कथा * माधव गवाणकर
बकाल वस्तीतला मी एक कंगाल कवी होतो. शे पन्नास रुपये मिळाले तरी त्यासाठी रेडिओ केंद्रापर्यंत रेकॉर्डिंगसाठी जायचो. स्वत:चा दिवाळी अंक काढून पुरता फसलो होतो. कर्जात बुडालो होतो. मनात ‘नकारात्मक’ विचार खूपदा यायचे. समुद्र त्यादृष्टीने जवळ होता. मला पोहता येत नव्हतंच. पूर्णवेळ लेखनाच्या उचापती अंगाशी आल्या होत्या. बेरोजगारी घामोळ्यासारखी टोचतदाह करत होती.
विजेची दोन महिन्यांची बिलं भरायची बाकी होती. गॅस बाकबुक करत होता. त्याचा जीव कधीही गेला असता. माझं जेवण मीच करायचो, पण गॅस तर पाहिजे. तरी बरं संसाराचं ओझं नव्हतं. मरून गेलो तरी माझा मीच होतो. मी आरशात स्वत:ला पाहिले. अगदी लाचार, ओशाळवापणा फिकट वाटत होतो मी. कुणालाही माझा उपयोग नाही आणि या पैशाच्या तालावर नाचणाऱ्या महानगरात जगण्याची आपली पात्रता नाही याची खात्री पटू लागली होती.
क्लासमेट हेमू माझ्या गरिबीचा वास काढत नेमका येऊन थडकला. मऊ स्वरात त्याने चौकशी केली. त्याचे शब्द धीर देऊ लागले. खानदानी, वडिलोपार्जित संपत्तीचं काय करायचं चैन तरी करून किती करणार? असा हेमूसमोर सवाल असायचा. मी रोज रेडिओवर कार्यक्रम केला असता, तरी हेमूच्या गळ्यात जी सोन्याची जाडजूड जड चेन होती, तशी मला घेता आली नसती. हेमू समलैंगिक आहे आणि महिलांऐवजी पुरुषांकडे अधिक आकर्षित होत असल्याने मला त्याची थोडी भीतिच वाटायची. पण मी बेकारीमुळे अगदी फाटकातुटका झालोय हे हेरून तो माझ्या त्या पावसात गळणाऱ्या रुमवर येऊ लागला होता. त्याची कार माझ्या रंग जाऊन भंग झालेल्या घरापाशी अजिबात शोभत नसे.
‘‘असा का दिसतो आहेस तू? आजारी वाटतोयस.... चणचण आहे का पैशाची?’’ हेमूने अचूक ठिकाणी बोट ठेवलं.
‘आहे खरी, पण...’’
‘‘असे कितीसे लागतील?’’ या प्रश्नात त्याला असं सुचवायचं असावं की एक कवी मागून किती मागणार? मोठी रक्कम मागण्याचं तुला धैर्यच होणार नाही.’’