कथा * आशा सराफ
आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेनं सूर्यही बेजार झाला असावा. म्हणून तो ढगांच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवासाच वाटतो.
संजनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडी फार ती भिजलीही, पण कुठं तरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. पाच वर्षं झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दु:खीही. आनंद राकेशबरोबर आहे म्हणून आणि दु:ख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून.
लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचं घर सोडतेच. पण तिला तर नातंच तोडावं लागलं होतं. पाच वर्षांत तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नाही.
लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्षं झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की दोन तरूण मुलं तिच्या पाठी आहेत. पाठलाग करताहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची. पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन अन् ही दोन उनाड मुलं…तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन् स्कूटी थांबवली.
‘‘काय प्रॉब्लेम आहे मॅडम?’’ एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला.
‘‘जरा बघा बरं, चालताना अडकतेय सारखी…काय झालंय कुणास ठाऊक,’’ प्रश्न विचारणाऱ्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळच थांबली होती.
‘‘मॅडम, स्कूटीत काही दोष नाही,’’ स्कूटी चेक करून तो तरूण म्हणाला.
‘‘नीट बघा, चाकात काही दोष असेल…’’ ती वेळकाढूपणा करत होती. ती दोन मुलं जाण्याची वाट बघत होती.
तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरूण म्हणाला, ‘‘चाकंही व्यवस्थित आहेत.’’
‘‘तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना? माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर?’’ ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिनं सुटकेचा नि:श्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला.
‘‘किती पैसे द्यायचे?’’
‘‘काहीच नाही…पैसे नाहीच द्यायचे.’’ तो तरूण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला.
‘‘ठिकाय…’’ घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोहोचली अन् अवचित ती दोन्ही पोरं स्कूटरसमेत तिच्यासमोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्द निघेना…ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली.
‘‘मॅडम, तुमची पर्स…तुम्ही विसरला होता.’’ अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना दचकली तशी ती मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला.
ती मुलं पळाली अन् भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली, ‘‘पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना?’’
‘‘होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं म्हणूनच मी इथवर आलो.’’
‘‘धन्यवाद! तुम्ही वाचवलंत मला.’’
‘‘आता गप्पा नंतर. आधी लवकर चला. नाही तर पेपरला उशीर होईल.’’
‘‘तुम्हाला कसं कळलं, माझा पेपर आहे ते?’’
‘‘नंतर सगळं सांगतो. चला लवकर…’’ त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला.
परीक्षा संपेपर्यंत तो तरूण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता. पण जे काही होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता.
तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद! आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला, त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता.
‘‘धन्यवाद!’’ त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली.
‘‘तुम्ही कुणाला धन्यवाद देताय?’’ त्यानं हसून प्रश्न केला.
‘‘तुम्हाला?’’ कपाळावर आठ्या घालत तिनं म्हटलं.
‘‘धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझं नावंही घेतलं नाहीए.’’ हसत हसत त्यानं म्हटलं.
त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं.
‘‘ओह सॉरी,’’ ओशाळून संजनानं म्हटलं, ‘‘तुमचं नावं काय आहे?’’
‘‘राकेश.’’
‘‘बरं तर, राकेश, आता सांगा धन्यवाद कसे देतात?’’ संजना थोडी सावरून म्हणाली.
‘‘जवळच एक कॅफे आहे. तिथं कॉफी पिऊयात?’’ गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं.
संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रूबाबदार होता तो. स्वत:चं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला दोन धाकट्या बहिणीही होत्या.
पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्नं बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं.
वडील बिथरलेच. ‘‘ कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही, आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दळीद्री…काय बघितलंस तू?’’
‘‘बाबा, तो स्वभावानं खूप चांगला आहे.’’ मान खाली घालून संजनानं सांगितलं.
‘‘स्वभावाचं काय लोणचं घालाचंय? त्याच्या घरात तू एक दिवसही राहू शकणार नाहीस.’’ बाबांचा राग शांत होत नव्हता.
‘‘बाबा, मी राहू शकेन. मी राहीन.’’ हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली.
‘‘हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितलंय मी…पैसा नसला की दोन दिवसांत प्रेमाचे बारा वाजतात.’’
‘‘नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे.’’ संजनानं नम्रपणेच सांगितलं.
आईनं कसंबसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘‘हे बघ संजना, संसार असा होत नाही. आत्ता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील पण ते इतकं सोपं नसतं. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजुक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे, श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं. शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दु:खाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या दोघी बहिणींची लग्नं करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील?’’
बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण संजना अन् राकेशचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कंच होतं. पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं अन् राकेश ते तिला भरभरून देत होता.
पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या दोन हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते.
‘‘राकेश, कधी आलास?’’ त्याच्याकडे वळून तिनं विचारलं.
तिला बाहूपाशात घेत त्यानं म्हटलं, ‘‘मी तर सकाळपासून इथंच आहे.’’
‘‘चल, खोटं बोलतोस…’’ त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिनं म्हटलं.
‘‘तुझ्या हृदयाला विचार ना? मी कशाला खोटं बोलू?’’
संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती. पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता.
एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली…‘‘अरे ही तर पूनम…तिची धाकटी बहिण.’’
पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं, ‘‘ताई…’’ तिनं संजनाला मिठीच मारली.
‘‘कशी आहेस पूनम?’’ संजनाला एकदम भरून आलं.
‘‘तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघतेय तुला.’’
‘‘घरी सगळे बरे आहेत ना?’’ थोड्याशा संकोचानंच संजनानं विचारलं.
‘‘थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात.’’ पूनमननं संजनाला ओढतच तिथं नेलं.
कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली.
‘‘घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते.’’
‘‘कशाला खोटं बोलतेस? आई बाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना?’’ संजनाला एकदम रडू अनावर झालं.
‘‘नाही ताई, तसं नाहीए. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीकाय, जे व्हायचं ते होऊन गेलंय, आता त्याचं काय? तू कशी आहेस? भावजी कसे आहेत?’’
राकेशचा विषय निघताच संजना एकदम आनंदली.
‘‘राकेश खूप म्हणजे खूप चांगले आहेत.’’ तिनं अभिमानानं सांगितलं.
‘‘तुझ्यावर प्रेम करतात ना?’’ तिच्याकडे रोखून बघत पूनमनं विचारलं.
‘‘प्रेम? अगं त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरंच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं, म्हणून तर आज बँकेत ऑफिसर म्हणून रूबाबात राहतेय. स्वत:चा छोटासा फ्लट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखंच वागवलं मला. दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय अन् जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो…मला असा नवरा मिळाला हे माझं मोठंच भाग्य आहे पूनम.’’
‘‘खरंच ताई? खूप बरं वाटलं ऐकून.’’
‘‘माझ्या आयुष्यात दु:ख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे.’’ क्षणभर संजनाचा चेहरा दु:खानं झाकोळला, पण लगेच स्वत:ला सावरून तिनं म्हटलं, ‘‘ते सोड, तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत?’’
‘‘माझं सासर दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आलेय. छोटी चंदीगडला असते…पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.’’
वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरंच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही.
पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं.
संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं संजनाकडे बघितलं.
‘‘राकेश, हे माझे आईबाबा आहेत.’’ संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला.
‘‘खुशाल रहा. सुखी रहा.’’ बाबांनी तोंड भरून आशिर्वाद दिला. ‘‘पूनमनं संजनाबद्दल सांगितलं, आम्हालाही पोरीचं सुखंच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही. पण आता ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नकोय आम्हाला.’’ बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंडभरून आशिर्वाद दिले.
संजनाचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले, तेव्हा राकेश त्यांना पोहोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा, संजनानं म्हटलं, ‘‘कुठं गेला होतास?’’
‘‘अगं तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का?’’ तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं.
काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला.
त्यादिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं ती अतीव आनंदानं डॉक्टकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राइज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदानं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लानिंग करून ठेवलंय. ती घरी पोहोचली, तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. किती तरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातलं अक्षर राकेशचं होतं. पण राकेश असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना.
‘‘प्रिय संजना,
हे पत्र वाचून तुला खूप दु:ख होईल ते मला ठाऊक आहे. खरंतर मी तुला सोडून जाऊच शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाहीए. केव्हा येईन सांगता येत नाही पण येईन हे त्रिवार सत्य! गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वत:ची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे.
तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…
तुझाच राकेश.’’
प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेशुद्ध पडली.
काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, कुणालाच काही माहीत नव्हतं. नऊ महिने तिला कसेबसे काढले, तिलाच ठाऊक, नऊ महिने उलटले अन् तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. पाच वर्षं ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनंच ठरवलं होतं ते नाव.
सहा वर्षं उलटली. राकेश नाही, त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती.
एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा, तेव्हा असाच सुंदर वास दरवाळयचा. राकेश तिच्यासमोर खरोखरंच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं संजनावर उधळली अन् तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले.
‘‘कोण तू? मी तुला ओळखत नाही.’’
‘‘संजना…’’ चेहऱ्यावरचं तेच लाघवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर.
‘‘मेली संजना…इथं नाही राहत ती…’’
संजनाला भावना आवरत नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला अन् मग स्वत:च त्याला मिठी मारली.
‘‘कुठं गेला होतास तू?’’
‘‘दुबईला?’’ तिचे अश्रू पुसून तो म्हणाला.
‘‘दुबईला? कशाला?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.
‘‘पैसे मिळवायला.’’
‘‘न सांगता निघून जाण्याजोगं काय घडलं होतं?’’
‘‘मला तुला सुखात ठेवायचं होतं.’’
‘‘सुखासाठी पैसे लागतात? मी कधी मागितले पैसे? कधी तरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते.’’
‘‘नाही संजना, माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणंजाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरीबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस कारण तिथं सगळेच नातलग, परिचित, श्रीमंत असतात. ‘मला वेळ नाही, जमणार नाही, म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळं मला कळत होतं.’’
‘‘तुला आठवतंय, आईनं दिलेली निळी साडी…’’
‘‘ती ४०,००० ची?’’
‘‘हो. तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस, कशी दिसतेय?’’ खरं तर तू कायमच मला सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती…मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली…अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं. अन् मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलगांमध्ये ताठ मानेनं कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो?
‘‘एक दिवस एका मित्रानं म्हटलं तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय संजना, आता तू तुझ्या नातालगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठ्ठा बंगला, झगमगीत गॅरेज…सगळं सगळं देईन मी तुला.
‘‘अरे, पण निदान मला सांगून जायचंस?’’
‘‘सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस? तू तर हेच म्हणाली असतील, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नकोय, पण मी तुला गेल्या काही वर्षांत फारच फार दुखवलंय. तू म्हणशील ती, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण…प्लीज…संजना.’’ त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते.
तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामिटरवर ठेवलेल्या फोटोफ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं.
‘‘माझी मुलगी आहे.’’ संजनानं हात सोडवून घेत म्हटलं.
‘‘नाही, आपली मुलगी आहे.’’ त्यानं ठासून म्हटलं, ‘‘राशी नाव ठेवलं ना हिचं?’’ त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होतं.
‘‘तुला इतकी खात्री होती?’’ संजनानंच आता आश्चर्याने विचारले.
‘‘खरं तर माझ्यावर, स्वत:वर माझा जेवढा विश्वास नाहीए, तेवढा तुझ्यावर आहे संजना.’’ त्यानं मिठीत घेतलं.
खरोखर एकमेकांवर असं प्रेम अन् आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला येतो?