कथा * अर्चना पाटील

वैदेही फार्मसीच्या लास्ट इअरला होती. मोहिते कुटुंबातील एकदमच शांत मुलगी होती ती. घरी कोणी पाहुणे आले तर पाण्याचा ग्लास देण्यासाठीही ती कधी हॉलमध्ये येत नसे. विचारल्याशिवाय कधी कोणाशी बोलणार नाही, शिस्तीत वागणे, अभ्यासात हुशार, दिसायला देखणी त्यामुळे तिच्यासाठी उत्तम स्थळ भेटणार याची सगळयांनाच खात्री होती. घरात आजी आजोबा, लहान बहीण अक्षरा आठवीला, वडील नितिनरावांचे किराणामालाचे दुकान आणि सोज्वळ आई मालिनीताई असं सुंदर कुटुंब होतं वैदेहीचं.

‘‘अगं ए मालिनी, आठ वाजले, नाश्ता देतेस का नाही की उपाशी मारतेस म्हातारीला?’’

‘‘हो, हो आणते. आम्हाला कशी मेली कामं करून भुक लागत नाही आणि यांनाच मात्र खाटेवर बसुन बसुन भुका लागतात. दोन मुलं जन्माला घातलीत तर दोघांकडे रहायचंना. मीच एकटीने ठेका घेतला आहे का या म्हातारा म्हातारीचा.’’

‘‘पुरे कर हं आई, काय सकाळी सकाळीच चालू होऊन जातं तुमचं दोघींचं.’’

‘‘सुनबाई, चहा ठेव. वामनकाका आले आहेत.’’

‘‘बारा वाजेपर्यंत चार कप चहा पिऊन जाईल हा म्हातारा. कधी सासुरवास संपेल माझी, काय माहिती. संपूर्ण आयुष्य निघून गेलं यांचं करण्यात.’’

‘‘सुनबाई आणते ना चहा.’’

‘‘आली हो आबा.’’

आजीआजोबांमुळे आईची होणारी सतत चिडचिड पाहून वैदेहीला तर वाटत असे की लग्नच करू नये. आपण शिकलेलो आहोत. स्वत: कमवावं आणि खावं. का म्हणून लग्न करून परक्या कुटुंबात मोलकरणीसारखं रहावं? वैदेही संध्याकाळी कॉलेज करून घरी आली. आईबाबा हॉलमध्येच बसले होते.

‘‘का हो, चला ना, आपण चारपाच दिवस कुठेतरी फिरून येऊ. आता मुलंही मोठी झाली आहेत.’’

‘‘मालिनी, मी तुला सांगितले आहे पैसे घे आणि तुझ्या मुलांना घेऊन कुठेही फिरायला जा. आईबाबांना सोडून मी बाहेरगावी येऊ शकत नाही.’’

‘‘हो ना ,नेहमीप्रमाणेच कारणं सांगा तुम्ही. तुमच्या लहान भावाकडे पाठवून द्या की त्यांना पाच दिवस.’’

‘‘मी असं करणार नाही आणि यावर वाद नको ’’ असं म्हणत हातातला पेपर फेकत नितिनराव घरातून बाहेर निघून गेले. मालिनीताई नेहमीप्रमाणे किचनमध्ये डोळयात पाणी आणून रडू लागल्या.

‘‘माझ्या मेलीचं नशिबच फुटकं. हा बंगला नी गाडी. काय चाटायचं आहे याला. श्रीमंती असुन उपयोग नाही. कधी टॉकीजमध्ये पिक्चरला जाणं नाही, हॉटेलमध्ये जाणं नाही, पर्यटन नाही, कसली मजा नाही आयुष्यात.’’

‘‘आई, माझं लग्न झाल्यावर माझ्यासोबतही असंच होईल.’’

‘‘नाही गं बाई, स्त्रीचा जन्मच असतो दुसऱ्यांसाठी. तुम्ही माझी दोन गोड मुले हेच माझं खरं सुख आहात.’’

पाहुणे पहायला येणं, डोक्यावर पदर घेऊन फिरणं, मग हुंडयासाठी बैठक बसवणं, लग्नानंतर त्या नणंदबाईंचा थटारा आणि त्या छोटया छोटया भाचाभाचींना अहोकाहो करणं, त्यांच्या पाया पडणं किती बोगस पद्धती आहेत या. शिवाय कोणी मेल्यावर घरात दहा दहा दिवस सगळया भाऊबंदकीला बोलवणं, जेवण खाऊ घालणं आणि या सगळयात घरातील सुनांची सतत कामावरून चालणारी धुसफूस सगळं जवळून पाहिलं होतं वैदेहीने. एकदा लग्न झाले म्हणजे आपणसुद्धा या परंपरांमध्येच अडकणार. यातून सुटका नाही त्यापेक्षा लग्नच नको असंच वैदेहीला वाटायचं. एक दिवस संध्याकाळी दुध घ्यायला ती बाहेर निघाली. समोरच्या घरातील सार्थकशी तिची टक्कर झाली. सार्थक दिसायला देखणाच होता. दहावीनंतर डिप्लोमा केलेला होता. दोन वर्षांपासून पुण्यात कंपनीत होता. पण एक महिन्यापासून गावाकडे घरी आलेला होता. वैदेही आवडतच होती त्याला. तो फक्त तिनेही आपल्याकडे पहावं म्हणून प्रयत्न करीत होता. दुसऱ्या दिवशी वैदेही कॉलेजला जाण्यासाठी निघाली. सार्थकही तिच्या पाठीमागे बाईकवर निघाला. वैदेही तिच्या प्लेझर गाडीवर जात असताना गाडीच्या काचेत तिला सार्थक दिसू लागला. तिने पाहून न पाहिल्यासारखे केले. दिवसभर सार्थक तिच्या फार्मसी कॉलेजमध्येच बसून राहिला. संध्याकाळी वैदेही कॉलेजमधून निघताना त्याने तिला थांबवले.

‘‘वैदेही, मला तू खुप आवडतेस. लग्न करशील माझ्याशी.’’

‘‘वेडा आहेस का? कामधंदा काय करतोस तू?’’

‘‘कंपनीत आहे मी पुण्यात. पंधरा हजार मिळतात मला. तुही कमवशील की पुण्यात बारातेरा हजार. सुखाचा संसार होईल आपला.’’

‘‘चुप. घरचे लोक झाडतील आपल्याला.’’

‘‘कशाला झाडतील? आत्ताच लव मॅरेज झालं आहे माझ्या मित्राचे. पहिले रजिस्टर मॅरेज करू. नंतर स्वत:च आपल्या जिवाला धोका आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून देऊ. काहीच होत नाही.’’

‘‘खुपच अभ्यास केलेला दिसतो आहेस तू. चल बाजूला हो.’’

‘‘मग मी ‘हो’ समजू का?’’

‘‘मी ‘हो’ बोलले का?’’

‘‘नाही पण बोलली नाहीस ना तू.’’

वैदेही गालातल्या गालात हसत हसत आपल्या गाडीवर निघून गेली. सार्थक सतत आपल्या खिडकीतून वैदेहीच्या घरावर नजर ठेवत असे. ती बाहेर येताच तिच्याकडे पाहून हात हलवत असे. मोबाईलवर गाणी वाजवत असे. तिला कॉलेजमध्ये जाऊन सुंदर सुंदर गिफ्ट्स देत असे. ती बाहेर निघाली की तोपण बाईक घेऊन तिच्यामागे जात असे.

‘‘तू फक्त हो म्हण वैदेही, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. माझा एक मित्र पुण्यात पोलीस आहे. तो आपल्याला सगळी मदत करेल. मी तुला आयुष्यभर सुखात ठेवेन. तू सांगशील तसंच होईल. तुला कधीही उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. माझ्याइतके प्रेम तुझ्यावर कोणीच करणार नाही. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, तु फक्त सांग.’’

सार्थकच्या रोमँटिक कविता, मेसेजेस सर्वच वैदेहीला आवडत होतं. घरातील आजीआजोबांची कटकट, आईची बाबांमुळे सतत होणारी घुसमट यामुळे अरेन्ज मॅरेजनंतर आपलंही असंच होणार त्यापेक्षा सार्थकबरोबरच पळून गेलेलं काय वाईट आहे. असा विचार करून एक दिवस वैदेही सार्थकसोबत पळून पुण्यात आली. दोन्ही कुटुंबांची बदनामी झाली. सार्थक वैदेहीला घेऊन एका मित्राच्या फ्लॅटवर राहत होता. दहापंधरा दिवस छान गेले. नंतर वैदेही मला जॉब करायचा म्हणून हट्ट करू लागली.

‘‘काही गरज नाही अजून. पैसे कमी पडतील तेव्हा मीच शोधेन तुझ्यासाठी जॉब स्वीटहार्ट.’’

एक दिवस रात्री सार्थक कोकाकोलाची बाटली घेऊन आला. वैदेहीने बाटली पाहताच पटकन तोंडाला लावली. अर्धी बाटली रिकामी केली. पाच दहा मिनीटातच तिला गुंगी यायला लागली.

‘‘सार्थक मला काहीतरी होतंय, यार.’’

‘‘काही नाही, झोप तू शांत मधल्या खोलीत बेडवर. मी आहे ना.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेहीला जाग आली, तेव्हा तिच्याशेजारी दुसराच मुलगा झोपलेला होता. वैदेहीला झालेला सर्व प्रकार समजला. ती हॉलमध्ये आली.

‘‘यु चीप, तु मला फसवलंस. मी तुला सोडणार नाही. मी पोलिसांकडे तक्रार करेन तुझी.’’

‘‘पोलिसांकडे जा. ते तुला उभं तरी करतील का? दहा दिवसांपूर्वी तेच पोलीस तुला आईवडिलांकडे जा म्हणून सांगत होते तर तु ऐकलं नाही त्यांचं. ते आता ऐकणार आहेत का तुझं.’’

‘‘किती नालायक आहेस तू? एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळायची लाज नाही वाटत आहे का तुला?’’

‘‘अगं ए भवानी, तू तुझ्या जन्मदात्या मायबापाला झाली नाहीस तर मला काय होशील भविष्यात? मायबापाच्या तोंडाला काळं फासताना तुला लाज वाटली नाही आणि माझी लाज काढतेस.’’

वैदेही ढसाढसा रडु लागली. पोलीसांकडे जाण्याची लाज वाटत होती. सार्थकशिवाय आयुष्यात कोणीच उरलेलं नव्हतं. हे घर सोडून तरी आजच्या आज कुठे जाणार? पण इथे राहायचं म्हणजे धंदा करावा लागणार.

‘‘आईवडिलांना दु:खी करून या जगात कोणीच सुखी राहु शकत नाही हेच खरं.’’ वैदेही मनोमन विचार करत होती. सार्थक बाहेर निघून गेला. थोडयाच वेळात बेडरूममध्ये झोपलेला उन्मेश बाहेर आला.

‘‘ऐकलंय मी सगळं. या लफंग्याबरोबर घर सोडून पळून आलीस तू. आपल्या अशा वागण्याने आईवडिलांची समाजात किती नाचक्की होईल याचा विचारही कसा येत नाही तुमच्या डोक्यात. आयुष्याची वीस वर्षे सोबत घालवलेल्या आईवडिलांना सोडून दोनतीन महिन्याचीच ओळख असलेल्या या मवाली मुलांच्या जाळयात तुम्ही अडकताच कशा? तुमच्या शिक्षणाचा तरी काय उपयोग आहे ?’’

‘‘सगळं समजतंय, पण आता काय करू?’’

‘‘एक ऑफर आहे तुझ्यासाठी. माझ्या बायकोला मुल होत नाही आहे. बाळ दे आम्हाला. आयुष्यभर आदराने सांभाळेन तुला.’’

‘‘सार्थकसोबत राहण्यापेक्षा माझं आयुष्य जर कोणाच्या कामी येत असेल तर काय वाईट आहे. मी तयार आहे तुमच्यासोबत येण्यासाठी. पण सार्थक…’’

‘‘त्याला मी पाहून घेईन. त्या कुत्र्याच्या तोंडावर दोन पैसे फेकले की क्षणात मोकळं करेन तो तुला.’’

‘‘ठीक आहे, मी तयार आहे तुमच्यासोबत यायला.’’

वैदेही बॅग घेऊन उन्मेशसोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...