदलल्याबरोबर कसे सरळ झाले.

गौरव कॉलेजातून आला अन् म्हणाला, ‘‘ बरं का मम्मा, मी ना, नेटवर सर्व केलंय ऑनलाइन. खूप छान शर्ट आणि ट्राझर्स मिळताहेत…मी विचार करतोय की मी आजच ऑर्डर करतो म्हणजे मला मामाच्या लग्नासाठी बॅग भरता येईल. तुला उगीच दुकानात जा, कपडे निवडा, वगैरे टेन्शन नकोच!’’

मी हसून मान डोलावली. म्हणजे माझा ‘तीर निशाने पे लगा था.’ अपूर्व अन् दोन्ही मुलं आपापल्या कपड्यांचं सिलेक्शन करत होती. प्रथम माझा अन् नंतर एकमेकांचा सल्ला घेत होती, तेव्हा मला खूपच मजा वाटत होती. माझ्या साड्यांची निवड करायला मी अपूर्वलाच सांगितलं.

गौरवनं वर चढून बॅगा काढून दिल्या अन् दोघं पोरं अन् त्यांचा बाप आपापले कपडे बॅगेत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले, तेव्हा मात्र मला राहवेना. मी पुढे होऊन त्यांना थांबवलं. थांबा मी नीट व्यवस्थित भरते बॅगा. बघा फक्त म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही आपल्या आवडीचे प्रसंगाला अनुरूप असे कपडे खरेदी केले हीच तुमची मदत फार मोलाची आहे. मला खूप बरं वाटतंय.

‘‘मम्मा, तू बॅगा जमव. आज बाबांनी डिनरपण ऑर्डर केलाय बाहेरून, म्हणजे स्वयंपाकात तुझा वेळ जायला नको,’’ अपूर्वनं म्हटलं.

‘‘आणि ना, परत आल्यावरही आम्ही तुला घर आवरायला मदत करणार आहोत हं!’’ माझ्या गळ्यात पडून ऋतिकनं म्हटलं.

मला तरी याहून जास्त काय हवं होतं?

घुसमट

कथा * पौर्णिमा अत्रे

पाच महिन्यांची सिया, शुभीची पहिलीच मुलगी. लाडक्या लेकीचे पुन्हा:पुन्हा लाड करून शुभीनं तिला खाली ठेवली. बाळंतपणाच्या दीर्घ रजेनंतर शुभी आज प्रथमच ऑफिसला निघाली होती. लहानग्या, गोंडस सियाला सोडून जावंसं वाटत नव्हतं, पण जायला हवंच होतं. गेले सहा महिने ती घरीच होती.

मयंकनं शुभीकडे बघितलं. ती पुन्हा:पुन्हा सियाला छातीशी कवटांळत होती.

‘‘काय झालं?’’ त्यानं विचारलं.

‘‘सियाला सोडून जावंसं वाटत नाहीए.’’

‘‘हो गं! मी समजू शकतो. पण तू काळजी करू नकोस. आईबाबा आहेत…शिवाय रमाबाई आहेच. सिया अगदी सुरक्षित वातावरणात आनंदात राहील. डोंट वरी…चल, निघायला हवं.’’

दिनेश आणि लता म्हणजे शुभीच्या सासूसासऱ्यांनीही तिला आश्वस्त केलं, ‘‘शुभी, अगदी नि:शंक मनानं जा. आम्ही आहोत ना? सिया मजेत राहील.’’

शुभी केविलवाणं हसली. सिया आजीच्या कडेवरून आईकडे बघत होती. शुभीचे डोळे भरून आले. पण ही वेळ भावनाविवश होण्याची नव्हती. तिनं पटकन पर्स उचलली अन् ती मयंकबरोबर घराबाहेर पडली.

शुभी अन् मयंक नवी मुंबईत राहत होती. तिथून आठ किलोमीटर अंतरावर शुभीचं ऑफिस होतं. मयंकनं तिला बस स्टॉपवर सोडलं अन् तो पुढे निघून गेला. बसमध्ये बसायला जागा नव्हती. उभ्याउभ्याच शुभी विचारात गढून गेली.

एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनीत शुभी एक्सपोर्ट मॅनेजर होती. पगार भरपूर होता. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती घरी, ऑफिसातही सर्वांना हवीशी वाटायची. आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य खूपच निवांत अन् आनंदात गेलं होतं. पण आज सियाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑफिसात आली होती, त्यामुळे ती जरा उदास होती.

ऑफिसात गेल्यावर शुभीनं सर्वत्र नजर फिरवली. बरेच नवे चेहरे दिसले. जुन्या लोकांनी तिचं अभिनंदन केलं अन् ते आपापल्या कामाला लागले. शुभी ज्या पोस्टवर होती तिथं जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट तिच अप्रूव्ह करत होती.

शुभीची बॉस शिल्पी तिच्या कामावर खुश होती. कितीही काम असलं तरी शुभी हसतमुखानं सर्व कामाचा फडशा पाडायची. त्यामुळे शिल्पी आपलीही बरीचशी कामं शुभीवर टाकायची. शुभीनंही ती कामं आनंदाने केली होती.

शिल्पी खूपदा म्हणायची, ‘‘शुभी, तू नसतीस तर इतकं काम मी एकटी करू शकले नसते. तुझ्यावर सगळी कामं सोपवून मी अगदी निश्चिंत होते.’’

शुभीला आपल्या कर्तबगारीचा, योग्यतेचा गर्व वाटायचा. तशी शिल्पी बऱ्यापैकी खडूस अन् खवंट होती. पण अशा बॉसकडून कौतुक ऐकलं की शुभीचाही अहंकार सुखावत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामं शुभी आटोपत असे.

ऑफिसात आपल्या सीटवर आल्या आल्याच शुभीला स्वत:त उर्जेचा संचार झाल्याचं जाणवलं. कर्तव्याची भावना मनातून उसळी मारून वर आली. शिल्पीला भेटून औपचारिक बोलणं झाल्यावर ती उत्साहानं कामाला लागली. महिनाभरातच एक नवा प्रॉडक्ट लाँच व्हायचा होता. त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी शुभी शिल्पीकडे गेली, तेव्हा अगदी थंडपणे ती म्हणाली, ‘‘शुभी, एक नवी मुलगी आली आहे, तिलाच हे असाइनमेंट दिलंय.’’

‘‘पण का? मी आलेय आता तर मी करते ना?’’

‘‘नको, तू राहू दे. बऱ्याच उशिरापर्यंत थांबावं लागेल…तुला तर आता घरी पोहोचण्याची घाई असणार ना?’’

‘‘नाही नाही, असं काही नाहीए…काम तर मी करणारच ना?’’

‘‘नको, तू राहू दे…’’

मनात खळकन् काही तरी फुटल्यासारखं वाटलं शुभीला. ती तर आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्टसाठी जिवाचं रान करत होती, तर आता का नाही करू शकणार काम? सियासाठी तिला घरी लवकर जावं लागेल हे खरं असलं तरी ती जमवून घेईल सगळं. तिच्या मानसिक समाधानासाठी, मानसिक आनंदासाठीच तर ती नोकरी करतेय ना? काही न बोलता ती परत टेबलपाशी आली, पण मघाचा उत्साह, उर्जा आता लोप पावली होती.

तिनं ऑफिसात सर्वत्र नजर फिरवली. तिला एकदम कपिलची आठवण आली. कपिल कुठाय? सकाळपासून दिसलाही नाहीए. त्याच्या आठवणीनं तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोकळ्या ढाकळ्या विनोदी स्वभावाचा कपिल सतत तिच्याशी चेष्टा मस्करी करायचा. फ्लर्टिंगच म्हणा ना. शुभीला गंमत वाटायची. ती विवाहित होती. त्यातून गरोदर होती, तरीही कपिल तिच्या मागेपुढे करायचा. कपिल तिला एकदम लंच टाइममध्ये भेटला. आज तिनं आपला डबा घरून आणला नव्हता. कॅन्टीनमध्ये जेवावं असं ठरलं होतं. उद्यापासून डबा आणता येईल. ती कॅन्टीनकडे निघाली. तेवढ्यात तिला कपिल दिसला. तिनं हाक मारली,

‘‘कपिल…’’

‘‘अरेच्चा? तू? कशी आहेस?’’

‘‘छान आहे. सकाळपासून दिसला नाहीस?’’

‘‘हो…फिल्डवर होतो. एवढ्यात येतोय.’’

‘‘आणि कसं काय?’’

‘‘छान आहे. तुझी मुलगी कशी आहे?’’

‘‘मस्त आहे, चल, लंच घेऊयात.’’

‘‘हो तू हो पुढे, मी येतोच,’’ म्हणत कपिल दुसरीकडे निघून गेला.

शुभीला नवलच वाटलं? हा तोच कपिल का? इतका फॉर्मल? असा तर तो कधीच वागत नसे. शुभीनं तिच्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर जेवण उरकलं, सहज लक्ष गेलं तर कपिल एका नव्या ग्रुपसोबत खिदळत होता. तिनं एक नि:श्वास सोडला. घरी फोन करून सासूला सियाबद्दल विचारलं. सगळं ठीक आहे कळल्यावर ती पुन्हा आपल्या टेबलपाशी येऊन कामाला लागली.

संध्याकाळी सहाला शुभी ऑफिसमधून निघून बस स्टॅन्डवर पोहोचली. एरवी इतक्या लवकर ती कधीच निघत नव्हती. कामंच आटोपत नव्हती. आज कामच कमी होतं. ती विचार करत होती. इतक्या दिवसांनी कामावर आल्यावर ऑफिसात चित्त का लागत नव्हतं. कदाचित सियाला पहिल्यांदाच इतका वेळ सोडून आल्यामुळे असेल का? की ऑफिसात बरेच बदल झालेत. नवी माणसं आली आहेत म्हणून? पूर्वी तिला कपिलचं फ्लर्ट करणं आवडायचं. छान टाइमपास होता तो. तिला वाटत होतं, इतक्या दिवसांनी कपिल भेटेल तेव्हा खूप गप्पा मारेल, बडबड करेल, तिला कामही सुचू देणार नाही. पण आज तर त्यानं शुभीला चक्क टाळलंच. ती रजेवर गेल्यानंतर सुरूवातीला तो आवर्जून फोन करायचा. पुढे पुढे मेसेजना रिप्लायसुद्धा देणं बंद केलं होतं. ती ही बाळात गुंतली. आत्ताच्या नव्या प्रॉडक्टमध्ये तिला इंटरेस्ट होता पण शिल्पीशी वाद कुणी घालायचा.

ती घरी पोहोचली, तेव्हा सियाला सांभाळताना सासू सासऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली होती. शुभीनं सिया म्हणून हाक मारताच सिया आईकडे झेपावली. शुभीनं भराभर हातपाय तोंड धुवून कपडे बदलून सियाला जवळ घेतलं. तिला छातीशी कवटाळून ती आपल्या बेडरूममध्ये येऊन अंथरूणावर पडली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

सासू खोलीत आली. ‘‘कसा गेला दिवस?’’

‘‘सियानं त्रास नाही ना दिला?’’ शुभीनं विचारलं.

