कथा * प्राची भारद्वाज
सकाळी फारसं दाट नसलेलं धुकं दुपारपर्यंत खूपच वाढलं. बहुतेक दिवस फारसा उत्साह, आनंदाचा नसावा हे हवामानालाही जाणवलं होतं. वातावरण उदास होतं त्यामुळे मनावर मलभ अन् मनावर मलम म्हणून वातावरण कोंदलेलं. समीक्षा अगदी गप्प होती. स्वत:चं आवरत होती. मनांत ना कोणती स्वप्नं ना कणभरही उत्साह. तिला बघायला एक स्थळ येणार होतं. घरच्यांच्या इच्छेखातर ती तयार झाली होती. सुरूवातीला तिच्या उत्तम नोकरीमुळे तिनं अनेक स्थळं नाकारली होती. असं करता करता वय तेहेतीस वर्षांचं झालं अन् लग्न ठरेना. हळूहळू स्थळंही येईनात. वर्ष सहा महिन्यात एखादं स्थळ कुणी सुचवलंच तर ते अगदीच खालच्या पातळीवरचं असे.
प्रोफेशनल जगात समीक्षाचं फार छान नाव होतं. ती तिच्या कंपनीची वॉइस प्रेसिडेंट आहे. स्वत:ची सुसज्ज केबिन, किती तरी कर्मचारी हाताखाली काम करताहेत. परदेशच्या वाऱ्या तर सतत सुरू असतात. तिच्या क्षेत्रातली सर्वच माणसं तिचा आदर करतात, मान देतात पण एवढं सगळं असूनही लग्नाचं वय निघून चाललंय म्हणून घरचे, बाहेरचेही नावं ठेवतात. मुलींच्या आयुष्याची हीच शोकांतिका आहे. करीअर करताना लग्न मागे ठेवावं लागतं अन् लग्न केलं तर करिअर करता येत नाही. घर संसार, नवरा, सासर, मुलंबाळं सांभाळूनही करीअर उत्तम करणारी सुपरवूमन सगळ्याच कशा होणार?
‘‘समीक्षा, आवरलं का? ते लोक येतंच असतील.’’ आईच्या हाकेनं ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.
‘‘आमच्या मुलीनं खूप लहान वयात एवढी मोठी मजल मारली आहे.’’ वडील अभिमानानं सांगत होते.
‘‘ते ठीक आहे पण स्वयंपाक, घरकाम येतंय की फक्त ऑफिसरकीच करते?’’ सासूनं परखडपणे विचारलं. थोड्या जुजबी गप्पा, चहा फराळ आटोपून मंडळी निघून गेली.
‘‘विचार करू सांगतो,’’ हे घालून गुळगुळीत झालेलं वाक्यंच पुन्हा ऐकवलं. उत्तर येणार नव्हतं, नाही आलं.
समीक्षाच्या लग्नासाठी उतावीळ झालेले घरचे लोक आता अगदी कुणाशीही तिचं लग्न लावून द्यायला तयार हाते. पण आता इतका मोठा मानन्मान अन् पगारअसलेली मुलगी मुलंच नाकारत होती.
नकार ऐकून थकली होती ती. घरचे मात्र अजूनही तिचं प्रदर्शन मांडायला उत्साहानं सरसावंत होते. शेवटी अगदी रडकुंडीला येऊन तिनं वडिलांना म्हटलं, ‘‘बाबा, प्लीज, आता हे सगळं थांबवा ना! जो कुणी येतो, तो माझे गुण न बघता दोषांचीच चर्चा करतो…कंपनीत, समाजात इतका मान मिळवलाय मी, अश्या फत्रुड मुलांकडून नकार घेताना माझ्या मनाला किती यातना होतात ते समजून घ्या ना, मला हे सहन होत नाही.’’
समीक्षाचं लग्न ठरेना तेव्हा तिनंच धाकट्या भावाचं लग्न करून द्या म्हणून आई वडिलांवर दबाव आणला. आता तिनं मनांतून लग्नाचा विचार पार काढून टाकला होता. जे व्हायचं असेल ते होईल असा निश्चय करून ती आपल्या करिअरच्या जोडीनं सामाजिक काम करणाऱ्या संस्थाना मदत करू लागली. झोपडपट्टीतल्या शाळेत त्या गरीब मुलांना शिकवताना तिला खूप समाधान वाटायचं, ज्या स्वयंसेवी संस्थेत ती काम करायची, त्याच संस्थेत दीपकही यायचा. साधारण चाळीशी ओलांडलेला असावा. वागण्यात बोलण्यात ऋजुता अन् परिपक्वता जाणवयाची. समीक्षा त्याच्याशी मोकळेपणानं बोलायची. त्याचे अनुभव तो सांगायचा. काम करताना तिला त्याचा उपयोग व्हायचा.
त्या दिवशीची कामं आटोपल्यावर दोघं संस्थेच्या कॅन्टीनमध्ये कॉफी घेत असताना दीपकनं विचारलं, ‘‘समीक्षा, रागावणार नसलीस तर एक विचारू का? अजूनपर्यंत तू लग्न का नाही केलंस?’’
समीक्षा हसली. ‘‘खरं तर सुरूवातीची खूप स्थळं मीच नाकारली. नंतर लोक मला नाकारायला लागले. आता मी सगळं परिस्थितीवर सोडलंय…मी ऐकलंय, तुमचं लग्न झालं होतं पण तुमची पत्नी…’’ बोलता बोलता समीक्षानं वाक्य अर्धवटच सोडलं.
‘‘अरेच्चा? इतकं ऐकलंय तू? खरंय ते, लग्न झालं होतं पण सगळेच लोक जन्मभर एकमेकांना साथ देतातंच असं नसतं ना?’’ काही क्षण थांबून दीपकनं पुढे सांगितलं, ‘‘मी लोकांना खोटंच सांगितलंय की माझी पत्नी वारली…पण खरं सांगायचं तर ती मला सोडून गेली. तिला जो पैसा अडका, सोयी सुविधा हव्या होत्या त्या माझ्या वयाच्या तीशीत मी तिला देऊ शकलो नाही.’’
एक दिवस ऑफिसचं काम संपवून मी लवकर घरी पोहोचलो अन् दाराशी माझ्या बॉसची गाडी दिसली. मला नवलंच वाटलं. माझा बॉस माझ्या घरी? काय कारण? मी दारावरची बेल दाबली, दार लवकर उघडलं नाही. तीनदा बेल वाजल्यावर बायकोनं दार उघडलं अन् मला दारात बघून ती दचकली. तशीच आत धावली…मला काही गळेना, तिच्या पाठोपाठ मीही खोलीत शिरलो..माझ्या बेडरवर माझा बॉस…’’
बोलता बोलता संताप, अपमान, असहायता अशा संमिश्र भावनांनी दीपकचा आवाज कापू लागला. काही क्षण तो मान खाली घालून बसला…मग म्हणाला, ‘‘मागच्या चार महिन्यांपासून माझ्या बायकोचं बॉसबरोबर अफेअर सुरू होतं. आमच्या घटस्फोटानंतर तिनं माझ्या बॉसशी लग्न केलं.’’ दीपक अजूनही त्या मन:स्थितीतून बाहेर आला नव्हता.
काही क्षण शांततेत गेले. समीक्षानं त्यांच्या खांद्यावर थोपटून त्याला शांत केलं. हळूवारपणे विचारलं, ‘‘हे सगळं तुम्ही मला का सांगितलंत?’’
दीपकनं समीक्षाकडे बघितलं. सरळ तिच्या नजरेला नजर भिडवली. त्या नजरेतलं आकर्षण अन् ओढ समीक्षाला जाणवली. तिनं त्याची नजर टाळली. मग वातावरण मोकळं करण्यासाठी तिनं विचारलं, ‘‘दीपक, इतक्या वर्षात तुम्ही दुसरं लग्न का केलं नाहीत?’’
‘‘तुझ्यासारखी कुणी भेटलीच नाही.’’
समीक्षा एकदम बावचळून उठून उभी राहिली. मनांतून तिलाही दीपक विषयी आकर्षण वाटत होतं. दीपकलाही तिच्याबद्दल ओढ वाटतेय हे तिल कळंत होतं पण असं एकाएकी तो इतकं स्पष्ट बोलेल असं तिला वाटलं नव्हतं. अर्थात् एकमेकांची मनांतली इच्छा एकमेकांना कळली हेही छानच झालं.
समीक्षाकडून होकार कळताच दीपकनं म्हटलं, ‘‘समीक्षा, मी जे सांगतोय, ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं नाहीए. पण तुला माहीत असायला हवं, म्हणून सांगतोय. मी ख्रिश्चन आहे. माझ्यासाठी धर्म तेवढा महत्त्वाचा नाहीए. मी कर्म करण्यावर विश्वास ठेवतो. या आयुष्यात आपण अनेकविध लोकांच्या संपर्कात येतो त्यांच्याबरोबर काम करतो, त्यांच्याकडून मदत देतो व घेतो, बरंच काही शिकतो, मग तो कोणत्याही धर्माचा का असेना, धर्म त्या गोष्टींच्या आड येत नाही. तसंच, आयुष्याचा जोडीदार निवडतानादेखील धर्म आड येऊ नये असं मला वाटतं. तुझ्या रूपापेक्षा तुझे गुण मला भावले अन् धर्माच्यामुळे एक चांगली जीवनसंगिनी मला घालवायची नाहीए…मी सतत तुला आधार देईन हे माझं वचन आहे…पुढे तुझी इच्छा.’’
समीक्षालाही दीपकचं व्यक्तिमहत्त्व, त्याचे विचार, त्याचं काम आवडंत होतं. विशेषत: तो तिच्यावर प्रेम करतोय, तिला मान देतोय, हे समजल्यावर तर तिला दीपकबद्दल अधिकच प्रेम वाटू लागलं होतं. पण धर्म हा एक फारच मोठा प्रश्न होता. इतका मोठा निर्णय ती एकटी घेऊ शकत नव्हती. कारण आपल्याकडे मुलींना संस्कारच असे दिले जातात की ती त्यांची शक्ती ठरत नाहीत तर बेड्या ठरतात. कितीही कमवती, उदात्त विचार असणारी, कर्तबगारर मुलगी असू दे, थोडासाही वेगळा निर्णय घेण्याआधी तिला कुटुंबाचा, समाजाचा विचार करावाच लागतो. पुरूष कोणताही निर्णय सहज घेतो, स्त्रीला मात्र फार विचार करावा लागतो. अगदी आज भाजी काय करू इथपासून प्रत्येक गोष्ट ती विचारून करते. तेच तिचे संस्कार असतात.
समीक्षानं आईला आपला विचार सांगितला. तिचं मत विचारलं.
‘‘तुझं दीपकवर प्रेम आहे?’’ आईनं प्रश्न केला.
‘‘आई, माझं दीपकवर प्रेम आहेच, पण तो मला पसंत करतो, माझ्यावर प्रेम करतो, मला आधार देतो हे अधिक महत्त्वाचं नाही का?’’ समीक्षा म्हणाली.
आईनं म्हटलं, ‘‘हे बघ समीक्षा, तुझं वय आता लहान नाही. तुला मी ओळखते. वावगं तू कधीच वागणार नाहीस. तुझं लग्न व्हावं, संसार थाटावा, तू सुखी व्हावंस हीच माझीही इच्छा आहे. फक्त दुसऱ्या धर्मातल्या कुटुंबात तू स्वत:ला एडजेस्ट करू शकशील का? नीट विचार करून निर्णय घे.’’
समीक्षाच्या आईनं होकार दिल्यावर दीपकनं तिला आपल्या घरी नेलं. दीपकचे वडील वारले होते. घरात एक धाकटा भाऊ व आई होती. एका बहिणीचं लग्न झालेलं होतं. समीक्षाला दीपकची आई आवडली. तिच्या आईसारखीच सरळ साध्या स्वभावाची, प्रेमळ स्त्री.
‘‘लग्नानंतर कोण कसं वागेल याची खात्री देता येत नाही. दीपकचं पहिलं लग्न आम्ही जातीतली मुलगी बघून करून दिलं होतं…पण काय झालं? आज इतक्या वर्षानंतर त्यानं तुला पसंत केलीय, याचाच अर्थ तुझ्यात त्याला काही तरी विशेष दिसलंय…’’ आईनं सांगितलं. ‘‘तुम्ही दोघं लग्न करून सुखात रहा. माझे आशिर्वाद आहेत.’’
दीपकच्या भावाला मात्र ही हिन्दु मुलगी नापसंत होती. त्यानं बहिणीलाही फोन करून बोलावून घेतलं. तिनंही बराच तमाशा केला. ‘‘लग्न करायचं होतं, तर मला सांगायचंस, एका वरचढ एक मुली मी आणल्या असत्या. तू विचार कर, एक हिन्दु मुलगी एका घटस्फोटित ख्रिश्चन मुलाशी, तो ही एवढा चाळीशी ओलांडलेला, लग्नाला संमती देतेय, म्हणजे तिच्यात काही तरी दोष असणारंच…इतकं वय होई तो तिचं लग्न झालेलं नाही म्हणजे आधीची काही प्रकरणंही असतील…तुला काही माहीत आहे का? की तू आमच्यापासून लपवतो आहेस?’’
दीपक मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. जेव्हा मनानं पुल तयार केलाय तर त्यावरूनच तो त्याचा प्रेमाचा मुक्काम गाठणार आहे. मुळात मनोमीलन महत्त्वाचं असतं.
दीपक व त्याची आई विवाहाला सहमत आहेत याचा समीक्षाला आनंद झाला पण त्याचे भाऊ-बहिण विवाहाविरूद्ध आहेत ही भावना तिला छळंत होती. आता समीक्षाला आपल्या घरात वडिलांना व भावांना ही गोष्ट सांगायची होती. घरात वादळ उठणार याची तिला खात्री होती. तिनं सांगितल्यावर तसंच घडलं.
‘‘तुला लाज नाही वाटली स्वत:च स्वत:चं लग्न ठरवतेस, ते ही एका वेगळ्या जातीच्या मुलाबरोबर…थोडा तरी आमच्या इभ्रतीचा विचार करायचास?’’ धाकटा भाऊ ओरडत होता…याच भावाचं लग्न आपल्यामुळे लांबू नये म्हणून समीक्षानं आईवडिलांना शपथ घालून त्यांचं लग्न करून द्यायला भाग पाडलं होतं.
‘‘मी कुठल्या तोंडानं समाजात वावरायचं? माझ्या माहेरी अजून धाकट्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, तिच्या लग्नात अडथळा येईल ना या तुझ्या विधर्मी लग्नामुळे,’’ भावाची बायको तरी मागे का राहील? तिनंही बोलून घेतलं.
‘‘शेवटचं सांगतोय समीक्षा, लग्न करशील तर माझ्या प्रेताला ओलांडूनच घराबाहेर जाशील. स्वत:चं सौभाग्य हवंय का आईचं हे तू ठरव.’’ बाबा निर्वाणीचं बोलले.
त्या रात्री समीक्षा व तिची आई आपापल्याअंथरूणावर तळमळत होत्या. रडत होत्या. पुढे नेमकं काय घडणार आहे ही अज्ञान काळजी दोघींनाही छळंत होती.
दुसऱ्यादिवशी वडिलांनी त्यांच्या बहिणीला, समीक्षाच्या आत्याला बोलावून घेतलं. समीक्षाचं अन् तिचं बऱ्यापैकी जमायचं. म्हणून बाबांनी समीक्षाला लग्नापासून परावृत्त करण्यासाठी तिचा आधार घेतला. आत्यानंही हरतऱ्हेनं तिला समजावलं. शपथा घातल्या. इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं. भाऊ, भावजय, वडिल, आत्या सर्वांनी घसा कोरडा होईपर्यंत ओरडून घेतलं.
समीक्षा मुकाट्यानं ऐकत होती. शेवटी उठता उठता अगदी शांतपणे म्हणाली, ‘‘मीही एकच सांगते. केलं लग्न तर दीपकशीच करेन नाही तर अशीच कुंवारी राहीन.’’
तिला वाटलं होतं यावर काहीतरी प्रतिक्रिया येईल. पण तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयाचं स्वागत झालं. तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करून तिनं सुखाचा संसार करावा हे मात्र मान्य झालं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच वडील म्हणाले, ‘‘मी समीक्षासाठी मुलगा बघितलाय…आपल्या गोपीनाथचा भाचा. ओळखीतली माणसं आहेत. त्यांनाही लग्नाची घाई आहे अन् आम्हालाही…’’ समीक्षाकडे तिरस्कारानं बघंत ते आपल्या खोलीत निघून गेले.
जमीन दुभंगावी अन् आपण त्यात गडप व्हावं असं झालं समीक्षाला. त्याच सायंकाळपासून हिंदुत्त्व प्रचारक सेनेचे प्रमुख गोपीनाथच्या भाच्याचे गुंड समीक्षाच्या मागावर सुटले. तिच्या ऑफिसच्या बाहेर पहारा करायचे, रस्त्यावर तिच्या मागे मागे असायचे. दीपकची व तिची भेट होऊ नये म्हणून त्यालाही धमकी द्यायचे. तीन दिवसात समीक्षा वैतागली, पार दमली.
मुलींना आपण शिकवतो, त्यांनी नोकरी करावी, स्वावलंबी व्हावं असं आपल्याला वाटतं. पण एखाद निर्णय त्यांनी त्यांच्या मनानं घेतला तर तो आपल्याला सहन होत नाही. मुलीला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क असू नये? तिचा आनंदही समाजानं ठरवावा? कुटुंबासाठी तिनं जीव द्यावा तर ती महान ठरते पण स्वत:साठी काही मागितलं तर तिला निर्लज्ज म्हणायचं? आईचा जीव विचार करून घाबरा झाला. पोरीची तिला कीव आली. स्वत:चीही कीव आली. या क्षणी तिच्या पाठीशी उभं रहायलाच हवं मग काय वाट्टेल ते होऊ दे.
रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळे मजेत जेवत होते. फक्त समीक्षाच दु:खी होती. समीक्षानं लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचा प्रश्न मिटला होता.
अचानक आई म्हणाली, ‘‘समीक्षा, तू मनांतली काळजी काढून टाक. आत्तापर्यंत या घरातली सगळी नाती तू उत्तम प्रकारे निभावली आहेस. तू चांगली मुलगी आहेस, बहीण आहेस, भाची आहेस, पुतणी आहेस. आता आम्ही जबाबदारी पार पाडायची आहे. आम्ही तुझ्या आणि दीपकच्या लग्नाच्या आड येणार नाही. ती सुखी रहा.’’
वडील काही म्हणणार तेवढ्यात त्यांना थांबवंत तिनं म्हटलं, कर्तव्य फक्त मुलींचीच नततात. कुटुंबाचीही असतात. दीपकच्या आईला मी भेटते अन् लग्नाचं नक्की करते.
वडील आश्चर्यानं बघत असताना त्यांच्या नजरेला नजर भिडवून आई अगी निर्णायक आवाजात म्हणाली, ‘‘माझं आयुष्य सरत आलंय, आता विधवा काय मला फरक पडणार नाही पण लेकीचं लग्नं झालेलं, तिचा सुखाचा संसार मला बघायचा आहे.’’
लग्न होणार हे नक्की झालं तरी दोन्ही कुटुंबात फारसा उत्साह नव्हता. समीक्षाच्या वडिलांनी पत्रिका छापल्या नाहीत. कारण त्यावर बायबलच्या ओळी लिहाव्या लागतील. दीपकच्या नातलगांना पत्रिकेच्या वरच्या गणपतीचं चित्र खटकंत होतं. नवरा नवरीच्या मनांत विघ्न येईल का ही काळजी होती. पण दोघांच्या आयांनी मात्र खूप प्रेमानं अन् उत्साहानं आशिर्वाद दिले.
लग्न झालं तरी समीक्षाच्या मनांत थोडं दु:ख होतं.
‘‘सगळ्यांनी सहकार्य केलं असतं तर किती छान झालं असतं.’’ तिने बोलून दाखवलं.
दीपकनं तिची समजूत घातली, ‘‘हे बघ, आपण एकमेकांवर प्रेम केलं, करतोय, पुढेही हे प्रेम असंच राहील. याप्रेमामुळेच आपण एकमेकांना निवडलंय. घरची माणसं खरंच आपल्यावर प्रेम करत असतील, आपल्या आनंदात आनंद बघत असतील तर आपल्याकडे येतीलच येतील.’’
समीक्षालाही ते पटलं. आता मनांत कोणतीही शंका नव्हती. फक्त डोळ्यात उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्नं होती.