जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

* नम्रता पवार

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे. त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात टिझर आणि ट्रेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. ‘जारण’चा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होत असून त्याला अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यात आता या प्रमोशनल साँगने उत्कंठा वाढवली आहे.

सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे. गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाची संकल्पना अधिकच स्पष्ट होत असून कथानकातील अस्वस्थ करणारी आणि विचारप्रवृत्त करणारी बाजू यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे.

निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या गाण्यातून आम्ही ‘जारण’ची भीतीदायक आणि सोबतच भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, गायन आणि व्हिज्युअल्स यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. चित्रपटाचा मूड आणि आशय या एका गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होत आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले या गाण्यात पाहायला मिळत आहेत. या दोघी उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच याव्यतिरिक्त त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे मैत्रीखातर त्यांनी या प्रमोशनल गाण्यात सहभाग घेऊन मला व चित्रपटाच्या पूर्ण टीमला सहकार्य केले.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, “ ‘जारण’चे प्रमोशनल साँग तयार करताना चित्रपटाचा मूड लक्षात घेऊनच हे गाणे करायचे होते. चित्रपटाची संकल्पना कुठेही विस्कळीत होणार नाही याची काळजी घायची होती. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते. प्रत्येक मूड, ताल, आवाज यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. अर्थात हे सगळे गायक, गीतकार यांच्या साथीनेच झाले. हे गाणे कमाल बनले असून प्रेक्षकांना ते नक्की भावेल. ”

या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. ते सतत लूपमध्ये ऐकत राहावसे वाटते. अतिशय भन्नाट गाणे आहे. मला खूप आनंद आहे, या चित्रपटाची जोडले गेले आहे.

अमोल भगत माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती करतोय, तर त्याच्या चित्रपटात आपले काहीतरी योगदान असले पाहिजे, असे मनात होतेच आणि ही संधी समोरून चालून आली. त्यामुळे मी त्याला त्वरीत होकार दिला. त्यात हे गाणे मला स्वत:ला खूप आवडल्याने ते करतानाही मजा आली. कोरिओग्राफी खूप कमाल आहे. सगळेच अप्रतिम आहे. शिवाय सोबत भार्गवी आहे. खूप वर्षांनी एकत्र काम करत आहोत. आवडती माणसं असल्याने काम करताना खूप मजा आली.’’

भार्गवी चिरमुले आपल्या अनुभवाबद्दल म्हणते, ‘’ माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे.  चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे. जबरदस्त कथा, अभिनय यांचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात येईलच. परंतु या प्रमोशनल साँगचा भाग झाल्याचा माझा अनुभव खूपच छान होता. यासाठी अमोलचं मनापासून आभार.’’

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

 

 

 

यशराज फिल्म्सकडून मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चा टीझर प्रदर्शित

* सोमा घोष

यशराज फिल्म्स (YRF) आणि प्रेमकथांचे बादशाह मोहित सूरी यांचं पहिलंवहिलं सहकार्य असलेली ‘सैयारा’ ही बहुप्रतीक्षित रोमँटिक चित्रपट आज टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

टीझर पहा:

या चित्रपटामधून यशराज फिल्म्स अहान पांडेला हिंदी सिनेमात लॉन्च करत आहे, तर त्याच्या जोडीला आहे अनीत पड्डा, जिने वेब सिरीज बिग गर्ल्स डोंट क्राईमधून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

टीझरमध्ये ‘सैयारा’ या शीर्षकाचा अर्थ समजावून सांगण्यात आला आहे. ‘सैयारा’ म्हणजे एखादं भटकतं आकाशीय पिंड. पण काव्यांमध्ये याचा उपयोग एखाद्या तेजस्वी, स्वप्नवत, आणि अप्राप्य व्यक्ती किंवा गोष्टीसाठी केला जातो—एक असं चमकदार तारा, जो नेहमी दिशा दाखवतो पण कधीही पूर्णपणे जवळ येत नाही.

मोहित सूरी, ज्यांचं सिनेमातलं २० वं वर्ष चालू आहे, याआधी आशिकी 2, मलंग, आणि एक विलन यांसारख्या लोकप्रिय प्रेमकथा दिग्दर्शित केल्या आहेत. त्याचप्रमाणे, वायआरएफ च्या ५० वर्षांच्या प्रवासात यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी हिंदी सिनेमाला अनेक अमर प्रेमकथा दिल्या आहेत.

‘सैयारा’ १८ जुलै २०२५ रोजी जगभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित

* नम्रता पवार

उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच नुकतेच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे. ‘मन जाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.

कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची जाईशी होणारी घट्ट मैत्री यात दाखवण्यात आली आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ हा एक चित्रपट नाही तर ९० च्या दशकातील प्रत्येकाच्या बालपणाची नाजूक आठवण आहे. आम्ही प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील गोड क्षण पुन्हा अनुभवता यावेत. प्रदर्शित झालेले गाणे हे त्या बालमैत्रीचे आणि नकळत्या वयातील भावनांचे प्रतिबिंब आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आपल्या बालमित्रांची आठवणी नक्की येईल.”

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात,” या गाण्यातून आम्ही त्या निष्पाप भावनांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या वयात मैत्री आणि प्रेम यामधील रेषा फारच धूसर असतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई यांची मैत्री आणि त्यातून नकळत फुलणारी भावना ही प्रत्येकाने अनुभवलेली असते. या गाण्यातून प्रेक्षकवर्ग त्यांचे स्वतःचे बालपण नक्कीच अनुभवतील. ९० व्या दशकाची ही गोड सफर प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

 

रितेश देशमुखने ‘पीएसआय अर्जुन’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या !

* नम्रता पवार

मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्या आगामी ‘पीएसआय अर्जुन’ या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. दोन वर्षांनंतर, अंकुश ‘पद्यावर झलकताना’ नंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याच्या देखण्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘पी.एस.आय.’ स्टाईल आयकॉन ज्याने तिच्या आकर्षक लूकमुळे इंटरनेटवर धुमाकूळ घातला. पोस्टर पाहिल्यानंतर अर्जुनच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

विशेषतः, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना रितेश देशमुखने आपल्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुख किंवा विशेष पथिमबायन हा सर्वांचे लक्ष वेधून घेईल कारण त्याला किंवा नव्या प्रवासाला तो आवडेल आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून मिळणारा उत्साही प्रतिसाद पाहून, ‘पीएसआय अर्जुन’ आधीच पडद्यावर हिट होण्याच्या मार्गावर आहे.

‘पी.एस.आय.’ विस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमवीव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘अर्जुन’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण पटेल दिग्दर्शित या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम शंकर आणि ध्रुव दास करत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं जबरदस्त महारॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

  • सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांत अनेक नामवंत, दिग्गजही आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसनं यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. नवं पर्व म्हटलं की काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं महारॅप सॉंग हे गुपित आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गायक (रॅपर) सुजय जाधव उर्फ सुजय जिब्रीश यांनी हे महारॅप सॉंग गायलं आहे. संगीत-दिग्दर्शक अनिरुद्ध निमकर यांनी हे महारॅप सॉंग संगीतबद्ध केलं आहे. चल तुला दाखवतो जत्रा असे या महारॅप सॉंगचे शब्द आहेत. या महारॅप सॉंगमध्ये महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतले सगळे कलाकार असणार आहेत.

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची वेळ आता खास रात्री 9 वाजता करण्यात आलेली आहे. जबरदस्त रॅप गाणं प्रदर्शित करत ‘सोनी मराठी वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आयुष्यात मॅटर आहेत सतरा, काही टेन्शन नाही मित्रा, सगळ्यावरची एकच मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा…! अशा ओळी या रॅपच्या आहेत. हास्यजत्रेच्या नव्या रॅपसाँगमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, श्रमेश बेटकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, श्याम राजपूत, प्रथमेश शिवलकर, दत्तू मोरे, ईशा डे, चेतना भट, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने हे कलाकार आहेत. याशिवाय निवेदिका प्राजक्ता माळी, परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हेही या रॅप साँगमध्येमध्ये सहभागी आहेत. हे गाणे पाहण्यासाठी सोनी मराठी पाहत राहा अथवा सोनी मराठी वाहिनीच्या युटयूब पेजवर पाहता येईल.

सोशल मीडिया म्हेणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राची हास्यजत्रा रात्री ९ वाजता आपल्या भेटीला येत आहे… तर पाहायला विसरू नका…

महाराष्ट्राची हास्यजत्रा ३१ मार्च पासून सोमवार ते बुधवार, रात्री ९ वाजता… फक्त सोनी मराठी वाहिनीवर…!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाचं जबरदस्त महारॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला…

महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाची वेळही बदलली…!

विशाल फुरियाची ‘छोरी 2’ पुन्हा भयपटाचा थरार आणणार!

भारतीय भयपट आणि थरारपटांच्या विश्वात दिग्दर्शक विशाल फुरियाने गेल्या दशकभरात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीत ‘लपाछपी’ या भयपटाने प्रवास सुरू करणाऱ्या विशालने बॉलिवूडमध्ये ‘छोरी’ आणि ‘फॉरेन्सिक’सारख्या दमदार चित्रपटांद्वारे आपली ओळख निर्माण केली. आता तो ‘छोरी 2’ घेऊन परतला आहे. नुशरत भरुचा आणि सोहा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या भयपट प्रकाराला एक नवे वळण देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

विशाल यांचे भयपटप्रेम लहानपणापासूनच रुजले आहे. त्याला या शैलीची भीती वाटायची, पण हळूहळू त्याचाच मोह वाढत गेला. त्याच्या मते, ‘ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट’ हा पहिलाच चित्रपट होता, ज्याने त्याला चांगलेच हादरवले. “फ्रेडी या पात्राने मला एवढं घाबरवलं की तो स्वप्नात अडकवेल या भीतीने मी झोपायलाच तयार नव्हतो!” तो आठवतो.

‘छोरी 2’ मध्ये साक्षी (नुशरत भरुचा) ही आता एका 7 वर्षांच्या मुलीची आई आहे. पण जेव्हा तिच्या मुलीचे अपहरण होऊन तिला त्या जुन्या शेतात नेले जाते, तेव्हा ती पुन्हा एका भयावह जगात सापडते. विशालने या चित्रपटात अशा वातावरणाची निर्मिती केली आहे, जी प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटभर अस्वस्थ ठेवेल—गुंतागुंतीच्या बोगद्यांपासून, विहिरींपर्यंत आणि जुन्या पडक्या घरांपर्यंत!

 

बॉलिवूडमध्ये भयपट हा बहुतांश वेळा अतिरंजित आणि ठराविक फॉर्म्युल्यांमध्ये अडकलेला राहिला आहे. त्यामुळे या प्रकाराला फारसा दर्जा मिळाला नाही. मात्र, टिम बर्टन, गिलेरमो डेल टोरो, जॉर्डन पील, ताकाशी मिके, एम. नाईट श्यामलन आणि एरी एस्टर यांसारख्या जागतिक दिग्दर्शकांपासून प्रेरणा घेणाऱ्या विशालला हा प्रकार पुन्हा प्रतिष्ठित करायचा आहे. “बॉलिवूडमधला भयपट हा जास्त करून मसालेदार आणि बी-ग्रेड टॅग असलेला राहिला आहे. मी भारतीय भयपटाला क्लासिक हॉररच्या दर्जावर नेण्याचा प्रयत्न करतो आहे. या प्रकारात प्रेक्षकांना भीती, थरार, रक्तपात, तसेच सहानुभूती आणि प्रेमाची जाणीव करून देण्याची ताकद आहे,” असे तो सांगतो.

विशालच्या मते, एक चांगला भयपट असा असतो जो क्रेडिट्स संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात राहतो. त्याचा ‘छोरी’ चित्रपट हा सामाजिक भीतीचा (सोशल हॉरर) प्रकार असून, तो सामाजिक विषमता आणि अन्याय यांसारख्या मुद्द्यांना स्पर्श करतो. “मी भयपटाचा उपयोग सामाजिक समस्या मांडण्यासाठी केला आहे. ‘छोरी’मध्ये भीती, गूढता, रक्तपात आणि भयशास्त्र यांचा वापर करून सामाजिक प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न केला आहे,” तो सांगतो.

आता विशाल विविध भयपट उपशैलींमध्ये काम करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला फक्त भारतीय संस्कृतीशी निगडित किंवा भारतीय कथा सांगायच्या आहेत. ‘छोरी 2’ प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज असतानाच, तो आपला पुढचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘माँ’वर काम करत आहे. काजोल मुख्य भूमिकेत असलेला हा पौराणिक भयपट अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेखाली तयार होत आहे. जूनमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी फारशी माहिती जाहीर झालेली नसली, तरी हा चित्रपट बॉलिवूडच्या भयपट प्रकाराला नवे परिमाण देईल, अशी अपेक्षा आहे.

‘एप्रिल मे ९९’चा टीझर शेअर करत रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

* नम्रता पवार

लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी १६ मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात दिसतेय. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आता टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘एप्रिल मे ९९’  या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. आता टिझर लाँच रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांसाठी काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांची एनर्जी आपल्याला ऊर्जा देते. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग होणे, ही आनंदाची बाब आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांचे पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिकच खास झाला आहे.’’

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच नॉस्टेल्जिक बनवेल. तरूणाईलाही तितकाच भावेल. खूप हलकीफुलकी कथा आहे, जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल.’’

 

 

 

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न

* नम्रता पवार

अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर यांच्याही प्रमुख भूमिका यात आहेत. चित्रपटाच्या यशस्वी समारोपानंतर कलाकार आणि निर्मात्यांनी या चित्रपटाविषयीचा आपला उत्साह व्यक्त केला.

चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. विशेष म्हणजे लोकशाही समूह अंतर्गत असलेले ईओडी मीडिया कंपनीचे संचालक पुष्कर यावलकर यांनी एव्हीकेसोबत हातमिळवणी करत मराठी चित्रपट निर्मितीक्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी निर्माता म्हणून ‘ पुन्हा एकदा साडे मेड तीन’ मध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली आहे.

अमेय विनोद खोपकर पिक्चर्स (एव्हीके), उदाहरणार्थ निर्मित, प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत.

दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात, “या चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग होणे खूप खास आहे. नुकतेच चित्रीकरण संपले असून चित्रीकरणाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता आणि कलाकार व निर्मात्यांच्या मेहनतीने हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल. प्रेक्षकांना ही नवी धमाल नक्कीच आवडेल.”

निर्माते पुष्कर यावलकर म्हणतात, “अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. नुकतेच चित्रपटाचे शुटिंग संपन्न झाले असून या सगळ्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप कमाल होता. चित्रपट निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवणे हा माझ्यासाठी एक मोठा प्रवास होता आणि तो या टीमसोबत खूप सुखकर झाला. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सारख्या चित्रपटाचा भाग होणे, ही आनंदाची गोष्ट आहे.

शर्वरी झाली स्प्राईटची महिला ब्रँड अॅम्बेसेडर!

* सोमा घोष

स्प्राईट इंडियाने अधिकृत घोषणा केली आहे की बॉलिवूडची नवी आणि दमदार अभिनेत्री शर्वरी आता त्यांच्या ब्रँडची नवी ब्रँड अॅम्बेसेडर असेल! आपल्या सहजसोप्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्वरी स्प्राईटच्या फ्रेश, यंग आणि कूल अटिट्यूडची परिपूर्ण प्रतिमा आहे.

अतिशय प्रतिभावान अशी शर्वरी ही आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. 100 कोटींचा ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’, जागतिक स्तरावर हिट ठरलेला ‘महाराज’, आणि दमदार अॅक्शन-थ्रिलर ‘वेदा’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. आणि आता स्प्राईटच्या ‘स्प्राईट, थंड रख ’ या नवीन मोहिमेसाठी तिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले आहे.

स्प्राईट हा ब्रँड नेहमीच आपल्या फ्रेश आणि विनोदी संवादशैलीद्वारे ग्राहकांशी कनेक्ट होत आला आहे. त्यामुळेच या पिढीतील सर्वाधिक कनेक्ट होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शर्वरीला या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे. या नवीन कॅम्पेनच्या माध्यमातून स्प्राईट ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत कूल राहण्याचा संदेश देत आहे!

ब्रिटनची रेल्वे आणि यशराज फिल्म्स एकत्र; प्रेमाच्या एकत्रित शक्तीचा उत्सव साजरा करणार!

* सोमा घोष

२०२५ मध्ये आधुनिक रेल्वेच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स (YRF) एकत्र येत आहेत. रेलवे 200 या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला जात आहे.

योगायोग असा की, २०२५ मध्ये वायआरएफच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) याच्या ३० व्या वर्षाचा मोठ्या दिमाखात उत्सव साजरा केला जाणार आहे. हा चित्रपट भारत, भारतीय आणि संपूर्ण दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी एक पॉप कल्चर माईलस्टोन आहे. डीडीएलजेच्या अनेक दृश्यांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये झाले होते, ज्यामध्ये किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवरील आयकॉनिक सीनदेखील समाविष्ट आहे. याच ठिकाणी शाहरुख खान आणि काजोल यांचे पात्र प्रथम भेटतात आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होते.

ब्रिटनची रेल्वे आणि वायआरएफ यांनी रेल्वे प्रवासातील रोमान्सला समर्पित करत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांच्या सांस्कृतिक सहकार्याची घोषणा केली आहे. सध्या वायआरएफ कम फॉल इन लव  – द  डीडीएलजे म्यूजिकल (CFIL) या डीडीएलजे च्या म्युझिकल अ‍ॅडॅप्टेशनची स निर्मिती करत आहे. या म्युझिकलचा प्रीमियर २९ मे २०२५ रोजी मँचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये होणार आहे आणि तो २१ जून २०२५ पर्यंत चालणार आहे.

ब्रिटनची रेल्वे आणि वायआरएफ एकत्र येऊन कम फॉल इन लव  – द  डीडीएलजे म्यूजिकलच्या माध्यमातून संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाचा उत्सव साजरा करतील. यासाठी मँचेस्टर आणि लंडनच्या प्रमुख रेल्वे स्टेशनवर खास इमर्सिव्ह अ‍ॅक्टिव्हेशन्स आयोजित केले जातील.

कम फॉल इन लव  – द  डीडीएलजे म्यूजिकल या इंग्रजी संगीत नाटकाचे दिग्दर्शन डीडीएलजे चे मूळ दिग्दर्शक आदित्य चोप्रा करत आहेत. ही कथा एका ब्रिटिश-भारतीय मुलीची आहे, जिला तिच्या कुटुंबाने भारतातील एका मित्रासोबत लग्न करण्यास सांगितले आहे. मात्र, परिस्थिती तेव्हा बदलते जेव्हा ती रॉजर नावाच्या एका ब्रिटिश तरुणाच्या प्रेमात पडते.

या भव्य निर्मितीमध्ये एकूण १८ नवीन इंग्रजी गाण्यांचा समावेश आहे. संगीतातील पूर्व-पश्चिम संगम दिसून येतो, कारण संगीत विशाल-शेखर यांनी दिले आहे, तर गीतलेखन आणि कथा नेल बेंजामिन (मीन गर्ल्स, लीगली ब्लॉन्ड) यांनी लिहिली आहे.

क्रिएटिव्ह टीममध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आहेत – नृत्यदिग्दर्शक रॉब अशफोर्ड (डिज्नीचा  फ्रोजन), भारतीय नृत्यांसाठी सह-नृत्यदिग्दर्शक श्रुती मर्चंट (ताज एक्सप्रेस ), सेट डिझायनर डेरेक मॅकलेन (मौलिन रूज! द म्यूजिकल), आणि कास्टिंग डिरेक्टर डेव्हिड ग्रिनड्रॉड यांचा समावेश आहे.

डीडीएलजे हा भारतीय सिनेमाचा सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे आणि तो १९९५ पासून आजतागायत मुंबईत सलग प्रदर्शित होत आहे.

रेल्वे २००च्या कार्यकारी संचालिका सुझान डोनेली म्हणतात, “आम्ही यशराज फिल्म्ससोबत भागीदारी करत आहोत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. रेल्वेने नेहमीच चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा दिली आहे आणि जगभरातील संस्कृती जोडण्याचे काम केले आहे. यंदाच्या द्विशतक महोत्सवाच्या निमित्ताने, या आयकॉनिक रेल्वे-आधारित बॉलिवूड ब्लॉकबस्टरच्या ३०व्या वर्धापन दिनाचा आणि याच्या नवीन इंग्रजी म्युझिकलच्या युके प्रीमियरचा एकत्रित उत्सव साजरा करण्याची ही सुवर्णसंधी आहे.”

यशराज फिल्म्सचे सीइओ अक्षय विधानी म्हणाले, “रेल्वेच्या २०० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ब्रिटनच्या रेल्वेसोबत सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो. वायआरएफने नेहमीच भारतीय मुळं जपत जागतिक पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या कथा सांगण्यावर भर दिला आहे आणि डीडीएलजे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. डीडीएलजेच्या ३० व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही या आयकॉनिक चित्रपटाच्या स्टेज अडॅप्टेशनला युकेमध्ये आणत आहोत! आमच्या म्युझिकलचा प्रीमियर २९ मे रोजी मँचेस्टर ओपेरा हाऊस येथे होणार आहे. डीडीएलजेचा सर्वात आयकॉनिक सीन किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवर शूट करण्यात आला होता आणि तो कम फॉल इन लवमध्ये देखील समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे रेलवे 200 सोबत भागीदारी करण्यासाठी हा एक परिपूर्ण क्षण आहे. एकत्र येऊन आम्ही प्रेमाच्या एकत्रित शक्तीचा संदेश देऊ इच्छितो आणि विविधता व समावेशकता यांचे महत्त्व अधोरेखित करू इच्छितो.”

२०२५ मध्ये डीडीएलजेची जादू पुन्हा एकदा परदेशी प्रेक्षकांसाठी खुलणार आहे, आणि या सांस्कृतिक सहकार्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रेम आणि कलेचा एक नवा सोहळा रंगणार आहे!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें