मूठभर जमीन ओंजळभर आकाश

कथा * ऋतु गुप्ते

फरहा पाच वर्षांनंतर आपल्या गावी परतून आली होती. विमानातून उतरताना तिने एक दीर्घ श्वास घेतला. जणू गेल्या पाच वर्षांतलं सगळं आयुष्य ती एकाच श्वासात जगून घेणार होती. पाच वर्षांत विमानतळाचा पूर्णपणे कायाकल्प झाला होता. बाहेर येताच तिने टॅक्सी केली अन् ड्रायव्हरला घराचा पत्ता सांगितला. तिच्या वडिलांचं घर हिंदपीढी भागात होतं.

पाच वर्षांत शहरात बराच बदल झाला होता. ते बघून फरहाला बरं वाटलं. वाटेत मल्टिफ्लेक्स अन् मॉलही दिसले. रस्ते पूर्वीपेक्षा रुंद अन् स्वच्छ वाटत होते. जीन्स टीशर्ट, स्कर्ट अन् टॉप घातलेल्या मुली बघून तिला सुखद आश्चर्य वाटलं. किती बदललंय हे शहर?

तिचा मुलगा रेहान टॅक्सीत बसताच झोपी गेला होता. फरहाने पण पाय थोडे पसरून सीटवरच स्वत:ला थोडं आरामशीर केलं. ऑस्ट्रेलियातून विमानं बदलत दिल्ली अन् आता तिथून टॅक्सीने आपल्या घरी. एवढ्या लांबलचक विमानप्रवासाने अंग आंबून गेलं होतं. आठवड्यापूर्वीच तिचे अब्बू रिटायर झाले होते. आता परत मूळ शहरात येऊन त्यांना इथे सेटल व्हायचं होतं. त्याच्या मदतीसाठीच फरहा काही दिवस त्यांच्याजवळ राहाणार होती. नव्या ठिकाणी, मग ते आपलं मूळ गाव का असेना, स्थायी होताना अनेक गोष्टींना सामोरं जावंच लागतं.

अचानक टॅक्सीवाल्याने ब्रेक दाबला. दचकून फरहा भानावर आली. तिची टॅक्सी हिंदपीढी भागात प्रवेश करत होती. रस्ते अत्यंत दयनीय परिस्थितीत होते. टॅक्सी डोलबाईडोल करत होती. सहज तिने खिडकीची काच खाली केली अन् भस्सकन् घाणीचा झोत अंगावर आला. पटकन् तिने काच बंद केली. शहराची प्रगती अजून या भागात पोहोचलीच नव्हती. रस्ते अजूनच अरुंद अन् गलिच्छ वाटत होते. अधूनमधून तयार झालेली घरं कुत्र्याच्या छत्र्या उगाव्यात तशी दिसत होती. तिच्या अब्बांचं दोन मजली घर मात्र तसंच दिमाखात उभं होतं.

अम्मी अन् अब्बू घराच्या बाहेरच तिची वाट बघत उभे होते.

‘‘अगं, अजूनही तुझा फोन बंद आहे…राकेश कधीचा काळजी करतोए, तू पोहोचलीस की नाहीस म्हणून?’’ अब्बूंनी तिला म्हटलं. त्यांना त्यांच्या जावयाचा प्रचंड अभिमान होता.

फरहाला जाणवलं बंद दारंखिडक्यांच्या फटीतून किती तरी डोळे तिच्याकडे बघाताहेत.

फ्रेश होऊन आरामत बसत फरहाने चहाचा कप हातात घेतला अन् ती अब्बूचं घर, त्यांची आळी व इतर गोष्टींचं निरीक्षण करू लागली.

सलमा नावाची विशीतली एक मुलगी भराभर घरकाम आवरत होती.

‘‘अब्बू कसं वाटतंय आपल्या घरात आल्यावर? अम्मी मात्र मला खूपच थकल्यासारखं वाटतेय. मागच्या वर्षी आमच्याकडे सिडनीला आली होती तेव्हा छान दिसत होती.’’

एक दीर्घ श्वास घेऊन अब्बू विषण्णपणे म्हणाले, ‘‘इथलं काहीही बदललेलं नाही. फक्त प्रत्येक घरात मुलं खूप वाढलीत. गल्लीत टवाळ पोरं जास्त दिसतात, मुली अजूनही जुन्या विचारांच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या आहेत. मात्र तुझ्या लग्नाची गोष्ट आता लोक विसरले आहेत.’’

फरहाने आतल्या खोलीत डोकावून बघितलं. तिची अम्मी अन् अम्मीचा नातू मजेत खेळत होते.

‘‘अब्बू, मला ना, फार भीती वाटत होती मोहल्ल्यातली, जवळपासची माणसं तुमच्याशी नीट वागतील ना? त्रास देऊन, अपमान करून छळणार तर नाहीत ना? त्या काळजीपोटीच मी आत्ता आलेय. आठ-दहा दिवसांत राकेशही येणार आहेत.’’

काही क्षण शांततेत गेले. मग ती अब्बूंजवळ येऊन बसली. ‘‘फूफी (आत्या) कशी आहे?’’

‘‘सोड गं, जे झालं ते झालं. तू आता विश्रांती घे. प्रवासाने दमली असशील.’’ अब्बू तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.

आतल्या खोलीत अम्मी रेहानला जवळ घेऊन पडली होती. तीही अम्मी शेजारी जाऊन आडवी झाली. दमली होती ती पण झोप लागेना. खोलीत चारी बाजूंनी जणू आठवणीचं पेव फुटलं होतं. चांगल्या आठवणी मनाला दिलासा देत होत्या, तर वाईट आठवणींनी मन रक्तबंबाळ होत होतं.

अब्बा सरकारी नोकरीत उच्च पदावर होते. काही वर्षांत त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली व्हायची. फरहाला त्यामुळे लहान वयातच हॉस्टेलला राहावं लागलं. अब्बू तिच्या शिक्षणाच्या बाबतीत फार दक्ष होते. अम्मी मुळातच नाजूक प्रवृत्तीची होती. तिला फार श्रम झेपत नव्हते. पण अम्मी अब्बूंचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. अब्बा जेव्हा पाटण्याला होते तेव्हा फूफी त्यांच्याकडे राहायला आली होती. तो प्रशस्त बंगला, सुंदर बाग, दिमतीला असणारी खानसामा, माळी, धोबी व इतर गडी माणसं, सरकारी गाड्या, अब्बांचा आदरयुक्त दरारा हे सगळं बघून ती भारावली. तिनं अब्बांचा दुसरा निकाह करण्याचा घाट घातला. ‘‘तुला मुलगा नाही. ही आजारी बायको तुला मुलगा देऊ शकणार नाही. तू दुसरं लग्न कर.’’ तिने अम्मीच्या समोरच अब्बांना सांगितलं तिच्या नात्यातली कोणी नणंद होती. इतर नातलगही फूफीच्याच बाजूचे होते. फार हिमतीनं अब्बूंनी हा प्रसंग निभावून नेला होता. फरहा मोठी झाल्यानंतर केव्हा तरी अम्मीनं हे सगळं तिला सांगितलं होतं. शिकलेल्या अब्बांना जुन्या रूढी आवडत नव्हत्या.

त्यामुळेच फरहाच्या घरातलं वातावरण इतर नातलगांच्या घरापेक्षा वेगळं होतं. अब्बू प्रगतिशील विचारांचे होते. ती एकटीच मुलगी होती तरी त्यांनी तिला उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली होती. तिच्या चुलत, मामे, आते, मावस बहिणीची लग्नं खूपच लवकर झाली. तिच्यापेक्षा धाकट्या बहिणींची लग्न झाली तरी फरहा शिकत होती. ती इंजिनीअर झाल्यावर तिला अब्बूंनी मॅनेजमेंटच्या पदवीला घातलं होतं.

ती इंजिनीअरिंगच्या फायनलला असतानाच एकदा फूफी घरी आली होती. आल्या आल्या तिने अम्मीला फैलावर घेतलं. लेकीचं वय वाढतंय अन् अजून तुम्ही तिच्या लग्नाचं बघत नाहीए. ‘‘भाभीजान मी सांगते तुम्हाला, फरहाला इतकं वय वाढेतो कुवार ठेवलीत, आता तिला मुलगा मिळणारच नाही. आता ओळखीत, नात्यात कुणी मुलगा लग्नाचा उरला नाहीए. भाईजाननाही काही कळत नाही. मुलींना एवढं शिकवायची गरजच काय मी म्हणते? मुलींची लग्न करायला हवीत. माझाच मुलगा आहे लग्नाचा. तुम्ही बघितलात ना? कसा गोरापान आहे. दुबईत पैसा मिळवतोए. फरहानची अन् त्याची जोडी चांगली दिसेल.’’

अम्मी बिचारी नातलगांच्या गराड्यात तशीच भरडून निघायची अन् फूफीच्या ओरडण्यामुळे तिचं बी.पी. अजूनच वाढलं. पण अब्बूंनी हे सगळं ऐकलं आणि फूफीला चांगलंच झापलं.

‘‘रझिया, तू काय विवाह मंडळ चालवतेस की काय? आधी माझ्या लग्नासाठी. आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी सतत स्थळं आणतेस ती? अगं आपल्या लाडक्या पोरांची काळजी घेतली असतीस तर तुझ्या पोराला दुबईत पेट्रोलपंपावर नोकरी नसती करावी लागली. फरहाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिचं लग्न होणार नाही.’’

बरेच दिवस मुक्काम?ठोकण्याच्या बेताने आलेली फूफी त्याच दिवशी गाशा गुंडाळून निघून गेली.

अशीच विचारात असताना फरहाला केव्हातरी झोप लागली. सकाळी जाग आली. सकाळी सलमाने विचारलं, ‘‘फरहा बाजी. झोप झाली का? चहा आणू?’’ सलमाने चहा आणला अन् तिच्याजवळच बसली. ती खूप लक्षपूर्वक फरहाकडे बघत होती.

‘‘बाजी, तुम्ही आता कुंकू लावता? रोजे ठेवता की नाही? तुमचं नावंही बदललंय का?’’ निरागसपणे सलमाने विचारलं.

‘‘नाही…काल मी काम करून जात होते ना तेव्हा आपल्या मोहोल्ल्यातली माणसं मला विचारत होती. तुम्ही काफिरशी लग्नं केलंत ना?’’

अब्बूने फूफीला परत पाठवलं तरी प्रश्न सुटला नव्हताच. रोजच तिचं शिक्षण आणि वाढतं वय यावर चर्चा व्हायच्या. अब्बूंनी तर हल्ली या घरी येणंही कमीच केलं होतं. भारतातल्या बेस्ट कॉलेजमध्ये ती मॅनेजमेण्टचा अभ्यास करत होती. मुळात या अभ्यासक्रमाला मुली कमीच होत्या. मुस्लिम मुलगी तर ती एकटीच होती. कॉलेजच्या सगळ्याच कार्यक्रमात ती भाग घ्यायची. बक्षिसं मिळवायची. अभ्यासातही ती चांगली असल्याने शिक्षकांचीही लाडकी होती. याच काळात राकेश भेटला. अनेक प्रोजक्ट दोघांनी मिळून पूर्ण केले. त्याची हुशारी, समजूतदारपणा अन् मदत करण्याची वृत्ती यामुळे फरहाला तो आवडू लागला.

इंटर्नशिपनंतर आठ दिवसांनी फरहा घरी आली होती. त्यावेळी अब्बूंचं पोस्टिंग दिल्लीला होतं. अब्बू अम्मी दोघंही आनंदात होती.

‘‘फरहा, आता काही दिवसांत तुझी इंटर्नशिप संपेल. माझे मित्र रहमान यांनी त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घातली आहे. आम्हाला तो मुलगा व सगळं कुटुंब पसंत आहे. अर्थात्च निर्णय तू घेणार आहेस.’’

त्या एका क्षणात जणू वादळ घोंघावलं. पण स्वत:ला कसंबसं सावरून ती म्हणाली, ‘‘तुमचा निर्णय मला मान्य असेल, अब्बू.’’

‘‘शाब्बास पोरी, माझी लाज राखली. लोक म्हणतात मुली आईबाबांचं ऐकत नाही, पण तू माझं ऐकशील याची मला खात्री होती. मी उद्याच रहमान अन् त्याच्या कुटुंबाला जेवायला बोलावलंय.’’

स्वप्न पडायला सुरुवात झाली नाही तोच झोप मोडली. फरहा रात्रभर रडत होती. तिला जाणवलं की ती अन् राकेश एकत्र येऊ शकणार नाही. दोन समांतर रेषा आहेत. त्या तशाच राहाणार. अब्बूंनी सगळ्या समाजाशी भांडून तिला एवढी शिकवली. आता जर तिने हिंदू मुलाशी लग्न केलं तर लोक कधीच मुलींना शिकू देणार नाहीत. तिला फक्त तिच्यापुरता विचार करून भागणार नाही. हे तिला राकेशला समजावून सांगावं लागेल.

दुसऱ्याच दिवशी रहमान आणि त्यांचे कुटुंबीय घरी आले. फक्त बघण्याचा औपचारिक कार्यक्रम होता तो. बाकी सर्व गोष्टी आधीच ठरवून झाल्या होत्या बहुतेक.

अब्बू अम्मीला सांगत होते. ‘‘समीना, आज मी फरहाच्या बाबतीतलं शेवटचं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान अनुभवतो आहे. खूप आनंद झालाय मला. फरहाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यावरच आपण तिचा निकाह लावू. त्याचवेळी सगळ्या नातेवाईक व परिचितांनाही सांगू. सध्या कुणाला काहीच सांगायला नकोय.’’

दोन दिवसांनी फरहा आपल्या कॉलेजात आली. तिला राकेशला भेटून खूप रडून घ्यायचं होतं. पण राकेश समोर आला तोच त्रस्त, उदास अन् खूप थकलेला असा दिसला. आपलं दु:ख विसरून फरहा त्याच्या दु:खाबद्दल विचारू लागली.

‘‘फरहा, मी घरी तुझ्याबद्दल बोललो. पण तुझं नाव ऐकताच माझ्या घरात वादळ उठलं. मुस्लिम मुलगी घरात सून म्हणून येणार ही कल्पनाच त्यांच्या पचनी पडत नाहीए. मी सगळ्यांशी खूप भांडून आलोय. फरहाशिवाय मी इतर कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही असं सांगून आलोय.’’ राकेशने आपल्या मनातला संताप व्यक्त केल्यावर फरहानेदेखील तिच्या मनातली खळबळ त्याला सांगितलं.

दिवस उलटत होते. राकेश व फरहाला नोकरी दिल्लीतच मिळाली. एक हिंदू मुलगा व एक मुस्लिम मुलगी यांचं लग्न होऊ शकत नाही हे दोघांनीही मान्य केलं होतं.

फरहाच्या निकाहची तारीख नक्की करून गुडगावहून दिल्लीला येत असताना फरहाच्या गाडीला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. फरहा, अब्बा, अम्मी तिघेही जखमी झाले. बेशुद्ध पडण्यापूर्वी फरहाने राकेशला फोन केला.

अम्मी अब्बूच्या जखमा बेतात होत्या. पण फरहाच्या चेहऱ्यात काचा घुसल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती. नाकाचं अन् हनुवटीचं हाड मोडलं होतं. सुर्दैवाने डोळे शाबूत होते. पण सगळा चेहरा बँडेजने झाकला गेला होता.

अपघाताची बातमी कळताच रहमान अन् त्यांचा मुलगा व पत्नीही भेटायला आले. हात व पाय प्लास्टरमध्ये, चेहऱ्यावर भयानक दिसणारं बँडेज बघून रहमानच्या मुलाने डॉक्टरांना तिच्या समोरच विचारलं, ‘‘ही पूर्वीसारखी सुंदर दिसेल ना?’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘हातपाय तर लवकरच पूर्वीसारखे होतील पण चेहऱ्याचं सांगता येतत नाही. प्लॅस्टिक सर्जरीचा पर्याय अर्थात्च आहे. पण त्याला वेळ लागेल.’’

तो दिवस की आजचा दिवस रहमानकडून कुणीही पुन्हा फिरकलंच नाही. फक्त निकाह होऊ शकत नाही एवढा निरोप फोनवर दिला.

ठरलेलं लग्न मोडलं याचा अम्मी अब्बूला खूपच धक्का बसला. त्यातल्या त्यात एवढंच समाधान होतं की लग्न ठरण्याची बातमी अजून कुणाला कळवली नव्हती. नाही तर लोकांना बोलायला आणखी एक विषय मिळाला असता. तरीही सध्या सगळ्यात महत्त्वाचं होतं फरहाचं पूर्णपणे बरं होणं. या सगळ्या कठीण परिस्थितीत राकेश मात्र पहाडासारखा त्यांच्या पाठीशी होता. हॉस्पिटलमध्ये तिघांना डबे नेऊन देणं, स्वत:चं ऑफिस, अम्मी अब्बूंना सतत धीर देणं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी चर्चा करणं, सगळ्या जबाबदाऱ्या तो व्यवस्थितपणे पार पाडत होता. घरातलाच एक सदस्य झाला होता.

अम्मी अब्बू पूर्ण बरे झाले होते. खोलीत राकेश अन् फरहा दोघंच होती. सलमा रडत होती. राकेश तिला समजवत होते. ‘‘प्लीज फरहा रडू नकोस…उद्या तुझं बँडेज काढतील. तू धीराने या गोष्टीला सामोरी जा. मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करीन मी. ऑफिसातही सगळे तुझी वाट बघताहेत.’’

‘‘पण आता माझ्याशी लग्न कोण करणार? अम्मी अब्बूंना माझ्या लग्नाची काळजी लागलीए.’’ सलमा म्हणाली.

‘‘मी तर कधीचा वाट बघतोय तुझ्याकडून होकाराची. अगं माझ्या आईनेही संमती दिलीए, कुणीशीही कर पण लग्न कर. तुझं बँडेज एकदा निघू दे. मी आईला तुझ्या अम्मीला अब्बूंना भेटायला घेऊन येतो.’’

हळूहळू परिस्थिती निवळत गेली. मोडलेलं नाकाचं हाड व हनुवटीचं हाड शस्त्रक्रियेने पूर्ववत् जुळून आलं. खोल जखमांचे व्रणही हळूहळू जातील, असं डॉक्टर म्हणाले. पण मुख्य म्हणजे फरहा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरली होती. राकेशच्या घरच्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं. निकाहची जी तारीख ठरवून फरहा गुडगावहून आली होती त्याच दिवशी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नोंदणी पद्धतीने राकेश व फरहाचं लग्न झालं. सुरेख रिसेप्शन झालं. दोन्हीकडची फारच कमी माणसं आली पण मित्र, कलीज अशी खूप मंडळी अभिनंदनासाठी आली होती. लग्नांनतर काही दिवसातच राकेशला कंपनीने सिडनीला पाठवलं. फरहाही गेली. तिथे त्यांचं छान बस्तान झालं.

फरहाच्या लग्नानंतर अब्बू अम्मी एकदा आपल्या घरी गेले होते. त्यावेळी लोकांनी त्यांना खूपच टोचून बोलून घेतलं. मोहल्ल्यातल्या वयस्कर माणसांनी भरपूर दम दिला. रात्री तर घरावर दगडफेकही झाली. पोलीस बोलावून त्यांच्या संरक्षणात अम्मी अब्बू स्टेशनवर पोहोचले.

अब्बूंची फोनवर कुणाशी तरी बातचीत सुरू होती. त्यांनी फोन ठेवल्यावर फरहाने विचारलं, ‘‘अब्बू, कुणाशी बोलत होता?’’

‘‘अगं, तुझी फूफी होती. बिचारी मदत मागायला येते माझ्याकडे. मुलं तर नालायक निघाली. कुणी तुरुंगात तर कुणी बेपत्ता आहे. बिच्चारी! उपासमारीने मरायची पाळी आलीय तिच्यावर’’ अब्बा म्हणाले.

‘‘फरहा, त्या रात्री हिनेच हिच्या त्या दिवट्या मुलांकरवी अन् त्यांच्या भाडोत्री गुंडाकरवी आपल्या घरावर दगडफेक केली होती. तिच्या मुलाशी आम्ही तुझं लग्न करून दिलं नाही ना? त्या रागाने तिने सगळ्या गावातल्या लोकांनाही आमच्याविरूद्ध भडकवलं होतं. तू राकेशशी लग्न केलं. एका हिंदू मुलाशी लग्न केलं याचाही खूप अपप्रचार केला होता तिने.’’ अम्मा म्हणाली, मग तिने हसत म्हटलं, ‘‘बर का, ही सलमा यंदा दहावीची परीक्षा देतेय. तिची इच्छा आहे तुझ्यासारखी इंजिनीअर अन् एम.बी.ए करण्याची.’’

फरहाने सलमाकडे बघितलं. सलमा म्हणाली, ‘‘मीच फक्त नाही हं फरहाबाजी, आता तर या शहरातल्या सगळ्याच मुलींना तुमच्यासारखं व्हायचंय.’’

‘‘खरंच?’’

‘‘हो ना, पण सगळ्यांचे अब्बू तुमच्या अब्बूसारखे अन् अम्मी तुमच्या अम्मीसारख्या असायला हव्या ना? मला तर आहे आधार या अम्मी अब्बूंचा,’’ म्हणत सलमाने फरहाला मिठी मारली.

मी इथंच बरा आहे

कथा * सुधा गुप्ते

‘‘आयुष्य किती सोपं झालंय. एक बटन दाबा अन् हवं ते मिळवा. ही छोटीशी डबी खरोखर आश्चर्यच आहे. कुठंही कुणाशीही बोला,’ मोनूदादा एकदम खुशीत होता.

कालच १० हजारांचा मोबाइल घेऊन आलाय मोनूदादा. खरंतर त्याची आधीची डबी म्हणजे मोबाइलसुद्धा चांगलाच होता. पण बाजारात नवा ब्रॅन्ड आल्यावर जुनाच ब्रॅन्ड आपण वापरणं म्हणजे स्टॅन्डर्डला शोभत नाही ना? या डबीला तर इंटरनेट आहे म्हणजे सगळं जग आपल्या मुठीतच आलंय ना?

त्या दिवशी किती वेळ वाद चालला होता मोनूदादा अन् बाबांमध्ये. बाबांना आता एवढे पैसे मोबाइलवर खर्च करण्याची इच्छा नव्हती. आईचा खांदा हल्ली फार दुखतोय. तिच्यासाठी चांगलं वॉशिंगमशीन घ्यायची त्यांची इच्छा होती. पण मोनूदादानं असं काही तारांगण घातलं की आईनं, ‘‘दुखू देत खांदा, मी धुवीन कपडे, पण त्याला मोबाइल घेऊन द्या,’’ असं बाबांना सांगितलं. ‘अभावात जगा पण शांतता राखा’ असा आईचा स्वभाव आहे.

‘‘तू मागितला असतास तर नसता दिला पण मोनूला नाही म्हणता आलं नाही. तो आईविना मुलगा आहे. त्याची आई व्हायचंय मला,’’ आई म्हणाली.

मनांत आलं की तिला सांगावं, ‘‘बिना आईचा तर मी आहे. त्याला आई आहे. ज्या दिवसापासून मी अन् आई मोनूदादा अन् बाबांच्याबरोबर राहायला आलो आहोत, त्या दिवसापासून जणू मी अनाथ झालो आहे. वडील आधीच गेलेले अन् आता आईही माझ्या वाट्याला फारच कमी येते. मोनूला आई नाहीए. ती त्याला अन् बाबांना सोडून पळून गेली आहे. त्याची शिक्षा नकळत का होईना मला भोगावी लागते आहे.

माझी आई तर माझीच आहे. माझंच जे आहे ते माझ्यापासून कोण हिसकावून घेणार? पण मला दु:ख हेच आहे की आई माझी असून माझी नाहीए. तिलाही कदाचित असंच वाटत असेल की सावत्र शब्द मधे आला की त्या सावत्रपणाच्या छायेतून बाहेर पडायला फार श्रम घ्यावे लागतात. फार चिकाटी ठेवावी लागते. जो आपला नाही, त्याला आपला करायचाय…जो आपलाच आहे, त्याला, आपलाच आहे हे सिद्ध करायला प्रयत्न करण्याची गरजच काय?

बरेचदा असं होतं. नको असलेल्या नात्यात माणूस अडकतो. माझ्या आजोबांची फार इच्छा होती की त्यांच्या सुनेनं दुसरं लग्न करावं. त्यांच्या एका मित्राचा मुलगा, त्याची बायको घरातून पळून गेल्यामुळे कसंबसं आयुष्य रेटत होता. दोघा मित्रांनी आपापल्या अपूर्ण मुलांना पूर्णत्त्व यावं यासाठी त्यांचं लग्नं करून दिलं. दोघांनाही आपली जबाबदारी पूर्ण झाल्याच्या भावनेनं कृतकृत्य वाटलं, कदाचित माझी आई आणि मोनूचे बाबाही सुखावले असतील.

मी वडिलांना कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे मी कुणालाच बाबा म्हणत नव्हतो. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आलेले पुरूष काका, मामा, आजोबा किंवा दादाच असायचे. गेली सतरा वर्षं आईच माझी आई अन् बाबा होती. मी माझ्या आजोबांनाच बाबा म्हणत होतो. आईच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर रात्रभर मी बेचैन होतो. मला झोप लागली नाही. पण आजोबांनीच मला समाजावलं की आईच्या चांगल्या, सुखमय भविष्यकाळासाठी मी तिच्या लग्नाला विरोध करू नये.

‘‘हे बघ बाळा, तू समजूतदार आहेस. आता तू अठरा वर्षांचा आहेस. आणखी  ८-१० वर्षांत तू नोकरीला लागशील. तुझं लग्न, तुझा संसार यात गुंतलास की तुझी आई खूपच एकटी पडेल. तिला कुणाची सोबत, कुणाचा आधार लागेलच ना? इतक्या वर्षांत तिच्या दुसऱ्या लग्नाचा योग आला नव्हता, तो आता आलाय…तर हे लग्न होऊन जाऊ दे…तुला जिथं वाटेल तिथं तू राहा. हे घर तुझंच आहे. तेही घर तुझंच आहे. आम्ही तुझेच आहोत अन् तू आमचा आहेस.’’