‘‘रडली थोडीशी, पण हळूहळू होईल तिला सवय. तिला, आम्हाला अन् तुलाही, कारण तुझं ऑफिसला जाणंही गरजेचं आहे ना?’’ सासू म्हणाली.

एव्हाना मयंकही आला होता. रमाबाई सायंकाळचा स्वयंपाक आटोपून निघून गेल्या होत्या. रात्रीची जेवणं एकत्रच झाली. सिया सर्व वेळ आईला चिकटूनच होती.

मयंकनं विचारलं, ‘‘शुभी, आज खूप दिवसांनी ऑफिसला गेली होतीस, कसा गेला दिवस?’’

‘‘वातावरण खूपच बदलेलं वाटलं. खूप नवीन लोकही आले आहेत. आज काही माझं चित्त लागेना कामात?’’

‘‘कदाचित तुला सतत सियाची आठवण येत असेल…होईल हळूहळू सवय.’’

त्या नंतरच्या पंधरा वीस दिवसांत ऑफिसचे झालेले एकूण बदल लक्षात आल्यावर शुभीला टेन्शनच आलं. हा प्रकार नवा होता. शिल्पी तशीही चिडचिडी होती. नवरा बंगळुरूला जॉब करत होता. ही मुंबईत एकटीच असायची. पंधरा दिवसांनी एकदा नवरा मुंबईत यायचा. त्यामुळे तिला बंधनं काहीच नव्हती. नेमकी सायंकाळी सहा वाजता तिला मीटिंग घेण्याची हुक्की यायची. अत्यंत महत्त्वाची डिस्कशन्स तिला नेमकी साडेसहाला आठवायची. मग सात वाजता मीटिंग व्हायची.

शुभीला आपलं काम आवडायचं. प्रामाणिकपणे ती काम करायची. जास्तीच्या कामाबद्दलही कधी तिनं तक्रार केली नव्हती. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शुभीनं इथवर पोहोचायला खूप श्रम घेतले होते. सहाच्या सुमाराला शुभीनं तिच्या नव्या सहकारी मैत्रिणीला घरी विचारलं तर ती म्हणाली, ‘‘आता तर मीटिंग आहे ना?’’

शुभी दचकलीच! ‘‘मीटिंग कुणी ठेवलीय? मला तर काहीच ठाऊक नव्हतं.’’

वैतागून हेमानं म्हटलं, ‘‘शिल्पीनं बोलावलीय. तिला स्वत:ला घरी जाण्याची कधीच घाई नसते. पण इतरांना घरदार, मुलं, नवरा, कुटुंब सांभाळायचं असतं हे ती लक्षातच घेत नाही.’’

शुभीला जरा गोंधळल्यासारखं झालं…शेवटी न राहवून ती शिल्पीकडे पोहोचली, ‘‘मॅम, मला माटिंगबद्दल ठाऊकच नव्हतं. काय डिस्कस करायचंय? मी काही तयारी करू?’’

‘‘नको, तू राहू दे. एका नव्या असाइनमेंटवर काम करायचंय.’’

‘‘मग मी थांबू का?’’

‘‘नाही…नको, तू घरी जा.’’ लॅपटॉपवरची नजरही न काढता शिल्पी आपलं काम करत राहिली. शुभीला ती उपेक्षा, तो अपमान खूपच खटकला. त्याच मन:स्थितीत ती घरी आली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिला मनातल्या भावना मोकळ्या कराव्याशा वाटल्या. तिनं म्हटलं, ‘‘मयंक, हल्ली ऑफिसात वातावरण विचित्र आहे. मला तिथं घुसमटायला होतंय. पूर्वी माझ्या खेरीज शिल्पीच्या मीटिंग्ज होत नव्हत्या. आता तिला माझी गरजच नाहीए. मला नवी असाइनमेंटही देत नाहीए.’’

कुणी काहीच बोललं नाही, तेव्हा तिच पुढे म्हणाली, ‘‘पूर्वी जे लोक सतत मागेपुढे करायचे, ते ही आता टाळायला बघतात. मला अजिबात आवडत नाहीए तिथं काम करायला. सियाच्या जन्मानंतर मी ऑफिस जॉइन करून चूक केली असं वाटतंय मला. घुसमट सहन होत नाहीए. जीव गुदमरतोय जणू…’’

मयंकनं तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं अन् तो म्हणाला, ‘‘टेकइट ईझी शुभी, तुला कदाचित फार दिवसांनी गेल्यामुळे असं वाटत असेल…पण नोकरी तर करायचीच आहे ना?’’

‘‘नाही, मला नाही जावंसं वाटत…’’

‘‘असं कसं? जावं तर लागेलंच!’’

आता सासूलाही संभाषणांत भाग घ्यावासा वाटला, ‘‘अगं, पण घरात इतके खर्च आहेत, दोघं कमवता आहात म्हणून सगळं सुरळीत चाललंय. एकट्या मयंकाच्या पगारात असं सगळं होईल का?’’

शुभी गप्प बसली. तिलाही माहीत होतं की तिला मिळणाऱ्या दणदणीत पगारामुळेच त्यांचं स्टॅन्डर्ड इतकं ‘हाय’ आहे. स्वत:च्या पायावर उभं असण्याचा तिलाही अभिमान होताच. पण ऑफिसात खरंच तिला घुसमटायला होतंय. नाहीच जावंस वाटत. तिला वाटतंय सध्या ब्रेक घ्यावा. घरीच सियाबरोबर रहावं…पण ब्रेक घेतल्यामुळेच तर सगळं बदललं आहे. सासूसासरे, मयंक सगळेच आपापल्या परीनं तिला समजवंत होते. काही तिला समजलं, काही तिनं समजून घेतलं नाही…ती स्वत:च्याच मनाची समजूत घालत होती.

