– गरिमा पंकज

१६ ऑक्टोबर २०१४. गुवाहाटी पासून १८० किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटेसे गाव कारबी एंगलाँग, जिथे मागील अनेक महिन्यांपासून होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे गूढ शोधण्याचा प्रयत्न सुरु होता. गावातील वृद्धांनी यामागे कोण्या चेटकिणीचा हात असल्याची संभावना व्यक्त केली आणि संभाव्य चेटकिणीचा तपास करण्यासाठी सर्व गावकऱ्यांची सभा घेण्यात आली.

मंत्रोच्चारणादरम्यान गर्दीतील एक वृद्ध महिला देबोजानी बोराकडे इशारा करत किंचाळली, ‘‘हीच ती चेटकीण आहे, हिला शिक्षा द्या.’’

त्या महिलेने हे म्हटल्याबरोबर सर्व गर्दी तिच्यावर तुटून पडली आणि तिला मासे पकडण्याच्या जाळीत बांधून बेदम मारण्यात आले. ती पूर्णपणे घायाळ झाली आणि तिला इस्पितळात घेऊन जावे लागले.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की ज्या देबोजानी बोरांनां चेटकीण म्हणून घोषित करण्यात आले, त्या सुवर्ण पदक विजेत्या आहेत. त्यांचा जन्म याच गावी झाला होता. त्या ५१ वर्षांच्या असून त्यांना ३ मुले आहेत. शेतात काम करण्यासह अॅथलिट आहेत. त्यांनी अनेक अॅथलेटीक्स स्पर्धांमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर आसामचे प्रतिनिधित्त्व केले. २०११ साली भारताला भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून दिले.

खेदाची बाब ही आहे की आज २१ व्या शतकात वावरताना विकासाच्या नव नव्या कसोटया पार केल्या जात आहेत. पण आजही आपल्या समाजामध्ये अनेक अशा प्रथा, परंपरा आहेत ज्या प्रतिगामी मानसिकतेचे आणि भेदभावपूर्ण व्यवहाराचे द्योतक आहेत. उदाहरणार्थ चेटकीण प्रथाच पाहा, ज्याने कित्येक निर्दोष महिलांचे जीवन नष्ट केलेले आहे.

चेटकीण प्रथा काय आहे

देशातील अनेक मागासलेल्या भागांमध्ये जादू-टोणा करणाऱ्या तांत्रिकांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही महिलेला चेटकीण ठरवता येते. अशा गोष्टी साधारणपणे तेव्हा होतात, जेव्हा गावातील मंडळी एखादा गंभीर आजार, कुटुंबावरील संकट, गावावर आलेले मोठे संकट इत्यादी समस्या सोडवण्यासाठी तांत्रिकांकडे पोहोचतात.

तांत्रिक आपल्या तंत्र-मंत्रांच्या शक्तीने संमोहीत करून कोण्या एका महिलेला दोषी ठरवून तिला चेटकीण म्हणून घोषित करतो, त्यावेळी सर्व गावकरी शिक्षा देण्यासाठी धावून जातात.

त्या महिलेला संपूर्ण गर्दीसमोर जबरदस्ती खेचून आणले जाते आणि तिला निर्वस्त्र करून मारण्यात येते, काही वेळा तिचे मंडण करण्यात येते, तिच्या तोंडाला काळे फासून संपूर्ण गावात तिची धिंड काढली जाते. सुरी किंवा एखाद्या धारदार अवजाराने तिच्यावर वार करण्यात येतात, तिला मलमूत्र पिण्यास सक्ती केली जाते. एवढे करूनही जर ती महिला जिवंत राहिली तर, तिला गावाबाहेर हाकलण्यात येते.

कारणे

अशिक्षितता : चेटकीण प्रथा अस्तित्वात असण्याचे प्रमुख कारण लोकांमधील अशिक्षितता आणि अंधश्रद्धेचे चक्रव्यूह होय.. अशाप्रकारच्या घटना मोठया प्रमाणात खेडेगावांमध्ये होत असतात. जेथे शिक्षणाचा आणि स्वच्छतेचा अभाव असतो.

संपत्तीवर अधिकार गाजवण्याची इच्छा : आदिवासी समाजामध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत जमिनीवर अधिक हक्क प्राप्त असतात. या संपत्तीवर प्राप्त करण्यासाठी त्या महिलेला चेटकीण म्हणून सिद्ध करण्याचा डाव आखतात. यासाठी विशिष्ट महिलांना लक्ष्य केले जाते. ज्यांचे पुढे-मागे कोणी नाही, एकल आहेत, स्वतंत्र काम करतात, विधवा, वृद्ध स्त्रिया आहेत इत्यादी.

तांत्रिकांचा स्वार्थ : जेव्हा जादू-टोणा करणारे तांत्रिक आजारी रुग्णांना बरे करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा ते स्वत:चा बचाव करण्यासाठी नवे उपाय शोधतात. आपली शक्ती दर्शवण्यासाठी ते गरीब आणि लाचार महिलांचा बळी घेतात.