वडील नसले की मुलं लवकरच समजूतदार होतात. मीही आईकडे आता वडिलांच्या दृष्टीतून बघू लागलो. कोर्टात दोघांनी सह्या केल्या. एकमेकांना हार घातले अन् दोन अपूरी, अर्धीमुर्धी कुटुंब मिळून एक संपूर्ण कुंटुंब झालं. मी आईला प्रथमच असं नटलेलं बघितलं. कपाळावर कुंकु, गळ्यात मंगळसूत्र, हातात सोन्याच्या, काचेच्या बांगड्या अन् जरीची राणी रंगाची साडी…आई इतकी सुंदर दिसत होती…एक संपूर्ण अनोळखी कुटुंब आईचं होत गेलं अन् मी मात्र आईपासून दूर होत होत बहुतेक घरातून बाहेरच होईन असं वाटतंय.

‘‘काय झालंय तुला? असा गप्प का आहेस विजय?’’ मीरा, माझी क्लासमेट आहे. पण खूपच समजूतदार आहे. माझी समजूत घालण्याचं काम तिचंच असतं.

‘‘आज आईकडे नाही जाणार? आजोबांच्या घरी जातो आहेस का? काही प्रॉब्लेम आहे का?’’

मी काय सांगू? कसं सांगू? माझी आईच माझ्यापासून दूर दूर जाते आहे…म्हणजे मला असुरक्षित वाटतंय असं नाहीए. आईच्या हृदयातला एक कोपरा मी आनंदानं मोनूदादासाठी दिला असता पण तो त्या लायकीचा नाहीए…आई इतकी त्याच्या मागेपुढे फिरते. त्याचं कौतुक करते पण तो मात्र आईचा मान अजिबात ठेवत नाही…उलट अपमानच करतो. हे सगळं मला सहन होत नाही.

माझ्याहून मोठा आहे मोनूदादा, वीस एकवीसचा सहज असेल. त्याला इतकंही कळू नये? आई बिचारी त्याला ‘आपला’ म्हणत असते. सतत त्याच्यासाठी झटत असते. पण त्याच्या मनात काय पूर्वग्रह आहे कुणास ठाऊक…पण जसं त्याच्या वडिलांना माझेही वडील म्हणून मी स्वीकारलं आहे, तसा तो माझ्या आईला त्याची आई म्हणून स्वीकारतच नाहीए…’’

मीरानं माझ्या हातावर थोपटून मला शांत केले. ‘‘वेळ लागतो विजय…आत्तापर्यंत त्या घरात त्याचं एकछत्र साम्राज्य होतं. आता तुम्ही दोन नवीन माणसं त्याच्या अधिकारावर अतिक्रमण करताय…’’

तिला पुरतं बोलू न देता मी म्हटलं, ‘‘अधिकारावर अतिक्रमण कसं म्हणतेस तू? अन् आई एकटीच त्यांच्या घरात गेलीय. मी तर बहुतेक वेळ आजीआजोबांकडेच राहतो. फार क्वचित मी तिथं जातो.’’

‘‘फार क्वचित जातो म्हणजे?’’ मीरानं आश्चर्यानं विचारलं. ‘‘कधीतरीच तिथं जाशील तर त्या घरात रमशील कसा? ते घर तुझं वाटेल कसं तुला?’’

‘‘ते घर मला माझं वाटण्याला काही अर्थ नाहीए…माझ्या बाबांचं, आजोबांचं घर आहे ना माझ्यासाठी. ते माझ्या आईचं घर आहे. तिनं तिथं रूळायला, रमायला हवंय आणि ती रमलीय तिथं. आपला नवा संसार सजवण्यात, ते घर नीट ठेवण्यात, नव्यानं त्याची मांडणी करण्यात ती इतकी गुतंली आहे की आठ आठ दिवस मी तिकडे फिरकत नाही हेही तिच्या लक्षात येत नाही. ‘इतके दिवस आला का नाहीस?’ एवढंही ती मला विचारत नाही. अर्थात आजोबांना अन् मलाही तेच हवं होतं…आईला जोडीदार मिळावा, ती एकटी राहू नये अन् तिनं सुखाचा संसार करावा. तसंच होतंय.’’

‘‘पण या आधी कधी तू बोलला नाहीस? मला तर वाटलं, गेलं वर्षभर तू तुझ्या नव्या घरातच राहतो आहेस.’’

‘‘खरं सांगायचं तर ते घर मला ‘माझं’ वाटत नाही. फारच कमी दिवस मी राहलोय तिथं.’’

‘‘पण तुझं नवे बाबा काही म्हणत नाहीत? तू इथंच थांब म्हणून आग्रह नाही करत?’’

‘‘सुरूवातीला म्हणायचे…मोनूदादाची खोलीही मला दिली होती. मला खोलीचा मोह नाहीए. आजोबांचं अख्खं घर आहे माझ्यासाठी. प्रश्न अधिकाराचाही नाहीए. प्रश्न प्रेम अन् मान राखण्याचा आहे. जागेसाठी मी तिथं राहत नाही. तिथं राहताना मला सतत जाणवतं की मोनू माझ्या आईशी नीट वागत नाही. तिला लागेल असं बोलतो अन् ते मला खटकतं. कदाचित मी आईच्या बाबतीत फार हळवा असेन. मी कदाचित अधिक संकुचित वृत्तीचा असेन. काही गोष्टी पचवणं मला जमत नाहीए. पूर्वी माझी आई फक्त माझी होती, पण आज ती एका अशा पुरुषाबरोबर आनंदात आहे जो माझा पिता नाहीए. मी जर माझ्या आईवरचा अधिकार सोडतोय तर मोनूनं तिचा मान राखायला हवा ना?’’

‘‘त्याचं मन तुझ्याएवढं मोठं नसेल विजय अन् त्याची समजही तुझ्याएवढी परिपक्व नसेल?’’ मीरानं म्हटलं.

‘‘कदाचित त्याला मीरासारखी मैत्रीण भेटली नसेल…’’ मी हसत म्हटलं. मीराही हसली.

पण वरकरणी मी जरी हा विषय संपवला होता तरीही मनातून मी माझ्या आईची काळजी करतच होतो. एखाद्या बापानं आपल्या मुलीची करावी तशी…आईचा पुनर्विवाह तिच्यासाठी काही नवं संकट तर नाही ना उभं करणार?

पण नवे बाबा आईची खूप काळजी घेतात. आईमुळे घराला आलेलं घरपण, उजळलेलं रूप, आईचा कामसूपणा या सगळ्यामुळे ते प्रसन्न दिसतात. त्यांच्या वागण्या बोळण्यातून आईविषयीचा आदर व कृतज्ञता जाणवते.

बस्स, मला फक्त मोनूदादाचं वागणं आवडत नाही. मी आईचा चेहरा वाचू शकतो. तिची सहनशक्ती अफाट आहे. कधीतरी तिचीही सहनशक्ती संपेल त्यानंतर काय होईल? मी तर तिथं राहतच नाही. मुळात आई आणि मोनूदादात माझ्यामुळे दुरावा यायला नकोय मला. आईचं घर, आईचा संसार अभंग राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आजीआजोबा पण जणू माझ्या पाळतीवर असतात. माझा चेहरा वाचायचा प्रयत्न करतात. मी आईला भेटतो की नाही, कधी भेटलो होतो वगैरे अगदी खोदून खोदून विचारतात. कधी तरी सांगतो मी की भेट झाली नाही, कधी तरी भेटल्याचं सांगतो. कधी खोटं तर कधी खरं. पण मला या सगळ्याचा फार त्रास होतोय. जीव गुदमरतोय माझा.

मीराला माझी मन:स्थिती कळतेय. ‘‘अरे, वार्षिक परीक्षा डोक्यावर आहे. अभ्यासाकडे लक्ष दे. सारखा त्या मोनूचाच विचार करशील तर पास कसा होशील? आई आधीच त्या मोनूच्या वागण्यानं दु:खी आहे, तू आणखी तिच्या दु:खात भर का घालतोस? हे सगळं चालतंच रे, अन् हळूहळू सगळं मार्गीही लागतं. तू अभ्यास पूर्ण कर, नोकरीला लाग त्यामुळेच आईलाही बरं वाटेल ना?’’ मीरानं मला खूपच छान समजावलं.

अन् मीही जोरदार अभ्याला लागलो. मीरानं म्हटलं ते खरच होतं. मी कर्तबगार निघालो तरच मी आईला आधार देईन ना? तिला तेवढंच बरं वाटेल.

आता मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच अभ्यास करत बसायचो. आजी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. आजोबा कधी सफरचंद तर कधी पपई कापून आणून द्यायचे. कधी आजी अक्रोड, बदाम त्यांच्या हाती पाठवायची तर कधी खसखसशीचा शिरा. दोघंही माझ्यासाठी खूप श्रम घेत होते.

‘‘तू अभ्यास नीट कर. इतर कोणतीही काळजी करू नकोस. आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासाठी?’’ आजीआजोबा सांगायचे.

कधीतरी आईशी फोनवर बोलून घेत होतो. ती तिथं रमली आहे हेच मला खूप समाधान होतं. माझ्या विझणाऱ्या दिव्याला तेवढं समाधान तेलासारखं होतं.

परीक्षा एकदाची संपली अन् मला ‘हुश्श’ झालं. पेपर फारच छान गेले होते. शेवटचा पेपर देऊन मी घरी आलो तेव्हा आईबाबा येऊन बसलेले दिसले. मला सुखद आश्चर्य वाटलं. शेवटी आईला माझी आठवण झाली म्हणायची. मी आईकडे बघितलं. तिच्या कपाळावर ढीगभर आठ्या होत्या. बाबांनी मला जवळ घेऊन माझ्या खाद्यांवर थोपटलं.

‘‘आम्ही तुला घ्यायला आलोय बाळा, पेपर छान गेले ना? आता आपल्या घरी चल…’’ बाबा म्हणाले.

‘‘नाही…नाही…मी येणार नाही. ते घर माझं नाहीए…मी इथंच बराय. हेच माझं घर आहे.’’ नकळत मी बोलून गेलो.

‘‘अरे, इतके दिवस तुझ्या परीक्षेचा ताण होता तुझ्यावर, म्हणून आम्ही गप्प होतो. पण आता चल त्या घरी.’’

‘‘नाही बाबा, मला नाही जायचंय…प्लीज माझ्यावर बळजबरी करू नका.’’

‘‘मोनूशी भांडण झालंय का तुझं? तो सांगत होता तू त्याच्या आईचं नाव घेऊन त्याची बदनामी केलीस म्हणून?’’ आई रागानं म्हणाली.

बाबा आईला न बोलण्याबद्दल सांगत होते, पण ती मात्र पूर्ण शक्तिनिशी मला दोषी ठरवत होती.

‘‘तू मोनूच्या आईचं नांव घेऊन त्याला हिणवलंस, टोमणे दिलेस, लाज नाही वाटत असं वागायला? काय बोलावं अन् काय बोलू नये हे कळण्याइतका मोठा झाला आहेस तू. लहान नाहीएस.’’

क्षणभर वाटलं सगळे एका बाजूला झाले आहेत अन् मी एकटा एका बाजूला आहे. मी मोनूला कधी त्याच्या आईबद्दल वाईटसाईट बोलले,  मी तर त्याला टाळतंच असतो. शक्यतो समोरासमोर येत नाही कारण मुळात त्याचं वागणंच बरोबर नसतं.

‘‘तू असं का केलंस बेटा? तू तर समजूतदार आहेस ना राजा?’’ आजीनंही मलाच विचारलं.

आजोबाही न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसले. इतके दिवस सगळे गप्प होते कारण माझी परीक्षा होती. आज शेवटचा पेपर झाला अन् सगळ्यांचाच संयमाचा बांध फुटला. माझं वर्षभर गप्प राहाणं, संयमानं स्वत:वर बंधनं घालणं सगळं गेलं आलं…माझ्या आईसाठी माझं मन सतत आक्रोशत होतं ते सगळं बेकारच म्हणायचं. मी जणू अपराधी आहे असंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की या आक्रमणासाठी अजिबातच तयारीत नव्हतो. परीक्षा संपल्याच्या आनंदात घरी आलो होतो. कसं छान हलकं हलकं वाटत होतं. घरी अजून एक परीक्षा वाट बघतेय हे कुठं ठाऊक होतं?

मी जरा सावरतोय तेवढ्यात आईनं प्रश्न केला, ‘‘तू मोनूना असं विचारलंस की त्याची आई कुणाबरोबर पळून गेली म्हणून? विचारलं होतंस असं?’’

मी चकितच झालो…कुठली गोष्ट कुठं नेऊन ठेवली अन् कशी लोकांसमोर मांडली मोनूनं? स्वत:चं वागणं नाही सांगितलं…मी काही बोलणार तेवढ्यात बाबांनी माझा हात धरून मला माझ्या खोलीत आणलं अन् खोलीचं दार आतून लावून घेतलं. माझ्यासमोर उभं राहून ते बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे बघत होते. मग म्हणाले, ‘‘मला कळतंय, तुझा संयम संपला असेल तेव्हाच तू काहीतरी बोलला असशील…काय घडलंय बाळा? तू तुझ्या आईपासून दूरदूर का राहतोस? माझं घर नांदतं व्हावं अन् तू एकटा पडावास असं मलाही नकोय. तू तिथं का येत नाहीस?’’

