गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  श्रीखंड

 साहित्य

  • 1 लिटर दूध
  • 2 चमचे दही
  • दिड कप पिठी साखर
  • काजू बदाम पिस्त्याचे काप
  • वेलची पावडर, केशर.

 कृती

सर्वप्रथम 1 लिटर दूध गरम करून कोमट करून घ्यायचं. त्यात दोन चमचे दही एकत्रित करुन विरजनासाठी 7-8 तास ठेऊन द्यायचं. सकाळी दही होण्यासाठी लावलं असेल तर रात्री ते दही एका सूती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. रात्रभर सर्व पाणी निघून जातं आणि मस्त चक्का तयार होतो. चक्का एका टोपात काढून घ्यायचा त्यामध्ये दीड कप पिठीसाखर टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं. काजू, बदामा, पिस्त्याचे पातळ काप,  वेलची पावडर आणि केशर (अर्धा वाटी कोमट दुधामध्ये केशर टाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे छान रंग तयार होतो. ) नंतर एका मोठ्या भांड्यात चक्का काढून घेतला की ते नीट फेटून घ्यायचं. त्यात पिठीसाखर टाकून पुन्हा फेटून घ्यायचं. मग केशर आणि वेलची पावडर टाकून पुन्हा नीट फेटून घ्यायचं. पिठीसाखर आपल्या आवडीप्रमाणे कमी-अधिक घ्यायची. तयार झालेलं श्रीखंड एका डब्यात काढून घ्यायचं आणि त्यावर आपल्या आवडी प्रमाणे काजू, बदाम, पिस्ता काप डेकोरेट करायचे. फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  बासुंदी

 साहित्य

  • 2 लिटर दूध
  • दिड कप साखर
  • सुकामेवा, केशर, वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध मंद आचेवर गरम करत ठेवायचं. दुधावरची साय येताच ती बाजूला काढून ठेवायची. यामध्येच केशराच्या काड्या भिजत ठेवायच्या. साधारणपणे दूध निम्मं झाल्यावर त्यामध्ये साखर विरघळऊन घ्यायची. आच बंद करुन घट्ट झालेल्या दुधात केशरमिश्रित साय, सुकामेव्याची जाडसर भरड आणि वेलची एकत्रित करून घ्यावी. नंतर फ्रिजमध्ये ठेऊन द्यावी. ही बासुंदी जेवढी घट्ट आणि मुरेल तेवढी अधिक चवदार होईल. सुकामेव्याच्या भरडीमुळे बासुंदी दाट होते. गरमागरम पुरीसोबत तसंच जिलेबी सोबत अधिक आस्वाद घेता येतो.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  खीर

तांदळाची खीर

 साहित्य

  • 1 वाटी बासमती तांदूळ
  • 1 लिटर दूध
  • 1 वाटी साखर
  • काजू, बदाम, पिस्ते, मनुका, केशर, वेलची पावडर
  • 2 चमचे तूप.

 कृती

एक वाटी बासमती तांदूळ (इतर कोणतेही घेऊ शकतो ) स्वच्छ धुवून अर्धा तास  पाण्यात भिजवायचे मग त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकून ते कणीदार जाडसर वाटून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवावे. त्या दुधाला एक उकळी आली कि वाटलेले तांदूळ त्यात घालून सतत ढवळत राहावे ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. तांदूळ मऊ होऊ लागल्यावर त्यात आवडीनुसार साखर घालावी व ढवळत राहावे. भात पूर्ण मऊ झाला कि गॅस बंद करून त्यात वेलची-जायफळ पूड घालावी. केशर टाकावं. काजू ,बदाम, पिस्त्याचे पातळ काप एकत्रित करावे. शेवटी 2 चमचे तूप पसरावं. ही खीर गरम किंवा थंड कशीही छान लागते .

# टीप: तांदळाची खीर जसजशी थंड होते तशी ती सुकत जाते घट्ट होत जाते , त्यामुळे आपण त्यात सोयीनुसार गरम किंवा थंड दूध घालून  पुन्हा थोडी पातळ करून सर्व्ह करू शकतो.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  आमरस

 साहित्य

  • 3 हापूस वा रायवळ आंबे
  • अर्धा कप घट्ट साईचं दूध
  • वेलची पावडर.

कृती

3 हापूस आंब्यांचा रस काढून घ्यावा. रस मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप घट्ट साईचं दूध आणि वेलची पावडर एकत्रित करून घ्यावं. शक्यतो साखर वापरू नये. आवडतं असल्यास साखर आणि थोडंसं तूप घ्यावं. गरमागरम पुरीसोबत वा पुरणपोळी सोबत आस्वाद घ्यावा.

गुढीपाडवा

* नम्रता विजय पवार

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रात मराठी नववर्षाचं स्वागत पारंपारिक पद्धतीने साजरं केलं जातं. दारोदारी रांगोळ्या काढून, दारी तोरण लावून, गुढी उभारून, नवीन कपडे तसंच गोडाधोडाचा स्वयंपाक करून,एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गुढीपाडवा साजरा केला जातो.

निसर्ग आणि गुढी

मराठी चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. याच सुमारास पानगळ संपून झाडांना नवीन पालवी फुटते. म्हणूनच चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो. भर उन्हात हि हिरवीगार झाडे मनाला थंडावा देतात.

यादिवशी विजयाचं प्रतीक म्हणून दारोदारी गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याची प्रथा अतिशय प्राचीन आहे. गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा कळकाची काठी कोमट पाण्याने स्वच्छ करून या काठीला सर्वप्रथम चंदनाचा लेप आणि हळदीकुंकू लावले जाते. काठीच्या वरच्या बाजूस नवीन वस्त्र, चाफाच्या फुलांचा हार, साखरेची माळ, कडुलिंबाची पाने आणि चांदी वा तांब्याचा गडू उपडा ठेवला जातो.

मागील वर्षाच्या कटू आठवणी संपवून नवीन वर्षाची सुरुवात गोडाने केली जाते. संध्याकाळी गुढीची पूजा करून ती उतरवली जाते.

परंपरा आणि पोशाख

गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो. नववर्षाची सुरुवात दाराला आंब्याच्या पानांचे तोरण, रांगोळी काढून, गुढी उभारून, नवीन पारंपारिक पोशाख घालून तसंच घरी पारंपारिक पदार्थ बनवून केली जाते. यादिवशी घरातील पुरुष धोतर-कुर्ता, सदरा-लेंगा, कुर्ता-पायजमा परिधान करतात तर स्त्रिया पारंपरिक नऊवारी साडी, खण साडी, पैठणी परिधान करतात. घरातील लहान मुली खास खणाचे, काठपदराचे परकर पोलके घालतात. पारंपारिक दागिने, हिरव्या तसंच सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, गोठ, तोडे, बाजूबंद, हार, बोरमाळ, ठुशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाकात पारंपरिक नथदेखील घालतात.

गुढीपाडवा आणि शोभायात्रा

आपल्या देशातील सण हे नेहमीच सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्रित आणण्याचं काम करतात. त्यात मराठी माणसे विशेष उत्सवप्रिय आहेत. सण सोबत मिळून साजरे करण्यात त्यांना विशेष आनंद मिळतो. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशातदेखील साजरा केला जातो. परंतु महाराष्ट्रात या सणाचे खास आकर्षण असते ते म्हणजे शोभायात्रा. संपूर्ण महाराष्ट्रभर यादिवशी शोभायात्रांचं आयोजन केल जातं. यामध्ये कोणत्याही राजकीय हस्तक्षेप नसतो. सर्वसामान्य माणसं उत्साहाने या शोभायात्रांचं आयोजन करतात. विविध सामाजिक,शैक्षणिक देखावे उभारून जनजागृती केली जाते.

या शोभायात्रांमध्ये तरुणाई सर्वाधिक संख्येने सहभागी होते. अनेक तरुणी खास पारंपारिक म्हणजेच नऊवारी, पैठणी, खण साड्या, पारंपारिक दागिने, डोक्यावर फेटा बांधून, गॉगल लावून मोटार बाईक वरून या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. तर तरुण मुले कुर्ता पायजमा आणि फेटे परिधान करून सहभागी होतात. केशरी फेट्यांसोबतच काठपदर आणि बांधणी फेटेदेखील परिधान केले जातात. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरांमध्ये या शोभायात्रा काढल्या जातात. मुंबईतील गिरगाव, लालबाग, परेल, दादर तर ठाणे, डोंबिवली, बदलापूर सारख्या ठिकाणी या शोभायात्रा पहायला विशेष गर्दी होते. सामाजिक संदेश आणि पारंपारिक वेशातील तरुण तरुणी या शोभायात्रेतील विशेष आकर्षण असतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें