कथा * पौर्णिमा अत्रे
पाच महिन्यांची सिया, शुभीची पहिलीच मुलगी. लाडक्या लेकीचे पुन्हा:पुन्हा लाड करून शुभीनं तिला खाली ठेवली. बाळंतपणाच्या दीर्घ रजेनंतर शुभी आज प्रथमच ऑफिसला निघाली होती. लहानग्या, गोंडस सियाला सोडून जावंसं वाटत नव्हतं, पण जायला हवंच होतं. गेले सहा महिने ती घरीच होती.
मयंकनं शुभीकडे बघितलं. ती पुन्हा:पुन्हा सियाला छातीशी कवटांळत होती.
‘‘काय झालं?’’ त्यानं विचारलं.
‘‘सियाला सोडून जावंसं वाटत नाहीए.’’
‘‘हो गं! मी समजू शकतो. पण तू काळजी करू नकोस. आईबाबा आहेत...शिवाय रमाबाई आहेच. सिया अगदी सुरक्षित वातावरणात आनंदात राहील. डोंट वरी...चल, निघायला हवं.’’
दिनेश आणि लता म्हणजे शुभीच्या सासूसासऱ्यांनीही तिला आश्वस्त केलं, ‘‘शुभी, अगदी नि:शंक मनानं जा. आम्ही आहोत ना? सिया मजेत राहील.’’
शुभी केविलवाणं हसली. सिया आजीच्या कडेवरून आईकडे बघत होती. शुभीचे डोळे भरून आले. पण ही वेळ भावनाविवश होण्याची नव्हती. तिनं पटकन पर्स उचलली अन् ती मयंकबरोबर घराबाहेर पडली.
शुभी अन् मयंक नवी मुंबईत राहत होती. तिथून आठ किलोमीटर अंतरावर शुभीचं ऑफिस होतं. मयंकनं तिला बस स्टॉपवर सोडलं अन् तो पुढे निघून गेला. बसमध्ये बसायला जागा नव्हती. उभ्याउभ्याच शुभी विचारात गढून गेली.
एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनीत शुभी एक्सपोर्ट मॅनेजर होती. पगार भरपूर होता. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती घरी, ऑफिसातही सर्वांना हवीशी वाटायची. आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य खूपच निवांत अन् आनंदात गेलं होतं. पण आज सियाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑफिसात आली होती, त्यामुळे ती जरा उदास होती.
ऑफिसात गेल्यावर शुभीनं सर्वत्र नजर फिरवली. बरेच नवे चेहरे दिसले. जुन्या लोकांनी तिचं अभिनंदन केलं अन् ते आपापल्या कामाला लागले. शुभी ज्या पोस्टवर होती तिथं जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट तिच अप्रूव्ह करत होती.
शुभीची बॉस शिल्पी तिच्या कामावर खुश होती. कितीही काम असलं तरी शुभी हसतमुखानं सर्व कामाचा फडशा पाडायची. त्यामुळे शिल्पी आपलीही बरीचशी कामं शुभीवर टाकायची. शुभीनंही ती कामं आनंदाने केली होती.