नीलोफर

कथा * शर्मिला चव्हाण

खिडकीसमोर डोकावणाऱ्या अशोकाच्या फांदीवर तिने एक छोटासा निवारा बनवला होता. जितकी छोटी ती होती तितकेच छोटे तिचे घर होते. मालती जेव्हा कधी शुद्ध हवेसाठी खिडकीपाशी यायची तेव्हा तिला पाहिल्याशिवाय परत जात नसे. ती खूप सुंदर होती. जिथे पाठीचा भाग संपतो, तिथून तिची शेपूट होती. तपकिरी लहान पंखांवर २-४ निळया पिसांचे आवरण होते. या निळया आवरणामुळे ती इतर चिमण्यांपेक्षा वेगळी दिसायची. त्या छोटयाशा मादीलाही तिच्यातील या सर्वात सुंदर गोष्टीचा नक्कीच अभिमान होता.

मोकळया वेळेत, ती तिच्या चोचीने निळी पिसे साफ करायची, तिच्या हलक्या पिवळया तपकिरी डोळयांनी आजूबाजूला एक नजर टाकून पाहायची की, तिच्या सुंदर रुपाचे कोणी कौतुक करत आहे की नाही. त्या चिमुकल्या पक्ष्याच्या पिसांमुळे मालतीने तिचे नाव ‘नीलोफर’ ठेवले होते.

‘‘आई, नीलोफरने कदाचित अंडी घातली आहेत… ती त्या घरटयातून बाहेर पडलीच नाही,’’ मालतीची २४ वर्षांची मुलगी नीलूने खिडकीजवळून मालतीला हाक मारली.

‘‘मलाही तसेच वाटतेय, म्हणूनच तिने खूप मेहनतीने घर बांधले,’’ असे म्हणत मालतीही खिडकीबाहेर डोकावू लागली.

नीलूला बाहेर बघताना पाहून मालती बोटांनीच नीलूचे केस नीट करू लागली.

‘‘आई, तू या पक्ष्याचे नाव नीलोफर का ठेवलेस?’’ नीलू अजूनही त्या चिमुकलीत हरवली होती.

‘‘तिची निळी पिसे खूप गोंडस आहेत, म्हणूनच ती निलोफर झाली,’’ मालती हसत म्हणाली.

‘‘तू माझे नाव नीलू का ठेवले?’’ नीलूने पुढचा प्रश्न केला.

‘‘कारण तुझे निळे डोळे झऱ्यासारखे पारदर्शक आहेत. तुझ्या मनातले सर्व काही तुझे डोळे सांगतात. म्हणून तू  नीलू आहेस,’’ मालती म्हणाली आणि तिने नीलूला व्हीलचेअरसह दिवाणखान्यात आणले.

नीलूने रिमोटने टीव्ही सुरू केला आणि ती पंजाबीतली नृत्याची गाणी पाहू लागली. कुठल्यातरी सणाचे ते दृश्य होते मुली रंगीबेरंगी कपडे घालून ढोलाच्या तालावर थिरकत होत्या. मालतीने हळूच नीलूकडे पाहिले. ती तल्लीन होऊन गाणे ऐकत होती आणि कमरेच्या वरच्या भागाने नाचण्यात गुंग होती.

तिला नाचण्यात तल्लीन झालेले पाहून  मालती नीलूच्या बालपणाच्या आठवणीत हरवून गेली…

‘‘आई, मला शास्त्रीय नृत्य आवडत नाही. मला नृत्याच्या तालावर थिरकायला लावणारी फिल्मी गाणी आवडतात,’’ ७ वर्षांच्या नीलूने हट्ट करून बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचायला सुरुवात केली होती.

‘‘हे काय आई? ती दिवसभर माकडासारखी उडया मारत राहाते… आरशासमोर उभी राहून कंबर मुरडत बसते. हिला आणखी काही काम नाही का?’’ नीलूपेक्षा ४ वर्षांनी मोठा असलेला शुभम चिडून विचारायचा.

‘‘तूही नाच ना, पण तुला तर नाचताच येत नाही,’’ असे म्हणत नीलू त्याला अधिकच चिडवायची.

वेळ पंख लावल्याप्रमाणे उडून गेली. नीलू ९ वर्षांची झाली.

‘‘शुभम उद्या सकाळी बसने शाळेच्या सहलीला जाणार आहे. आपण त्याला शाळेच्या बसपर्यंत सोडून येऊया,’’ मालतीने पतीला सांगितले.

‘‘मीही त्याला सोडायला येणार,’’ नीलूने रात्रीच सांगितले.

सकाळी सर्वजण कारने शुभमला शाळेच्या बसपर्यंत सोडून परत येत होते. ‘‘बाबा, थांबा ना, आपण तिथे जाऊन काहीतरी खाऊ. माझ्या मैत्रिणी सांगत होत्या की, इथे सकाळी वडापाव, इडली-डोसा आणि सँडविच खूप छान मिळते,’’ शाळेच्या वाटेवरील एका छोटया उपहारगृहाकडे बोट दाखवत नीलू म्हणाली.

सर्व गाडीतून उतरू लागले. तितक्यात नीलू धावत एकटीच रस्ता ओलांडू लागली.

‘‘नीलू… थांब बाळा…’’ जवळून जाणाऱ्या गाडीच्या ब्रेकसोबतच मालतीचा आवाजही दबून गेला.

क्षणार्धात फासे उलटे पडले होते. रक्ताच्या थारोळयात पडलेली नीलू रुग्णालयात बेशुद्धावस्थेत होती. तेव्हापासून आजपर्यंत ती कधीच उभी राहू शकली नव्हती. खेळणारे, धावणारे, नाचणारे बालपण कमरेखालून शांत झाले होते. तिचे विश्व व्हीलचेअरपुरतेच मर्यादित झाले होते.

‘‘आई, आज दादाला व्हिडिओ कॉल करूया, मला बॅग मागवायची आहे,’’ नीलूच्या आवाजाने भूतकाळात हरवलेली मालती वर्तमानात आली.

‘‘हो, आज शुभमला फोन लावूया,’’ अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलाबद्दल त्या बोलत होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच भावाशी बोलून तिने बॅग आणायला सांगितली. त्यानंतर ती व्हीलचेअरवरून खिडकीपाशी गेली.

वडील आणि भावाच्या सल्ल्याने तिने शिक्षण सुरू ठेवले होते, सोबतच ती हस्तकौशल्याच्या सुंदर वस्तूही बनवू लागली. निसर्गाने जणू तिच्या पायांतली सर्व ताकद तिच्या हातांना दिली होती. धागे, शिंपले, मोती, तागाच्या साहाय्याने ती सुंदर पिशव्या आणि भिंतीवर टांगायच्या शोभेच्या वस्तू बनवायची.

तिला कामात मदत करायला मालती होतीच, सोबतच त्यांनी एका मुलीला ठेवले होते, जी सामान उचलायला, ठेवायला मदत करायची. मोठमोठया बुटीकमधून ऑर्डर यायच्या. सर्व मिळून त्या वेळेत पूर्ण करत. हळूहळू आयुष्याने पुन्हा वेग पकडायला सुरुवात केली होती.

‘‘आई, तुला माझी खूप काळजी वाटते ना?’’ नीलू गंभीर स्वरात विचारायची.

‘‘नाही, मी कशाला काळजी करू? तू समजूतदार आहेस. स्वत:ची कामे स्वत: करतेस. बुटीकच्या ऑर्डरही घेतेस आणि शिकतही आहेस,’’ मालती तिला नेहमीच प्रोत्साहन देत असे.

‘‘तुझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आणि डोळयांखाली काळी वर्तुळे आली आहेत,  तरीही सांगतेस की, कसलीच काळजी नाही,’’ नीलूचे निळे डोळे मनाचा वेध घेत होते.

मालती नीलूचे कमरेपासून खालचे अवयव स्वच्छ करून तिला कपडे घालायची. ही सर्व कामे एका तरुण मुलीला दुसऱ्याच्या हातून करून घ्याव्या लागणाऱ्या परिस्थितीचा सामना दोघीही रोजच करत होत्या.

अचानक चिवचिव आवाजासोबत कावकावचा आवाज आला.

‘‘ते बघ आई. नीलोफरच्या घरटयात ३-४ कावळे एकत्र आलेत. तिला त्रास देत आहेत. आई, नीलोफरला, तिच्या अंडयांना वाचव,’’ नीलूच्या आवाजात वेदना होत्या, जणू कोणीतरी तिच्यावरच हल्ला करत होता.

मालती स्वयंपाकघरातून धावतच खिडकीपाशी आली. तिने नीलूकडे पाहिले. ती घामाघूम झाली होती.

‘‘आई, हे कावळे तिला मारून टाकतील. जसे तू मला वाचवलेस तसे कृपा करून तिलाही वाचव आई…’’ नीलूचा आवाज जणू खोल विहिरीतून बाहेर यायचा प्रयत्न करत होता. एक अंधार ज्यात ती स्वत: जगत होती, एक शांतता जिला ती स्वत: तोंड देत होती. दूरवर आशेचे क्षितिज होते, पण ते मुठीतून निसटायला सदैव आतूर असायचे.

‘‘बाळा, प्रत्येकाला स्वत:ची लढाई लढायची असते. दुसरे कोणीतरी थोडी मदत करू शकते, पण आयुष्यभर साथ देऊ शकत नाही,’’ मालतीने नीलूचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘नीलोफरची लढाई तिची स्वत:ची आहे. तिला शक्ती मिळावी यासाठी आपण फक्त निसर्गाकडे प्रार्थना करू शकतो.’’

‘‘तू त्या कावळयांना हाकलून लावू शकतेस, मी उठून त्यांना मारू शकत नाही,’’ नीलूचा आवाज थरथरत होता.

‘‘आपल्यापेक्षा नीलोफरला तिच्या अंडयांबद्दल जास्त काळजी असेल. ती तिची लढाई कशी लढते ते तू बघच,’’ मालतीने मुलीची समजूत काढली, पण तिचा एका लहान पक्ष्याच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे तिने आतून एक मोठे लाकूड आणले.

‘‘समोरचे दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली. एकटी नीलोफर आत्मविश्वासाने ४ कावळयांशी लढत होती. आपल्या लहान पण तीक्ष्ण चोचीने त्यांच्या डोळयांवर हल्ला करून तिने २ कावळयांना पळवून लावले. एक नजर आपल्या अंडयांवर टाकली, पंख फडफडवत स्वत:मधील ताकद एकवटली, पण हे काय…? तिची २ निळी पिसे गळून पडली.

गळून पडलेल्या पिसांवर एक नजर टाकून तिने जोरात चिवचिवाट केला आणि उरलेल्या दोन्ही कावळयांवर ती हल्ला करू लागली.

आपला श्वास रोखून धरत खिडकीतून मालती आणि नीलू त्या छोटयाशा चिमणीला प्रोत्साहन देत होत्या. पक्षी मन वाचतात, जे तोंड असूनही माणसाला समजू शकत नाही. त्या ४ धाडस वाढवणाऱ्या डोळयांनी नीलोफरला लढण्याचे बळ दिले.