काही दिवस अजून गेले. सिया आता नऊ महिन्यांची झाली होती. खूपच शांत अन् खेळकर होती सिया. दिवसभर ती आईशिवाय छान राहायची. संध्याकाळी मात्र आई आल्यावर आईला अजिबात सोडत नसे.

शुभीला आता ऑफिसच्या कामात मजा येत नव्हती. शिल्पी आता तिला अजिबात विचारत नव्हती. नवी जबाबदारी देणं तर दूरची गोष्ट होती. सहा महिन्यांत इतका फरक का पडावा हेच तिला कळत नव्हतं. कुठं काय चुकलं? तिनं बाळंतपणाची रजाच घ्यायला नको होती का? पण तो तर तिचा हक्कच होता. पण तेवढ्यामुळे ऑफिसमधली तिची गरजच संपून जावी?

त्यातून पुन्हा कपिलचं तुसडेपणानं वागणं, त्याच्याकडून होणारी उपेक्षा तिला अधिकच दु:खी करत होती. ती एका बाळाची आई झाल्यामुळे त्याच्या स्वभावात इतका फरक पडावा? कधी तरी भेटला तर इतका औपचारिकपणे बोलायचा, वागायचा, जणू हा तो कपिल नाहीच. पूर्वी त्याचे रोमँटिक डॉयलॉग, फ्लर्टिंग, जोक्स ती एन्जॉय करायची. दिवसा कसा उत्साहानं सळसळत संपायचा. आता मात्र ती उदास कंटाळवाणा दिवस कसाबसा रेटून घरी परतायची.

आपली योग्यता, आपल्या अधिकाराच्या अनुरूप काम ऑफिसात दिलं जात नाही यामुळे ती निराश असायची. टेन्शन यायचं तिला. मनाची घुसमट वाढत होती. घरात कुणीच तिला समजून घेत नव्हतं अन् ऑफिसमध्ये मनाजोगतं काम मिळत नव्हतं.

नेमकं तिच्या मागे काय घडलं होतं ते तिला समजलं नाही. पण ऑफिसात वातावरण बदललं होतं. त्यामुळे ती फार त्रस्त होती. ती घुसमट, तो ताण सहन होईना. डिप्रेशन येईल की काय असं वाटत होतं. शेवटी तिनं सरळ राजीनामा लिहिला अन् शिल्पीकडे पाठवला. तिला नवल वाटलं…कुणीच काही रिएक्शन दिली नाही. ती ऑफिसबाहेर पडली अन् तिनं मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला.

थोड्या दिवसांनी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न करता येतील. तिच्याजवळ योग्यता आहे. वय अजून गेलेलं नाही. ती मेहनती आहे. दुसरी नोकरी सहज मिळेल. सध्या तरी सियाबरोबर वेळ घालवता येईल. इतकी वर्षं इथं मरेमरेतो काम केलं. रात्र की दिवस बघितला नाही, तिथंच तिला इतकं इग्नोर करताहेत. नकोच ती नोकरी.

खूपच दिवसांनी ती त्या दिवशी आनंदी अन् शांत मन:स्थितीत होती. घरी परतताना तिनं सियासाठी खेळणी अन् फ्रॉक्स विकत घेतले. घरी पोहोचताच सिया तिच्याकडे झेपावली. सियाला जवळ घेतल्यावर तिला अजूनच छान वाटलं. रात्री जेवताना तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मी आज राजीनामा दिला.’’

सगळ्यांना जणू विजेचा शॉक बसला. सगळ्यांनी एकदमच विचारलं, ‘‘का?’’

‘‘मला तिथलं टेंशन सहन होईना. ते वातावरण डिप्रेशन आणणारं होतं. मी दुसरी नोकरी शोधेन. मला तिथं आवडत नव्हतं.’’

मयंक चिडचिडून म्हणाला, ‘‘हा काय मूर्खपणा आहे? तिथं नोकरी करायची, वातावरण आवडत नाही याला काय अर्थ आहे?’’

‘‘नोकरीच करत होते, पण मला माझ्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जात नाही. काम करण्याचं मानसिक समाधान नाही. त्यामुळे मला तिथं आवडत नव्हतं…’’

‘‘पण आधी दुसरा जॉब बघायचा. मग हा सोडायचा.’’

‘‘मी बघणारच आहे. माझ्याकडे योग्यता आहे, अनुभव आहे, वयही गेलेलं नाहीए.’’

सासू रागातच होती. म्हणाली, ‘‘दुसऱ्या जॉबमध्ये मन रमेल याची काय गॅरेंटी आहे? आणि मन लागत नाही हे काय नोकरी सोडायचं कारण असतं का? आता मयंकच्या एका पगारात कसं भागायचं? इतकी घाई का केलीस तू नोकरी सोडायची? थोडा धीर धरला असता…’’

सासरेही म्हणाले, ‘‘आता कधी नोकरी शोधणार, कधी मिळणार, कधी पगार येणार…इतके खर्च आहेत. एका पगारात काय काय होणार? कठीणच आहे…’’

सियाला मांडीवर घेऊन बसलेली शुभी त्या तिघांकडे आळीपाळीनं बघत होती. तिच्या मनाची घुसमट, तिचा होणारा कोंडमारा कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. तिची व्यथा, वेदना यापेक्षाही तिचा पगार थांबला हे महत्त्वांचं होतं…बिचारी शुभी…तिची घुसमट आता अधिकच वाढली होती.

नवी पहाट

कथा * सुवर्णा पाटील

सकाळी सकाळी मधुरा एका सुखद स्वप्नात रमली होती. तिचा पराग तिच्या स्वप्नात आला होता. अगदी मनमोहक हसून तिची मस्करी करत होता. काहीतरी छेड काढून तिला रडवणारा, पण तितक्याच प्रेमाने हळुवारपणे तिची समजूत काढणारा, थोडासा अल्लड पण प्रसंगी सर्वांना सांभाळून घेणारा, सारखा धडपडणारा आणि स्वत:वरच हसणारा…तिही त्याच्यासोबत हसू लागली आणि हसता हसता तिला जाग आली. जाग आल्यावर जाणवले आपण खुप पुढे आलो आहोत. त्या स्वप्नाने तिची सकाळ प्रसन्न केली, पण शेजारीच निजलेल्या लहानग्या रोहनने तिला वास्तवाची जाणीव करून दिली.

आज पराग जाऊन बरोबर एक वर्ष झाले होते. अगदी नजर लागण्यासारखा संसार होता दोघांचा. दोघे राजाराणी आणि त्यात नवीन पाहुण्याची चाहूल. परागला लहान मुलं खूप आवडायची. जेव्हा मधुराने त्याला ती आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा त्याला खूप आनंद झाला

मधुराला ती रात्र आजही आठवते, ‘‘मधू , तू आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट दिले आहेस. हे बघ, मुलगा झाला तर त्याचे नाव रोहन ठेवायचे आणि मुलगी झाली तर अदिती. मी त्यांना खूप मोठे करणार. माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मी परिस्थिती अभावी करू शकलो नाही, ते सर्वकाही मी आपल्या बाळाला देणार.’’ पूर्ण रात्र तो बाळाच्याविषयीच बोलत होता. पण त्या दोघांना माहितीच नव्हते की त्यांच्या या सुंदर स्वप्नांना लवकरच ग्रहण लागणार आहे.

मधुराला नववा महिना लागला होता. पराग तिची खुपच काळजी घेत होता. त्याने तर तिला हेसुद्धा सांगितले होते की तुझे बाळंतपण इथेच करायचे, माहेरी जायचे नाही. त्याला बाळाच्या आगमनाचा एक एक क्षण अनुभवायचा होता, पण झाले वेगळेच. ऑफिसच्या कामासाठी त्याला तातडीने बाहेरगावी जावे लागले. खरंतर त्याला मधुराला एक क्षणही डोळयासमोरून दूर करायचे नव्हते, पण ऑफिसचे ते कामही तेवढेच महत्त्वाचे होते. त्याने मधुराच्या आईला बोलावून घेतले. त्यांच्यावर जबाबदारी सोपवून तो निघाला. पण पावसाळी वातावरण आणि त्यात घाटाचा निसरडा रस्ता यामुळे त्याच्या गाडीला अपघात झाला आणि तो जागीच सर्व स्वप्ने डोळयांत ठेवून गतप्राण झाला.

इकडे मधुराला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. ती पराग येईपर्यंत थांबायचे म्हणत होती, पण तिची परिस्थिती बघून डॉक्टरांनी सिझरचा निर्णय घेतला. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मधुरा शुद्धीवर आली, तेव्हा ती खुपच आनंदात होती.

‘‘आई, तू परागला बाळाची बातमी दिली ना. मग तो अजूनही कसा आला नाही? माझ्यापेक्षा तोच जास्त आतुर होता बाळासाठी.’’

‘‘मधुरा…, तुला कसे सांगू हेच समजत नाहीए. मन घट्ट कर पोरी.’’

‘‘काय झाले आई? तू असे का म्हणत आहे? पराग…परागला काही झाले आहे का? पण कसे शक्य आहे? तो म्हणाला होता की काम झाले, की लगेच येतो. बघ, त्याचा फोन येईल आताच.’’

आईकडून सर्व अपघाताची बातमी समजल्यावर मधुराला खुप मोठा धक्काच बसला. ती दोन दिवस बेशुद्ध होती, पण परागसाठी त्याच्या शेवटच्या इच्छेसाठी, त्याच्या स्वप्नांसाठी तिने स्वत:ला सावरले.

पराग गेला आणि मधुराचे आयुष्यच बदलून गेले. परागचे आईवडील आधीच वारलेले होते म्हणून मधुराला सासरचे असे कोणीच नव्हते. ती आपल्या आईसोबत माहेरी आली. वडिल लहानपणीच वारलेले असल्याने ती व तिची आई, भाऊ वहिनीसोबत राहू लागले. नात्याने वहिनी असली तरी मधुराशी तिचे मैत्रिणीचेच नाते होते. ती तिला दु:खातून बाहेर येण्यास मदत करत होती.

तिने एके दिवशी नवऱ्याला सांगितले, ‘‘तुम्ही मधुरा ताईंविषयी काय ठरवले आहे.’’

‘‘तुला नेमके काय म्हणायचे आहे?’’

‘‘अहो, त्यांच्यापुढे एवढे मोठे आयुष्य पडले आहे. रोहन अजून लहान आहे. त्या एकटयाने कसे सर्व करतील.’’

‘‘अगं, आपण आहोत ना सोबतीला.’’

‘‘आपण त्यांना जन्मभर थोडी पुरणार आहोत. त्यांनासुद्धा स्वत:च्या हक्काचे घर हवे. हक्काची व्यक्ती हवी, जिच्याजवळ त्या सर्व गोष्टी शेअर करू शकतात. रोहनला आपण कितीही प्रेम दिले तरी त्याच्या वडिलांची जागा आपण घेऊ शकत नाही. मी त्यांना समजावते. तुम्ही व आई दोघे त्यांच्याशी बोला. त्या हो म्हणाल्या तर त्यांना अनुरूप व त्यांना सांभाळून घेणारे असे स्थळ शोधू या.’’

