कथा * पूनम अत्रे

गौरी हसते ना तेव्हा माझ्यया अवतीभवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ अन् निरागस आहे…तिच्या स्वच्छ, निष्कपट मनांचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं.’’ अनिरूद्ध सांगत होता अन् शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती अन् तिचा प्रियकर अनिरूद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार अन् संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरूद्धला मारून मारून अर्धमेला केला असता. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरूद्धची बडबड ऐकून घेत होता.

‘‘चला निघूया…माझं काय? सध्या मी एकटा जीव सदाशिव…पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुंलंबाळं असतील ना? ती वाट बघतील…’’

‘‘का हो? आज गौरी भेटायला नाही येणार?’’

‘‘आज शनिवार. आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते अन् तिचा नवरा अन् मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे.’’

‘‘तरीही ती तुम्हाला भेटते? का?’’

‘‘तुम्हाला नाही समजणार.’’

‘‘सांगून तर बघा…’’

‘‘नंतर कधी तरी…बाय…’’ बोलून अनिरूद्ध गेलासुद्धा. पण संतापानं ठणकणारी आपली कानशिलं दाबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्याव्या का? तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं अन् कशासाठी चाललंय? हा अनिरूद्ध मध्येच कुठून टपकला?

गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडी त्यानं आठवून बघितल्या. तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही अन् आनंदात दिसते. स्वत:विषयी बरीच जागरूक झालीय. सकाळी फिरायला जाते. ब्यूटीपार्लरला जाते. फेशिअल, हेअर स्टाइल काय अन् काय…पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचे अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते पण हल्ली स्वत:वरही लक्ष देतेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते.

शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही, पण तरीही काहीतरी बदललंय. काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आजतागायत गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य…कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गौरीतला हा बदल कशामुळे का? हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या.

शेखरला गौरीचा मोबाइल चेक करायचा होता. पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता, कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीच चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवंय.

एकदा गौरी अंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाइल चेक केला. कुणा अनिरूद्धचे बरेच मेसेजेस होते. त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीनं आपल्या नवऱ्याची अन् मुलांची खूप स्तुती केली होती. अनिरूद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरूद्ध? कोण आहे हा अनिरूद्ध? शेखरनं आठवून बघितलं अन् त्याला आठवलं.

गौरी एक दिवस म्हणाली होती, ‘‘शेखर, आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथंच आहे. बनारसला.’’

‘‘असं?’’

‘‘हो ना? मी कधी तरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईन. कधी तरी घरी बोलावू का त्याला?’’

‘‘त्याची फॅमिली आहे इथं?’’

‘‘नाही. फॅमिली लखनौला आहे. त्याची बायको नोकरी करते. दोन्ही मुलंही तिथंच शिकताहेत. सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला.’’

‘‘ठीक आहे, बघूया बोलवण्याचं कधीतरी…’’ कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं. त्यानंतर गौरीनं कधी हा विषय काढला नाही. पण गौरीत होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होतं. आज, अगदी याक्षणीही ती मुलांची समर्पित आई, शेखरची त्याला समर्पित पत्नी अन् घराला समर्पित गृहिणी होती. तरीही शेखरला काहीतरी खटकत होतं.

फोन चेक केल्यानंतर शेखरनं ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धिच्या, असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या. या विषयावर इतर कुणाशी बोलून गौरीबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं. ती त्याची पत्नी होती अन् दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं.

एक दिवस गौरी म्हणाली, ‘‘शेखर, आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाइलवरून आपण संपर्कात राहूच.’’

शेखर एकदम सावध झाला. ‘‘कुठं जायचं आहे?’’

‘‘एका फ्रेंडला भेटायला?’’

‘‘कोण? फ्रेंड?’’

‘‘रचना.’’

शेखरनं पुढे काहीच विचारलं नाही. पण दुपारी तो ऑफिसातून निघाला अन् घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की ती मुलांचं खाणंपिणं वगैरे आटोपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गौरी नटूनथटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला. पण एकदम अनिरूद्धचा विचार मनात येताच मनांत संताप दाटून आला.

गौरी पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्चा हा तर रोज बागेत सायंकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आलं… आत्ताच्या आत्ता गौरीला हात धरून ओढत आणावं अन् तिच्या पापाचं माप तिच्या पदरानं घालावं. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूममध्ये जाऊन अंथरूणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत…हे घर, सगळं हौशीनं घेतलेलं सामान, किती कष्टानं उभा केलेला संसार, मुलं, त्यांच्या भवितव्याची स्वप्नं…आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं.

नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी, मनातल्या मनात तो गौरीला काय काय दूषणं देत होता.

शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईवडिल गावी रहायचे. गौरीचेही आईवडिल आता हयात नव्हते. ती ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं. पण असं काय घडलंय? त्यांचे संबंध आजही चांगलेच आहेत. तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट द्ब्राली? समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर? तो एखादीच्या नादी लागला असता तर? गौरीनं काय प्रतिक्रिया दिली असती? त्यानं एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वत:चं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं अन् संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं.

तो जर असा बहकला असता तर गौरीनं निश्चितपणे प्रेमानं, संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षांची तपश्चर्या करून थाटलेलं घर, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानंही गौरीला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं.

दोन तासातच गौरी आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्याजवळ बसत, त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली, ‘‘मला फोन का केला नाहीत? मी लगेच आले असते ना?’’

‘‘रचनाला सोडून?’’

‘‘तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाहीए माझ्या आयुष्यात.’’ गौरीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले.

शेखरनं तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, ‘‘खूप सुंदर दिसते आहेस…’’

‘‘खरं?’’

‘‘तुझी फ्रेंड कशी आहे?’’

‘‘बरी आहे.’’ एवढं बोलून गौरी उठली अन् म्हणाली, ‘‘चहा करून आणते. तुम्हाला खायला काही करू का?’’

‘‘नको…चहाच कर…’’

गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस्स, याच्यापुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती.

शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळाऊ अन् स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरूद्धशी ओळख करून घेतली…जाणूनबुजून मैत्री वाढवली. स्वत:चं नाव त्यानं विनय सांगितलं.

अनिरूद्धशी मैत्री वाढवून त्याच्याकडून शेखर त्याच्या अन् गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली होती. गौरीचं नाव न घेता शेखर अनिरूद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा.

अनिरूद्धनंही सांगितलं, ‘‘सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करतेय. दोन मुलांची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही. कारण तिथं त्यांचं उत्तम चाललं आहे. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय.’’

शेखर दचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही? याचाच अर्थ हे नातं ही अस्थिरच आहे. पुढे त्याचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरूद्ध त्याच्या अन् गौरीच्या संबंधांबद्दल त्याच्याशी केव्हातरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंचहोमला न्यायचा. ‘‘आजही माझी बायको माहेरी गेली आहे. चल, आपण एकत्र जेऊयात.’’

अनिरूद्धशी जवळीक वाढवत होता तो अन् एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं. ‘‘इथं माझी एक मैत्रीण राहते. गौरी नाव आहे तिचं.’’

शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. हाताचे तळवे घामेजले. कुणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं.

‘‘गौरी खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो. अचानक फेसबुकवर भेटली.’’ अनिरूद्ध सांगत होता.

‘‘असं? लग्न झालंय तिचं?’’

‘‘हो…लग्न झालंय, नवरा, दोन मुलं…त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठंही असू देत तिचा जीव नवरा अन् मुलांमध्येच गुंतलेला असतो.’’

‘‘मग ती तुमच्याबरोबर?’’

‘‘मैत्री आहे आमची.’’ अनिरूद्धनं विषय टाळला.

शेखरनंही त्याला फार छेडलं नाही. पण त्यानंतर अनिरूद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हे ही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांची मित्र होती…त्यांचं नातं प्रियकर प्रेयसीचं कधीच नव्हतं अन् आजही नाही.

अनिरूद्ध निघून गेला तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करंत होता. मग उठून खिन्न मनानं घरी परत आला.

शनिवार होता. सुट्टी होती. गौरीनं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, ‘‘कसल्या विचारात आहात? फिरून आलात अन् असे खिन्न का दिसताय?’’

शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, ‘‘काही नाही, कामाचं टेन्शन आहे.’’

‘‘गारगार सरबत देऊ? की गरम चहा आवडेल?’’ गौरीनं विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली अन् तो खोलीत गेला. गौरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

हल्ली शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं, अनिरूद्धला समोर आणून उभं करावं अन् जाब विचारावा असं वाटायचं.

पण इतकी वर्षं निष्ठेनं संसार करणारी गौरी आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं…मग अनिरूद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरूद्धकडून सगळंच जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरूद्धला फोन लावला.

‘‘काय करतो आहेस? आज लंच एकत्र घेऊयात?’’

‘‘अरे, आज रविवार…तुझी फॅमिली…’’

‘‘आज त्यांना एका ठिकाणी लंचला बोलावलंय. मी तिथं बोअर होईन म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवलाय.’’

‘‘बरंय, येतो मी.’’

ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं, ‘‘तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय? कुठवर आलंय प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून…?’’

‘‘हे असं सगळं सांगायचं नसतं, मित्रा.’’ हसून अनिरूद्ध बोलला.

‘‘म्हणजे? तुमच्या मैत्रीत शारीरिक/लैंगिक संबंधंही…’’

त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत अनिरूद्ध म्हणाला, ‘‘चल, आज तुला सांगतोच सगळं…गौरी खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादशील, शीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ समर्पित पत्नी अन् उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वी होती तशीच निखळ मैत्री अजूनदेखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती नि:संकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला. हात हातात घेतला अन् मला वाटलं…खरंच किती मृदु अन् उबदार आहे हा स्पर्श…सगळं जगच असं असतं तर? मी आवेगानं तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथम विरोध केला, पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलं. खरं सांगतो त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब अन् जाणीव होती. मला स्वत:लाही वाटलं की मी असा उमलून आलोय आत्ता, तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतो. गौरीनंही मान्य केलं, जे घडलं त्या क्षणांची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही. ती असोशी, ती ऊब, तो आपलेपणा अन् समर्पण पती बरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे पण अशा एकांतात, भावनोत्कट क्षणांतही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादूच जणू नाहीशी झाली आहे.