हवेत झोपावून ती सतत तिच्या चोचीने हल्ले करत राहिली. कावळयांच्या मोठया, जाड चोचीपासून स्वत:चे संरक्षण करणे थांबवून ती अधिक आक्रमक झाली.

अखेर एका आईसमोर पराभूत होऊन दोन्ही कावळे पळून गेले. दीर्घ श्वास घेत नीलोफरने तिच्या घरटयातल्या सुरक्षित अंडयांकडे प्रेमाने पाहिले. तिची नजर खिडकीपाशी थांबली, जिथे दोघीही टाळया वाजवून तिचे कौतुक करत होत्या.

नीलोफर तिच्या जखमी शरीराकडे पाहू लागली. कावळयांनी चोच मारल्यामुळे शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. तिचे तेजस्वी निळे पंख गळून पडले होते. त्याचे दु:ख तिच्या डोळयांतून जाणवत होते.

‘‘नीलोफर, तू जगातली सर्वात सुंदर चिमणी आहेस. तुला निळया पिसांची गरज नाही. आज तुझे सौंदर्य मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,’’ नीलूचे शब्द त्या चिमुकल्या पक्ष्याला किती समजले माहीत नाही, पण ती आनंदाने चिवचिवाट करू लागली.

नीलूने वळून मालतीकडे पाहिले. आता तिच्या डोळयांखाली काळेपणा नव्हता, तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत नव्हत्या.

राहो चमकत प्रतिबिंब

कथा * मधु शर्मा कटिहा

अभिनव जाताच अनन्या शांतपणे खाटेवर पहुडली. आठवडाभराकरिता ऑफिसच्या कामासाठी अभिनव लखनऊला निघाला होता. पण जातेवेळी नेहमीप्रमाणेच रुक्षपणे ‘निघतो’ एवढेच बोलून गेला. किती आठवण आली होती तिला अभिनवची जेव्हा तो मागच्या महिन्यात गोव्याला गेला होता. त्यावेळी अनन्या त्याची आतुरतेने वाट पाहात होती. त्याच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत होती. इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून काही पदार्थही बनवायला शिकली होती.

जेव्हा अभिनव घरी आला तेव्हा नोकराकडून स्वयंपाक बनवून न घेता तिने स्वत:च्या हाताने त्याच्यासाठी कोफ्ते आणि खुसखुशीत पराठे बनविले. जेवण झाल्यावर अभिनय हसून तिला ‘धन्यवाद’ म्हणाला तेव्हा अनन्याला खूपच छान वाटले होते.

या वेळेस तिला अशी अपेक्षा होती की, अभिनव बऱ्याच सूचना देऊन जाईल. जसे की, या वेळेस माझी जास्त आठवण काढत बसू नकोस… स्वत:साठी चांगले जेवण बनवून जेवत जा… रात्री उशिरापर्यंत जागू नकोस वगैरे वगैरे. पण अभिनव नेहमीप्रमाणे फक्त ‘निघतो’ एवढेच सांगून टॅक्सीत जाऊन बसला. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. मनात असे विचार चक्र सुरू असतानाच अनन्याचा डोळा लागला. त्यानंतर मोबाईलची रिंग वाजली आणि ती जागी झाली.

‘‘नुकतीच फ्लाईट लँड झाली आहे,’’ अभिनवचा फोन होता.

‘‘बरं… आता आणखी काही वेळ लागेल ना विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी? त्यानंतर ऑफिसच्या गेस्ट हाऊसला पोहोचण्यासाठी आणखी १ तास लागेल… तुम्ही ऑफिसमध्ये सांगून गाडीची व्यवस्था करून घेतली आहे ना? रात्री टॅक्सीने जाणे धोकादायक असते… स्वत:ची काळजी घ्या,’’ अनन्याला नेहमीप्रमाणेच अभिनवची काळजी वाटत होती. तिच्यापासून दूर गेलेल्या अभिनवशी बोलण्यासाठी ती काही ना काही बहाणा शोधत असे.

‘‘बरं ठीक आहे,’’ असे मोघम बोलत अभिनवने फोन कट केला.

अनन्याला रडू आले. ती विचार करू लागली की, अभिनव नक्कीच आणखी थोडा वेळ बोलू शकत होता… लग्नाला फक्त ६ महिने झाले आहेत, एवढयातच अभिनव मला कंटाळला आहे असे वाटते… दिव्याचे लग्नही आमच्या लग्नाच्या वेळेसच झाले होते. ते दोघे अजूनही प्रत्येक दिवस हनिमूनसारखाच मजेत घालवत आहेत. त्या दिवशी ती बाजारात नवऱ्याच्या हातात हात घालून मिरवत होती… आणि एक मी आहे जिला अभिनवला खुश ठेवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करावे लागत आहेत.

अंधार होऊ लागताच अनन्याला जणू निराशेच्या काळोखाने घेरले. या उदास करणाऱ्या विचारचक्रातून बाहेर पडण्यासाठी तिने व्हॉट्सअपवर जाऊन जुन्या मित्र-मैत्रिणींची चॅट उघडली.

‘‘अरे वा, उद्या सर्वांनी इंडिया गेटवर भेटायचे ठरविले आहे… कितीतरी दिवसांनी सर्व भेटणार आहेत… खूप मजेत जाणार उद्याचा दिवस,’’ असा विचार करून अनन्या आंनदी झाली.

‘‘मीही येणार,’’ असे लिहून ती उद्यासाठीच्या ड्रेसची निवड करण्यासाठी कपटाकडे गेली. ड्रेससोबत मॅचिंग दागिने काढून ते टेबलावर ठेवून आनंदाने झोपली.

सकाळी कामवाल्या बाईकडून लवकरात लवकर काम करून घेऊन आनंदाने निघण्याची तयारी करू लागली. करडया रंगाच्या पँटवर गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि रुबीचा चोकर घालून जेव्हा ती लिपस्टिक लावू लागली तेव्हा आरशात स्वत:चे सुंदर रूप पाहून स्वत:वरच खुश झाली. हसतच हातात बॅग घेऊन इंडिया गेटच्या दिशेने रवाना झाली.

तेथे पोहोचली तर संजना, मनिष, निवेदिता, सारांश आणि कार्तिक तिच्या आधीच आले होते.

‘‘हाय ब्यूटीफुल,’’ मनिष नेहमीप्रमाणेच तिला पाहून म्हणाला.

‘‘कोण म्हणेल की तुझे लग्न झाले आहे,’’ सारांश तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हणाला.

तितक्यात कोणीतरी मागून येऊन अनन्याचे डोळे बंद केले.

‘‘साक्षी… ओळखले मी तुला,’’ साक्षीच्या हातांना आपल्या हातांनी बाजूला सारत आनंदाने अनन्या म्हणाली.

साक्षी डोळे विस्फारून अनन्याकडे पाहातच राहिली. ‘‘अरे, माझे तर लग्नाच्या २ महिन्यांनंतरच वजन वाढले… पण तू मात्र अजूनही जशीच्या तशी आहेस…’’

संजनाही लगेचच अनन्याचे कौतुक करत म्हणाली, ‘‘महाविद्यालयातही सर्वांच्या नजरा हिच्या सौंदर्यावर खिळून राहायच्या… संपूर्ण हॉस्टेलमध्ये उत्तराखंडमधून आलेल्या या मुलीचीच चर्चा होती… आम्ही सर्व तर हिला बाहुली म्हणायचो… किती सुंदर दिसतेस…’’

‘‘तुम्ही सर्व कोणत्याही नावाने हाक मारा, पण मी मात्र हिला चुनचून म्हणायचो आणि तेच म्हणणार…’’ संजनाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच नमन आला आणि नेहमीप्रमाणेच अनन्याच्या सौंदर्याचे कौतुक करू लागला.

‘‘चुनचुन… हो, चुनचुन म्हणायचास तू तिला, पण हेच नाव का ठेवलेस तू या बाहुलीचे?’’ संजनाने उत्सुकतेने विचारले.

‘‘अगं, ते सुंदरसे गाणे आहे ना, चुनचुन करती आई चिडीया… आणि हीदेखील होती ना, छोटीशी चुनचुन करती चिडीया,’’ अनन्याचा गाल ओढत नमन म्हणाला.

‘‘हो…हो… प्रत्येक गोष्टीसाठी गाणे गाण्याची तुझी सवय माझ्या अजूनही लक्षात आहे… पण हे आजच समजले की, चुनचुन हे नावही तू गाण्यातूनच चोरले होतेस…’’ हसतच अनन्या नमनकडे पाहात म्हणाली. तितक्यात तिला स्वातीची आठवण झाली, जी अनन्याच्या या नावाला जळून तिला खूप चिडवत असे.

‘‘स्वाती अजून आली नाही… काल ग्रुपवर तर लिहिले होते की, नक्की येईन,‘‘ अनन्या म्हणाली.

‘‘अगं तिकडे बघ, ती आली… सोबत बहुतेक तिचा नवरा आहे,‘‘ दुरूनच स्वातीला येताना पाहून मनिष म्हणाला.

स्वातीने आल्यानंतर सर्वांची विचारपूस केली. ती नवऱ्याची ओळख करून देणारच होती मात्र त्याआधी तिचा नवराच स्वत:हून म्हणाला, ‘‘हिच्याशिवाय माझे मनच लागत नाही, म्हणून तिचा पदर धरून तिच्या मागोमाग आलो.’’

एकमेकांसोबत मौजमजा करण्यात मग्न झालेले सर्व मित्रमैत्रिणी अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच भासत होते. खाण्या-पिण्यात, आनंदाने गप्पागोष्टी करण्यात संपूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळ होऊ लागली तसे पुन्हा भेटायचे ठरवून सर्वजण आपापल्या घरी निघाले.

अनन्या घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. चहा बनवून चहासोबत दोन बिस्किटे खाऊन तिने व्हॉट्सअप सुरू केला. ग्रुपवर सर्व आपापल्या मोबाईलमधून काढलेले फोटो शेअर करीत होते. नमनने ग्रुपवर फोटो टाकण्यासोबतच अनन्याच्या नंबरवर तिला तिचा एक फोटो पाठवून त्याखाली एका गाण्याची ओळ लिहिली. ‘‘लडकी ब्यूटीफुल, कर गई चुल…’’

हे वाचून अनन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हिंदी चित्रपट आणि गाण्यांची आवड असलेल्या नमनला प्रत्येक गोष्टीसाठी चित्रपटातील संवाद आणि गीतांच्या ओळींचा वापर करण्याची सवय होती, हे अनन्याला चांगलेच माहीत होते.

नमन नेहमीच तिचे कौतुक करायचा. पण आज त्याने असे खोडसाळपणे वागून अनन्याच्या सुंदरतेचे केलेले कौतुक तिला खूपच आवडले होते. अभिनवने कधीच मोकळेपणाने तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली नव्हती.

