कथा * पूनव आरडे
नजरभेटीचा खेळ, दोन डोळ्यांनी, दुसऱ्या दोन डोळ्यांशी शब्दांशिवाय साधलेला संवाद हा माझ्या मते जगातला सर्वाधिक सुंदर आणि रोमांचक खेळ आहे (निदान सुरूवातीला तरी असंच वाटतं). या खेळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चार डोळे हा खेळ खेळतात त्यांच्या पलीकडे कुणालाच त्याबद्दल काही शंका येत नाही. मीदेखील सुमारे एक वर्षांपूर्वी हा खेळ सुरू केला होता. इथं मुंबईत जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो. आमच्या सोसायटीच्या बागेतल्या जॉगिंग ट्रेकवर पाण्यामुळे थोडं शेवाळं साचतं. तिथं पाय घसरण्याची भीति असते. खरं तर मला घराबाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर जायला अजिबात आवडत नाही. तिथलं ट्रॅफिक, बसचे हॉर्न, लोकांचा गोंगाट मला नको असतो. म्हणूनच कोलाहलापासून दूर सोसायटीच्या बागेत फिरणं हा माझा नित्यक्रम असतो.
हं, तर पावसाल्यातल्याच एका दिवशी मी घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर असेलल्या दुसऱ्या मोठ्या पार्कात सकाळच्या ब्रिस्क वॉकसाठी जात होते. तिथंच वाटेत तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. अवचितच आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्या क्षणार्धाच्या नजरभेटीत जे घडायचं, ते घडून चुकलं होतं. मला वाटतं, हा डोळ्यांचाच दोष असावा. कुणाचे डोळे कुणाच्या डोळ्याला भिडले तर मग त्यावर काही उपाय नाहीए अन् मला वाटतं हाच चार डोळ्यांच्या नजरभेटीचा खेळ आहे.
हं! तर, जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं तेव्हा काहीतरी घडलं. काय घडलं हे सांगणं, त्या क्षणाचं वर्णन करणं, त्या भावनांना शब्दरूप देणं अवघड आहे. पण इतकंच आठवतं की तो सगळा दिवस फारच मस्त गेला. घरी परतताना वाहनांचे कर्कश्श हॉर्नदेखील जाणवले नाहीत. रस्त्यावरच्या कोलाहलानं वैताग आणला नाही. सकाळी सात वाजता मी हवेत उडंत अगदी आनंदानं गाणं गुणगुणत घरी आले.
२२ वर्षांची माझी मुलगी कोमल आठ वाजता कॉलेजला जाते. नवरा नऊ वाजता ऑफिसला जातो. मी रोजच्याप्रमाणे कोमलला हाक मारून किचनमध्ये शिरले. भराभर सकाळची कामं आवरली. दोघं निघून गेल्यावर सगळा दिवस मला खूप उत्साह वाटत होता. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा वॉकसाठी बाहेर पडले. पुन्हा त्याच जागी तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. आमची नजरानजर झाली. मनात, देहात एक गोड शिरशिरी जाणवून गेली. नकळत उत्साह संचारला…शरीर जणू पिसासारखं हलकं झालं होतं. नंतर पुढल्या तीनचार दिवसात मला अगदी स्पष्टपणे लक्षात आलं की तो माझा वाट बघतो. पुन्हा:पुन्हा वळून तो त्या वळणाकडे बघत असतो जिथून मी त्या रस्त्यावर येणार असते. मी अगदी दुरूनच त्याला पुन्हा:पुन्हा बघताना पकडलं होतं.
नजरभेटीचा हा खेळ खूपच छान सुरू झाला होता. दोघंही खेळाडू उत्सुकतेनं सकाळची वाट बघत असायचे. संडेला मी कधीच सकाळचा वॉक घेत नव्हते. त्या दिवशी माझा ब्रेक असायचा…आज मी संडेला बाहेर पडले तसं दचकून निखिलनं विचारलं, ‘‘अगं, कुठं निघालीस?’’
‘‘फिरायला…’’ मी उत्तरले.
‘‘पण आज तर रविवार आहे?’’
‘‘आता झोप उघडलीच आहे, तर जाऊन येते. तुम्ही अजून पडून रहा…मी आलेच!’’ म्हणत मी सरळ बाहेरचा रस्ता गाठला. बघितलं तर तो तिथं होताच. आज त्याचा मुलगा बरोबर नव्हता. बहुधा झोपला असावा रविवार म्हणून. पण आज तो त्याच्या पत्नीसोबत होता. मुद्दाम लक्षपूर्वक मी त्याच्या पत्नीकडे बघितलं. छान होती ती. सुंदर आणि स्मार्ट. मला आवडली. त्यानं मला बघितलं अन् बायकोची नजर चुकवून तो माझ्याकडे बघून चक्क हसला. प्रथमच हसला अन् माझ्या सकाळी उठून येण्याचं जणू सार्थक झालं.
म्हणजे आमच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी होतं. त्यामुळे माझ्यात खूपच बदल झाला होता. सकाळची वाट बघण्यात माझी सगळी दुपार, सायंकाळ अन् रात्रही संपत होती. दहा दिवसातच मी किती बदलले होते. संपूर्ण दिवस ही एक जाणीव की या वयातही कुणीतरी आपली वाट बघतंय, रोमांचित करायला पुरेशी होती.
हळूहळू एक महिना पूर्ण झाला. या खेळातल्या दोन्ही खेळांडूनी तोंडानं एक शब्दही उच्चारला नव्हता. डोळेच विचारायचे, डोळेच उत्तर द्यायचे.
एक दिवस नवऱ्यानं विचारलंच, ‘‘आजकाल तू सोसायटीच्या बागेत फिरत नाहीस का?’’
‘‘नाही, तिथं बुळबुळीत झालंय, मला घसरायची भीती वाटते.’’
‘‘पण तुला तर बाहेरचा कोलाहल आवडत नाही ना?’’
‘‘पण पाय घसरून पडण्यापेक्षा तो परवडला ना?’’ उत्तर दिलं मी, पण मनातून जरा अपराधीही वाटत होतं. तरीही या खेळात खूपच मजा वाटत होती म्हणून पुन्हा सकाळची वाट बघायला लागले.
आता खरं तर पावसाळा संपला होता, पण अजूनही बाहेरच्याच बागेत जात होते. ऑक्टोबर सुरू झाला होता. चार डोळ्यांच्या भेटीचा खेळ खूपच रोमांचक झाला होता. मला बाहेरचा कोलाहल आणि गर्दी आवडत नसतानाही केवळ त्याला बघण्यासाठी घाईनं बाहेर पडत होते. पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित कपडे घालून, छान क्रीम पावडर लावून, नवीन टीशर्ट्स, नवीन ट्रॅकपॅन्ट्स, स्टायलिश बूट घालून, सेंटचा फवारा मारून, शोल्डरवर केसांची कधी उंच पोनी बांधून तर कधी केस मोकळे सोडून. त्यावेळी मला मी अगदी सोळा वर्षांची तरूणी असल्यासारखं वाटायचं. कसली धावायची मी…खरं तर सकाळचं फिरणं वर्षांनुवर्षं चाललंय. पण इतकी मजा यांपूर्वी कधीच आली नव्हती.
त्याच्या नजरेशी नजर भेटली की किती प्रश्न असायचे. डोळेच प्रश्न विचारत, डोळेच उत्तर देत. कधी सुट्टीच्या दिवशी उशीर झाला किंवा इतर दिवशी काही कारणानं खाडा झाला तर त्याचे डोळे तक्रार करायचे. त्याचं उत्तर मी डोळ्यांनीच, फक्त हसून द्यायची. कधी कधी तो बहुधा मुद्दामच बघत नसे. मग मीच त्याच्याकडे टक लावून बघायचे. मग तोही मनमोकळे हसायचा. खरंच किती मजेदार खेळ होता…थोडा विचित्रही होता…बोलायची गरजच नव्हती. सकाळी एकदा बघितलं की संपूर्ण दिवस मी एका अनामिक आकर्षणात गुरफटलेली असायचे. मला मग कुणाचा, कशाचा रागही येत नसे की विनाकारण चिडचिडही होत नसे. अगदी प्रसन्न मुद्रेनं, शांतपणे मी माझी घरातली कामं आटोपत असे.
निखिलना आश्चर्य वाटत होतं. एक दिवस त्यांनी म्हटलंच, ‘‘आता तर पावसाळाही संपलाय. जॉगिंग ट्रॅकवरचं वाळलेलं शेवाळंही खरबडून टाकलंय, तरीही बाहेरच्या मार्डनमध्ये जाते आहेस?’’
‘‘हो, जास्त मोठा अन् चांगला राऊंड होतो. इतकी वर्षं इथल्या बागेत फिरून फिरून कंटाळाही आलाय, हा बदल आवडलाय मला.’’
‘‘ठिक आहे. तुला आवडतंय तर काहीच हरकत नाही. फिरणं होतंय हेच महत्त्वाचं!’’ निखिलही फिरायला जायचे पण मी आल्यानंतर ते निघायचे.
त्यानंतर माझं कंबरेचं दुखणं उपटलं. मला खूप त्रास होऊ लागला. सकाळी वीस मिनिटं जायला, वीस मिनिटं यायला लागायची. आल्याआल्या दोघांचे लंच बॉक्स तयार करणं, ब्रेकफास्ट तयार करणं यातच मी दमायचे. पूर्वी मी अर्ध्या तासात घरी आलेली असायचे. दहा मिनिटं मला विश्रांतीसाठी मिळायची. डॉक्टरांकडे जाऊन आले. ते म्हणाले, ‘‘फिरण्याचा वेळ थोडा कमी करून बघा.’’ मी एकदम दचकले. बेचैन झाले. माझी दिनचर्या. दिवस रात्रीचा सर्व वेळ सध्या सकाळी त्याच्या भेटीशी जुळलेला होता. त्याला भेटायचं म्हणजे वीस मिनिटं चालत जायचं अन् वीस मिनिटं चालत परत यायचं. माझ्या दुखण्याने मी त्रस्त होते. थकवा यायचा. आता नियमित जाणं होईना. खाडे व्हायला लागले. कारण आल्यावर किचनमधल्या कामासाठीही एक संपूर्ण तास द्यावाच लागायचा. म्हणजे चाळीस मिनिटं व एक तास जर सलग सकाळी काम केलं तर सगळा दिवस माझी कंबर दुखत राही. अरे बापरे! आता काय करू? इतके दिवस एखाद्या षोडशीच्या उत्साहानं अन् आतुरतेनं रोमांचित होणारी मी…आता काय होणार? सगळं संपणार का?
निखिलला आश्चर्यही वाटत होतं. ते थोडे वैतागलेही होते. मला समजावत होते, ‘‘अगं, इतकी वर्षं इथंच वॉक घेत होतीस ना तर आता सकाळचं फिरणं बंद करून संध्याकाळी फिरायला जा. सकाळी कामं जास्त असतात. ती तर टाळता येणार नाहीत. म्हणून आपणच तोडगा काढायचा. सायंकाळी काम कमी असतात. त्यामुळे तुझ्यावर ताण येणार नाही. तब्येतीला थोडा आराम पडेल…’’
डॉक्टरांनीही हेच सांगितलं. पण मला ते पटेना. फारच विचित्र मन:स्थितीत होते मी. शरीराला विश्रांतीची गरज होती. पण मनाला आनंद तो दिसल्यामुळेच मिळायचा. त्याला बघण्यासाठीच मी बाहेरच्या रस्त्यावर, लांबच्या बागेत जात होते. पण आता खाडे फारच होऊ लागले.
त्याचा मुलगा एव्हाना छानपैकी सायकल चालवू लागला असावा. कारण आता तो एकटाच दिसायचा. नजरभेटीचा खेळ चालूच होता. माझ्या तब्येतीची काळजी न करता मी बाहेर जातच होते.
एक जानेवारीच्या सकाळी पहिल्यांदा त्यानं माझ्या जवळून जाताना, ‘हॅप्पी न्यू ईयर’ म्हटलं. मी ही आपली स्पीड करून, ‘‘थँक्स टू यू,’’ म्हटलं. इतक्या दिवसांच्या या आमच्या नजरभेटीच्या खेळात प्रथमच शब्दांचा वापर झाला. मन मयूर आनंदानं थुईथुई नाचायला लागलं.
आता माझी कंबर जास्त दुखत असली तरी मी कोमल आणि निखिलपासून स्वत:चं दुखणं लपवत होते. ती दोघं घराबाहेर पडली की दुखणारी कंबर शेकत सगळा दिवस लोळून काढायचे. कंबरेला बेल्ट बांधून असायचे. पण कितीही लपवलं तरी वेदना चेहऱ्यावर उमटायची. लेकीच्या लक्षात यायाचं. मग ती कधी प्रेमानं, कधी दटावून म्हणायची, ‘‘मॉम, नको त्रास करू घेऊस. डॉक्टरांनी नको म्हटलंय ना? संध्याकाळीच वॉक घेत जा, सकाळचं फिरणं बंद कर.’’
पण मी ऐकत नव्हते. कारण मी जगातल्या सगळ्यात आकर्षक आणि रोमांचक खेळातील खेळाडू होते.
मे महिना सुरू झाला अन् माझ्या जिवाची घालमेल वाढली. मे महिन्यात मी नेहमीच सायंकाळी फिरायला जायची. उन्हाळा, उकाडा मला अजिबात सहन होत नाही. आठ-दहा दिवस कशीबशी मी गेले. मुंबईतल्या चिपचिप्या उन्हाळ्यात सकाळीच इतकी घामाघूम होऊन जायची. पार थकलेली. आल्या आल्या लिंबूपाणी ढसकल्यावर खरं तर जागचं उठू नये असं वाटायचं…पण सकाळची कामं वाट बघत असायची. उठावंच लागायचं.
या उन्हाळ्यानं तर माझ्या मनाचा अगदी अंतच पाहिला. यावेळचा उन्हाळा तर या चार डोळ्यांच्या खेळातला महत्त्वाचा टप्पा होऊन आला. कितीही प्रयत्न केला तरी मी उन्हाळ्यात रोज नियमित फिरायला जाऊ शकले नाही. सुट्टीच्या दिवशी आवर्जून जायचे. कारण घरी परतल्यावर स्वयंपाक घरात शिरण्याची घाई नसे. त्याला बघण्याचा मोह अनावर होता. पण उन्हाळा अन् काहिली त्यावर मात करत होती. घाम पुसता पुसता जीव नकोसा व्हायचा. त्याला बघून आल्यावर ठरवायचे की आता नाही जाणार…उकाडा सहन होत नाही. मी कुणी सोळा वर्षांची तरूणी आहे का जी प्रियकरासाठी वेडीपिशी होते. नवरा आहे, मोठ्या वयाची मुलगी आहे, अरे मी एक संसारी, मॅच्युअर स्त्री आहे. मी कशाला त्याला भेटायला धावत जावं? अन् इतक्या महिन्यांत नेमकं मिळवलं काय? मला काही त्याच्याशी अफेअर करायचं नाहीए की पुढे संबंध वाढवायचे नाहीएत. जे झालं, ते पुरे झालं. ही बाब इतकी महत्त्वाची नाहीए. उन्हाळा वाढत होता. माझी अक्कल ठिकाण्यावर येत होती. सगळा उत्साह, रोमांस, रोमांच…सगळंच संपल्यात जमा होतं. उन्हाळा, कंबरेचं दुखणं आणि घरकाम या त्रयीनं मला या खेळात पराभूत केलं होतं. मनातून अजूनही त्या पार्कात जावंसं वाटायचं पण प्रत्यक्षात ते जमणं शक्य नाही हे ही समजत होतं.
खरं तर मनात, हृदयात खळकन् काही तरी फुटलं होतं. पण मग स्वत:चीच समजूत घातली की ठीक आहे. जीवन आहे…असंच चालायचं…होतं असं कधीकधी. हे वय, ही वेळ, या जबाबदाऱ्या खरं तर या खेळामध्ये नसाव्यात…पण माझ्यावर त्या आहेत. नजरभेटीच्या या खेळात मी आपला पराभव मान्य केला होता. ‘ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गंमतीची’ ही ओळ आता आयुष्यातून मी पुसून टाकली होती अन् पूर्वीप्रमाणेच आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये सायंकाळी फिरायला जायला लागले होते.