‘‘मोनू माझ्या आईला मान देत नाही…वाईट वागतो. ते मला बघवत नाही, सहन होत नाही, म्हणून मी तिथं येत नाही.’’

‘‘काय म्हणतो मोनू? मला सांग तर खरं…तूही माझा मुलगा आहे. तुझाही माझ्यावर तेवढाच अधिकार आहे.’’

‘‘मला कुठलाच अधिकार नकोय बाबा. अधिकाराची एवढी हाव असती तर मी आईला तुमच्याकडे पाठवलंच नसतं. आईच्या आनंदासाठी, आईला मी माझ्यापासून दूर केलंय…या घरात तिला काय कमी होतं? खाणं, पिणं, कपडालत्ता, मानसन्मान सगळंच होतं…आजी आजोबा अन् मीही तिच्यावर जिवापाड प्रेम करतो.’’

मोनू कॉलेज कॅन्टीनमध्ये माझी चेष्टा करतो. मित्रांना सांगतो, ‘‘याची आई माझ्या घरी पळून आली आहे… तो असं का म्हणतो? मला माझ्या आईला सांभाळता येत नव्हतं का? माझी आई तर वडिधाऱ्यांच्या सांगण्यावरून अगदी राजरोसपणे लग्न करून तुमच्या घरात आली आहे. पण मोनूचा आई कुठं भटकते आहे हे त्याला ठाऊक आहे का? माझी आई कुठं आहे हे मला ठाऊक आहे? बाबा तुम्हीच सांगा, मी त्याला हे विचारलं यात माझं काय चुकलं? अपमान त्यानं माझा केलाय की मी त्याचा केलाय?’’

बाबा खरोखर अवाक् झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वत:च्या मुलाच्या वर्तणुकीची लाज स्पष्ट दिसत होती. ते दुखावलेही गेले होते.

‘‘बाबा, तुम्हालाही वाटतं माझ्या आईनं तुमच्याशी लग्न केलं ही वाईट गोष्ट आहे? त्यामुळे माझा अपमान होणं बरोबर आहे का?’’

‘‘नाही रे बाळा, असं बोलू नकोस, माझं तर आयुष्यच आता कुठं सुरू झालंय…तू अन् तुझी आई माझ्या आयुष्यात आलात …तेव्हापासून…अन्… खरं तर आईची माया काय असते ते मोनूलाही तुझ्या आई घरात आल्यावरच समजलंय.’’

‘‘समजलंय तर तो आईशी कृतज्ञतेनं का वागत नाही? तिचा अपमान का करतो? तिचा मान ठेवत असता तर चार फालतू मित्रांमध्ये बसून माझ्या आईबद्दल असं बोलला नसता. तुमच्या अन् आईच्या लग्नानंतर लगेचच काही दिवसात तो असं बोलला. त्या दिवसापासून मी त्याच्याकडे बघतही नाहीए. मला फक्त इतकंच समजतंय की तो माझ्या आईला मान देत नाही. मी त्याला काहीही म्हणालो नाही. फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी त्याच्या आईचा अपमान का करेन?’’

बाबा गप्प होते. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मग मला जवळ घेऊन कुरवाळू लागले. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शानं मला एकदम रडू आलं.

‘‘पण मग इतके दिवस तू हे सगळं माझ्याजवळ बोलला का नाहीस? इतकं सगळं मनात का ठेवलंस?’’

‘‘मला मोनूची मन:स्थिती समजतेय बाबा, त्याला तुमच्यावरचा अधिकार विभागला गेलेला सहन होत नाहीए. पण ज्याच्या आईचा स्वत:चाच पत्ता ठिकाणा नाहीए, त्यानं दुसऱ्याच्या आईबद्दल अपमानकारक का बोलावं?’’

‘‘मोनूनं असं बोलायला नको होतं. मी विचारेन त्याला?’’

‘‘नका विचारू बाबा, आईला कळलं तर मोनूबद्दल तिच्या मनात किल्मिष येईल. मग ती मोनूना माया देऊ शकणार नाही. ती माझी आई आहे. ती माझीच राहील. दूर किंवा जवळ राहण्यानं ती माझ्यापासून दुरावेल असं नाही. पण मोनूला आईची अधिक गरज आहे. म्हणूनच मी आईच्या प्रेमात वाटेकरी होऊन तिथं राहू इच्छित नाही. मला इथंच राहू देत. तिथं राहिल्याने तर नित्य नवं काहीतरी घडेल. तुम्हाला अन् आईला त्याचा त्रास होईल…ते मला नकोय. ते घर मोनूचं आहे, हे घर माझं आहे. मी खरं काय ते तुम्हाला सांगितलं, मी मोनूला चिडवलं नाही, टोमणा दिला नाही फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. माझं बोलणं त्याला झोंबलं, तर त्याच्या बोलण्याचा मला त्रास नसेल झाला?’’

बाबा शांतपणे ऐकत होते. पुन्हा मला कुशीत घेतलं अन् हसून म्हणाले, ‘‘मी खरोखर भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखा शहाणा, समजूतदार मुलगा मिळाला. मला तुझं म्हणणं समजलंय. आता माझंही म्हणणं ऐकून घे. तू अन् तुझी आई, दोघंही माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग आहात. आधीपासूनच तुम्हा दोघांविषयी माझ्या मनां असलेला आदर अन् कृतज्ञता आता आणखी वाढली आहे, मला वाटतं, आपण चौघांनी एकत्र राहावं.’’

‘‘बाबा, मी काय किंवा मोनू काय, आता लहान नाही आहोत. किती दिवस तुमच्यापाशी राहू? बाहेर जावंच लागेल…मनात तेढ ठेवून जवळ राहण्यापेक्षा दुरून गोडीनं राहावं, भेटताना मोकळ्या मनानं भेटावं हे चांगलं नाही का?’’

बाबांचे डोळे भरून आले. ते मला जवळ घेऊन काही क्षण स्तब्ध उभे होते. मला प्रथमच जाणवलं की मी माझ्या बाबांच्या कुशीत आहे. मला माझे वडिल भेटले.

मला स्वत:पासून दूर करत ते म्हणाले, ‘‘सुखी रहा बाळा, पण स्वत:ला एकटा समजू नकोस, मी तुझाच आहे. जे लागेल ते हक्कानं माग. आज उद्या कधीही…मी तुझाच आहे. मोनूला थोडा वेळ देऊ या. एकेकाला समज उशीरा येते. काळही बरंच काही शिकवतो. त्यालाही हळूहळू नाती कळायला लागतील.’’

आई बाहेरून खोलीचं दार सारखं वाजवत होती. बहुधा ती घाबरली होती…बाबांसाठी किंवा माझ्यासाठी कदाचित दोघांनी आत काय गोंधळ घातला असेल म्हणून. बाबांनी दार उघडलं. आईच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या होत्या. तिच्या एकूण देहबोलीवरून ती माझ्यावर किती रागावली आहे हे मला कळत होतं. ती तिच्या नव्या संसारात रमली आहे हे मला कळलं होतं. मलाही तेच हवं होतं. आई तिच्या घरात आनंदात राहावी. माझं काय? मी जिथं आहे तिथंच बरा आहे.

थोर तुझे उपकार

कथा * राजलक्ष्मी तारे

रात्रभर नंदना बेचैन होती. झोप लागत नव्हती. असं का होतं ते तिला समजत नव्हतं. सगळं अंग मोडून आल्यासारखं वाटत होतं.

सकाळी उठली अन् तिला घेरीच आली. कशीबशी पलंगावर बसली. डोकं गरगरत होतं. ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात तनुजा वहिनीचा आवाज ऐकू आला.

‘‘नंदू, उठतेस ना? ऑफिसला जायला उशीर होईल…’’

‘‘उठलेय वहिनी, आवरून येतेय.’’ नंदनानं तिथूनच म्हटलं.

पण नंदनाच्या थकलेल्या आवाजावरून तनुजाला थोडी शंका आली. ती हातातलं काम तसंच टाकून नंदनाच्या खोलीत आली. ‘‘काय झालं गं? बरं नाहीए का?’’

‘‘हो गं!’’ नंदनानं म्हटलं.

तिच्या अंगाला हात लावून तनुजानं म्हटलं, ‘‘ताप नाहीए, पण डोकं दुखतंय का? नेमकं काय होतंय?’’

तेवढ्यात नंदना उठून बाथरूममध्ये धावली. तिला ओकारी झाली. तनुजानं तिच्या पाठीवरून हात फिरवला. चुळा भरून झाल्यावर नंदनाला हाताला धरून तिनं बेडवर बसवलं.

तनुजाला काळजी वाटली, ‘‘नंदुला काय झालं?’’ नंदनाचा भाऊ म्हणजे तनुजाचा नवरा सध्या परगावी गेलेला होता. तिनं नंदनाला दिलासा देत म्हटलं, ‘‘नंदू, आज ऑफिसला जाऊ नकोस, घरीच विश्रांती घे. मी तुझ्यासाठी चहा आणते. तू फक्त ऑफिसात फोन करून कळव.’’

नंदनानं केवळ मान हलवली.

तनुजा तिच्यासाठी चहा घेऊन आली, तेव्हा नंदना अश्रू गाळत होती. ‘‘काय झालं गं?’’ तिचे डोळे पुसत तनुजानं विचारलं.

‘‘वहिनी, किती काळजी घेतेस गं माझी. तुझ्यामुळे मला आई नाही ही जाणीवच कधी झाली नाही. कायम माझ्यावर माया करतेस, माझ्या चुका पोटात घालतेस, माझी इतकी काळजी घेतेस…पण तरीही आज मला बरंच वाटत नाहीए.’’

‘‘काळजी करू नको, चहा घे. आवर…आपण दोघी ब्रेकफास्ट घेऊन डॉक्टरकडे जाऊन येऊ. बरं वाटेल तुला,’’ तनुजानं तिच्या खांद्यावर थोपटत दिलासा दिला.

थोड्या वेळानं दोघी घराबाहेर पडल्या. डॉ. माधवी तनुजाची मैत्रिण होती. निघण्यापूर्वीच तनुजानं तिला फोन केला होता.

माधवीनं नंदनाला जुजबी प्रश्न विचारले, तपासलं अन् नंदनाला बाहेर पाठवून तनुजाला केबिनमध्ये बोलावलं, ‘‘तनुजा, नंदना विवाहित आहे का?’’ तिनं विचारलं.

‘‘नाही माधवी, तिचं लग्न बरंच लांबलंय. आता एका स्थळाकडून होकार येण्याची आशा आहे. का गं? तू हे का विचारते आहेस?’’

‘‘तनुजा, प्रसंग गंभीर आहे. नंदनाला दिवस गेलेत.’’

‘‘बाप रे!’’ तनुजाच्या पायाखालची जमीन सरकली. असं कसं घडलं? नंदनाचं पाऊल घसरलं कसं? मला तिनं कसं सांगितलं नाही?

तात्पुरतं बरं वाटावं म्हणून डॉ. माधवीने लिहून दिलेल्या गोळ्या घेऊन दोघी घरी आल्या. नंदनाला कसं विचारावं तेच तनुजाला कळत नव्हतं. तिनं पटकन् स्वयंपाक केला. नंदनाला जेवू घातलं. गोळ्या दिल्या अन् नंदनाला झोपायला लावलं.

सायंकाळपर्यंत नंदनाला थोडं बरं वाटेल. मग तिला शांतपणे सर्व विचारू असं तनुजानं ठरवलं.

पाच वाजता तनुजानं चहा केला अन् ती नंदनाच्या खोलीत गेली. नंदना रडत होती. ‘‘नंदू, चहा घे. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे.’’ तनुजा म्हणाली.

डोळे पुसून चहाचा कप घेत नंदनानं म्हटलं, ‘‘हो वहिनी, मलाही तुला काही सांगायचं आहे.’’

दोघी चहा घेऊन एकमेकींकडे बघत बसल्या. सुरूवात कुणी करावी हेच कळत नव्हतं.

शेवटी तनुजानं धीर एकटवून विचारलं, ‘‘नंदू, तू प्रेग्नंट आहेस हे तुला माहीत आहे का?’’

नंदूनं दचकून तिच्याकडे बघितलं, ‘‘नाही वहिनी, पण मला बरं वाटत नाहीए,’’ ती म्हणाली.

तनुजाला काय बोलावं तेच कळेना, ‘‘नंदना, अगं, तू तिशीला येतेस अन् तुला दिवस गेलेत हे ही कळलं नाही? अगं, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस कशी? आता तुझ्या दादाला अन् तुझ्या बाबांना मी काय तोंड दाखवू? काय उत्तर देऊ? त्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे गं!…’’

रडत रडत नंदना म्हणाली, ‘‘वहिनी, अगं माझी मासिक पाळी खूप अनियमित आहे. चार चार महिने मला पाळीच येत नाही. मागे तू मला डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यायला लावले, तेव्हा बरी नियमित झाली होती. मग मी कंटाळून औषधं बंद केल्यावर पुन्हा तसंच सुरू झालं.’’

‘‘बरं, मला सांग, तुझे कुणावर प्रेम आहे का? तुला मर्यादा ओलांडण्याचा मोह कोणामुळे झाला? कुणी पुरूष आवडला आहे तर मला का सांगितलं नाहीस? अजूनही सांग, तुझं त्याच्याशी लग्न करून देऊया.’’

‘‘वहिनी…दादाचे बॉस वीरेंद्र…ते आणि मी…’’

‘‘सत्यानाश! बापरे. अगं वीरेंद्रचं तर लग्न झालंय, दोन मुलंही आहेत त्याला…तो तुझ्याशी लग्न करणार आहे का?’’

‘‘मला नाही माहीत…’’ नंदना घाबरून म्हणाली, ‘‘दादानं त्यांच्याशी माझ्या एका पार्टीत ओळख करून दिली. तेव्हापासून ते माझ्या मागे आहेत. त्यांचं लग्न झालंय हेही मला आत्ता तुझ्याकडूनच कळतंय…’’

नंदनाचं बोलणं ऐकून तनुजाला काय करावं तेच समजेना. तिला नंदनाचा राग आला अन् मग कीवही आली. वीरेंद्रला तर फटके मारावेत इतका त्याचा राग आला. ‘‘नंदना, अगं चार दिवसांत तुझे दादा अन् बाबा येतील घरी…त्यांना काय सांगायचं आपण…?’’

‘‘वहिनी, काहीही कर, पण मला वाचव. दादा तर जीवच घेईल माझा…’’ भीतिनं पांढरी फटक पडली होती नंदना.

‘‘शांत हो, आपण काही तरी मार्ग काढूया.’’ तनुजानं तिला मिठीत घेऊन दिलासा दिला.

रात्रभर दोघींना झोप नव्हती. खूप विचार केल्यावर तनुजानं ठरवलं की रजतला म्हणजे नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगायचं. तो संतापेल, त्रागा करेल, पण काहीतरी मार्ग काढेलच.

सकाळीच तनुजानं रजतला फोन करून सर्व सांगितलं.

तनुजाचं बोलणं ऐकून रजत अवाक् झाला. काही क्षण तसेच गेले. मग म्हणाला, ‘‘मी दुपारच्या फ्लाइटनंच निघतोय तोपर्यंत तू माधवीशी बोलून अॅबॉर्शन करता येईल का विचार. बाकी सर्व मी आल्यावर बघूयात. पण तो वारेंद्र इतका हलकट असेल असं मला वाटलं नव्हतं. माझाच विश्वासघात केला हरामखोरानं,’’ रजतनं फोन ठेवला.

तनुजानं नंदनाला चहा आणि ब्रेकफास्ट दिला. स्वत:ही घेतला अन् आवरून दोघी डॉक्टरकडे निघाल्या. नंदना सतत रडत होती. तिला जवळ घेत तनुजानं म्हटलं, ‘‘अशी सारखी रडू नकोस. थोडी धीट हो.’’

तनुजानं माधवीला अॅबार्शन करायचं आहे असं सांगितलं. माधवीनं नंदनाला काळजीपूर्वक तपासलं. तिचा चेहरा गंभीर झाला.

नंदनाला तपासल्यावर माधवीनं तनुजाला बोलावून घेतलं, ‘‘आय एम सॉरी तनु, पण आपल्याला अॅबॉर्शन करता येणार नाही. अंग साडे चार महिने झाले आहेत. नंदनाच्या जिवाला त्यात धोका आहे.’’

नंदना हताश झाली. हवालदिल झाली. काही दिवसांत ही गोष्ट जगजाहीर होईल. नंदनाचं कसं होणार? आता हिच्याशी लग्न कोण करणार? भोळी भाबडी पोर…कशी त्या वीरेंद्रला भुलली अन् मर्यादा ओलांडून या परिस्थितीत अडकली. नंदनाची एक चूक तिला केवढी महागात पडणार होती. तनुजाचेही डोळे आता भरून आले होते.

ती माधवीच्या व्हिजिटर्स लाउंजमध्ये दोन्ही हातात डोकं धरून बसली होती. तेवढ्यात रजत तिथं पोहोचला. ‘‘कशी आहेस तनू? माधवी काय म्हणाली? सगळं ठीक आहे ना?’’

त्याला बघताच तनुजाचा बांध फुटला. त्याला मिठी मारून ती रडू लागली.

‘‘काहीही ठिक नाहीए रजत, माधवीनं सांगितलं की अॅबॉर्शन करता येणार नाही. त्यात नंदनाचा जीव जाऊ शकतो. भाबडी पोर, केवढी मोठी चूक करून बसलीय…’’

रजत संतापून म्हणाला, ‘‘जाऊ दे जीव, तसंही आता आपण लोकांना काय तोंड दाखवणार आहोत?’’

‘‘असं नको म्हणूस रजत…अरे, आपल्या मुलीसारखी आहे ती…चुकली ती, पण आपण तिला सावरायला हवं ना? तू धीर सोडू नकोस…मार्ग काढूया आपण…’’

तिघंही घरी परतली. संतापलेल्या रजतनं नंदूकडे बघितलंही नाही. बोलणं तर दूरच. त्याला स्वत:चाही राग येत होता. त्यानंच तर वीरेंद्रशी नंदूची ओळख करून दिली होती. ‘हिच्यासाठी मुलगा बघ’ असंही सांगितलं होतं. पण तो तर हलकटच निघाला.’’

घरी पोहोचातच नंदूनं दादाचे पाय धरले अन् ती धाय मोकलून रडू लागली. ‘‘दादा, मला मार, माझा जीव घे, पण बोल माझ्याशी…’’

रजतचेही डोळे पाणावले. तिला आवेगानं मिठीत घेतली. तिला थोपटलं…शांत केलं अन् तो खोलीत निघून गेला.

तनुजानं पकटन् स्वयंपाक केला, पण जेवण कुणालाच गेलं नाही. तनुजानं रजतला म्हटलं, ‘‘चार सहा दिवसातच बाबाही येतील…त्यांना काय सांगायचं? नंदनाचं हे असं ऐकून तर त्यांना हार्ट अटॅकच येईल.’’

विचार करून रजतनं म्हटलं, ‘‘मी बाबांना फोन करून सांगतो की अजून काही दिवस तुम्ही काकांकडेच राहा. घरात थोडं रिपेअरिंगचं काम काढलंय. तोवर विचार करायला वेळ मिळेल.’’

दुसऱ्या दिवशी तनुजा रजतला म्हणाली, ‘‘मी काही दिवस नंदनाला घेऊन सिमल्याला जाते.’’

‘‘तिथं काय करशील? तुझा भाऊ तिथं एकटाच असतो ना?’’

‘‘हो. त्यानं लग्न केलं नाही…एकदम माझ्या मनात आलं, त्याला विचारावं, नंदनाशी लग्न करशील का?’’

‘‘अगं, पण…नंदनाच्या अशा अवस्थेत…तो होकार देईल?… पण एक सांग, आता तो ३७-३८ वर्षांचा असेल, त्यानं लग्न का केलं नाही?’’

‘‘ही एक टॅ्रजेडीच होती. ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं, तिनं त्याला लग्नाचं वचनही दिलं होतं अन् लग्न त्याच्या मित्राशी केलं. त्यामुळे तो खूप दुखावला गेला. त्यानंतर त्यानं बरीच वर्षं लग्नाचा विचार केला नाही. आम्ही मुली दाखवल्या पण तो नाकारत होता. मला आता एकदम आठवलं, मागे एकदा तो आपल्याकडे आला असताना त्यानं नंदूला बघितली होती. ती त्याला आवडली असल्याचंही तो बोलला होता. पण तेव्हा सासूबाई खूप आजारी होत्या. त्यानंतर त्या गेल्या. बाबांना धक्क्यातून सावरायचं, नंदूला सांभाळायचं या सगळ्या गडबडीत मी ते विसरले. आपण नंदूसाठी नंतर स्थळ बघायला लागलो, तेव्हाही माझ्या डोक्यात माझ्या भावाचं स्थळ आलं नाही…आता बघते विचारून…’’

दुसऱ्याच दिवशी नंदूला घेऊन तनुजा भावाकडे सिमल्याला गेली. तिनं प्रवासात नंदूला स्वत:च्या भावाबद्दल सांगितलं अन् तो तयार असेल तर तुझेही मत मला सांग असंही समजावलं.

अचानक आलेल्या बहिणीला बघून विमलेश आनंदला. त्यानं प्रेमानं, अगत्यानं दोघीचं स्वागत केलं तनुजानं आपल्या येण्याचा हेतू त्याला सांगितला. नंदनाची परिस्थितीही सांगितली.

विमलेश म्हणाला, ‘‘एकीनं माझा विश्वासघात केला. त्यानंतर मला आवडलेली मुलगी म्हणजे नंदनाच होती. पण तेव्हा काही लग्नाचा योग आला नाही. तिच्याकडून अजाणता चूक घडली आहे. पाप नाही. मी तिला तिच्या बाळासकट स्वीकारायला तयार आहे. तिला फक्त तिची इच्छा विचार.’’

‘‘विमलेश, मी तुम्हाला खात्री देते…आपला संसार खूप सुखाचा होईल. त्या संसारात फक्त प्रेम, विश्वास अन् समर्पण असेल…’’ खोलीतून बाहेर येत नंदनानं म्हटलं. विमलेशनं तिला जवळ घेतलं. ‘‘होय नंदना, आपलं पूर्वायुष्य विसरून आपण एकमेकांना साथ देऊ,’’ तो म्हणाला.

तनुजालाही अश्रू अनावर झाले. तिच्या अत्यंत प्रेमाची दोन माणसं एकमेकांच्या आधारानं उभी राहत होती. त्यांची आयुष्य आता बहरणार होती.

तिनं फोन करून रजतला सगळं सागितलं. रजतही मोठेपणानं भारावला. त्यानं बाबांना फोनवर नंदनाचं लग्न ठरलंय एवढंच सांगितलं. बाबा घरी आल्यावर त्यांनी विमलेशच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. नंदनाच्या गरोदरपणाविषयी कुणालाच काही सांगितलं नव्हतं. अजून पोट दिसत नसल्यानं कुणाला काहीच शंका आली नाही. नंदना विमलेशचं लग्न थाटात झालं.

निघताना नंदनानं तनुजालाही मिठी मारली. रडत रडत ती म्हणाली, ‘‘वहिनी, खूप उपकार आहेत तुझे…आणि विमलेशचे…मी जन्मभर लक्षात ठेवीन. तुझ्यासारखी चांगली वहिनी मीही होईन…मला आशीर्वाद दे…’’

उंच, अजून उंच…

कथा * ऋतुजा कांबळे

बरेच दिवसांपासून अर्धवट विणून ठेवलेला स्वेटर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मी लॉनवरच्या खुर्चीत बसून होते. थंडी असल्यामुळे दुपारचं ऊन सुखदायक वाटत होतं. झाडाच्या सावलीतही ऊब सुखावत होती. त्याचवेळी माझी बालमैत्रीण राधा अवचित समोर येऊन उभी राहिली.

‘‘अरेच्चा? राधा? काय गं, आता सवड झाली होय तुला मैत्रीणीला भेटायला? लेकाचं लग्न काय केलंस, मला तर पार विसरलीसच. किती गप्पा मारतेस सुनेशी अन् किती सेवा करवून घेतेस तिच्याकडून? कधी तरी आमचीही आठवण करत जा की…!’’

‘‘अगं, कसल्या गप्पा अन् कसली सेवा घेऊन बसली आहेस? माझ्या सुनेला तिच्या नवऱ्याशीच बोलायला वेळ नाहीए, ती काय माझ्याशी गप्पा मारेल अन् कसली सेवा करेल? मी तर गेले सहा महिने एका वृद्धाश्रमात राहातेय.’’

बापरे! हे काय ऐकतेय मी? माझ्या पायाखालची जमिनच सरकली जणू. मला काही बोलणंही सुधरेना. काय बोलणार? ज्या राधानं सगळं आयुष्य मुलासाठी वेचलं, आपलं सुख, आपला आनंद फक्त मुलासाठी दिला आज तोच मुलगा आईला वृद्धाश्रमात ठेवतोय?

मधुकर राधेचा एकुलता एक मुलगा. त्याला वाढवताना तिनं आपल्या सर्व सुखांचा त्याग केला. आपल्या म्हातारपणी पैसा आपल्याजवळ असायला हवा याचा विचार न करता त्याला मसुरीच्या महागड्या शाळेत शिकायला पाठवलं. तिथून पुढल्या शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. पैशांची फार ओढाताण व्हायची. पण उद्या मुलगा उच्चशिक्षित होऊन मोठ्या पगाराची नोकरी करेल, भरपूर पैसा मिळवेल. एवढ्याच आशेवर ती सर्व कष्ट आनंदानं सहन करत होती. भेटली की सतत मुलाच्या प्रगतीबद्दल सांगायची, ‘‘माझं पोरगं म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे,’’ म्हणायची.

राधा खूप काही सांगत होती. बरंच काही मला कळतही होतं, पण वर्मावर बोट ठेवावं असं वाटत नव्हतं. सायंकाळ होण्यापूर्वीच राधा तिच्या वृद्धाश्रमात परत गेली.

ती निघून गेली तरीही माझं मन मात्र तिच्यातच गुंतून होतं. बालपण ते तारूण्याचा काळ आम्ही दोघींनी एकत्रच घालवला होता.

आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. राधाला डॉक्टर व्हायचं होतं. ती हुषार होती. अभ्यासूही होती. दहावीला ती संपूर्ण राज्यात दहावी आली होती.

राधा सर्व भावंडात मोठी होती. त्यामुळे बारावीनंतर वडिलांनी तिचं लग्न करून टाकलं. नवऱ्याच्या घरी गेल्यावरही आपण शिक्षण पूर्ण करू असं भाबडं स्वप्नं बघत ती बोहल्यावर चढली. पण नवऱ्याला तिच्या शिक्षणात अजिबात रस नव्हता. तिथल्या एकूण सर्व वातावरणाची कल्पना येताच राधानं डॉक्टर होण्याच्या आपल्या स्वप्नाला तिलांजली दिली. नवरा, सासरचं घर अन् संसार यातच रमण्याचा ती प्रयत्न करू लागली.

तिच्या लग्नानंतर लगेचच सासरे गेले अन् तिचा मुलगा तीन वर्षांचा होतोय तोवर नवराही एका अपघातात दगावला. राधावर म्हातारी सासू अन् लहानग्या मुलाची जबाबदारी आली. वैधव्यानं ती एकदम खचली. पण तरीही तिनं धीर न सोडता नवऱ्याचा व्यवसाय कसाबसा सांभाळायला सुरूवात केली. अनुभव नव्हता, तरीही घर चालवण्याइतपत पैसे ती मिळवू शकली.

नवऱ्यालाही कुणी नातलग नव्हते. त्यामुळे सासरी मार्गदर्शन किंवा आधार देणारं कुणीच नव्हतं. पण राधानं परिस्थितीशी व्यवस्थित झुंज दिली. मुलाला उत्तम शिक्षण मिळेल याची दक्षता घेतली.

तिच्या त्या कष्टाचं फळ म्हणून मधुकर आज आयआयटीतून इंजिनियर झाला असून अहमदाबादच्या प्रसिद्ध कॉलेजमधून एम.बी.ए. पण झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत तो खूप वरच्या पोस्टवर काम करतोय. मुलाच्या यशानं राधा हरखली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अन् तेजच तिची यशोगाथा सांगत होतं. आम्हालाही तिचा आनंद खूप सुखावत होता. आता तिला सुखाचे दिवस आले ही खात्री वाटत असतानाच ती वृद्धाश्रमात राहते अन् तेही मुलाच्या लग्नाला जेमतेम वर्षंच होतंय, तेवढ्यात…ही गोष्ट पचनी पडत नव्हती.

माझ्या लेकीला माझी घालमेल लक्षात आली, ‘‘काय झालंय आई? राधामावशी गेल्यापासून तुझं लक्ष लागत नाहीए कशात?’’ तिनं विचारलं.

‘‘अगं माझ्या मनात येतंय की हल्ली शिक्षण इतकं विचित्र झालंय की माणूस पैसे तर खूप कमवतो पण त्याला नात्यागोत्यांची, माया ममतेची किंमत राहात नाही. मोठ्यांना, निदान आईवडिलांना तरी मान द्यावा, त्यांना समजून घ्यावं, एवढीही शिकवण त्यांना मिळत नाही. मग इतक्या डिग्यांचा उपयोग काय?’’

‘‘मम्मा, अगं तू नेहमी तुमच्या वेळचे संस्कार अन् संस्कृतीबद्दल बोलत असतेस, पण तू हे का विसरतेस की काळानुरूप प्रत्येक गोष्टच बदलत असते. तशा या गोष्टीही बदलतीलच ना? आजचं शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यापुरतंच मर्यादित झालंय, ती नोकरी मिळवण्यासाठी जर तेवढाच एक पर्याय किंवा उपाय म्हण, जर शिल्लक असेल तर माणूस मुल्य जपत बसेल की जगण्यासाठी प्रयत्न करेल? सॉरी मम्मा, तुला आवडायचं नाही माझं बोलणं, पण ही वस्तुस्थिती आहे.’’

शिक्षक तरी काय करतील? पालकांना वाटतं की शिक्षकांना भरपूर फी दिली की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या ध्येयाकडे पोहोचवायला हवं. पालकच जर पाल्यांच्या जीवनमुल्यांविषयी असे उदासीन असतील तर शिक्षकांनाही वाटतंच, खड्ड्यात गेले ते संस्कार अन् खड्ड्यात गेली ती संस्कृती. पालक ज्यासाठी पैसे देताहेत तेवढंच करूया. आता हीच विचारसरणी इतकी फोफावली आहे की जीवनमूल्य, आदर्शवाद, देशाभिमान वगैरे गोष्टी बोलणारा किंवा आचरणात आणणारा मूर्ख आणि हास्यास्पद ठरतो. नातीगोती जपणं म्हणजे ‘विनाकारण वेळ घालवणं’ असंच त्यांना वाटतं. कारण आईवडिल तरी मुलांसाठी वेळ कुठं देतात? त्याच्यासाठी पैसा कमावायचं हेच त्यांचंही उद्दिष्ट असतं ना?

म्हणजे आईवडिलच मुलांच्या समोर पैसा कमवणं, प्रतिष्ठा मिळवणं, पॉवर मिळवणं हे आदर्श ठेवत असतात. आईवडिलांना आपला मुलगा फक्त पहिला यायला हवा असतो. त्याची मानसिक भावनिक भूक असते, त्याला प्रेम, प्रोत्साहन अन् प्रेमळ सहवास हवा असतो हे त्यांच्या लक्षातच आलेलं नसतं. तुझ्यासाठी आम्ही इतका खर्च करतोय, आम्हाला कधी असा पैसा बघायलाही मिळाला नव्हता. ऐपतीपेक्षा जास्त खर्च फक्त तुझ्या भल्यासाठी करतोय. असं सतत त्या मुलावर ठसवतात. एक प्रकारे मुलावर ते दडपणंच असतं.

कित्येकदा आईवडिलांच्या या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा मुलं पूर्ण करू शकत नाहीत अन् निराश होतात, आत्महत्त्या करतात. कधी कधी आई वडिलांचाच खून करतात. त्यांना अपयशाला सामोरं जाणं आईवडिल शिकवतच नाहीत. हल्ली तर मुलीही करिअरच्या मागे आहेत. त्यांना नवरा, संसार, मुलबाळ अशी जबाबदारीही नको वाटते. कारण त्यामुळेच त्या करियरवर लक्ष केंद्रित करू शकतात.

लहानपणापासून मुलाला आपण वेगळी ट्रीटमेंट देतो. त्याचा अहंकार जोपासून त्याला समर्थ पुरूष करण्याचा प्रयत्न करतो. त्याला लग्न झाल्यावर घर, संसार, बायको, मुलांकडे दुर्लक्ष करून करियर करायला मुभा असते. पण मुलींच्या बाबतीत आपण वेगळेच वागतो. हल्ली मुलीही मुलांच्या बरोबरीनं सगळं करायला बघतात अन् नात्यात प्रेम न राहता शत्रुत्त्व येतं. पण दोष फक्त मुलांचाच असतो का? मुळात, खरं तर, अप्रत्यक्षपणे आई वडिलच यासाठी दोषी ठरतात,’’ नेहा म्हणाली.

‘‘बोल ना, अजूनही बोल. गप्प का झालीस? ‘‘नीतिमत्तेला तिलांजली द्या अन् सुखोपभोगात लीन व्हा. पैसा, पैसा, पैसा मिळवा अन् संसार विसरा…हेच का तुला शिकवलंय मी? मधुकरनं आपल्या सुखाचा विचार करून आईला वृद्धाश्रमात पाठवलंय, तूही पुढे तशीच वागशील कारण मधुकर पूर्वी तुझा पक्का मित्र होता…’’ मी चिडून बोलले.

‘‘आई, अगं अजून माझं शिक्षण पूर्ण होतंय, तू माझ्या पुढल्या आयुष्याशी कशाला भांडते आहेस? मला कळतंय, राधामावशी वृद्धाश्रमात राहतेय ही बाब तुला खूपच खटकते आहे. तुझ्या दृष्टीनं मधुकर अपराधी आहे. पण मी मधुकरला ओळखते. राधामावशीच तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहे. मुलांच्या वागण्यात, त्यांच्या यश किंवा अपयशात आईवडिलांच्या विचारसरणीचा आणि त्यांना वाढवताना घडणाऱ्या घटनांचा प्रभाव दिसून येतो हे तुलाही मान्य आहे ना? राधामावशीला कायम वाटायचं की मधुकरनं नेहमी पहिला नंबर मिळवायला हवा. तो इतका, इतका उंच जायला हवा की इतर कुणी त्याच्या जवळपासही पोहोचता कामा नये. तिनं त्याला कायम नातेवाईकांपासून, मित्रमंडळींपासून तोडलं. दूर ठेवलं, कारण अभ्यासात व्यत्यय नको. पण तिला सर्वांकडून…म्हणजे नातलग अन् मित्रमंडळीकडूनही हेच ऐकायचं असायचं की ‘हा बघा राधाचा मुलगा…राधानं नवऱ्याच्या मागे एकटीनं वाढवलं त्याला…बघा तो किती मोठा झालाय…कुठल्या कुठं पोहोचलाय…खरंच कौतुक आहे हं राधेचं अन् तिच्या मुलाचंही.’

तुला आठवतंय ना मम्मा, जेव्हा यमुनाबाई म्हणजे राधामावशीची सासू, मधुकरची आजी शेवटच्या घटका मोजत होती, तेव्हा तिचा प्राण फक्त मधुकरच्या भेटीसाठी तळमळत होता. एकदा, फक्त एकदाच तिला तिच्या नातवाला, तिच्या मृत मुलाच्या एकुलत्या एका वारसाला बघायचं होतं. ती पुन्हा पुन्हा ‘त्याला बोलावून घे’ म्हणून राधामावशीला गळ घालत होती, पण राधामावशीनं शेवटपर्यंत त्याला आजीच्या आजारपणाची, तिच्या अंतिम समयाची बातमी लागू दिली नाही, कारण तो त्यावेळी दिल्लीला आयआटीच्या परीक्षेच्या तयारीत गुंतला होता. प्रश्न फक्त दीड दिवसाचा होता. विमानानं आला असता अन् आजीला भेटून निघून गेला असता. पण राधामावशीनं त्याला अभ्यासात डिस्टर्ब नको म्हणून काही कळवलंच नाही. खरं तर मधुकरचा आजीवर खूप जीव होता. आजीसाठी तो नक्कीच आला असता. इतका हुशार होता की तेवढ्या एकदीड दिवसाचा अभ्यास त्यानं कधीच भरून काढला असता. पण राधामावशीनं हटवादीपणा केला अन् यमुनाबाई ‘नातवाला बघताही आलं नाही,’ ही खंत घेऊनच वारल्या. त्या गेल्यानंतरही मधुकरला कळवलं नव्हतं.

आयआयटीत निवड झाल्यावर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला आजी निवर्तल्याचं समजलं…किती रडला होता तो त्यावेळी. त्यानं आईला खूप दोषही दिला पण राधामावशी आपलं चुकलं हे मान्यच करेना. मी केलं ते बरोबरंच होतं, त्यामुळेच तू आयआयटीत निवडला गेलास हेच ती घोकत होती. अभ्यास, करिअर यापुढे आजी, आजीची इच्छा किंवा प्रेम याला काहीच महत्त्व नाही, हेच तिनं मधुकरला अप्रत्यक्षपणे शिकवलं ना? आता तो आईकडे लक्ष न देता करिअरच्या मागे लागलाय तर त्याचं काय चुकलं?

लहानपणापासून मधुकरनं आईचं ऐकलं. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. तनमनानं तो अभ्यास करत होता. आईच्या इच्छेला मान देताना त्यानं आपली आवड, इच्छा बाजूला ठेवल्या होत्या. त्याची फक्त एकच इच्छा होती ज्या मुलीवर त्याचं प्रेम आहे, तिच्याशी त्याला लग्न करू द्यावं.

पण राधामावशीनं तिथंही हटवादीपणा केला. कारण तिला सून तिच्या मुलासारखीच हुशार अन् मोठ्या पगाराची नोकरी असणारी हवी होती. मधुकरचं जिच्यावर प्रेम होतं तिचं अजून शिक्षण संपल नव्हतं. स्वत:ची महत्त्वकांक्षा राधामावशीला मुलाच्या प्रेमापेक्षाही मोठी वाटली. मधुकरची इच्छा तिनं साफ धुडकावून लावली. तिचे शब्द होते, ‘माझ्या मखमलीला मला गोणपाटताचं ठिगळ नकोय.’ तिनं जीव देण्याची धमकी दिली अन् तिच्या आवडीच्या, तिनं पसंत केलेल्या मुलीशीच मधुकरला लग्न करावं लागलं.

राधामावशीच्या मते, तिनं मुलाचं भलं केलं. त्याला साजेशी बायको मिळवून दिली. आज परिस्थिती अशी आहे की सून अन् मुलगा, दोघंही कामाच्या ओझ्याखाली दबली आहेत. ऑफिसच्या कामासाठी कधी मधुकर महिना महिना परदेशी असतो तर कधी सून…कधीकधी दोघंही. आता त्यांना एकत्र राहायला वेळ नाही. एकमेकांसाठी वेळ नाही. कसला संसार, कसली मुलंबाळं. अशात ती दोघं राधामावशीकडे कधी बघणार अन् कधी तिची काळजी घेणार? दोघांनाही आपली नोकरी, आपलं करिअर, आपली प्रमोशन्स सोडवत नाहीएत. मधुकरची बायको रश्मी तशी चांगली आहे, पण ती करिअर सोडणार नाही. हे तिला तिच्या आईवडिलांनीच शिकवलंय. ते तिच्या लहानपणापासून डोक्यात भरवलं गेलंय की ती मुलापेक्षा कमी नाही. लोकांना मुलगा हवा असतो, पण मुलगीही तेवढीच कर्तबगार असते.

जग कितीही बदलू दे मम्मा, पण कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं आपसातलं अंडरस्टॅडिंग. एकमेकांना समजून घेणं. एखादी गोष्ट माझ्या नजरेतून मला बरोबर वाटत असली तरी तुझ्या नजरेतून ती तशीच असेल असं होत नाही. तुला नाही वाटत की राधामावशीनं तिची प्रत्येक इच्छा मधुकरवर लादली म्हणून? तिच्या दृष्टीनं ते योग्य असेलही, पण मधुकरच्या दृष्टीनं ते बरोबर नव्हतं, मधुकर राधामावशीच्या इच्छेप्रमाणे घडला पण आज तो तिला खरं तर दुरावलाच आहे. त्याचं प्रेम जिच्यावर होतं तिला तो अजून विसरू शकला नाहीए.’’

नेहाचं बोलणं ऐकून मी खरं तर सुन्न झाले होते. खरोखर आपण मुलांना माणूस म्हणून वागवत नाही. त्याचं फक्त मशीन करून टाकतो अन् मग माणुसकी, संस्कृती वगैरे महान गोष्टींची अपेक्षा करतो.

एकाएकी मी दचकले. मी नेहाच्या डोळ्यांत बघत विचारलं, ‘‘मधुकरचं तुझ्यावर प्रेम होतं?’’

मनातली वेदना लपवण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा बांध फुटला अन् ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली. मी पश्चात्ताप करत होते, माझ्या मुलीचं मन मला तरी कुठं कळलं होतं?

खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे. मुलांवर आपल्या अपेक्षा लादायच्या की त्यांना हवं तसं घडू द्यायचं? परदेशातला पैसा किंवा इथंच भरपूर पगार, मोठा बंगला किंवा फ्लॅट, सुखासीन आयुष्य एवढंच महत्त्वाचं आहे की जीवनमूल्यही जपता येणं गरजेचं आहे. नातेसंबंधातून येणारी प्रेमाची जबाबदारी, कर्तव्याची जाणीव, त्यातून मिळणारा आधार आणि सुरक्षितपणाची भावना हे सगळंही महत्त्वाचं असतं ना? खरोखर आमचंही चुकतंच…मी नेहाला जवळ घेत म्हटलं, ‘‘आमच्याकडून फारच मोठी चूक घडली आहे. त्यामुळे तुझं अन् मधुकरचं आयुष्य…खरं तर तुम्ही विनाकारण शिक्षा भोगता आहात. पण आता घडून गेलं ते विसरून तुला पुढं जायला हवं. तुला अजून कुणी चांगला जोडादार भेटेल. एकच सांगते यापुढे प्रत्येक क्षणी मी तुझ्याबरोबर आहे…’’

ते खरंच होतं का?

कथा * गरिमा पाठक

श्रेयानं कपाट आवरायला घेतलं होतं. ड्रॉव्हर स्वच्छ करताना तिला एका डबीत विपुलनं दिलेली खड्याची अंगठी दिसली. तिला विपुलला विसरायचं होतं. त्याची कुठलीही आठवण नको होती. वरवर कितीही प्रयत्न केले तरी मनाच्या तळाशी दडून बसलेली आठवण अशा काही प्रसंगांमुळे उसळून वर यायचीच. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं, त्यानंच आयुष्यातलं सगळ्यात जास्त दु:ख दिलं.

तिच्या सत्ताविसाव्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीचा दिवस. त्याच दिवशी विपुल अन् नेहा, तिची धाकटी बहीण, दोघांनाही तिनं गमावलं होतं.

ज्या बहिणीसाठी ती नेहमीच ढाल बनून उभी असायची. तिनेच श्रेयाच्या विपुलला तिच्यापासून हिसकावलं होतं. आई गेल्यानंतर तिनं नेहाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. ती विपुलला नेहमी म्हणायची, ‘‘नेहा माझी बहीण नाही, मुलगी आहे. तिला मी फुलासारखी जपते. तिला मी दु:खी अवस्थेत बघूच शकत नाही,’’ त्याच बहिणीनं श्रेयाला डोंगराएवढं मोठं दु:ख दिलं होतं. त्यातून बाहेर पडताना श्रेयाला किती कष्ट झाले होते.

तिचं मन कडू आठवणींनी विपष्ण झालं. विपुलची आठवण आली की नेहमीच असं व्हायचं.

‘‘श्रेया…,श्रेया…कुठं आहे, तू?’’ ज्ञानेश्वरच्या तिच्या नवऱ्याच्या हाकांनी ती भानावर आली.

श्रेया खोलीबाहेर येताच ज्ञानेश्वरनं म्हटलं, ‘‘आज आपल्याला नमनकडे जायचंय, विसरलीस का?’’

‘‘खरंच की! मी विसरलेच होते…मी आवरते हं लवकरच!’’?श्रेयानं म्हटलं. ती भराभर आवरू लागली. आरशासमोर मेकअप करताना तिनं स्वत:लाच दटावलं, ‘‘इतकी का ती आहारी जातेस जुन्या आठवणींच्या? विपुल गेला सोडून तर जाऊ देत ना? आपणही त्याला विसरायला हवं. असं रडत बसून कसं चालेल? तुला ज्ञानेश्वरसारखा भक्कम आधार मिळाला आहे ना? झालं तर मग!’’

ज्ञानेश्वरबद्दल तिच्या मनात अपार आदर दाटून आला. किती प्रेम करतो तो श्रेयावर. ती त्याच्या आवडीची निळी साडी नेसली. त्यावर शोभणारे दागिने व सुंदरसा अंबाडा घालून ती समोर आली, तेव्हा ज्ञानचे डोळे आनंदानं चमकले. पसंतीचं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. मुलगा सौरभ, ज्ञान व ती असे तिघं खूपच दिवसांनंतर एकत्र बाहेर पडले होते. सौरभची लाडीक बालसुलभ बडबड ऐकत असताना श्रेयाच्या मनावरचं मळभ सहजच दूर झालं. नमनकडे त्याच्या मुलाचा साखरपुडा होता. खूपच आनंदी अन् उत्साहाचं वातावरण होतं. श्रेया त्या वातावरणात मुक्तपणे वावरली अन् तिनं ज्ञानसोबत डान्सही केला.

तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. वळून बघते तो एक वयस्कर स्त्री होती. श्रेयाच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. ती भयचकित नजरेनं तिच्याकडे बघू लागली.

ती स्त्री विपुलची आई होती. त्यांच्या डोळ्यात पूर्वीप्रमाणेच वासल्य होतं. अचानक त्यांना बघून श्रेयाला काहीच सुधरेना अन् मग एकाएकी त्या स्त्रीला मिठी मारून श्रेया गदगदून रडू लागली. मनातल्या भावना अश्रूवाटे व्यक्त झाल्या.

त्या बाई तिला हळूवारपणे थोपटत होत्या जणू तिची वेदना, व्यथा त्यांना कळत होती. श्रेया प्रथमच अशी व्यक्त झाली होती. खरं तर श्रेयानंच त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांच्याशीच नाही तर विपुलशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्रत्येत आठवणीशी तिनं फारकत घेतली होती. तिला कुठूनही विपुलशी, त्याच्या नावाशी संपर्क नको होता. पण आज विपुलची आठवण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती.

एकाएकी ती भानावर आली. हे काय करतेय ती? का अशी कुणापुढे हतबल होतेय? जुन्या आठवणीत गुंतायचं नाहीए तिला.

ती झटकन् त्यांच्यापासून दूर झाली. समोर ज्ञान उभा होता. ती अश्रू लपवत तिथून निघून वॉशरूममध्ये शिरली. ज्ञान विपुलच्या आईबरोबर बोलत होता.

परतीच्या वाटेवर श्रेया अभावितपणे विपुलचाच विचार करत होती. तिचं मन तडफडत होतं, ज्या विपुलसाठी सगळं जग सोडायला तयार होती, त्यालाच आयुष्यातून वजा करून ती जगत होती. मस्ती करून, पक्वान्नांवर ताव मारून सौरभ झोपला होता. ज्ञान सावधपणे गाडी चालवत होता.

रात्रभर श्रेया प्रयत्न करूनही विपुलच्या आठवणींमधून स्वत:ला मुक्त करू शकली नाही. जुने क्षण, जुने प्रसंग डोळ्यांपुढे उभे राहत होते. हातात हात घालून त्यांनी दोघांनी भविष्याची सोनेरी स्वप्नं रंगवली होती. किती गुजगोष्टी करत बसायची ती दोघं. विपुल शांत, समजूतदार होता.

आजपर्यंत श्रेयाला कळलं नाहीए की त्याची अन् नेहाची इतकी सलगी कधी अन् केव्हा झाली…विपुलनं नेहासाठी श्रेयाला दूर लोटलं. दुधातल्या माशीप्रमाणे आयुष्यातून काढून टाकलं.

श्रेयाचा विपुलवर किती विश्वास होता. तो तिचा विश्वासघात करेल असा स्वप्नांतही विचार केला नव्हता. तिनं आणि तिची लाडकी बहीण नेहा…तीही अशी वागेल याची तरी कुठं कल्पना होती तिला. नेहा कॉलेजच्या फायनल ईयरला होती. तिचं इंग्रजी थोडं कच्चं होतं. श्रेयानंच विपुलला म्हटलं होतं की नेहाला जरा अभ्यासात मदत कर. आपण आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारतोय हे तेव्हा श्रेयाला समजत नव्हतं.

त्या दिवशी कॉलेजमधून थकून भागून आलेली नेहा भयंकर काळजीतही होती. एकाएकी श्रेयाला मिठी मारून ती जोरजोरात रडायला लागली. पाठोपाठ विपलुही घरात आला. श्रेयानं त्याला बसायची खूण केली अन् ती नेहाला थोपटून शांत करू लागली. तेवढ्यात विपुल म्हणाला, ‘‘श्रेया, तुझ्याशी जरा बोलायचं आहे.’’

‘‘बोलूयात आपण, पण आधी जरा नेहाला शांत करू देत…नेहा, काय झालंय? का रडतेस?’’

‘‘मी कारण आहे तिच्या रडण्याचं,’’ विपुलनं सांगितलं.

‘‘म्हणजे?’’

श्रेयाला काहीच कळेना.

‘‘म्हणजे माझ्यामुळेच नेहा रडतेय.’’

‘‘काय बोलतो आहेस, मला काहीच कळत नाहीए.’’ श्रेयाला अजुनही उलगडा होत नव्हता.

‘‘मला ठाऊक आहे श्रेया, तुला समजायला हे कठीण आहे, पण मला समजून घे. माझा अगदी नाईलाज आहे. मी नेहाच्या प्रेमात पडलोय…मला हिच्याशीच लग्न करायचंय. मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही.’’

‘‘काय?’’ श्रेया केवढ्यांदा किंचाळली. ‘‘तू? तू नेहावर प्रेम करतो आहेस? अन् मग मी माझ्यावर प्रेम करत होतास ना? की ती एक फालतू गोष्ट होती? मनोरंजन, वेळ घालवण्यासाठी एक पोरखेळ नाही विपुल, नाही, माझा यावर विश्वास बसत नाहीए.’’

ती वळली. तिनं लगेच नेहाचे खांदे धरून तिला विचारलं, ‘‘नेहा, विपुल काय म्हणतोय? काय आहे हे सगळं? तो खोटं सांगतोय ना? तू खरं खरं सांग…नेहा सांग!!’’

‘‘ताई, अगं, मला ठाऊक नाहीए…माझ्या आयुष्यात काय लिहिलंय ते…मी तुला काय सांगू?’’

‘‘फक्त एवढंच सांग की तू आणि विपुल एकत्र आयुष्य घालवणार आहात का? विपुल म्हणाला ते खरं आहे का?’’

नेहानं मान खाली घातली अन् होकारार्थी हलवली. आता श्रेयाकडे विचारण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं काहीच नव्हतं. डोक्यावर धाडकन् काही पडावं तसं वाटलं तिला. ती तिथून उठली अन् आपल्या खोलीत जाऊन अश्रूंना वाट करून दिली.

त्यानंतर विपुल कधी श्रेयासमोर आलाच नाही. त्यानं श्रेयाच्या बाबांजावळ नेहाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा घरात वादळच उठलं. घरात श्रेया अन् विपुलच्या लग्नाची तयारी चालू होती अन् इथं मात्र वेगळंच घडलं होतं. घरात आधी वादळ अन् मग त्या नंतरची शांतता भरून होती.

श्रेयाला तर काय करावं, कसं वागावं समजत नव्हतं. विपुलनं लग्नाला परवानगी देत नाहीत म्हणताना नेहाला घेऊन गावच सोडलं…तो लांब कुठं तरी निघून गेला, कुठं गेला हेही फारच कमी लोकांना ठाऊक होतं.

श्रेयाच्या घरच्यांनी विपुल अन् नेहाशी संबंधच तोडले. विपुलनंही परत कधी विचारपूस केली नाही…श्रेयाची प्रेमकहाणी तिचं आयष्य उद्ध्वस्त करून संपली.

काही दिवस सगळ्यांचेच विचित्र अस्वस्थतेत गेले. हळूहळू पुन्हा आयुष्य पूर्वपदावर आलं. घरच्यांनी स्थळं बघायला सुरूवात केली अन् ज्ञानेश्वर सगळ्यांना पसंत पडला. आयुष्याचा डाव पुन्हा मांडण्यासाठी श्रेयाला स्वत:शीच खूप झगडावं लागलं. तिनं ज्ञानशी लग्न केलं पण मनातून पहिलं प्रेम जात नव्हतं. ती मोकळेपणानं ज्ञानला साथ देऊ शकत नव्हती. ज्ञानही समजूतदार होता. त्यानं श्रेयाला समजून घेतलं. सौरभचा जन्म झाल्यावर श्रेयाला आयुष्यात पुन्हा रस वाटू लागला.

सगळी रात्र जुन्या आठवणींच्या आवर्तात गेली. सकाळी उठली तेव्हा श्रेयाचं डोकं जड झालेलं होतं. कशीबशी कामं आटोपत होती. सौरभ शाळेला अन् ज्ञान ऑफिसात गेल्यावर थोडा वेळ झोपावं असा तिनं विचार केला होता. बारा वाजून गेले होते. आता आडवं व्हावं असा विचार करत असतानाचा दराची घंटी वाजली. थोडं वैतागूनच तिनं दार उघडलं अन् ती चकित झाली.

समोर विपुल उभा होता. दमलेला, थकलेला, त्रासलेला…आजारी दिसत होता. क्षणभर श्रेयाला ओळखता आलं नाही. काळे केस पांढरे झाले होते. तजेलदार रंग फिकटला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं…

श्रेयाला अवघडल्यासारखं झालं, ‘‘तू…इथं? तू माझ्याकडे कशाला आला आहेस विपुल? मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीए.’’

‘‘खरंय श्रेया, पुन्हा नाही मी येणार…फक्त हे पत्र तुला द्यायला आलो होतो.’’ हातातलं पाकिट तिला देत तो बोलला. त्याचे डोळे भरून आले होते. पत्र तिला देऊन तो त्वरेनं निघून गेला.

श्रेया अवाक् होऊन काही वेळ तिथंच उभी होती. ज्या व्यक्तिला क्षणभरही आठवायचं नाही असं तिनं ठरवलेलं असतानाच तिच व्यक्ती तिच्या दारी आली होती. तिच्या नकळत तिच्या मनात इच्छा होती की ज्यानं तिला दुखावलं त्यालाही कधी सुख मिळू नये. पण आज त्याला अशा अवस्थेत, डोळ्यांत अश्रू घेऊन उभा असलेला बघून तिला गलबलून आलं. ती दारातून घरात आली. एक दीड तास काहीच न सुचून वेड्यासारखी या खोलीतून त्या खोलीत फिरत होती. शेवटी धाडस करून तिनं ते पाकीट उघडलं. हात थरथरत होते. बहिणीचं अक्षर बघून तिला त्या पत्राचा मुका घ्यावासा वाटला…पण दुसऱ्याच क्षणी तिरस्कार उफाळून आला. तिनं पत्र वाचायला सुरूवात केली.

‘‘ताई, क्षमा मागायचा हक्क नाहीए मला, तरी क्षमा मागतेय…हे पत्र तुला मिळेल तोपर्यंत कदाचित मी या जगातून गेलेली असेन. इतके दिवस काही गोष्टी आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. पण आता खरं काय ते सांगते म्हणजे मी मरायला मोकळी.’’

‘‘ताई, माझं विपुलवर किंवा विपुलचं माझ्यावर प्रेम नव्हतं…नाहीए…विपुल फक्त तुझेच आहेत. तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे त्यांचं अन् म्हणूनच तुझ्या लाडक्या बहिणीचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी आपली आहुती दिली…माझ्याशी लग्न केलं. ताई कुणा एका नराधमानं मला नासवलं. त्या प्रकारामुळे मी फार कोलमडले होते. तरीही मी त्याला लग्नाची गळ घालणार होते, पण त्यापूर्वीच एका अपघातात तो मरण पावला. मी सुटकेचा नि:श्वास सोडला, पण माझ्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता…मी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी मला तपासलं अन् सांगितलं की आता गर्भपात जिवावरचा ठरेल.

‘‘मी वेड्यासारखी रडत होते…काय करू सुचत नव्हतं. नेमके त्याचवेळी कुणा नातलगाला घेऊन विपुल डॉक्टराकंडे आले होते. त्या क्षणी ते भेटले नसते तर मी विष खाऊन जीव देणार होते. तसं ठरवलंच होतं, पण विपुलनं तुझी शपथ घालून खरं काय ते माझ्याकडून काढून घेतलं. मी खूप घाबरले होते. बाबांच्या इभ्रतीची काळजी होती. ते हार्ट पेशंट होते. त्यांना हार्ट अॅटक येऊ शकला असता. मी स्वत:ला क्षमा करू शकत नव्हते.

‘‘पण विपुलनं धीर दिला. यातून मार्ग काढू म्हणाले म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्या मुलाला त्यांचं नाव दिलं. इतक्या लांब बदली करून घेतली…माझ्या प्रेगनन्सीबद्दल कुणालाच काही कळू दिलं नाही.

मी विचार केला होता की सगळं व्यवस्थित पार पडलं की मी पुन्हा तुझ्याकडे येईन. खरं काय ते सांगेन. पण विपुलनं मला अडवलं. तुझं लग्न होईपर्यंत आम्ही थांबायला हवं. तुझ्या लग्नाबद्दल कळलं होतं. पण माझ्या येण्याचा अपशकुन नको म्हणून नाही आले…तुझ्यासमोर येण्याचं धाडसही नव्हतं.

‘‘ताई मला क्षमा कर. आयुष्य संपत आलंय माझं. एक गोष्ट अगदी खरी की माझी काळजी घेतली विपुलनं, माझ्या मुलाला स्वत:चं नाव दिलं, पण त्यांनी मला कधी स्पर्शही केला नाही. मलाही फक्त त्यांचा आधार मिळाला. ते तुझेच आहेत…जमल्यास माझ्या मागे त्यांची काळजी घे.’’

– तुझीच अभागी बहीण नेहा.

पत्र वाचता वाचता श्रेयाला रडू अनावार झालं. किती भोगलं बिचारीनं…अन् विपुल केवढा महान, किती त्याग केला त्यानं प्रेयसीच्या बहिणीसाठी…तिला भेटायला हवं…कुठं…कसं? विपुल तर केव्हाचाच निघून गेला होता.

अंथरूणावर पडून रडता रडता थकून तिला कधीतरी झोप लागली. पत्रं हातात तसंच होतं. तिला जाग आली तेव्हा ज्ञान ऑफिसातून परतला होता. चहा करून घेत होता. ती धडपडून उठली. तेवढ्यात चहाचे कप घेऊन ज्ञानच खोलीच आला.

‘‘चहा घे…आपल्याला जरा बाहेर जायचं आहे,’’ तो गंभीरपणे म्हणाला.

‘‘सॉरी, मी नाही येऊ शकत…’’ ती थकलेल्या आवाजात म्हणाली.

‘‘श्रेया, नाही म्हणू नकोस. तुला यावंच लागेल.’’ ज्ञानच्या आवाजात जरब होती.

जायची तर अजिबात इच्छा नव्हती. कुठं जायचं तेही ठाऊक नव्हतं. पण न जाण्याचं कारण तरी काय सांगणार होती ती? मुकाटयानं आवरून गाडीत जाऊन बसली. ज्ञान न बोलता गाडी चालवत होता. एका मोठ्या हॉस्पिटलसमोर गाडी थांबवून ज्ञाननं म्हटलं, ‘‘श्रेया, तुझ्या बहिणीला भेटून ये.’’ त्याच्या आवाजात आता जरब नव्हती, कोवळीक होती.

‘‘काय म्हणताय तुम्ही?’’ दचकून श्रेयानं म्हटलं अन् तिला एकदम रडूच फुटलं.

तिला थोपटून शांत करत तो म्हणाला, ‘‘ही वेळ बोलत बसण्याची नाही. ताबडतोब नेहाला भेट.’’ त्यानं तिला आधार देऊन गाडीतून उतरवलं.

दोघंही जवळजवळ धावतच आत गेले. वॉर्डमधल्या बेडवर नेहा अखेरचे क्षण मोजत होती. खरं तर ज्या अपराधीपणाच्या भावनेनं तिचं आयुष्य व्यापलं होतं…त्यानंच कॅन्सरच्या दुखण्याला जन्म दिला होता.

श्रेयाला बोलवत नव्हतं, पण तिचा स्पर्श होताच नेहानं डोळे उघडले…श्रेयाला बघताच तिने टाहो फोडला.

‘‘ताई, मला क्षमा कर…मी तुझी अपराधी आहे.’’

‘‘नको गं असं बोलू..दोष तुझा नव्हता, तुझ्या नशिबाचा होता. स्वत:ला दोषी मानू नकोस.’’

‘‘मी आता वाचणार नाही ताई, तुला भेटायलाच जीव अडकला होता. फक्त विपुलना क्षमा कर.’’ तिनं शेजारी उभ्या असलेल्या विपुलचा हात श्रेयाच्या हातात दिला. विपुलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. दाटलेल्या कंठानं श्रेयानं म्हटलं, ‘‘नेहा, विपुलची तर काही चूकच नाहीए. त्यानं तर स्वत:ची आहुती दिली आहे. मी कोण त्याला क्षमा करणार?’’

नेहाच्या चेहऱ्यावर संतोष झळकला. बराच वेळ श्रेया नेहाचा हात हातात घेऊन बसली होती.

डॉक्टरांनी उपचार संपल्याचं सांगून टाकलं होतं. काही तास फार तर नेहानं काढले असते. ज्ञानेश्वनंही नेहाच्या माथ्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला. विपुलशी हस्तांदोलन करून त्यानं श्रेयाला निघायची खूण केली.

किती वर्ष मध्ये गेली. लाडकी धाकटी बहीण शेवटी का होईना भेटली. मनातलं किल्मिष नाहीसं झालं. विपुलचा मोठेपणा प्रत्ययाला आला…आता मनात राग, चीड, तिरस्कार काहीही नव्हतं. फक्त प्रेम अन् प्रेमच होतं.

पण त्याच क्षणी तिला ज्ञानेश्वरचा मोठेपणाही आठवला.

‘‘ज्ञान, तुम्हाला कसं समजलं, नेहा इथं आहे?’’

‘‘अगं, तू रडता रडता झोपली होतीस, मी घरात आलो तेव्हा पत्र तुझ्या हातात होतं. मी ते वाचलं…मलाही फार वाईट वाटलं…तुझी व नेहाची भेट तर व्हायलाच हवी…मला एकदम विपुलची आई आठवली. नमनकडच्या पार्टीत त्या भेटल्या होत्या…मी त्यांचा मोबाइल नंबर घेऊन ठेवला होता. मी त्यांना फोन केला…त्यांच्याचकडून हॉस्पिटलचा पत्ता मिळाला.’’

श्रेयाच्या मनात ज्ञानबद्दल अपार आदर आणि कृतज्ञता दाटून आली. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं म्हटलं, ‘‘तुमचे उपकार कसे फिटतील…किती चांगले आहात तुम्ही…’’

‘‘माझे नाही, विपुलचे उपकार मानले पाहिजेत नेहा, त्यानं खरोखर फार मोठा त्याग केलाय. त्याला सांभाळणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्याला एकटा पडू द्यायचं नाही. आपल्या घराशेजारीच एखादं घर घेता आलं तर आई, विपुल अन् नेहाचा मुलगा आपल्या सोबतीनं राहू शकतील.’’

‘‘ज्ञान, किती मोठं मन आहे तुमचं…माझं भाग्य म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात…माझं अन् विपुलचं नातं जेवढं मला समजलं नव्हतं, तेवढं तुम्ही समजून घेतलंत…माझी मन:स्थिती जाणून घेऊन नेहाशी माझी भेट घडवून आणलीत. नेहाच्या मृत्युनंतर विपुल किती एकटा पडेल हेही तुम्हालाच समजलं. खरोखर तुम्ही थोर आहात. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले…मला क्षमा करा.’’ श्रेया भरल्या गळ्यानं म्हणाली.

ज्ञाननं हसून तिला आश्वस्त केलं. सगळीच नाती आता स्पष्ट झाली होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें