* प्रतिभा अग्निहोत्री
रांगोळीला विविध राज्यात वेगवेगळया नावाने ओळखलं जातं. बंगालमध्ये अल्पना, आंध्रप्रदेशात मुग्गुल, तमिळनाडुमध्ये कोलम, राजस्थानमध्ये मांडना, हिमाचलमध्ये अडूपना आणि उत्तरप्रदेशात चौक व बिहारमध्ये एपन या नावानी ओळखले जाते.
रांगोळी ही प्रद्धत जास्त करून गुजरात आणि महाराष्ट्रात आहे. परंतु महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधून येत ही कला आता पुर्ण देशात प्रचलित झाली आहे. महाराष्ट्रात तर दसऱ्यानंतरच दररोज सकाळी गृहिणी उठून मुख्य दारात नविन रांगोळी काढून मगच कामाला सुरूवात करतात. रांगोळीचं तात्पर्यच रंगाच्या माध्यमातुन मनातील भावना अभिव्यक्त करणं आहे.
चला तर मग तुमची ओळख करून देतो याच्या वेगवेगळया रंगरूपांशी :
फ्री हँड रांगोळी : यात तुम्ही कोणतीही फुलं, पानं, यासारख्या कलाकृती करू शकता. ज्यांची स्केचिंग आणि चित्रकला चांगली आहे ते याचा जास्त वापर करतात.
ठिपक्यांची रांगोळी : यामध्ये ठिपके एकमेकांना जोडून डिझाइन तयार होते. यामध्ये भौमितीय, चौकोनी, किंवा आयताकृती डिझाइन अधिक बनविल्या जातात.
रेडिमेड रांगोळी : ही बाजारात विविध डिझाइनमध्ये पेपर किंवा प्लास्टीक शीटवर मिळते. डिझाइननुसार पेपरवर छिद्र असतात. ज्यावर रंग टाकून डिझाइन तयार करता येते.
आर्टीफिशियल रांगोळी : ही प्लास्टीक शीट विविध डिझाइनमध्ये उपलब्ध असते. याच्या मागच्या बाजुला गम लावलेला असतो. गमवर असलेला पातळ कागद हटवून तुम्ही ती डिझाइन शिट तिथे चिकटवू शकता.
हर्बल रांगोळी : ही गुलाब, झेंडुसारख्या विविध रंगांच्या फुलांनी, झाडाच्या पानांनी काढली जाते. ती दिसायला फार सुंदर दिसते.
कशी असावी जागा
रांगोळी बनविण्यासाठी जागेचा समतोल असणं अत्यंत गरजेचं असतं. आजकाल घरात टाइल्स लावलेल्या असतात आणि बऱ्याचदा त्या फुगीर असतात. तर अशावेळी तुम्ही रांगोळी काढायच्या ठिकाणी प्लेन रंगाचं प्लास्टीक घालून किंवा पेपर टेप पट्टीने चिकटवून त्यावर रांगोळी काढा. हे स्थान घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजुला ठेवावे जेणेकरून येण्याजाण्यासाठी त्रास होणार नाही आणि रांगोळीसुद्धा जास्त काळ टिकून राहील.
कशी काढाल रांगोळी
रांगोळी काढायची जागा स्वच्छ ठेवा. जर तुम्ही पेपर शीट किंवा प्लास्टीक पेपर शीट चिकटवली असेल तर तीदेखील साफ करा. स्वच्छ कापडाने पुसून घ्या. सफेद रंगाने, डिझाइन किंवा आउटलाईन काढून घ्या. जर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढत असाल तर आधी ठिपके काढून घ्या नंतर ते जोडा. मग त्यात मनासारखे रंग भरा. लक्ष ठेवा की रंग एका वर एक सांडणार नाही.
लक्षात घेण्यायोग्य बाबी
* जर तुम्ही पहिल्यांदा रांगोळी काढत आहात तर छोट्या आणि सोप्या डिझाइन काढा. त्याचबरोबर बाजारात मिळणाऱ्या रांगोळीच्या पुस्तकाचा आणि ठिपक्यांच्या कागदाचा वापर करा.
* डायरेक्ट सफेद रंगाने रांगोळी काढायला जमत नसेल तर आधी खडूने किंवा पेन्सिलने डिझाइन काढून घ्या मग त्यावर रंग भरा. प्लास्टीक आणि पेपरवर मग तुम्ही पेन्सिलही पण डिझाइन तयार करू शकता.
* रांगोळी काढताना डिझाइनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व रंगांना वेगवेगळया डबित ठेवा. जेणेकरून वापरणं सोपं जाईल.
* जर काही नविन प्रयोग करू इच्छिता तर तांदुळ पाण्यात एक तास भिजवून आणि मग वाटून पेस्ट बनवून घ्या आणि मग एका प्लास्टीकच्या कोनमध्ये ही पेस्ट भरून जमिनीवर मनासारखी डिझाइन काढा.
मग या दिवाळीत आपल्या घराची सजावट अधिक उठावदार बनवण्यासाठी रांगोळी काढायला विसरू नका.