‘‘अगं, हे सर्व खरे असले तरी मुलासोबत तिचा स्विकार कोण करेल? माझ्या मनातही ही गोष्ट होती, पण कसे बोलावे हेच समजत नव्हते. आज तू विषय काढला म्हणून सांगतो. आमच्या ऑफिसचे नविनच बदली होऊन सर आले आहेत, त्यांचे नाव साकेत. स्वभावाने एकदम शांत, कामात तर एकदम हुशार आहेत. वयाने लहान असले तरी हुशारीमुळे ते एवढ्या मोठया पदावर काम करत आहेत. मागच्याच वर्षी त्यांच्या बायकोचे आजारपणात निधन झाले. त्यांना जुळया मुली आहेत. घरी कोणीच नसते. घरी एक आया त्या दोघींना सांभाळते. त्यांचे एक दूरचे मामा आमच्याच ऑफिसला आहेत. ते माझे छान मित्र आहेत. आपल्या मधुराविषयी त्यांना सर्व माहिती आहे. त्यांनीच विषय काढला होता की तुम्ही मधुराच्या पुनर्विवाहाचा विचार केला आहे का? साकेतला तर खूप स्थळं येत आहेत. पण त्यांना अशी मुलगी हवी आहे, जी साकेतच्या मुलींना आईचे प्रेम देऊ शकेल. म्हणूनच ते विचारत होते. आपली मधुरा तर सुंदर आहेच. तिचा प्रेमळ स्वभावही त्यांना माहिती आहे. फक्त प्रश्न आहे तो रोहनचा. त्याचा स्वीकार करायचा की नाही हा निर्णय साकेतचा राहील.’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी मधुरा ताईशी बोलते. राहिला प्रश्न रोहनचा, तर त्याला आपण आपल्यासोबतच ठेऊ या. मलासुद्धा त्याचा खूप लळा लागला आहे.’’

‘‘ठीक आहे, मी बोलतो मधुराशी.’’ मधुराचे भाऊ-वहिनी आणि आईने मधुराला खुप समजावलं. सुरुवातीला तिने साफ नकार दिला, कारण परागच्या आठवणीतून ती अजूनही बाहेर आली नव्हती. पण असे किती दिवस आपण भावाच्या घरी राहणार म्हणून तिने साकेतला भेटण्यास होकार दिला. पण ती रोहनला सोबतच ठेवणार या निर्णयावर ठाम होती. ती या विषयावर साकेतशी बोलणार होती.

आज संध्याकाळी साकेत आणि मधूरा ऑफिसजवळच्या रेस्टॉरंटमध्ये भेटणार होते. मधुरा वेळेवर तिथे आली. तिच्यासाठी आधीच एक टेबल बुक करण्यात आले होते. साकेत अजून आला नव्हता. ऑफिसमधील एक मीटिंग करुन तो येणार आहे असे भावाने सांगितले होते. मधुरा तिथे बसून विचार करत होती, ‘‘मी जे करत आहे ते बरोबर आहे ना? मी परागशिवाय दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही. पण रोहनचे काय, त्याला वडिलांचे प्रेम कसे देऊ?’’ मधुरा तिच्या विचारात असतानाच तिच्या कानावर शब्द पडले.

‘‘नमस्ते, आपण मधुरा ना! मी साकेत.’’ मधुरा त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण नाव वेगळे असले तरी त्याला पाहताच तिला परागची आठवण झाली. एक क्षणभर तिला आपल्यासमोर परागच आहे असे वाटून गेले. तिच चेहरेपट्टी, बोलण्याची लकबही तशीच, जर परागला भाऊ असता तर तो असाच दिसला असता. फक्त परागमध्ये असलेले मनमोहक हास्य व त्याचे निरागसपण यात नव्हते. कामामुळे म्हणा किंवा पत्नीच्या अचानक निधनामुळे त्यात एक शांतपणा होता. त्याच्या चेहऱ्यावर विद्ववत्तेचे एक वेगळेच तेज होते. तिला आता समजले की पराग व त्याच्यात असलेल्या साम्यामुळेच तिच्या भावाने हे स्थळ सुचवले आहे.

 

navi pahaat marathi story

‘‘हॅलो मधुरा मॅम, आपण काय विचार करत आहात? तुमच्या भावाने मला तुमचा फोटो दाखवला होता. म्हणूनच मी तुम्हाला ओळखू शकलो. तुम्हाला खुप वाट पहावी लागली का?’’

‘‘नाही, मी आता थोडया वेळापूर्वीच आली आहे. मला दादाने तशी कल्पना दिली होती.’’

‘‘चला तर आपण सरळ मुद्दयाचे बोलू या. माझी पत्नी निशा मागच्याच वर्षी आम्हाला सोडून गेली. मला सोबत आहे माझ्या दोन मुलींची. खरंतर मी स्वत: त्यांना सांभाळू शकतो, पण आईच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे मला आता समजले आहे. फक्त या एकाच कारणासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या विषयीची सर्व माहिती मला माझ्या मामानी सांगितली आहे. तुमच्या भूतकाळाविषयी माझे काहीही म्हणणे नाही. जर तुमचा होकार असेल तर मी तुमचा माझ्या मुलींची आई म्हणून स्वीकार करायला तयार आहे. आपल्यात फक्त तेवढंच नाते असेल. बाकी मला कसलीही अपेक्षा नाही. तुमचे काय म्हणणे आहे ?’’

साकेतचा स्पष्टवक्तेपणा मधुराला आवडला. पण त्याने रोहनविषयी कोणतीच भूमिका घेतली नव्हती आणि तिला तर रोहन सोबतच हवा होता. तिने साकेतला सांगितले, ‘‘मला तुमच्या भूतकाळाविषयी सहानुभूती आहे. मी मुलींच्या आईची जागा तर घेऊ शकत नाही, पण त्यांना आईचे प्रेम देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझी एक विनंती होती.’’

‘‘काय जे असेल ते स्पष्ट सांगा. गोष्टी आधीच स्पष्ट असल्या की नात्यांमध्ये नंतर गुंता होत नाही.’’

‘‘तुम्हाला माझ्याविषयी सर्व माहिती आहेच. मग हेसुद्धा माहिती असेल की मला एक लहान मुलगा आहे. तो माझे सर्वस्व आहे. माझ्या पतिची ती शेवटची आठवण आहे. जर मी माझ्या मुलाला भावाकडे ठेवले तर माझे मन त्याच्यातच अडकेल. पण तुम्ही रोहनसह माझा स्वीकार केला तर तुम्हाला खात्री देते की तुमच्या मुलीच्या प्रेमात मी कोणताही कमतरता ठेवणार नाही. त्यांना स्वत:च्या मुलीप्रमाणेच वागवेन. ज्या क्षणी तुम्हाला माझ्या वागण्यात बदल जाणवेल तुम्ही रोहनला पुन्हा भावाकडे पाठवू शकता. माझी काहीही हरकत नसेल.’’

साकेतला मधुराचा प्रामाणिकपणा आवडला. त्याच्या मामांनी सांगितल्याप्रमाणे मधुरा सुंदर तर होतीच, पण त्याचबरोबर तिच्यातील प्रामाणिकपणा, नात्यांना समजून घेणारा भावनिक ओलावा, आवजातले माधुर्य त्याला स्पर्शून गेले. त्याला त्याच्या मुलींच्या आयुष्यात आईच्या भूमिकेसाठी ती अगदी योग्य होती. पण त्याने रोहन व तिच्या नात्याचा विचारच केला नव्हता. मधुराचे बोलणे ऐकून त्याला तिची बाजू पटली होती आणि शेवटी तसे नाही झाले तरी निर्णय घेण्याचा अधिकारही मधुराने त्याला दिला होता. थोडा विचार करुन त्याने मधुराच्या प्रस्तावास मान्यता दिली. मधुराला खुपच आनंद झाला, कारण आता तिच्या रोहनला त्याचे स्वत:चे कुटुंब मिळणार होते, ज्यात त्याच्या हक्काच्या व्यक्ती त्याला भेटणार होत्या.

साकेत आणि मधुरामध्ये बाकीची बोलणी झाली. तसा निर्णय फोन करून तिच्या भावासही कळवण्यात आला होता. मधुराचे आयुष्य एका नवीन पर्वाकडे वळण घेत होते. तिने परागच्या सर्व सुंदर आठवणी हृदयाच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे बंदिस्त केल्या आणि रोहनच्या भविष्यासाठी नविन आयुष्यात पाऊल टाकले.

अतिशय साध्या पद्धतीने व जवळच्या लोकांच्या उपस्थितित साकेत व मधुराच्या या नवीन पर्वाची सुरुवात झाली. साकेतचे घर म्हणजे एक आलिशान राजवाडाच होता. प्रत्येक कामासाठी नोकर होता. फक्त मुलींची काळजी घेणं हे एकच काम मधुरासाठी होते. साकेतच्या दोन्ही मुली निधी व परिधी त्याच्या सारख्याच सुंदर होत्या. सुरुवातीचे काही दिवस त्या मधुराशी औपचारिकपणे वागत होत्या, पण मधुराची प्रेमळ वागणूक आणि रोहनची अखंड बडबड यामुळे त्यांची लवकरच गट्टी जमली. त्या मधुराला आई म्हणू लागल्या. साकेतलाही मुलींमधील हा बदल जाणवत होता. त्याचे शांत शांत वाटणारे घर आता खऱ्या अर्थाने घरकुल झाले होते. त्यात एक प्रकारचे चैतन्य आले होते. या सर्वांचे श्रेय मधुराला जात होते, म्हणून त्यानेही रोहनचा प्रेमाने स्वीकार केला.

मधुराचा पूर्ण दिवस मुलांमध्येच जात होता. साकेतही सकाळी ऑफिसमध्ये गेला की संध्याकाळी परत येई. घरी आला की थोडा वेळ मुलांसोबत घालवत असे. मग जेवण झाले की साकेत त्याच्या खोलीत, मुले त्यांच्या खोलीत आणि मधुरा तिच्या खोलीत. दिवसा मधुराला आईच्या भूमिकेत स्वत: विषयी विचार करायला वेळच नव्हता, पण रात्र…रात्र झाली की तिला ती पोकळी जाणवत होती.

ती शारीरिक सुखासाठी आतुर होती असे नव्हे, पण कधी कधी तिला साकेतचा भावनिक आधार हवा होता. तिला तिच्या मर्यादा माहीत होत्या. म्हणूनच तिने कधीही तक्रार केली नाही.

एके दिवशी ती संध्याकाळी नेहमीप्रमाणे साकेतची वाट बघत होती. साकेतला कधीही उशीर होत नसे उशीर होणार असल्यास तो तसे फोन करून कळवत असे. मधुराला काळजी वाटू लागली तेवढ्यात साकेतच्या सहकाऱ्याचा फोन आला, ‘‘मधुरा मॅडम, मी साकेत सरांच्या ऑफिसमधून बोलत आहे. साकेत सर घरी येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.’’

‘‘काय…काय…म्हणताय तुम्ही? साकेत तर नेहमी हळू गाडी चालवतात. कसे शक्य आहे? तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल…’’

‘‘नाही मॅडम, तुम्ही ऐकून तर घ्या…आम्ही साकेत सरांना दवाखान्यात नेत आहोत. तुम्ही पटकन या.’’

