कथा * सुवर्णा पाटील
सकाळी सकाळी मधुरा एका सुखद स्वप्नात रमली होती. तिचा पराग तिच्या स्वप्नात आला होता. अगदी मनमोहक हसून तिची मस्करी करत होता. काहीतरी छेड काढून तिला रडवणारा, पण तितक्याच प्रेमाने हळुवारपणे तिची समजूत काढणारा, थोडासा अल्लड पण प्रसंगी सर्वांना सांभाळून घेणारा, सारखा धडपडणारा आणि स्वत:वरच हसणारा...तिही त्याच्यासोबत हसू लागली आणि हसता हसता तिला जाग आली. जाग आल्यावर जाणवले आपण खुप पुढे आलो आहोत. त्या स्वप्नाने तिची सकाळ प्रसन्न केली, पण शेजारीच निजलेल्या लहानग्या रोहनने तिला वास्तवाची जाणीव करून दिली.
आज पराग जाऊन बरोबर एक वर्ष झाले होते. अगदी नजर लागण्यासारखा संसार होता दोघांचा. दोघे राजाराणी आणि त्यात नवीन पाहुण्याची चाहूल. परागला लहान मुलं खूप आवडायची. जेव्हा मधुराने त्याला ती आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा त्याला खूप आनंद झाला
मधुराला ती रात्र आजही आठवते, ‘‘मधू , तू आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट दिले आहेस. हे बघ, मुलगा झाला तर त्याचे नाव रोहन ठेवायचे आणि मुलगी झाली तर अदिती. मी त्यांना खूप मोठे करणार. माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मी परिस्थिती अभावी करू शकलो नाही, ते सर्वकाही मी आपल्या बाळाला देणार.’’ पूर्ण रात्र तो बाळाच्याविषयीच बोलत होता. पण त्या दोघांना माहितीच नव्हते की त्यांच्या या सुंदर स्वप्नांना लवकरच ग्रहण लागणार आहे.
मधुराला नववा महिना लागला होता. पराग तिची खुपच काळजी घेत होता. त्याने तर तिला हेसुद्धा सांगितले होते की तुझे बाळंतपण इथेच करायचे, माहेरी जायचे नाही. त्याला बाळाच्या आगमनाचा एक एक क्षण अनुभवायचा होता, पण झाले वेगळेच. ऑफिसच्या कामासाठी त्याला तातडीने बाहेरगावी जावे लागले. खरंतर त्याला मधुराला एक क्षणही डोळयासमोरून दूर करायचे नव्हते, पण ऑफिसचे ते कामही तेवढेच महत्त्वाचे होते. त्याने मधुराच्या आईला बोलावून घेतले. त्यांच्यावर जबाबदारी सोपवून तो निघाला. पण पावसाळी वातावरण आणि त्यात घाटाचा निसरडा रस्ता यामुळे त्याच्या गाडीला अपघात झाला आणि तो जागीच सर्व स्वप्ने डोळयांत ठेवून गतप्राण झाला.