राष्ट्रीय गुन्हे नोंद केंद्राच्या अहवालानुसार चेटकीण हत्येच्या नावाखाली वर्ष २००० ते २०१२ दरम्यान २०९७ लोकांचा मृत्यू झालेला आहे, ज्यातील ३६३ गुन्हे हे झारखंडमधील होते. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भारतातच नव्हे तर विदेशांतही असे प्रकार घडताना दिसतात. उदाहरणार्थ तंजानिया, दक्षिण आफ्रिका, नायजेरीया, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये अशा घटना घडताना दिसून येतात.

बिहारमध्ये राहणाऱ्या समाज सेविका संध्या सिन्हा सांगतात, ‘‘गावांमध्ये गरीब महिलांचे शोषण होते. कधी पैशांसाठी तर कधी तिच्या शरीरासाठी. बिहारमधील १-२ जिल्ह्यांना सोडले तर कुठेच महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देत नाहीत. मग त्या रात्रंदिवस शेतात कष्ट घेत असल्या तरीदेखील त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. आता समजा, एका व्यक्तीच्या ३ मुली आहेत, तर त्याची सर्व संपत्ती मुलींच्या नावेच होणार. मग जेव्हा गोष्ट योजनांचा लाभ घेण्याची येते, तेव्हा मात्र ही बाब अभिशाप बनते.

अनेकदा असंही होतं की घरातील एक सदस्य महिलेवर चुकीची नजर ठेवतो. जेव्हा महिला त्याचे म्हणणे स्वीकारत नाही, तेव्हा संधी मिळताच तो सदस्य महिलेला चेटकीण ठरवून आपला राग शांत करतो.

या भागातील प्रमुख व्यक्ती आणि भटजी हे दोन असे व्यक्ती असतात ज्यांचे म्हणणे संपूर्ण गाव ऐकते आणि त्याचे पालन करते. या दोहोंना पैसे देऊन स्वत:च्या बाजूने वळवणे कठीण काम नाही. केवळ यांना पैसे दिले की ते धर्म आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या आयुष्याची दुर्गती करायला ते काही क्षणांचाही विलंब लावत नाहीत.’’

सरकार फक्त या प्रकरणांवर कायद्याद्वारे अंकुश आणण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, छत्तीसगडमधील जादूटोणा छळ प्रतिबंधक अधिनियम २००५, बिहारमध्ये प्रत्यक्ष जादूटोण्याचा वापर प्रतिबंधक कायदा १९९९ आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २००१, झारखंड, राजस्थान सरकारने एक कायद्यात्मक अधिनियम पुढे आणलेला आहे. याअंतर्गत एका महिलेला चेटकीण घोषित करून तिचा छळ, अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. अजूनतरी या कायद्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसलेले नाही, जे अपेक्षित आहे.

या अत्याचारी आणि अंधश्रद्धेच्या वातावरणात एक नवे नाव समोर आलेले आहे बीरूबाला राबा, ज्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि इतरांना यातून सुटण्याचा मार्ग दाखवला.

६२ वर्षीय बीरूबालांना खुद्द एक संस्था म्हटले जाऊ शकते. आसामच्या गोलपारा जिल्ह्यातील धाकुर विला गावात राहणाऱ्या महिलेने आपले जीवन या प्रथेच्या विरुद्ध लढण्यासाठी समर्पित केलेले आहे.

या लढ्यादरम्यान त्यांना अनेकदा हत्येच्या धमक्या आलेल्या आहेत. शारीरिक, मानसिक आघात करण्यात आले. पण या दृढनिश्चयी महिलेने आपली लढाई सोडली नाही. १९९९ मध्ये, ‘आसाम महिला समता संघटने’ने त्यांना समर्थन दिले.

चेटकीण प्रथेच्या व्यतिरिक्त बीरूबाला लोकांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मद्याचा वाईट प्रभाव इत्यादी गोष्टींवर जागरूकता करत आहेत.

४ जुलै २०१५ रोजी त्यांना १२ वे ‘उपेंद्र नाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आसाम सरकारचा ‘बेस्ट आंतरप्रेनॉर अवॉर्ड’देखील मिळवलेला आहे.

समाजसेविका संध्या सिन्हा (फाऊंडर मेंबर ऑफ वुमन पॉलिटीकल फोरम) यांचे म्हणणे आहे, ‘‘स्त्रियांचे सर्वात मोठे शत्रू त्यांची शांतता आहे. त्या स्वत: अत्याचाराचा विरोध करत नाहीत. दुसऱ्या कोणासोबत चुकीचे घडत असेल तरीदेखील त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाहीत. अयोग्य असेल त्याला अयोग्य म्हणण्याची हिंमत करत नाहीत. त्यांना सतत भीती वाटत असते की कोणाला साथ दिली तर मारण्यात येईल.

‘‘त्या संस्कारांच्या नावावर गप्प बसतात. त्यांना हे माहिती नाही की संस्कार आणि अंधश्रद्धेमध्ये फरक आहे. ज्या दिवशी स्त्रियांना हे समजेल, त्यावेळी त्यांची स्थिती सुधारेल. आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे बनवण्यात आलेले आहेत. आता फक्त जागृत होण्याची गरज आहे.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...