आमच्यात घडलेल्या…अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांनी आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं. नुसतंच सुख नाही, समाधान अन् ऊर्जाही दिली. गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगानं उमलून येऊन, मनाच्या गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमँटिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम आहे. ती त्याचा विश्वासघात करणार नाही. पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातली एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणांत माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्याक्षणी गौरीला असंच वाटलं.’’ अनिरूद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता.

शेखर श्वास रोखून अनिरूद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरूद्ध अजूनही बोलतच होता. ‘‘गौरी म्हणजे प्रेमासाठी आसूसलेलं वाळवंट आहे अन् मला वाटतं, तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढंगाप्रमाणे धोधो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवणं, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईंकांकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं सगळं आहे पण प्रणयातली ऊब, ऊष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे, त्याला तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे, पण…हा पणच एक मध्ये येतो. तिच्या प्राणांहून प्रिय असलेल्या त्याला गौरीला प्रेम हवंय हे कळत नाही.’’

शेखर आत्तापर्यंत स्वत:ला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. याक्षणी मात्र त्याचा स्वत:विषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता.

‘‘मित्रा, आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय. पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय का? पण काय        करू? ती तिच्या करियरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून पण तिला माझं नसणं जाणवत नाही. अन् इथं गौरी आपल्यानवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचे उत्कृट क्षण शोधते आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना? माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

शेखरनं दचकून विचारलं, ‘‘ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर?’’

‘‘हो ना, सीमा इथं यायची नाही. मुलांना बाबा त्यांच्या जवळ हवे आहेत अन् घर सांभाळणं ही एकट्या सीमाचीच जबाबदारी नाहीए ना? संसार दोघांचा असतो…’’

समोर बसलेला अनिरूद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार अन् मोठ्या मनाचा. बिल अनिरूद्धनंच दिलं. मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले.

शेखर घरी पोहोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाहीत. ‘‘मुलं कुठायेत?’’ त्यानं विचारलं.

‘‘मित्राकडे बर्थ डे पार्टीला गेलीत.’’

‘‘याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत?’’

‘‘हं!’’

खरं तर मघापासून त्याच्या मनांत गौरीबद्दल खूप राग होता. पण तिला बघताच    त्याचा राग निवळला. त्यानं गौरीला एकदम उचलून घेतलं. गौरी चकित झाली अन् मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतोय याचं स्वत: शेखरलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानं गौरीवर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वत:लाच जाणवलं की गौरीबरोबर असा वेळ घालवल्याला किती तरी वर्षं उलटून गेली होती. गेली कित्येत वर्षं तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवतो आहे. गौरीच्या चेहऱ्यावरची तृप्ती अन् आनंद शेखरला किती काही समजावून गेला.

किती तरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गौरी म्हणाली, ‘‘आज काय झालंय तुम्हाला?’’

‘‘का? तुला आवडत नाहीए?’’

‘‘मी तर अशा क्षणांची वाटच बघत आहे…खरं तर असे क्षण शोधत असते…मला का नाही आवडणार?’’ शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली. दोघं किती तरी वेळ खूप काहीबाही बोलत होती. किती तरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकांसोबत घालवला होता.

थोड्या वेळानं मुलं घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गम्मतजम्मत ऐकण्यात घालवला.

पुढले दोन दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला, त्यामुळे अनिरूद्धही भेटला नाही. तिसऱ्या दिवशी बागेत अनिरूद्धची भेट झाली.

‘‘माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय.’’

शेखर दचकला, ‘‘अन् तुझी मैत्रीण? तिला माहीत आहे हे?’’

‘‘अजून नाही. आता फोन करून सांगेन.’’

‘‘का? तुमची भेट नाही झाली?’’

‘‘नाही, तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही.’’

‘‘याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही?’’

‘‘असंच दिसतंय.’’

दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं. तिला अनिरूद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्यानं ती दु:खी, उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गौरी मुलांचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, ‘‘मी  पप्पांसाठी चहा करते. तुम्ही तुमचा अभ्यास करा.’’

ड्राइंगरूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, ‘‘तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं? नाव काय त्याचं तू सांगितलं होतंस?’’

‘‘तो अनिरूद्ध…चांगलाय. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे.’’

‘‘अरेच्चा? ट्रान्सफर झालीय?’’

‘‘चांगलं झालं ना, त्यांचं घर आहे तिथं, बायको, मुलं इथंच बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही टीव्ही बघा, आराम करा. मी स्वयंपाकांचं बघते अन् मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते,’’ गौरीनं म्हटलं.

अनिरूद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गौरीला जवळ ओढून मिठीत घेतलं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...