मधुराला खूप मोठा धक्का बसला. ती आता आयुष्याच्या अशा वळणावर होती की तिला कोणताही धक्का पचवणे शक्य नव्हते. तिला परागच्या अपघाताची आठवण झाली आणि ती क्षणभर शहारून गेली. पण तिने लगेच स्वत:ला सावरले. मुलांची जबाबदारी आयावर सोपवली. पत्ता विचारून ती दवाखान्यात पोहोचली. साकेतच्या गाडीला दुसऱ्या गाडीने ओव्हरटेक करताना अपघात झाला होता. साकेतचे खुपच रक्त वाहून गेले होते आणि पायालासुद्धा गंभीर इजा झाली होती. साकेतचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मधुरा तर पूर्ण कोलमडून गेली.

ती धावतच त्याच्या बेडजवळ गेली व त्याला बिलगली, ‘‘साकेत…साकेत…तुम्ही माझा आवाज ऐकत आहात ना… मी मधुरा…तुम्ही मला सोडून कुठेही जायचे नाही. मुलं तुमची घरी वाट पाहत आहे. चला लवकर उठा.’’

मधुराचा आक्रोश पाहून डॉक्टरानी तिला समजावले, ‘‘ तुम्ही काळजी करू नका. ऑपरेशनच्या भूलमुळे ते बेशुद्ध आहेत, पण तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. तरच या जखमा लवकर भरतील.’’

डॉक्टरांच्या शब्दांनी मधुरा भानावर आली. साकेतला शुद्ध आल्यावरही मधुरा त्याच्याजवळून हलली नाही. साकेत मधुराचे वेगळेच रूप पाहत होता. त्याच्याशी एक अक्षरही न बोलणारी मधुरा त्याची ही अवस्था पाहून खूपच व्याकुळ झाली होती. ती खुपच घाबरलेली दिसत होती, पण तरीही दवाखान्यात ती एका समंजस व्यक्तीप्रमाणे त्याची काळजी घेत होती. त्याने तिला जवळ बोलवले आणि तिचा हात हातात घेऊन प्रेमाने थोपटले, ‘‘ मधुरा, घाबरू नकोस, मी ठीक आहे. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही…तुझा विश्वास आहे ना माझ्यावर…’’

नवीन नात्याचा पहिला स्पर्श…काय होते त्या स्पर्शात आधार, विश्वास, प्रेम…हेच तर हवे होते मधुराला…आणि तिला रडू कोसळले, पण ते रडणे काळजीचे नव्हते, समाधानाचे होते. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यावर साकेत घरी आला. त्याला एक महिन्याची सक्त विश्रांती सांगितली होती. घरी आल्यावर मधुराने मुलांना आधीच बाबांबद्दल सांगितले होते. तसेच त्यांना बरे नसल्याने आपण त्यांची काळजी घ्यायची आहे अशी प्रेमळ समजूतही घातली होती.

साकेतला मुलांचे आश्चर्य वाटत होते. नेहमी खेळण्यासाठी हट्ट करणारी तिन्ही मुले समंजसपणे वागत होती. ही किमया मधुराची आहे हेसुद्धा त्याने ओळखले. मधुराने महिनाभर त्याची लहान मुलासारखी काळजी घेतली. न सांगताही ती त्याच्या सर्व गोष्टी समजून घेत होती. दोघांमध्ये एक वेगळयाच नात्याची कडी विणली जात होती. मुलांकडेही दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घेत होती. महिन्याभरात साकेतच्या तब्येतीत खुपच सुधारणा झाली आणि याचे सर्व श्रेय मधुराचे आहे हे डॉक्टरांनीसुद्धा मान्य केले. साकेत लवकरच ऑफिसला रुजू झाला.

एके रात्री सर्व कामे आटोपून मधुरा तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. तेवढ्यात तिच्या दारावर कोणाची तरी थाप पडली. तिने दरवाजा उघडला .

‘‘साकेत, तुम्ही इथे…तुम्हाला काही हवं होतं का…’’

‘‘मधुरा, नेहमी आम्हाला काय हवे आहे याचाच विचार करतेस तू. तुला काय हवे आहे हे पण कधीतरी सांगत जा.’’

‘‘साकेत, तुम्ही काय म्हणत आहात..?’’

साकेतने मधुराचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले, ‘‘मधुरा, आज काहीच बोलू नको. तुझे डोळे जे नेहमी सांगतात, ते ऐकायचे आहे मला. तू फक्त आई न होता खऱ्या अर्थाने माझी सहचारिणीचे कर्तव्य निभावले. माझ्या या विटामातीच्या घराचे नंदनवन केले. तू मला नेहमी भरभरून देतच आली आहे. आज मला तुला काही द्यायचे आहे, त्याचा स्वीकार करशील का?’’

मधुराचे हात अजूनही साकेतच्या हातात होते. त्यातील प्रेमाची ऊब मधुराला जाणवत होती. तिने डोळयांनीच साकेतच्या बोलण्यास संमती दर्शवली. साकेतने मधुराला हळूच आपल्या जवळ घेतले व म्हणाला, ‘‘मधुरा, आज आपण आपल्या या नविन नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करू या. माझी सखी, अर्धांगिनी होशील ना…’’

साकेतच्या स्पर्शाने मधुरा मोहरली व ती अजूनच साकेतच्या मिठीत शिरली. साकेतने तिला घट्ट मिठीत घेतले. साकेत व मधुराच्या नात्यातील सर्व अनामिक बंध गळून पडले. येणारी नवीन पहाट, नवीन स्वप्ने, नवीन उमेद घेऊन त्यांचे स्वागत करत होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें