* कुसुम सावे
‘‘अरे वा आई, कानातले खूपच सुंदर आहेत. कधी घेतलेस? रंजोने आपली आई प्रभाच्या कानातल्या झुमक्यांकडे पाहत विचारले.
‘‘गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा सूनबाई अपर्णाने मला हे झुमके आणि तुझ्या वडिलांना घडयाळ दिले. तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही,’’ प्रभाने सांगितले.
डोळे विस्फारत रंजो म्हणाली, ‘‘वहिनीने दिले? अरे वा. त्यानंतर उसासा टाकत म्हणाली, मला तर तिने कधीच असे काही घेऊन दिले नाही. सासू-सासऱ्यांना मस्का मारत आहे. भरपूर मस्का लाव.’’ तिचे लक्ष कानातल्यांकडेच होते. ती म्हणाली, ‘‘कोणी का दिले असेना, पण आई मला तुझे झुमके खूपच आवडले.’’
आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा, त्यात काय मोठे? असे म्हणत प्रभाने लगेचच कानातून झुमके काढून रंजोला दिले. आपण दिलेले झुमके सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले, हे समजल्यावर अपर्णाला काय वाटेल? याचा विचार प्रभाने एकदाही केला नाही.
प्रभाने झुमके देताच रंजोने लगेचच ते स्वत:च्या कानात घातले. त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली, ‘‘तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे झुमके परत घे आई, नाहीतर मागाहून घरातले, खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी रंजो येते, तेव्हा काही ना काही घेऊन जातेच.’’
‘‘असे काय बोलतेस बाळा, कोण कशाला काय म्हणेल? आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडले असतील तर तूझ्याकडेच ठेव. तू घातलेस किंवा मी घातले, त्यात काय मोठे? माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.’’
‘‘खरंच आई? अरे वा… तू किती चांगली आहेस’’, असे म्हणत रंजोने आईला मिठी मारली. नेहमी ती अशीच वागायची. जे आवडायचे ते स्वत:कडे ठेवायची. ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे, याचा ती साधा विचारही करीत नसे. खूप प्रेमाने आणि पै पै जोडून अपर्णाने आपल्या सासूसाठी ते झुमके विकत घेतले होते. पण, प्रभाने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले. ती सांगू शकत होती की, हे झुमके तुझ्या वहिनीने खूपच प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत, त्यामुळे मी तुला असेच दुसरे घेऊन देईन. पण, मुलीसमोर सुनेच्या भावनांची कदर प्रभाने कधीच केली नाही.
‘‘आई बघ, मला हे झुमके कसे दिसतात? चांगले दिसतात ना, सांग ना आई?’’ आरशात स्वत:ला न्याहाळत रंजोने विचारले. ‘‘पण आई, माझी एक तक्रार आहे.’’
‘‘आता आणखी कसली तक्रार आहे?’’ प्रभाने विचारले.
‘‘मला नाही, तुझ्या जावयाची तक्रार आहे. तुम्ही ब्रेसलेट देणार, असे सांगितले होते त्यांना, पण अजून घेऊन दिले नाही.’’
‘‘अरे हो, आठवले.’’ प्रभा समजावत म्हणाली, ‘‘बाळा, सध्या पैशांची चणचण आहे. तुला माहीतच आहे की, तुझ्या वडिलांना खूपच कमी पेन्शन मिळते. अपर्णा आणि मानवच्या पगारावरच घरखर्च चालतो.’’
‘‘हे सर्व मला सांगू नकोस आई. तू आणि तुझा जावई मिळून काय ते बघून घ्या. मला मध्ये घेऊ नका,’’ झुमके आपल्या पर्समध्ये टाकत रंजोने सांगितले आणि ती निघून गेली.
‘‘सूनेने दिलेले झुमके तू रंजोला दिलेस?’’ प्रभाच्या कानात झुमके नाहीत, हे पाहून भरतने विचारले. त्यांच्या लक्षात आले होते की, रंजो आली होती आणि तीच झुमके घेऊन गेली.
‘‘हा… हो, तिला आवडले म्हणून देऊन टाकले,’’ काहीसे कचरतच प्रभाने सांगितले आणि ती तेथून जाऊ लागली, कारण तिला माहीत होते की, हे ऐकून भरत गप्प बसणार नाहीत.
‘‘काय म्हणालीस तू, तिला आवडले? आपल्या घरातली अशी कोणती वस्तू आहे, जी तिला आवडत नाही, दे उत्तर? जेव्हा कधी येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच. जराही लाज वाटत नाही का तिला? त्या दिवशी आली होती तेव्हा सुनेची पर्स, जी तिला तिच्या मैत्रिणींनी दिली होती ती घेऊन गेली. कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, ती मनाला वाटेल तशी वागेल,’’ प्रचंड रागावलेले भरत तावातावाने बोलत होते.
आपल्या पतीच्या अशा बोलण्याने नाराज झालेली प्रभा म्हणाली, ‘‘अशी तुमची कोणती संपत्ती घेऊन गेली ती, ज्यामुळे तुम्ही तिला इतके बोलत आहात? फक्त झुमकेच तर घेऊन गेली ना, त्यात काय मोठे? रंजो तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नाही.’’
परंतु, आज भरत यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळेच ते संतापत म्हणाले, ‘‘तुझी संपत्ती देऊ नकोस असे तुला कोणी सांगितले आहे का? जे द्यायचे आहे ते सर्व देऊन टाक. पण, कोणीतरी प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकणे योग्य आहे का? जर सूनबाई असे वागली असती तर तुला कसे वाटले असते? किती प्रेमाने तिने तुझ्यासाठी झुमके आणले होते आणि तू ते कुणा दुसऱ्याला देऊन टाकताना क्षणभरही विचार केला नाहीस.’’
‘‘सारखे कुणा दुसऱ्याला, असे का म्हणत आहात? अहो, मुलगी आहे ती आपली आणि मी माझ्या मुलीला एकदा काही दिले म्हणजे कायमचे देऊन टाकले, समजले? मोठे आले सुनेचे चमचे, हूं,’’ तोंड वाकडे करीत प्रभा म्हणाली.
‘‘अगं, तुझी मुलगी तुझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहे, आणखी काही नाही. काय कमी आहे तिला? आपल्या मुलगा, सुनेपेक्षा जास्त कमावतात ते दोघे पतीपत्नी. तरी कधी वाटले तिला की, आपल्या आईवडिलांसाठी किमान २ रुपयांचे काहीतरी घेऊन जाऊया? कधीच नाही. आपले सोडून दे. तिने तिच्या भाचीसाठी आजपर्यंत कधी एखादे खेळणे तरी खरेदी करून आणले आहे का? कधीच नाही. तिला फक्त घेता येते. मला दिसत नाही का? सर्व पाहतोय मी, तू मुलगी, सुनेत किती भेदभाव करतेस ते. सुनेचे प्रेम तुला बेगडी वाटते आणि मुलीचे नाटक म्हणजे प्रेम वाटते. असे डोळे विस्फारून पाहू नकोस माझ्याकडे, समजेलच तुलाही कधीतरी, बघच तू.’’
‘‘खरंच, कसे वडील आहात तुम्ही? मुलीच्या सुखालाही नजर लावता. माहीत नाही रंजोने तुमचे काय बिघडवले आहे, ज्यामुळे ती नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपते.’’ रडवेल्या स्वरात प्रभा म्हणाली.
‘‘ए… कमी अकलेच्या बाई, रंजो, माझ्या डोळयांना खुपत नाही, उलट काही केल्या सूनबाई अपर्णा तुला आवडत नाही. संपूर्ण दिवस घरात बसून अराम करीत असतेस. ऑर्डर देत राहतेस. तुला कधी असे वाटत नाही की, सुनेला कामात मदत करावी आणि तुझी मुलगी, ती तर येथे आल्यावर हातपाय हलवायचेही विसरून जाते. सर्व काही करते अपर्णा या घरासाठी. बाहेर जाऊन कमावते आणि घरही चांगल्या पद्धतीने सांभाळते. तरीही तुझी तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेच. तू मुलगी, सुनेत इतका भेदभाव का करतेस?’’
‘‘कमावून आणते आणि घर सांभाळते म्हणजे उपकार करीत नाही आपल्यावर. घर तिचे आहे, मग सांभाळणार कोण?’’ नाराजीच्या स्वरात प्रभा म्हणाली.
‘‘अच्छा, म्हणजे घर फक्त तिचे आहे, तुझे नाही? मुलगी कधीही आली की तिच्या पाहुणचारात काही कमी पडू देत नाहीस. पण तुला कधी असे वाटत नाही की, कामावरून थकून आलेल्या सुनेला किमान एक ग्लास पाणी देऊया. फक्त टोमणे मारता येतात तुला. अगं, सूनच नाही, तर तिच्या मैत्रिणीही खटकतात तुला. कधीही आल्या तरी त्यांना काहीतरी वाईट बोलतेसच. तुला असे वाटते की, त्या तुझ्या आणि तुझ्या मुलीविरोधात अपर्णाचे मन कलुषित तर करणार नाहीत ना? म्हणून त्यांना बघून घेत नाहीस, जाऊ दे. मी कोणत्या दगडासमोर डोके फोडत आहे? तुझ्याशी बोलणेही कठीण आहे.’’ असे म्हणत भरत आपले पाय आपटत तेथून निघून गेले.
पण, खरंच तर बोलत होते भरत. या घरासाठी अपर्णा खूप काही करीत होती, तरीही प्रभाची तिच्याविरोधात तक्रार असायची. नातेवाईक असोत किंवा शेजारी, सर्वांना ती हेच सांगायची की, सुनेच्या राज्यात राहायचे म्हणजे तोंड बंद करूनच जगावे लागणार, नाहीतर मुलगा, सून आम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवतील, हे समजणार नाही. जमाना बदलला आहे. आता सुनेला नाही तर सासूला घाबरून राहावे लागते. प्रभाचे हे बोलणे ऐकून अपर्णा मान खाली घालत असे, पण कधीच उलटून बोलत नसे. मात्र तिच्या डोळयातून वाहणारे अश्रू तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांचे साक्षीदार असत.
अपर्णाने या घरात पाऊल टाकताच प्रभाला स्वत:ची आई मानले होते. प्रभा मात्र अजूनही तिला दुसऱ्याच्या घरची मुलगी, असेच समजत असे. अपर्णाने प्रभासाठी काहीही केले तरी प्रभाला ते नाटकी वाटायचे आणि ‘‘आई, तुझी तब्येत तर बरी आहे ना?’’ असे रंजोने एकदा जरी विचारले तरी प्रभाचा आंनद गगनात मावेनासा व्हायचा.
त्या दिवशी अपर्णा केवळ एवढेच म्हणाली होती की, ‘‘आई जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. शिवाय डॉक्टरांनीही तुम्हाला चहा पिऊ नका असे सांगितले आहे. हॉरलेक्स घेऊन आले आहे मी, तुम्ही दुधासोबत हे प्या, असे म्हणत तिने प्रभासमोर ग्लास ठेवले. प्रभाने तिचा हात झटकत ते तिच्या हातातून काढून घेतले व टेबलावर आपटत म्हणाली, ‘‘तू मला डॉक्टरांच्या नावाने सल्ले देऊ नकोस. जे मागितले आहे तेच दे. नंतर पुटपुटत म्हणाली, ‘मोठी आली मला शिकविणारी, चांगले बनण्याचे नाटक हिच्याकडून शिका.’ अपर्णाची प्रत्येक गोष्ट तिला बेगडी आणि नाटकी वाटत असे.
मानव ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता. अपर्णाही आपल्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती. पण मनातल्या मनात तिला अशी भीती वाटत होती की, सासू तसेच सासऱ्यांना एकटे सोडून आली आहे, त्यांची तब्येत तर बिघडणार नाही ना? हाच विचार करून तिने लग्नाला येण्यापूर्वीच रंजोला दोघांकडे लक्ष ठेवण्यास व दिवसातून कमीत कमी एकदा येऊन त्यांना बघून जा, असे सांगितले होते. हे ऐकून रंजो रागावत म्हणाली होती की, ‘‘वहिनी, तू सांगितले नसतेस तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती. तुला काय वाटते, तू एकटीच आहेस का त्यांची काळजी घेणारी? अगं, मुलगी आहे मी त्यांची, सून नाही, समजले का?’’ रंजोच्या अशा बोलण्यामुळे अपर्णा खूपच दुखावली होती, तरीही गप्प बसली. मात्र, अपर्णा गेल्यानंतर रंजो एकदाही माहेरी आली नाही, कारण आल्यावर तिला काम करावे लागले असते. कधीकधी फोन करून विचारपूस करायची आणि सोबतच वेळ नसल्यामुळे भेटायला येऊ शकत नाही, पण वेळ मिळताच नक्की येईन, असे खोटेच सांगायची. प्रभा विचार करायची, आपल्या मुलीकडे खरंच वेळ नसेल नाहीतर भेटायला नक्की आली असती.
एका रात्री अचानक भरत यांची तब्येत खूपच बिघडली. प्रभा इतकी घाबरली की, काय करावे तिला काहीच सूचत नव्हते. तिने मानवला फोन लावला, पण त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यानंतर तिने मुलगी रंजोला फोन लावला. बेल वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हते. जावयालाही फोन लावला, पण त्यानेही उचलला नाही. प्रभाने रंजो व तिच्या नवऱ्याला अनेकदा फोन लावला, पण कुणीही फोन उचलला नाही. ‘कदाचित ते झोपले असतील म्हणून फोनची रिंग त्यांना ऐकू आली नसेल,’ प्रभाला वाटले. अखेर नाईलाजाने तिने अपर्णाला फोन लावला. एवढया रात्री प्रभाचा फोन आलेला पाहून अपर्णा घाबरली.
प्रभा काही बोलण्याआधीच अपर्णाने घाबरत विचारले, ‘‘आई, काय झाले? बाबा ठीक आहेत ना?’’ प्रभाच्या हुंदक्यांचा आवाज येताच ती समजून गेली की, नक्कीच काहीतरी घडले आहे. तिने काळजीने विचारले, ‘‘आई, तुम्ही रडत का आहात? सांगा ना आई, काय झाले?’’ त्यानंतर सासऱ्यांबाबत समजताच ती म्हणाली, ‘‘आई तुम्ही घाबरू नका, बाबांना काहीही होणार नाही. मी काहीतरी करते, असे म्हणत तिने फोन ठेवला आणि लगेचच तिची मैत्रीण शोनाला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन जा, अशी शोनाला विनंती केली.’’
अपर्णाच्या ज्या मैत्रिणीकडे प्रभाला पाहायलाही आवडत नव्हते आणि तिला ती सतत बंगालन म्हणायची, आज तिच्यामुळेच भरत यांचा जीव वाचला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की, मेजर अटॅक होता. रुग्णाला घेऊन येण्यास जरा जरी उशीर झाला असता तर जीव वाचविणे अवघड होते. तोपर्यंत अपर्णा आणि मानवही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर काही वेळाने रंजोही आपल्या पती व मुलासोबत तेथे आली. मुलगा, सुनेला पाहून जोरजोरात हुंदके देत रडतच प्रभा म्हणाली, आज शोना नसती तर कदाचित तुमचे बाबा जिवंत नसते.
अपर्णाचेही अश्रू थांबत नव्हते. सासऱ्यांना काही झाले असते तर ती स्वत:ला कधीच माफ करू शकली नसती. सासूला मिठी मारत ती म्हणाली, रडू नका, आता सर्व ठीक होईल. शोनाचे तिने मनापासून आभार मानले कारण, तिच्यामुळेच सासऱ्यांचा जीव वाचला होता.
दुसरीकडे आपल्या आईला वहिनीच्या गळयात पडून रडताना बघताच रंजोही रडण्याचे नाटक करीत म्हणाली, ‘‘आई, अगं बाबांना काही झाले असते तर माझाही जीव गेला असता. किती दुर्दैवी आहे मी, जिला तुझा फोन आला, हेच समजू शकले नाही. सकाळी तुझे मिस कॉल पाहिले आणि त्यानंतर तुला फोन लावला तेव्हा कुठे मला सर्व काही समजले. नाहीतर इथे मला कोणी काहीच सांगितले नसते,’’ अपर्णाकडे रागाने बघत रंजो म्हणाली. अपर्णा प्रभाच्या जवळ गेलेली तिला आवडले नव्हते.
ती प्रभाची समजूत काढतच होती तोच तिचा ७ वर्षांचा मुलगा अमोल म्हणाला, आई, तू खोटे का बोलतेस? आजी, ‘‘आई खोटे बोलत आहे. तुझा फोन आला तेव्हा आम्ही टीव्हीवर चित्रपट पाहत होतो. तुझा फोन पाहून आई म्हणाली होती की, माहीत नाही एवढया रात्री कोण मेले जे माझी आई मला त्रास देत आहे. पप्पा तिला म्हणाले, फोन घे, कदाचित एखादी मोठी अडचण आली असेल. तरीही तिने फोन घेतला नाही आणि त्यांनाही घेऊ दिला नाही. ती आरामात चित्रपट बघत राहिली.’’
अमोलचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रंजोला तर तोंड वर करून पाहणेही अवघड झाले होते. प्रभा कधी आपल्या नातवाकडे तर कधी मुलीकडे एकटक बघत होती.
सत्य बाहेर येताच रंजोला ओशाळल्यासारखे झाले. तिला चांगलाच धक्का बसला होता, त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली, ‘‘वेडा कुठला, काहीही बडबड करतो. त्यानंतर उसने अवसान आणत तिने सांगितले, ‘‘आई… अगं दुसऱ्याच कोणाचा तरी फोन होता तो, त्यामुळे मी तसे म्हणाले होते.’’ त्यानंतर समजूत काढत म्हणाली, ‘‘बघ ना आई, काहीही बोलतो हा, त्याला काही कळत नाही. लहान आहे ना.’’
आपण जे काही ऐकले ते खरे आहे, यावर प्रभाचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणाली, ‘‘याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्या जवळच होता. इतक्या रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल, असा तू एकदाही विचार केला नाहीस का? चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची. शोना नसती तर आज मी माझ्या सौभाग्याला मुकले असते. ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी, बनावटी वाटत होत, हे आज मला समजले. तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढेही खोटया भ्रमातच जगत राहिले असते.’’
आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निसटून चालली आहे, हे पाहून रंजो उगाचच काकुळतीला येत म्हणाली, ‘‘नाही आई, तू गैरसमज करून घेत आहेस.’’
‘‘गैरसमज झाला होता बाळा, पण आता माझ्या डोळयावरची आंधळया प्रेमाची पट्टी उघडली आहे. तुझे बाबा बरोबर सांगायचे की, तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसेही प्रेम नाही.’’ असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने अपर्णाला सांगितले, ‘‘चल सूनबाई, बघून येऊया, तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना?’’ रंजो, सतत आई, आई अशा हाका मारत होती, पण प्रभाने एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिचा भ्रमनिरास झाला होता.