तिने नमनचे आभार मानले तेव्हा त्याचे उत्तर आले, ‘‘मॅडम, मैत्रीत माफी आणि धन्यवादासाठी जागा नसते… ‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमानने असे सांगितले आहे,’’ असे लिहिण्यासोबतच नमनने चुंबन घेत असल्याचा इमोजीही पाठवला.

‘‘हो… हो… मैत्री आहे ते मान्य, पण हा चुंबन घेतानाचा इमोजी कोणासाठी पाठवला आहेस?’’

‘‘तुझ्यासाठीच मैत्रिणी… जर मैत्रीण तुझ्याइतकी सुंदर असेल तर तिच्यावर जीव जडतोच.’’

प्रेमाच्या या गप्पा येथेच संपविण्याच्या हेतूने अनन्याने विषयांतर करीत लिहिले, ‘‘आणखी फोटो पाठव… तू आपल्या ग्रुपमधील सर्वात चांगला फोटोग्राफर आहेस… आज तू बरेच फोटो काढलेस.’’

नमनने भरपूर फोटो पाठवले. ते सर्व अनन्याचेच होते. अनन्याच्या मनाला हे सर्व आवडत होते, पण बुद्धी सतत आठवण करून देत होती की, एका विवाहित महिलेने परपुरुषाशी एवढया मोकळेपणाने बोलणे चांगले नाही.

हसणाऱ्या स्मायलीसह अनन्याने लिहिले, ‘‘अरे वा, माझे एवढे फोटो? उगाच वेळ का वाया घालवतोस तुझा? आता तुही लग्न कर… मग तुझी ती दिवसरात्र गाणे गात राहील, ‘तू काढ माझो फोटो प्रिया…’ आणि मग काढ तिचे भरपूर फोटो.’’

नमनचे उत्तर आले, ‘‘तुझ्यासारखी कोणी असेल तर सांग… करतो लग्न… ‘जगभर फिरलो, पण तुझ्यासारखे कोणीच नाही…’’’

अनन्याला नमचे हे बोलणे असे वाटले जसे तप्त वाळवंटात कोणीतरी पाण्याचा वर्षाव करीत आहे. अभिनवचे रुक्ष वागणे आणि सतत गप्प बसून राहण्याच्या स्वभावामुळे कंटाळलेल्या अनन्याला नमनचे प्रेमळ बोलणे खूपच भावले. ती आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत होती, पण ते तर तिच्या हातून निसटून चालले होते.

रात्री उशिरापर्यंत अनन्या नमनसोबत चॅटिंग करीत होती. तिने कितीही विषयांतर करण्याचा प्रयत्न केला तरी तो मात्र पुन्हा तिच्या सौंदर्याबाबतच बोलत होता. एकमेकांना ‘शुभ रात्री’ असे लिहून चॅटिंग बंद केल्यावर जेव्हा अनन्या झोपायला गेली तेव्हा नमनच्या रंगात रंगून ‘भागे रे मन कही…’ हे गाणे गुणगुणत स्वत:शीच हसली.

पुढचे २-३ दिवस नमन आणि अनन्याने भरपूर चॅटिंग केली. महाविद्यालयीन दिवसांची आठवण काढत नमनने तिला सांगितले की, एके दिवशी त्याच्या बालपणीचा एक मित्र महाविद्यालयात त्याला भेटायला आला होता. तेव्हा अनन्या आपली गर्लफ्रेंड असल्याचे त्याने मित्राला सांगितले होते.

हे वाचल्यावर अनन्याला आश्चर्य वाटले. तिने हसणारे तीन इमोजी टाकले.

‘‘हे काय… तू कशाला हसतेस…? तू माझी गर्लफ्रेंड व्हावीस अशीच माझी इच्छा आहे… जीवन खूप सुंदर होऊन जाईल आपले.’’

‘‘अरे… अरे… असे काय बोलतोस? एका विवाहितेला मागणी घालतोस?’’

‘‘मी असे कुठे म्हटले की, तुझ्या नवऱ्यासोबतचे नाते तोडून तू मला गाणे ऐकवावेस की, ‘मेरे सयाजी से आज मैने ब्रेकअप कर लिया…’ माझी गर्लफ्रेंड हो एवढेच तर सांगत आहे.’’

‘‘महाविद्यालयात असताना असे का नाही विचारलेस मला?’’

‘‘बस… बस… अनन्या, अजून ऐकवू नकोस. उद्या महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी मी अहमदाबादला जाणार आहे… तेथून परत आल्यावर तुला जेवायला घेऊन जाईन. आणि हो, मी कधीच विनंती करीत नाही. फक्त एकदाच सांगतो आणि तेच सांगणे माझ्यासाठी पहिले आणि शेवटचे असते.’’

‘‘अरे वा, किती छान बोललास… ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खान… जेवायला जाणे पहिले आणि शेवटचे असेल तर उरलेल्या गप्पा तिथेच मारू,’’ अनन्याने लिहिले आणि त्यानंतर दोघांनी काही दिवसांसाठी एकमेकांचा निरोप घेतला.

नमन गेल्यानंतर काही दिवस अनन्याला एकटेपणा जाणवू लागला. फेसबूकवर मित्र-मैत्रिणींचे स्टेटस आणि त्यांचे फोटो पाहून त्यांना कमेंट देण्यात कसेबसे १-२ दिवस गेले. अखेर अभिनव परत येण्याचा दिवस उजाडला.

अभिनवने आल्यानंतर जे सांगितले ते ऐकून अनन्या आनंदी होण्यासोबतच उदासही झाली. अभिनवच्या कामावर खुश झाल्यामुळे वरिष्ठांनी त्याला बढती दिली होती. अभिनवने सांगितले की, १५ दिवसांच्या आतच त्यांना दिल्लीहून कायमचे हैदराबादला रहायला जावे लागेल.

नमनच्या मैत्रीमुळे खुललेली अनन्या निराश झाली, पण तिच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता. दुसऱ्याच दिवसापासून ती जाण्याची तयारी करू लागली.

हैदराबादला गेल्यानंतर अभिनव कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडल्यामुळे जास्तच व्यस्त झाला. अनन्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत नव्या घरातील सामानाची व्यवस्था लावण्यात थकून जात असे. कामवाली बाई रोजचे काम उरकायची पण इतर कामात अनन्या तिची मदत घेऊ शकत नव्हती. अनन्याला तेलुगू येत नव्हते आणि कामवाल्या बाईला हिंदी फारसे समजत नव्हते. त्यामुळे कोणत्या कामासाठी मदत हवी आहे, हे अनन्या तिला सांगू शकत नव्हती.

काही दिवसांनंतर अनन्याला अशक्तपणा जाणवू लागला. सतत झोप येऊ लागली. दुपारी जेव्हा ती एखादे पुस्तक वाचायला घ्यायची तेव्हा डोळयावरची झोप तिला एक शब्दही वाचू देत नसे. सकाळीही तिला उठायला उशीर होऊ लागला. सकाळचा फेरफटका मारायला जाणेही बंद झाले होते. झोप आणि सुस्तीपासून दूर राहण्यासाठी ती घरातले काही ना काही काम करत राहण्याचा प्रयत्न करायची, पण झोप तिच्यावर ताबा मिळवायचीच. स्वत:मध्ये होत असलेल्या या बदलांमुळे तिला काळजी वाटू लागली होती. फक्त जेव्हा कधी नमनसोबत चॅटिंग करायची तेवढयापुरतेच तिला थोडे प्रसन्न वाटायचे.

हैदराबादला येऊन ३ महिने झाले होते. त्या दिवशी दोघांना शेजारच्या मुलाच्या वाढदिवसाला जायचे होते. अनन्याने कपाटातून ड्रेस काढला, पण तो तिला खूपच घट्ट होऊ लागला. तिला वाटले की, धुतल्यामुळे ड्रेसचा कपडा आकसला असेल. त्यामुळे ३-४ आणखी ड्रेस काढून ते घालण्याचा प्रयत्न केला, पण कोणताच ड्रेस तिला होत नव्हता. येथे आल्यापासून घरातले काम वाढल्यामुळे ती सैल कुरता आणि गाऊनच घालत असे. त्यामुळे आपले वजन वाढत आहे, हे तिच्या लक्षात आले नाही.

त्यानंतर अनन्याने सकाळचा फेरफटका मारणे, व्यायाम करणे सुरू केले. तरीही वजन नियंत्रणात येत नव्हते, शिवाय प्रचंड थकवा जाणवू लागला होता. चेहराही निस्तेज झाला होता. जेव्हा तिला पाय सुजल्यासारखे वाटू लागले तेव्हा ती अभिनवसोबत डॉक्टरांकडे गेली.

डॉक्टरांनी तिला रक्ताची चाचणी करण्यास सांगितले. चाचणीचा अहवाल आल्यानंतर समजले की, अनन्याला हायपोथायरॉईडिज्म आहे. आपल्या गळयात असलेली थायरॉईड नावाची ग्रंथी जेव्हा जास्त सक्रियपणे काम करू शकत नाही तेव्हा हा आजार होतो. यामुळे शरीराला आवश्यक हार्मोन्स मिळू शकत नाहीत.

डॉक्टरांनी तिला दररोजसाठीची औषधे लिहून दिली आणि काही दिवसांनंतर पुन्हा रक्ताची चाचणी करण्यास सांगितले, जेणेकरून औषधांची योग्य मात्रा ठरवता येईल. सोबतच हेही सांगितले की, एकदा या ग्रंथी निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा सक्रिय होणे जवळपास अशक्य असते. पण सध्या तरी घाबरण्याचे कारण नाही.

काही दिवसांनंतर अभिनवला एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला जायचे होते. अनन्यानेही त्याच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या मित्र-मैत्रिणी, विशेष करून नमनला भेटण्याची ही चांगली संधी होती. नमन नेहमी अशी तक्रार करीत असे की, तो प्रशिक्षणावरून परत येण्याआधीच ती हैदराबादला निघून गेली. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही.

दिल्लीत आल्यावर ते एका हॉटेलमध्ये थांबले. तिथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तिने आपल्या मित्र-मैत्रिणींना जेवणासाठी बोलवायचे ठरविले. ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्या हॉटेलचा पत्ता सर्वांना पाठवून तिने तेथेच जेवणाची व्यवस्था केली. आपल्या आवडीचा ड्रेस घालून अनन्या आतुरतेने मित्र-मैत्रिणींची वाट पाहू लागली.

मनिष सर्वात आधी आला. त्याला पाहून अनन्याला खूपच आनंद झाला. पण तिला पाहून चेहरा पाडून आणि डोळे बारीक करून मनिष म्हणाला, ‘‘अरे हे काय? तू… तू इतकी लठ्ठ? हे काय झाले?’’

अनन्याने उत्तर देण्याआधीच नमनही आला. त्यानंतर १-१ करून सर्व आले.

‘‘मी अनन्याला भेटत आहे की एखाद्या काकूबाईला… केवढी जाड झाली आहे… आळशासारखी पडून राहून भरपूर खात असतेस का संपूर्ण दिवस?’’ नमनने हसतच विचारले.

अनन्या रडवेली झाली. ‘‘अरे नाही. मी आळशी झालेली नाही. खूप खाते असेही काही नाही… हायपोथायरॉईडिज्मचा आजार झाला आहे मला… सांगितले तर होते नमन तुला, काही दिवसांपूर्वीच.’’

‘‘माझ्या वहिनीलाही हा आजार आहे, पण तू तर थोडी जास्तच…’’ हसू येणारे आपले गाल फुगवत आणि हातांनी जाड झाल्याचा हावभाव करीत स्वाती म्हणाली आणि मोठयाने हसली.

सर्वांच्या बोलण्यामुळे उदास झालेल्या अनन्याने जेवण मागवले. जेवतानाही मित्र-मैत्रिणी तिला ‘जाडे, आणखी किती खाशील,’ असे चिडवत होते. नमनही त्यांना साथ देत ‘बस… खूप खाल्लेस,’ असे म्हणून सतत तिची प्लेट बाजूला ठेवत होता. जेवण झाल्यानंतर अनन्या सर्वांना बाहेरपर्यंत सोडायला आली.

‘‘ओके… बाय चुनचुन… नाही टूणटूण…’’ असे नमनने म्हणताच सर्व मोठयाने हसले. अनन्याला खूपच वाईट वाटले. उदास होऊन ती हॉटेलच्या आपल्या खोलीत येऊन बसली.

घरी गेल्यानंतर नमनने तिला कुठलाच मेसेज केला नाही, शिवाय तिच्या एकाही मेसेजला उत्तरही दिले नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा अनन्याने त्याला फोन केला तेव्हा, ‘सध्या कामात खूपच व्यस्त आहे… वेळ मिळाला की स्वत:च फोन करेन,’ असे सांगून त्याने फोन कट केला.

अनन्या रोज वाट पाहात होती, पण नमनचा फोन किंवा मेसेज आलाच नाही. हैदराबादला परत जाण्याचा दिवसही जवळ येत चालला होता.

अनन्याने परत जाण्याच्या एक दिवस आधी नमनला रागावून मेसेज केला.

त्यावर नमनचे उत्तर आले. ‘एवढी का रागावली आहेस? तुझा राग पाहून मला ‘जवानीदिवानी’ चित्रपटातील एक गाणे आठवले… ‘खल गई, तुझे खल गई, मेरी बेपरवाही खल गई… तू कोणत्या दगडाची बनली आहेस ते तरी सांग?’ असे विचारत त्याने जीभ बाहेर काढून एक डोळा बंद केलेला इमोजी टाकला.

त्याचे हे उत्तर वाचून अनन्याला खूपच राग आला. एकेकाळी नमन माझ्या दिल्लीला येण्याची आतुरतेने वाट पाहात होता आणि आता बोलणे तर दूरच… सतत माझा अपमान करीत आहे. मी तर तीच आहे ना, जी पूर्वी होते… बाह्य सौंदर्य नमनसाठी जास्त महत्त्वाचे आहे का? त्याच्यासाठी अनन्या म्हणजे फक्त गोऱ्या रंगाची ५ फूट १ इंचाची सडपातळ मुलगी होती का…? आता ते रूप उरले नाही म्हणून अनन्या ही अनन्या राहिली नाही…

रात्री झोपण्यासाठी ती खाटेवर गेली आणि अभिनवच्या जवळ जात त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवत गुपचूप पडून राहिली.

‘‘काय झाले? तब्येत तर बरी आहे ना तुझी? उद्या परत जाणार आहोत म्हणून कदाचित उदास आहेस,’’ तिच्या पाठीवर हात ठेवत अभिनव म्हणाला.

काही वेळ तशीच पडून राहिल्यानंतर अभिनवकडे पाहात अनन्या म्हणाली, ‘‘अभिनव, एक विचारू? मी इतकी लठ्ठ झाले आहे, हे तुला खटकत नाही का? चेहराही सुजलेला, बदलल्यासारखा वाटत आहे… तू तर एका सडपातळ, सुंदर, गोऱ्या मुलीशी लग्न केले होतेस, पण तीच मुलगी आता कशीतरीच झालीय.’’

‘‘हा… हा… अभिनव मोठयाने हसला. नंतर स्मितहास्य करून अनन्याकडे पाहात म्हणाला, ‘‘हे काय अनन्या, हा कसला प्रश्न आहे? हे खरे आहे की, तुला एक आजार झाला आहे आणि त्यात वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते… पण तूच सांग की, आपण जसे लग्नावेळी दिसायचो तसेच शेवटपर्यंत दिसू शकतो का? माझे केस गळू लागले आहेत. मला टक्कल पडले किंवा म्हातारपणी माझे दात पडले तर मीही खराब दिसू लागेन ना?’’

‘‘तुझे अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना?’’ अनन्याच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती.

अभिनव पुन्हा एकदा मोठयाने हसला. ‘‘अनन्या ऐक, तू इतकी समजूतदार आहेस की माझे मन कधी तुझ्याशी प्रेमाने जोडले गेले, हे माझे मलाही समजले नाही. तू माझी काळजी तर घेतेसच, शिवाय प्रत्येक गोष्ट मला सांगतेस. विनाकारण कधीच भांडत नाहीस… मी ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो तरीही मला समजून घेतेस.

‘‘पण याआधी तर तू असे कधीच सांगितले नव्हतेस.’’ अभिनवचे आपल्यावरील प्रेम पाहून भावनाविवश होत अनन्याने विचारले.

‘‘मी असाच आहे… मला बोलायला कमी आणि ऐकायला जास्त आवडते… अनन्या विश्वास ठेव, मला अगदी तुझ्यासारखीच जोडीदार हवी होती.‘‘

अनन्या मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.

‘‘एक गोष्ट आणखी सांगेन… शरीराची काळजी घेणे आपल्या सर्वांसाठीच गरजेचे आहे, पण तनाच्या सुंदरतेने कधीच मनाच्या सुंदरतेचा ताबा घेता कामा नये… तू माझ्या मनात डोकावून तुझा चेहरा पाहशील तेव्हा तुला तोच सुंदर चेहरा दिसेल जो काल होता, आज आहे आणि उद्याही तसाच असेल…’’

‘‘बस, अभिनव… आता आणखी काहीच नकोय मला. कोणी मला काहीही म्हटले तरी आता मला त्याची पर्वा नाही… फक्त तुझ्या मनाच्या आरशात माझे प्रतिबिंब असेच चमकत राहो,’’ असा विचार करत अनन्या पाणावलेल्या डोळयांनी अभिनवच्या मिठीत शिरली. त्याच्या प्रेमात विरघळून तिला खूपच शांत, अगदी हलके झाल्यासारखे वाटत होते.

प्रेमाचे धागे

कथा * अर्चना पाटील

सौम्य अफिसमधून रात्री आठ वाजता घरी परतला. शुज काढून हॉलमध्येच बसला.

‘‘जेवण वाढू का तुम्हाला,’’ काव्याने विचारलं.

‘‘जेवण नको आहे मला. तू इथे बस. माझ्यासमोर.’’

‘‘मी बसते, पण तुम्ही जेवून तर घ्या आधी.’’

‘‘भुक नाहीए मला. तुला इथे बसायला सांगतो आहे. तेवढं कर.’’

‘‘काय झालंय?’’

‘‘हेच मला तुला विचारायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? हनीमुनची टुर कँन्सल का केलीस तू आईबाबांसमोर? आठ दिवस गेलो असतो घराबाहेर फिरायला. तेवढाच एकांत मिळाला असता आपल्याला.’’

‘‘मला नको आहे एकांत. मी या घरात केवळ कस्तुरीची आई म्हणून आले आहे. तुम्ही माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका.’’

‘‘याचा अर्थ काय? नुसती नाटके नकोत मला. तुला जर एक बायको म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नव्हते तर लग्न का केलं माझ्याशी? जगात मुलींची काही कमी होती का? कस्तुरीसाठी आया तर भाडयानेही घेऊन आलो असतो मी. अनन्याच्या अपघाती निधनानंतर मला पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरूवात करायची होती आणि कस्तुरीची मावशी असल्याने तू परक्या बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेशील एवढेच या विवाहामागचे कारण आहे.’’

काव्या निरुत्तर झाली होती. आठ दिवस झाले होते लग्नाला. ती सतत सौम्यला टाळत होती. पण आज सासुसासरे गावी निघून गेले. त्यामुळे सकाळपासूनच तिला रात्रीची भीती वाटत होती. कारण आज सौम्यला टाळणे शक्य नव्हते.

‘‘तुम्ही जेवून घ्या आधी. आपण शांततेत बोलू नंतर.’’

‘‘कस्तुरी ?झोपली का?’’

‘‘हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना. मी ताट वाढते.’’

काव्या किचनमध्ये ताट वाढायला गेली. सौम्यसुद्धा तिच्या मागेमागे गेला. ताट हातात घेऊन काव्या उभी होती.

‘‘जेवण नको आहे मला, तू फक्त कस्तुरीची आई आहेस ना मग माझ्या पोटाची चिंता कशाला करते आहेस? तू आधी बेडरूममध्ये चल. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत.’’

‘‘आपण आईबाबांच्या खोलीत जाऊ. बेडरूममध्ये कस्तुरी झेपली आहे.’’

सौम्य काव्याचा हात हातात पकडूनच तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. काव्या एका भिंतीला चिटकून काहीशी घाबरतच उभी होती. सौम्य आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हते. लग्नानंतर प्रथमच ते दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ उभे होते.

‘‘आज मला एक मुलगी आहे. पण माझं नाव चालवायला मला आणखीन एक मुल हवंय. त्यासाठीच मी पुन्हा लग्न केले आहे. हे वाक्य कायम लक्षात असू दे आणि तुझ्यासोबत बोलताना आणि वागताना चुकलो तर तुमचं हे चुकत आहे असं बोलायलाही विसरू नको. बाकी तुझं नाटकं चालू देत.’’ सौम्य संतापात बोलून निघून गेला.

एक आठवडा ताणतणावातच गेला आणि आईबाबा गावाहून परत आले. सौम्यसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सगळे एकत्रच बसले. सौम्य एकटक काव्याकडे बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे पाहतच नव्हती. आईबाबा घरात असले की काव्या बिनधास्त असे, कारण सौम्यला टाळणे सहज जमत असे. जेवत असताना सौम्यला फोन आला. तेवढया वेळात सर्वजण जेवण करून निघून गेले. किचनमध्ये केवळ सौम्य आणि काव्या उरले. काव्याचे जेवणही झाले होते. पण सौम्यला जेवण वाढण्यासाठी तिला तिथेच त्याच्याशेजारी मांडी घालून बसावे लागले. सौम्य जेवत होता, पण काव्याला सतत भीती वाटत होती.

‘‘गुळाचा काला कर मस्त. कधीपासून खाल्ला नाही आहे.’’

‘‘काय?’’

‘‘येत नाही का तुला?आईला बोलव मग.’’

काव्याने कटरने गुळ चिरायला सुरूवात केली. सौम्य काव्याच्या घाबरट हालचालींचा आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. काव्याने पोळी आणि गुळाचा काला करताच कस्तुरीसुद्धा तेथे पोहोचली.

‘‘अय्या मम्मीपण असाच काला बनवायची ना पप्पा.’’

कस्तुरीच्या त्या वाक्याने नीरव शांतता पसरली. सौम्यसुद्धा काला न खाताच उठून गेला. काव्यालाही वाईट वाटले. दिवसभर सौम्य बेडरूममध्येच होता. पण काव्या चुकुनसुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबा गावातच लग्नाला जाणार होते.

‘‘सौम्य, कस्तुरी आमच्यासोबत लग्नाला येते आहे. तुम्ही दोघंही कुठेतरी फिरून या. बरं मग निघू आम्ही.’’ बाबा बोलून निघून गेले.

काव्या हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. सौम्यने आईबाबा जाताच घराचा दरवाजा आतून बंद केला आणि काव्याजवळ येऊन बसला. सौम्य जवळ येताच काव्या सावरून बसली.

‘‘किती दिवस एकांत टाळशील? लग्नाची बायको आहेस तू माझी. तू कितीही ठरवलं तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबतच घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तुझेही आईबाबा नातू हवा म्हणून तुला त्रास देतील.’’ सौम्य नेहमीप्रमाणे बोलून निघून  गेला. काव्यासुद्धा नजर खाली करून बसुन राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सौम्य कस्तुरीला शाळेत सोडण्यासाठी काव्यालाही घेऊन गेला. कस्तुरीला शाळेत सोडल्यानंतर टुव्हीलर घराच्या रस्त्याने न येता वेगळयाच दिशेने धावत होती. काव्या बेचैन झाली.

‘‘तुम्ही कुठे नेत आहात मला. तुम्ही गावाच्या बाहेर का जात आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला कस्तुरीची शपथ आहे.’’

सौम्यने गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. काव्या पटकन खाली उतरली. सौम्यसुद्धा खाली उतरला.

‘‘मी काही चुकीचं वागतोय का?’’

‘‘या प्रश्नाचे उत्तर नाहीए माझ्याकडे. मला घरी सोडा.’’

‘‘नाही सोडणार घरी. मला जिथे जायचं असेल, तिथेच जाईन. तुझ्या बापाला फोन करतो तू अशी नाटकं करते आहेस रस्त्यावर हे सांगायला,’’ सौम्य संतापात बोलत होता.

‘‘मी बसतेय गाडीवर,’’ काव्याच्या डोळयात पाणी आलं. बोलताना…मधूनमधून दोघांचा एकमेकांना हलकासा स्पर्श होत होता. टुव्हीलर एका कॉलेजसमोर थांबली. एक तासाचा प्रवास केला दोघांनी. पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज पाहताच काव्या गोंधळली. सौम्यने काव्याचं लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतलं. अॅडमिशन फॉर्म भरताच टुव्हीलर सपसप घराच्या दिशेने निघाली. तोपर्यंत कडक ऊन पडलं होतं.

‘‘तुम्ही रूमाल बांधाना डोक्याला,’’ काव्या बोलायचा प्रयत्न करत होती.

‘‘आयुष्याने इतके चटके दिले आहेत की आता या उन्हाचं काही वाटत नाही. तू व्यवस्थित बस.’’

काव्याला खुपच शरमल्यासारखे होत होते. सौम्य किती चांगल्या मनाने मला आणत होता आणि मी विनाकारणच त्याच्याशी भांडत होते. आजही सौम्यने अॅडमिशनसाठी रजा टाकली होती. दुपारच्यावेळी काव्या बेडरूममध्ये पाठ टेकायला आली. सौम्यने  रोमँटिक गाणी लावली लॅपटॉपवर. अभी ना जाओ छोडकर…ये हँसी वादीयाँ…तुम मिले, दिल खिले…प्रत्येक गाणं काव्याला आवडत होतं. ती सौम्यकडे पाठ करून बेडवर झेपली होती, पण गालातल्या गालात हसत होती. तेवढयात काव्याच्या आईचा फोन आला.

‘‘कशी आहेस बेटा. बरं ते जाऊ दे. जावईबापूंना म्हणा पन्नास हजार मिळाले. तात्यांना अॅडमिट केलं होतं दवाखान्यात. आम्ही पगारावर फेडू म्हणा त्यांना. तू काळजी करशील म्हणून बोलले नाहीत तुला. आभार मानायला फोन केला गं मी. जावईबापूंना नाराज करू नकोस. खूपच हळव्या मनाचे आहेत ते. आपली अनन्या त्यांच्या आयुष्यातुन अचानक निघून गेली, त्यामुळे खुप खचले गं ते. पण मन मोकळं करत नाहीत ते. आता तुच अनन्याची जागा भरून काढ.’’

संध्याकाळी स्वत:हून काव्याने सौम्यसाठी शिरा बनवला. रात्री जेवण झाल्यावर स्वत:हून गुळपोळीचा काला केला.

‘‘बापरे, कस्तुरी तुझी नवी मम्मी खुपच खुष दिसते आहे आज’’

‘‘हो, कारण मम्मा आता वकील होणार आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार.’’

‘‘कस्तुरी, असं बोलू नये बाळा. तू जा आजीजवळ आणि झोप.’’

‘‘मी चुकीचे ऐकतोय का, कस्तुरीची मम्मी. तू तिला आजीजवळ पाठवते आहेस झोपायला.’’

काव्या लाजली आणि पटापट किचनमधील पसारा आवरून बेडरूममध्ये आली.

‘‘आईचा फोन होता संध्याकाळी. कौतुक करत होती तुमचं.’’

‘‘मी तर सगळयांनाच आवडतो तू सोडून.’’

‘‘मी कुठे म्हटले की तुम्ही मला आवडत नाहीत.’’

‘‘म्हणजे मी तुला आवडतो. मग इतके दिवस माझ्यापासून दुरदुर का पळत होती?’’

‘‘थोडा वेळ हवा होता मला. अनन्या गेली आणि लगेच तिच्या अर्धवट संसारात गुंतवलं मला आईबाबांनी. मला ग्रॅजुएशननंतर लॉ करायचे होते. या लग्नामुळे माझे शिक्षणसुद्धा थांबले. याशिवाय तुम्ही मला अनन्याची जागा कधीच देणार नाही असं वाटत होतं मला.’’

‘‘बावळट आहेस तू, अनन्या माझा भुतकाळ होती. मी तुला आधीच सांगितलं होतं की मला आयुष्याची नवीन सुरूवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं आहे.’’

‘‘मला माझी चुक समजली. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझे मन जिंकलेच. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या.’’

‘‘एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव.’’

अपंग

कथा *  रवी चांदोरकर

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचं विमान उभं होतं. मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाइट होती. सगळ्या सीट्स भरलेल्याच होत्या. स्वातीनं गौरवबरोबर विमानात प्रवेश केला. गौरव व्हीलचेअरवर होता. एअरहोस्टेस व्हीलचेअर ढकलत होती. स्वाती तिला मदत करत होती. गोरापान, देखणा गौरव त्रासल्यासारखा दिसत होता.

स्वातीनं एअरहोस्टेसच्या मदतीने गौरवला सीटवर नीट बसवलं. एअरहोस्टेसला धन्यवाद दिले अन् हातातलं सामान वरच्या रॅकवर ठेवून ती आपल्या सीटवर बसली. तेवढ्यात विमानात प्रवेश करणाऱ्या जोडीकडे तिचं लक्ष गेलं. तो अनंत होता. त्याच्याबरोबर नवपरिणीत वाटणारी एक सुंदर मुलगी होती. मुख्य म्हणजे अनंत व्यवस्थित चालत होता. दोघंही खूप आनंदात दिसत होती. स्वातीनं आपला चेहरा मॅगिझनच्या आड लपवला. तिला अनंतकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. ती दोघं स्वातीच्या सीटच्या दोन सीट मागे जाऊन आपल्या आसनावर बसली

स्वातीला घेरी आल्यासारखं वाटलं. तिनं गौरवच्या हातावर हात ठेवला.

‘‘काय झालं स्वाती? बरं वाटत नाहीए का?’’ गौरवनं विचारलं.

स्वातीनं उत्तर दिलं नाही, तेव्हा गौरवनं पुन्हा विचारलं, ‘‘काय होतंय? बरी आहेस ना?’’

‘‘हो…हो, आता बरं वाटतंय. एकदम घेरी आल्यासारखं झालं मघाशी,’’ स्वातीनं स्वत:ला सावरून उत्तर दिलं.

स्वातीचं ग्रॅज्यूएशन होता होताच तिचं अनंतशी लग्न झालं होतं. दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासात हुशार अन् वागायला अत्यंत गुणी असलेली स्वाती सगळ्यांची लाडकी होती.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पाच बहिणींपैकी स्वाती सर्वात धाकटी. ती बी.ए. फायनलला असतानाच वडील वारले. चार पोरी उजवता उजवता वडिल तरूण वयातच म्हातारे दिसायला लागले होते. इकडून तिकडून कर्ज घेत कशीबशी चार पोरींची लग्नं केली अन् हार्ट अटॅक येऊन स्वातीच्या लग्नाआधीच जग सोडून गेले. निरक्षर, गरीब घरातली मुलगी असलेली स्वातीची आई या धक्क्यानं अंथरूणाला खिळली. चारही बहिणींना काळजी पडली की बाबांपाठोपाठ आईही या जगातून गेली तर स्वातीचं कसं होणार? तिला कोण बघेल? कारण या चौघीही तशा सामान्य कुटुंबातच दिल्या गेल्या होत्या. त्यांनी ठरवलं स्वातीचं लग्न लवकरात लवकर करायचं.

मुलं बघायची मोहीम सुरू झाली. पण वडील वारलेले, भाऊ नाहीच हे ऐकून अनेक स्थळं मुलगी न बघताच नकार द्यायची. कुणाला मुलगी पसंत पडली तरी देण्याघेण्यावरुन बोलणी फिसकटायची.

लग्नात खर्च करायला आईकडे कुठं पैसा होता? बहिणीही गरीबीतच राहात होत्या. त्या तरी उचलून काय मदत करणार होत्या?

स्वाती त्यांची समजूत घालायची, ‘‘तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, होईल माझं लग्न.’’

एकदा स्वातीसाठी मुंबईतल्या एका फार मोठ्या उद्योगपतींच्या घरातून स्थळ आलं. नात्यातल्या एकानं हे स्थळ सुचवलं होतं.

‘‘मावशी, खूप छान स्थळ आहे. स्वाती राज्य करेल त्या घरात. पैसा अडका, मोटारी, नोकर चाकर आलिशान बंगला…’’ स्वातीचा चेहरा उजळला.

‘‘पण सुशांत, अरे ती एवढी बडी माणसं, आम्ही गरीब…’’

‘‘मावशी, त्यांना फक्त हुशार अन् समजून घेणारी मुलगी हवी आहे. मुलात थोडा दोष आहे.’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘लहानपणी त्याला काही आजार झाला होता. त्यात एक पाय अधू झालाय. पण ती पैसेवाली माणसं आहेत. लवकरच अमेरिकेला जाऊन उपचार करून घेणार आहेत.’’

‘‘पण पाय होईल ना चांगला?’’ आईनं काळजीनं विचारलं.

‘‘होय मावशी. अमेरिकेतल्या निष्णात डॉक्टरशी बोलणी सुरू आहेत त्यांची.’’

‘‘तरीही मला जरा…’’

‘‘मावशी, स्वाती माझी बहीण आहे. अयोग्य व्यक्ती मी माझ्या बहिणीसाठी सुचवेन का? अनंतला बघशील तर तू ही त्याच्या प्रेमात पडशील. दिसायला तो चांगलाच आहे. वर पुन्हा श्रीमंतीचं, बुद्धीचं, शिक्षणांचं तेज…तो चालत नाही तोवर कुणाला त्याचा दोष कळतसुद्धा नाही.’’

शेवटी सुशांतने मावशीचं व तिच्या पाचही मुलींचं मन वळवलं. स्वातीला प्रथम, पायानं अधू असलेला अनंत पसंत नव्हता. पण आपल्या गरीबीचं रडगाणं पुन्हा पुन्हा गाऊन बहिणींनी तिलाही राजी केलं.

लग्न मुंबईतच खूप थाटात झालं. स्वातीची आई, चारही बहिणी, त्यांचे नवरे, मुलं सर्वांना छान आहेर मिळाले. मुंबई हिंडवून आणली. स्वातीच्या घरून त्यांनी एक पैसाही घेतला नाही. सगळेच लोक खुश होते.

स्वातीला तर ते वैभव बघून घेरीच आली. सासूसासरे तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्यावर खूप माया करायचे.

अनंतचा एक पाय आजारपणांत अधू झाल्यामुळे त्याला कुबडी घ्यावी लागे. प्रथम स्वातीला त्याच्याबरोबर बाहेर पडायची लाज वाटायची. पण मग तिनं स्वत:ला बजावलं, इतकं प्रेम करणारा नवरा भेटलाय, त्याचं आपण आधार व्हायचं. त्याला काही कमी पडू द्यायचं नाही. त्यानंतर तिला अनंतची कधीच लाज वाटली नाही. सगळा देश ती अनंतबरोबर फिरली. मुंबईत होणाऱ्या अनेक कार्यक्रमांत ती अनंतबरोबर जायची. कार्यक्रम एन्जॉय करायची.

एकदा क्लबच्या एका कार्यक्रमानंतर ती अनंतचा हात धरून बाहेर येत असताना स्वातीला अचानक गौरव दिसला. तिच्याबरोबर तो कॉलेजात होता. स्मार्ट अन् देखणा तरूण होता तो.

‘‘हॅलो गौरव,’’ स्वातीनं त्याला हाक मारली.

‘‘हाय स्वाती, कशी आहेस? कुठं असतेस हल्ली?’’ गौरवनं तिच्या जवळ येत विचारलं.

‘‘इथंच असते मुंबईत. लग्न झालं माझं. दोन वर्षं झालीत.’’

‘‘अरेच्चा? दोन वर्षं झालीत?’’ आश्चर्यानं गौरव बघतंच राहिला.

‘‘हे माझे पती अनंत.’’ स्वातीनं ओळख करून दिली.

‘‘नमस्कार, मी गौरव,’’ गौरवनं हात पुढे केला.

‘‘नमस्कार, मी अनंत,’’ त्याच हात हातात घेऊन हस्तांदोलन करत अनंत म्हणाला.

त्याच्या अधू पायाकडे गौरवचं लक्ष गेलं. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं स्वातीकडे बघितलं.

स्वातीनं त्याची खबरबात विचारली तेव्हा तो म्हणाला, हल्लीच तो दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदावर आहे. अजून लग्न केलं नाहीए. स्वातीनं त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. एकमेकांच्या मोबाईल नंबर्सची देवाण घेवाण झाली अन् ते आपापल्या घरी गेले.

त्या रात्री गौरवला झोप आली नाही. तो कॉलेजच्या दिवसांपासून स्वातीवर प्रेम करत होता, पण त्या वयात प्रेमाचा उच्चार करायला घाबरत होता.

स्वातीने अशा अपंग माणसाशी लग्न का केलं असेल? ती खरोखर सुखात आहे की वरवर आनंदी दिसते? अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. स्वातीला याबाबतीत एकदा विचारावं असं त्यानं ठरवलं.

त्यानं एक दिवस स्वातीला फोन केला अन् ‘केव्हा भेटूयात’ असं विचारलं. स्वाती म्हणाली, ‘‘उद्या मी मार्केटला जाते आहे तेव्हा तिथंच आपण भेटूयात.’’

मार्केटमधल्या कॉफी शॉपमध्ये दोघं भेटली. स्वातीनं तिच्या लग्ना आधीची अन् मग लग्न ठरल्यानंतर, लग्न झाल्यानंतरची सर्व हकिगत गौरवला सांगितली.

अनंत बरोबर ती आनंदात आहे. सासू सासरे, इतर नातलग तिच्यावर किती माया करतात शिवाय अनंतचा कोट्यवधींचा टर्न ओव्हरचा बिझनेसही ती बघतेय वगैरे अनेक गोष्टी गौरवला सांगितल्या.

स्वातीच्या गरीबीमुळेच तिला ही तडजोड करावी लागली असली तरी ती आता अगदी सुखात आहे हे बघून गौरवला आश्चर्य वाटलं.

त्यादिवशी तिला परतून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. तिनं ड्रायव्हलाही सोबत नेलं नव्हतं. त्यामुळे अनंतला खूपच काळजी वाटली. अनंत तिला मोबाइलवर फोन लावत होता. पण गाडी ड्राइव्ह करत असल्यामुळे स्वातीनं फोन उचलला नाही.

घरी आल्यावर अनंतची क्षमा मागून स्वाती म्हणाली, ‘‘अनंत, तुमची स्वाती आता मुंबईकर झाली आहे. पूर्वीसारखी घरगुती, घाबरट स्वाती नाहीए ती.’’

गौरवशी स्वातीच्या भेटी वाढल्या. गौरव घरीही येऊन गेला. अनंतनं त्याला मित्रासारखीच वागणूक दिली. गौरव अन् स्वाती एकत्र सिनेमाला, हॉटेललाही जाऊ लागली. त्यांच्यातली जवळीक वाढू लागली. गौरवचं आकर्षण स्वातीला त्याच्याकडे ओढत होतं अन् तिच्याही नकळत ती अनंतपासून दुरावरत होती.

स्वाती अन् अनंतच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. पण अजून त्यांना मूळबाळ नव्हतं. स्वातीला आता गौरवच अधिक जवळचा वाटत होता. त्याच्याबरोबर संसार थाटायची स्वप्नं ती बघत होती.

अनंत पायानं अधू असला तरी हुशार अन् कर्तबगार होता. स्वातीवर त्याचं खूपच प्रेम होतं. तिनं त्याला आपलं म्हटलं, त्याला भारतदर्शन घडवलं याबद्दल तो तिचा कृतज्ञ होता. तो तिला म्हणायचा, ‘‘माझे पाय बरे झाले की मी तुला जगप्रवासाला नेईन, थोडी कळ काढ.’’

पण आता स्वातीमध्ये झालेला बदल त्याला जाणवत होता. स्वातीला तो काही म्हणत नव्हता, पण स्वातीचं ऑफिसमधून बराच वेळ बाहेर असणं, ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष, घरी उशिरा अवेळी येणं, सगळ्यांनाच खटकत होतं.

अनंतच्या आईबाबांनी अत्यंत सौम्यपणे स्वातीला या बाबतीत विचारलं, तेव्हा तिनं आपण ऑफिसच्या कामानं बाहेर जातो किंवा मैत्रिणींकडे भिशी, किटी असते म्हणून जातो असं सांगून वेळ मारून नेली.

अनंतच्या बाबांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्यांनी एका खाजगी गुप्तहेराला स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं. त्यानं काढलेली माहिती धक्कादायक होती. स्वातीचा सगळा वेळ गौरवच्या सोबतीत जात होता. तिनं एका पंचतारांकित हॉटेलात एक खोलीही बुक करून ठेवली होती. नेहमी ती दोघं तिथंच भेटायची.

दोनचार दिवसातच डिटेक्टिव्हनं सूचना दिली की स्वाती आणि गौरव हॉटेलात आहेत. अनंतचे आईबाबा ताबडतोब तिकडे गेले.

बाबांनी खोलीची बेल वाजवली. गौरवला वाटलं, वेटर असेल म्हणून त्यानं दार उघडलं. दारात त्या दोघांना बघून तो एकदम गांगरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ‘‘तू…तुम्ही?’’ कसा बसा बोलला.

‘‘नालायक, कृतघ्न माणूस…बाजूला हो.’’ बाबांनी त्याला खोलीत ढकललं अन् ते आत आले. खोलीत बेडवर स्वाती झोपलेली होती. संतापलेल्या सासूसासऱ्यांना अवचित असं समोर बघून ती धडपडून उठून बसली.

‘‘स्वाती काय चाललंय हे?’’ सासूनं दरडावून विचारलं. स्वाती खाली मान घालून उभी होती.

‘‘तुझे इतके लाड केले. कार ड्रायव्हिंग शिकवलं, धंद्यात तुला पार्टनर केलं, पैसा भरपूर दिला, स्वातंत्र्य दिलं त्याची अशी शिक्षा देते आहेस आम्हाला?’’ सासरे गरजले.

‘‘होय, हेच सत्य आहे. सगळं आयुष्य मी तुमच्या अपंग मुलाबरोबर नाही काढू शकणार. मला सुदृढ जोडीदार हवाय. कुठवर मी सहन करू?’’ एकाएकी स्वातीनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘तर मग राहा याच्याच बरोबर. यापुढे आमच्या घरात तुला जागा नाही.’’ सासूनं म्हटलं. सासूसासरे तिथून तडक घरी पोहोचले.

घरी जाऊन त्यांनी अनंतलाही सांगितलं. रात्री स्वाती घरी आली. ‘‘आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही,’’ अनंतनं म्हटलं.

दुसऱ्याच दिवशी अनंतच्या नावांनं एक चिठ्ठी लिहून ठेवून स्वातीनं घर सोडलं.

‘‘गौरवबरोबर जाते आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम, आदर. पैसा, स्वातंत्र्य व सर्वच गोष्टींसाठी आभारी आहे. माझा शोध घेऊ नका.’’

स्वाती घर सोडून गेल्यावर सासऱ्यांनी पुन्हा व्यवसायात लक्ष घातलं. मधल्या काळात त्यांनी अनेक गोष्टी स्वातीवर सोपवल्या होत्या. जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं. हॉटेलची लाखो रूपयांची बिलं दिली गेली होती. एक कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम व पन्नास हजारांचे दागिने बँकेतून काढले गेले होते. स्वाती असा विश्वासघात करेल याची त्यांनी स्वप्नांतही कल्पना केली नव्हती. एवढ्या मोठ्या खानदानी कुटुंबातली लाडकी सून असा दगा देऊन प्रियकरासोबत निघून गेली होती.

काळासारखं औषध नाही म्हणतात. हळूहळू अनंत व त्याच्या घरचे लोक सावरले. व्यवसायानं अधिक जोम धरला. बऱ्यांपैकी स्थिरस्थावर होतंय म्हणेपर्यंत एक धक्का अजून बसला. स्वातीनं वकीलांमार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. दहा कोटींची मागणी केली होती. तिच्या लोभीपणाला मर्यादा नव्हती. आधीच एक कोटी कॅश अन् पन्नास हजारांचे दागिने नेले होते. लाखो रूपये हॉटेलवर खर्च केले होते आणि आता हे दहा कोटी, पण शेवटी नावाचा, नामांकित घराण्याच्या इभ्रतीचा प्रश्न होता. अनंतनं व त्याच्या आईबाबांनी निर्णय घेतला की परस्पर संमतीनं घटस्फोट अन् पोटगी म्हणून आठ कोटी रुपये देऊन ही ब्याद आयुष्यातून कायमची घालवावी.

आठ कोटी रुपये घेऊन स्वातीनं अनंतला घटस्फोट दिला. तिनं गौरवशी लग्न केलं.

ती आनंदात होती. भरपूर पैसा होता. चैन चालली होती. हातात फुकटचा पैसा आल्यानं गौरवनंही नोकरी सोडून धंदा सुरू केला होता. पार्ट्या, सट्टा, दारू, यात भसाभस पैसा संपत होता.

त्यातच एक अपघात घडला. गौरव बाइकवरून खाली पडला अन् मागून येणारी बस त्याच्या पायांवरून गेली. पायांचा पार भुगा झाला.

स्वातीला कुणीतरी कळवलं. ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गौरवचे काही मित्रही आले होते. डॉक्टरांच्या टीमनं स्वातीला सांगितलं की गुडघ्याखाली त्यांचे पाय कापावेच लागतील. ऐकून स्वाती स्तब्ध झाली.

नोकरी गेलेली. मन:पूत खर्च केल्यानं पैशांची चणचणच निर्माण झालेली. दोन्ही पाय गेल्यामुळे गौरव खूप चिडचिडा झाला होता. त्याला वाटे स्वातीनं सतत त्याच्या जवळ राहावं. त्याला जुने दिवस आठवायचे…जेव्हा तो धडधाकट होता तेव्हा स्वाती अनंतला सोडून त्याला भेटायला यायची. आता तो अपंग होता. अनंतला निदान आधार द्यायला आईवडिल, व्यवसाय, अफाट संपत्ती होती. गौरवकडे तर काहीच नव्हतं. जरा स्वाती इकडे तिकडे गेली की तो घाबरा व्हायचा. ‘‘कुणाकडे गेली होतीस, कशाला गेली होतीस,’’ तो तिच्यावर ओरडायचा.

स्वातीला वाईट वाटायचं. तिच्या केलेल्या चुकांची शिक्षा ती भोगत होती. तिला अनंतची आठवण यायची. पण आता काय उपयोग होता?

गौरवच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता. आता मुंबईत राहाणं अवघड होतं. दिल्लीला परत जाऊन तिथं काहीतरी व्यवसाय करावा असा निर्णय त्यांनी घेतला. दिल्लीला काही जुने मित्र होते. त्यांनी आधार द्यायची तयारी दाखवली.

दिल्लीला जाण्यासाठी स्वाती व्हीलचेअरवरून गौरवला घेऊन विमानतळावर आली होती. तिचा भूतकाळ तिच्या चुकीनं तिनं उद्ध्वस्त केला होता. जे आता हातात होतं, ते तिला घालवायचं नव्हतं.

‘‘एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही बेल्ट बांधायला विसरलात.’’ एअरहोस्टेसनं स्वातीला म्हटलं.

‘‘थँक्यू,’’ स्वातीनं म्हटलं. तिनं मागे वळून बघितलं. अनंत आपल्या सीटवर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. त्याची बायको त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपी गेली होती.

स्वातीला वाटत होतं आज ती स्वत:च अपंग झाली आहे.

का हा अबोला?

कथा * प्रा. रेखा नाबर

मी जर्मन रेमिडीज या कंपनीत मेडिकल ऑफिसर असताना घडलेली ही गोष्ट आहे. एका वर्षासाठी मला गोवा डिव्हिजनला पोस्टिंग मिळाले. गोव्याच्या निसर्ग सौंदर्याच्या मी प्रेमात आहे. त्याशिवाय जवळच असलेल्या सावंतवाडीतील आजोळच्या मधाळ आठवणींनी मी आनंदित झालो. दोन वर्षं माझे शालेय शिक्षण तिथे झाले होते. त्यावेळचा माझा जीवश्च कंठश्च मित्र रमाकांत मोरचकर (मोऱ्या) मला साद घालू लागला. गोव्याला बाडबिस्तरा टाकून सावंतवाडीला मोऱ्याला न कळविता दाखल झालो. ‘येवा, कोकण आपलाच असा’ या वृत्तीची ही माणसं दिलखुलास स्वागत करतात. त्याच्या घरात एक प्रकारचा सन्नाटा जाणवला. माझ्या मामेभावाने तर तशी काही बातमी दिली नव्हती. मी कोड्यात पडलो.

‘‘काय मोरोबो, सगळं क्षेमकुशल ना?’’

‘‘हो. तसंच म्हणायचं.’’

‘‘न सांगता आलो म्हणून नाराज आहे की काय?’’ वहिनी पाणी घेऊन बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसले. तब्येतही काहीशी उतरलेली वाटली. मी कोड्यात.

‘‘सवितावहिनी, कशा आहात?’’

‘‘ठीक आहे,’’ चेहरा निर्विकार.

‘‘चहा टाक जरा आंद्यासाठी.’’ (आंद्या म्हणजे मी… आनंद).

देवघरात काकी (मोऱ्याची आई) जप करीत होत्या. त्यांना नमस्कार केला. ‘‘बस बाबा.’’ त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी.

माजघरात नजर टाकली तर एक १४-१५ वर्षांची मुलगी शांतपणे बसली होती, जे तिच्या वयाला अजिबातच शोभत नव्हते. कृश हातपाय व चेहेरा फिकुटलेला. मी निरखून बघितले.

‘‘ही सुरभी ना? सुभ्या, ओळखलं नाहीस चॉकलेट काकाला? हो कळलं, चॉकलेट दिन नाही म्हणून रागावलीस ना? हे घे चॉकलेट, चल ये बाहेर.’’

तिने चॉकलेट घेतले नाहीच, उलट ती रडायलाच लागली.

‘‘आंद्या, तिला बोलायला येत नाही,’’ काकींनी धक्कादायक बातमी दिली.

‘‘काय? लहानपणी चुरूचुरू बोलणाऱ्या मुलीला बोलता येत नाही. पण का? आजारी होती का? अशक्त वाटतेय. का रे मोऱ्या?’’

चहा घेऊन आलेल्या वहिनींनी आणखी एक धक्का दिला.

‘‘गेल्या वर्षी एक दिवस शाळेतून आली, तेव्हापासून मुकीच झाली.’’

‘‘काहीतरीच काय? आता शाळेत जात नाही वाटतं?’’

‘‘शाळेत जाऊन काय करणार? बसली आहे घरात.’’ वहिनींचा उदास स्वर.

मी धक्क्यातून सावरलो. सुरभीचा गळा, कान, नाक वगैरे तपासले.

स्वीच ऑडिओ माझा विषय नसला तरी डॉक्टर असल्यामुळे प्राथमिक ज्ञान होते.

‘‘मोऱ्या, मला सांग हे नक्की कधी झालं? कळवायचं नाही का रे मला?’’

‘‘गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मैत्रिणींबरोबर शाळेतून येत असताना एकदम हिचा आवाज बसल्यासारखा झाला आणि काही वेळाने बाहेरच पडेना. तेव्हापासून असंच आहे.’’

‘‘अरे त्या झाडाखालून आली होती ते सांग ना,’’ काकींची सूचना.

‘‘कोणत्या झाडाखालून? त्याची फांदी पडली का हिच्या अंगावर?’’

‘‘पिंपळाखालून. फांदी कशा पडायला पाहिजे. त्या झाडाखालून अमावस्येच्या दिवशी आलं की असंच होतं. शिवाय दुपारी बाराला.’’

‘‘ही एकटीच होती का?’’

‘‘नाय रे, होत्या तीनचार जणी. पण हिलाच धरले ना. अण्णा महाराजांनी सगळं सांगितलं मला,’’ काकींचे विवेचन अगाध वाटले.

‘‘आता हे अण्णा महाराज कोण?’’

‘‘गेल्या वर्षींपासून गावाच्या बाहेरच्या मळात येऊन राहीलेत. बरोबर एक शिष्य आहे. पूजा पठण, जप असा त्यांचा कार्यक्रम असतो. भक्तांना काही समस्या असल्या तर त्यांचं निवारण करतात. काही तोडगे सुचवतात. जडीबुटीची काही औषधंसुद्धा आहेत त्यांच्याकडे. गावात बऱ्याच जणांना गुण आलाय.’’

‘‘मग तू गेला होतास की काय त्याच्याकडे?’’

‘‘आई घेऊन गेली होती सुरभीला. बघताक्षणीच त्यांनी सांगितलं की पिंपळाखालची बाधा आहे. मंतरलेले दोरे दिलेत. हिला उपास करायला सांगितलेत. करतेय ती.’’

‘‘दिसतंय ते वहिनीच्या तब्येतीवरून, कसला रे गंड्या दोऱ्यांवर विश्वास ठेवतोस? ही अंधश्रद्धा आहे. अज्ञानातून आलेली. विज्ञानयुगात आपली विचारसरणी बदलली पाहिजे. या बुवाबाबांच्या औषधाने गुण आला तर वैद्यकशास्त्र का मोडीत काढायचं? बी.ए.पर्यंत शिकलास ना तू? डॉक्टरांना दाखवलं नाहीस का?’’

‘‘दाखवलं ना! गोव्याहून येणाऱ्या स्पेशालिस्टना दाखवलं. त्यांनी सांगितलं स्वरयंत्राचं ऑपरेशन करावं लागेल. एक तर ते खर्चिक आहे आणि यशाची खात्री नाही. म्हणून मनात चलबिचल आहे.’’

‘‘ठीक आहे. हिच्या ज्या मैत्रिणी त्यावेळी बरोबर होत्या, त्यांना मी भेटू शकतो का?’’

त्या मैत्रिणींशी बातचित करून मी मनाशी काही आडाखे बांधले. पिंपळाखालची जागा बघून आलो. मोऱ्या, त्याची आई व पत्नी संभ्रमात होते. ‘‘मोरोबा, उद्या सकाळी आपण गोव्याला जाऊ या. माझा मित्र नाक, कान, घसा यांचा तज्ज्ञ आहे. त्यांचा सल्ला घेऊ या.’’

‘‘गोव्याच्याच डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ना? मग हा काय निराळं सांगणार? जायचा यायचा त्रास आणि जबरदस्त फी.’’

‘‘त्याची तू काळजी करू नकोस. जाताना माझी गाडी आहे. येताना तुम्हाला कदंबच्या बसमध्ये बसवून देतो. रात्रीपर्यंत परत याल.’’

‘‘पण अण्णा महाराजांनी सांगितलंय की डॉक्टर काही करू शकणार नाहीत.’’ काकींचा विरोधाचा सूर.

‘‘काकी, त्यांचे दोरे आहेतच हातात. आता हे डॉक्टर काय म्हणतात बघू.’’

नाखूशीनेच मोऱ्या तयार झाला. बाहेर पडल्यामुळे सुरभीची निराशा कमी झाल्यासारखी वाटली. डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या. त्या कशा घ्यायच्या ते सांगितलं. नंतर चर्चा करून आम्ही कार्यवाही ठरविली.

सुरभीच्या तब्येतीविषयी मी फोनवर चौकशी करत होतो व माझ्या भावालासुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते. त्याच्या मुलीला सुरभीसोबत वेळ घालविण्याची विनंती केली होती. उपाय-तापास, गंडेदोरे, अण्णा महाराजांकडे खेटे घालणे चालूच होते. पंधरा दिवसांनी मी पुन्हा सावंतवाडीला मोऱ्याकडे हजर झालो, यावेळी सुरभीनेच पाणी आणले.

‘‘काय सुभ्या, थोडंसं बरं वाटतयं ना?’’

मानेनेच होकार देत तिने हातातील चॉकलेट घेतले व किंचित हसलीसुद्धा.

‘‘मोऱ्या, ही हसली का रे? आता हे बघ त्या डॉक्टरने सुरभिला पंधरा दिवसासाठी गोव्याला बोलावलं आहे. तिथे तिची ट्रिटमेंट होईल.’’

‘‘अरे बाप रे, म्हणजे पंधरा दिवस हिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची? मला नाही रे हा खर्च परवडणार.’’

‘‘गप रे. माझं घर हॉस्पिटलच्या आवारातच आहे. तुझी वहिनीसुद्धा आली आहे. दोन दिवसांनी येऊन मी सुरभीला घेऊन जातो. ही तिला रोज हॉस्पिटलमध्ये नेईल. ट्रिटमेंट पंधरा दिवस चालेल. परिमाम पाहून नंतरची कार्यवाही ठरवू.’’

‘‘पण ट्रिटमेंट काय असेल?’’ वहिनीने घाबरतच विचारले.

‘‘ते डॉक्टर ठरवतील. पण ऑपरेशन नक्कीच नाही,’’ सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सुरभीची ट्रिटमेंट वीस दिवसांपर्यंत लांबली. त्या दरम्यान दोन वेळा मोऱ्या आणि वहिनी येऊन गेल्या. वीस दिवसांनी मी व माझी पत्नी सुरभीला घेऊन सावंतवाडीला गेलो.

‘‘सुभ्या बेटा, आईला हाक मार.’’

सुरभीने जोर लावून ‘‘आ आ…’’ असे म्हटले. वहिनींचा आनंद गगनात मावेना.

‘‘सुभ्या, बाबाला नाही हाक मारणार?’’

पुन्हा तिने ‘बा…बा…’ असे म्हटले. दोघांच्या डोळ्यांतून आंनदाश्रू पाझारले.

‘‘भाऊजी, सुरभी बोलायला लागलीय. पण नीट बोलत नाही आहे.’’

‘‘वहिनी, इतके दिवस तिच्या गळ्यांतून आवाज फुटत नव्हता. आता नुकता फुटायला लगलाय. प्रॅक्टिस केल्यावर होईल सुधारणा.’’

‘‘पण इथे कसं जमणार हे सगळं?’’

‘‘इकडच्या आरोग्य केंद्रात शितोळे नावाच्या बाई येतात. त्या हिच प्रॅक्टिस करतात. त्याला स्वीच आणि ऑडिओ थेरपी म्हणतात. त्या सराव करून घेतील. मग लागेल ती हळूहळू बोलायला.’’

काकींनी आपले घोडे पुढे दामटले. ‘‘अण्णा महाराजांनी वर्षभर उपाय केले. सुनेने उपास केले त्याचं फळ आहे हे आंद्या. तुझा डॉक्टर एक महिन्यांत काय करणार?’’

‘‘काकी, जे वर्षांत झालं नाही ते पंधरवडयात झालं. कारण वैद्यकिय ज्ञान. तरीही सुरभी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही.’’

‘‘पण झालं तरी काय होतं तिला?’’

‘‘आपण सर्व अण्णा महाराजांकडे जाऊनच खुलासा करू?’’

आमची वरात मठात दाखल झाली.

‘‘नमस्कार अण्णा महाराज, सुभ्या बेटा, अण्णांना हाक मार.’’

ना…ना… अशी अक्षरे ऐकून अण्णा चपापले पण क्षणभरच.

‘‘अहो साहेब, वर्षभर आम्ही कसून प्रयत्न करतोय. माईंची तपस्या, वहिनींचे उपासतापास आणि आमचे उपाय..आला ना गुण?’’

‘‘अरे व्वा. पण काय झालं होतं हिला?’’

‘‘अहो काय सांगू? त्या पिंपळाला टांगून एका मुलीने जीव दिला होता. तिच्या भुताने हिला झपाटलं. आता जायला लागलंय ते भूत.’’

‘‘पण मी त्या पिंपळाला लोबंकळलो. हिच्या मैत्रिणींनासुद्धा करायला लावलं. आम्हाला कुणाला नाही झपाटलं.’’

‘‘सगळ्यानाच झपाटत नाही. या मुलीचं प्राक्तनच होतं तसं.’’

‘‘आणि तुमच्या प्राक्तमनांत हिच्या पालकांचा पैसा होता.’’ मीसुद्धा आवाज चढवला.

‘‘काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्यावर संशय घेताय?’’ अण्णा गरजले.

‘‘ओरडण्याने खोट्याचं खरं होत नाही. तुम्हाला लबाडी करून लोकांना लुबाडण्याच्या वृत्तीने झपाटलंय, खरी गोष्ट फार निराळी आहे,’’ मी चवताळून बोललो.

‘‘काय आहे सत्य?’’ अण्णांचा आवाज नरमला होता.

‘‘सुरभी जन्मत:च मुकी नाही. ती बोलत होती, पण तोतरी. वर्गातल्या मुली तिला ‘तोतरी तोररी’ असं चिडवायच्या. त्यामुळे ती बोलणं टाळायला लागली. आतल्या आत कुढायला लागली. कायमचे आघात झाल्यामुळे तिचं मन काही व्यक्त करणं विसरूनच गेलं. त्याचा परिपाक म्हणजे मुकेपणा. कायम दाबून ठेवलेल्या भावना तिला निराशेच्या गर्तेत नेऊ लागल्या होत्या. ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या होती.’’

‘‘मग याच्यावर तू उपाय तरी काय केलेस? फक्त त्या गोळ्या?’’

‘‘त्या गोळ्या शक्तीवर्धक म्हणजे टॉनिक होत्या. खरं टॉनिक हवं होतं तिच्या मनाला. ते माझ्या डॉक्टर मित्राने ओळखलं. पण ही सगळी पार्श्वभूमी मला सुरभीच्या मैत्रिणींनी सांगितली. गोव्याला गेल्यावर तिचं समुपदेशन केलं. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. नंतर बोलण्याचा प्रयत्न करायला शिकवलं. अजून जवळजवळ दोन महिन्यांनी ती व्यवस्थित बोलायला लागेल.’’

‘‘हे सगळं आपणहून होईल का?’’ वहिनींची रास्त शंका.

‘‘आपणहून कसं होईल वहिनी? त्यासाठी इथल्या आरोग्य केंद्रात तिला रोज जावं लागेल. एवढं तुम्हाला करावं लागेल.’’

‘‘करेन मी भावोजी. तुम्ही खूपच मदत केलीत आम्हाला.’’

‘‘मग माझी वर्गणी?’’

‘‘कोंबडी वडे.’’

‘‘एकदम बरोबर. राहणार आहे मी दोन दिवस. आता आधी या अण्णा महाराजांना कोणता नैवेद्य द्यायचा ते बघू, काय म्हाराजा?’’

‘‘काही नको. मी जातो दुसरीकडे.’’

‘‘आधी सुरभीच्या हातातले गंडेदोरे सोडा. दुसरीकडे अजिबात जायचं नाही. कारण तिकडच्या लोकांच्या हातात गंडेदोरे बांधून त्यांना गंडवणार. तेव्हा इथेच या मठात राहायचं. काम करून खायचं. फुकटचं नाही. हे गाव तुम्ही सोडूच शकत नाही. तुमचे फोटो आहेत माझ्याकडे. माझा भाऊ पोलिसांत आहे. तो तुम्हाला कुठनही शोधून काढील. काय, आहे का कबूल?’’

‘‘हो डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगाल तसंच वागेन.’’ अण्णा नरमले.

घरी आल्यावर मी त्या सर्वांचं बौद्धिकच घेतलं.

‘‘मोऱ्या, काकूंचं एक राहू दे. पण तुसुद्धा सारासार विचार करू शकला नाहीस? अंधश्रद्धा आणि कर्मकांडामुळे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. गंडेदोरे, अंगारेधुपारे यांनी कुणाचा उद्धार होत नाही. मनात श्रद्धाभाव जरूर असावा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तिवर किंवा शास्त्रज्ञावर आपली श्रद्धा असते. डॉक्टरांनी दिलेलं औषध विश्वासाने घेतलं तरच गुण येतो. सकारात्मक विश्वासाला श्रद्धा म्हटलं तर नकारात्मक विचाराला अंधश्रद्धा म्हणता येईल. स्वा. सावरकर म्हणत, ‘‘श्रद्धा माणसाला प्रगतीपथावर दौडण्याची शक्ती देते व अंधश्रद्धा माणसाच्या बुद्धिला पंगू बनवून एकाच जागी जखडून ठेवते.’’ म्हणूनच बुद्धिचा कस लावून विचार करावा.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें