कथा * सुमन बेहरे
‘‘अहो, चला ना, आपण कुठंतरी बाहेर आठदहा दिवस फिरून येऊयात. राघवही त्याच्या मित्रांसोबत सिंगापूरला ट्रिपवर गेलाय. आपण किती दिवसात कुठंच गेलो नाही.’’ सुनयनानं नवऱ्याला, जयला खूपच गळ घातली.
‘‘मला कुठंही जायचं नाहीए. माझा अगदी संताप होतो कुठंही जायचं नाव काढलं म्हणजे, काय मिळतं बाहेर जाऊन? यायचं तर पुन्हा घरीच ना? मग जायचं कशाला? ट्रेनचा प्रवास करा, थका, हॉटेलात राहा अन मूर्खासारखे इथे तिथे फिरा. विनाकारण इतकाले पैसे खर्च करायचे अन् प्रवास करून आल्यावर दमलो म्हणून पुन्हा घरी आल्यावर दोन दिवस विश्रांती घ्यायची. सगळी दिनचर्या विस्कळीत होते. मला कळतच नाही, तुला सतत ‘फिरायला जायचं’ एवढंच का सुचतं? मला नाही आवडत कुठं जायला हे ठाऊक असूनही आपलं, फिरायला जाऊचं तुणतुणं’’ जय संतापून ओरडला.
‘‘तुम्हाला नाही आवडत हे मला ठाऊक आहे, पण कधीतरी दुसऱ्याला आवडतं म्हणूनही काही करावं ना? बावीस वर्षं झाली लग्नाला, तुम्ही कधीतरी कुठं घेऊन गेलात का? राघवही बिचारा किती वाट बघायचा. बरं झालं तो तुमच्यासारखा संतापी अन् खडूस नाहीए ते! त्याला आवडतं प्रवास करायला. प्रत्येक मुलीला इच्छा असते लग्नानंतर नवऱ्याबरोबर प्रवासाला जावं. रोजच्या रूटीन आयुष्यातून वेळ काढून थोडं वेगळं आयुष्य जगावं. त्यामुळे पुन्हा कामं करायला, आपलं आयुष्य जगायला नवा उत्साह मिळतो. नव्या जागी, नवे लोक भेटतात, नवं काही खायला, बघायला, ऐकायला मिळतं. लोक काय वेडे आहेत का? उगीच ते प्रवासाला जातात? तुम्हीच आहात जगावेगळे आणि अत्यंत चिक्कू, कंजूष. पैसा खर्च करायचा म्हटला की पोटात गोळा येतो तुमच्या. कधी तरी बायकोच्या, मुलाच्या भावनांना किंमत द्या, समजून घ्या. छोट्या छोट्या आनंदालाही का मुकायला लावता आम्हाला?’’ सुनयनाच्या मनातला सगळा संताप, सगळी खदखद आता बाहेर पडली.
‘‘उगीच मूर्खासारखी बडबडू नकोस अन् राघवचं काय सांगतेस? अजून लग्न नाही झालंय त्याचं. संसारासाठी पैसा खर्चावा लागेल, तेव्हा हे प्रवासाचं भूत पार उतरेल. सध्या तरी बापाच्या जिवावर चंगळ चाललीये त्याची.’’
‘‘उगीच काही तरी बोलू नका, तुम्ही थोडीच दिलेत त्याला पैसे. त्याच्या ट्रिपचा सगळा पैसा मी दिलाय.’’ सुनयना संतापून म्हणाली.
‘‘मग त्यात काय मोठेपणा? उपकार केलेस का माझायावर? कमवते आहेस म्हटल्यावर खर्चही करायलाच हवा. सगळा पैसा काय तू स्वत:वरच खर्च करणार का?’’
दोघांमधला वाद वाढतच चालला. ही काही आजची नवी बाब नव्हती. नेहमीच त्यांच्यात खूप वाद व्हायचे. थोडेफार मतभेद असू शकतात. पण जयचा स्वभावच फार विचित्र होता. तो स्वत: कधीच खळखळून हसतही नसे. इतरांना आनंदात बघायलाही त्याला आवडत नसे. सुनयनाच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढणं, तिच्या कुठल्याही म्हणण्याला नकार देणं यात त्याला विकृत आनंद मिळायचा.
‘‘मी ही ठरवलंय…कुठं तरी फिरून येईनच!’’ सुनयनानं जयला जणू आव्हानच दिलं. तिला माहीत होतं की हल्ली बऱ्याच टूरिस्ट कंपन्या लेडिज स्पेशल, ओन्ली लेडीज अशा ट्रिपा काढतात. सगळी व्यवस्था अगदी उत्तम असते. स्त्रिया अगदी सुरक्षित व बिनधास्त प्रवास करू शकतात.
तिनं गूगलवर अशा प्रवासी कंपन्यांची माहिती काढली. एका कंपनीचं नाव वाचून क्लिक केलं, तेव्हा व्यवस्थापक स्त्रीचं नाव ओळखीचं वाटलं. तिचं प्रोफाइल बघताच सुनयनाचे डोळे आनंदानं चमकले. मानसी तिची कॉलेजातली मैत्रीण होती. लग्नानंतर सुनयनाचा तिच्याशी संपर्क नव्हता. जयला सुनयनाचे माहेरचे, इतर नातलग किंवा मित्रमैत्रीणी कुणाशीच संबंध नको होते. त्यामुळे सुनयनानं सर्वांशी फारकत घेतली होती.
तिनं मानसीचा फोन नंबर मिळवला अन् फोन केला. मानसीला खूप आनंद द्ब्राला. ‘‘सुनयना, अगं किती दिवसात तुझा आवाज ऐकतेय…कुठं आहेस? काय करते आहेस?’’
दोघींच्या गप्पा इतक्या रंगल्या की सांगता येत नाही. गप्पांमधूनच सुनयनाला कळलं की त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या अजून दोघीजणीही त्या लेडीज स्पेशल टूरवर जाताहेत.
‘‘आता पुढली ट्रिप कधी आहे तुझी? अन् कुठं जाणार आहात? मलाही यायचंय.’’
‘‘अगं तर मग आताच चल ना? चार दिवसांनी आमची लद्दाखची टूर आहे. दहा दिवसांची टूर आहे. सगळी तयारी झालीय. तुला ही घेते मी त्यात. खूप मज्जा येईल. येच तू. खूप जुन्या आठवणी आहेत. त्यांची उजळणी करू. हो, अन् तुला स्पेशल डिस्काउंटही देईन.’’
‘‘मी नक्की येते. फक्त काय तयारी करावी लागेल तेवढं सांग. अशी संधी पुन्हा मिळणार नाही.’’
जयला जेव्हा तिनं हे सांगितलं, तेव्हा तो प्रचंड संतापला. ‘‘काय डोकंबिकं फिरलंय का तुझं? इतका पैसा विनाकारण खर्च कशाला करायचा? ज्यांच्याबरोबर तू जाते आहेस ना? त्या सगळ्या बायका फ्रस्टेटेड असतात. एकतर त्यांची लग्नं झालेली नसतात किंवा त्यांना नवऱ्यानं टाकलेलं तरी असतं. म्हणूनच असे ग्रुप करतात त्या. नाही तर नवऱ्यासोबत गेल्या नसत्या? कुणास ठाऊक प्रवासात या काय काय करतात? प्रवासाच्या नावावर कसले धिंगाणे घालतात? काही गरज नाहीए तू त्यांच्याबरोबर जाण्याची. अशा सिंगल बायकांच्या आयुष्यात पुरूष नसतात म्हणून त्या आपसातच संबंध ठेवत असतात. नाही पुरूष तर स्त्रीबरोबर संबंध…या सगळ्या बेकार बायका असतात. एक्सपेरिमेंट म्हणून काहीही करतात. स्वत:ला मारे इंटेलेक्चुअल म्हणवतात, समाज सेवेच्या मोठमोठ्या गोष्टी करतात, पण खरं तर सेक्सुअल प्लेजर हवा असतो त्यांना. तो मिळतच नाही म्हणून मग असले धंदे…तुला तर माझ्याकडून काही कमी पडत नाहीए ना?’’
‘‘शी:! किती घाणेरडा विचार करता हो तुम्ही? मला खरंच कीव येते तुमची. एकटी स्त्री काही करते ती फ्रस्टेट असते म्हणून करते हे कुणी सांगितलं तुम्हाला? फक्त आपला आनंद मिळवला तर त्याला इतकं विकृत रूप द्यायचं? आणि हे सेक्सुअल प्लेजरबद्दल कुठून कळलं तुम्हाला? उगीच काही तरी बोलायचं…मी जात नाही पण तुम्हाला मला फिरायला न्यावं लागेल, आहे कबूल?’’ जय सुनयनाच्या बोलण्यानं ओशाळला तर होता. न बोलता खोलीत निघून गेला.
मानसी आणि दोन जुन्या मैत्रिणी अचला, निर्मला यांना भेटून सुनयना खूपच आनंदली. किती छान वातावरण होतं. एकत्र भटकणं, हास्य विनोद, एकत्र चहा, जेवण खरोखरच तिला इतकं मोकळं मोकळं अन् छान वाटत होतं. कुणाची काळजी नव्हती, घराची चिंता नव्हती…अगदी मुक्तपणे जगत होती ती. लदाखच्या त्या भूमीत तिला जणू स्वर्गसुखाचा साक्षात्कार झाला. आजही तिथं आधुनिकतेला वाव नाही. परंपरा जपल्या जातात. तिथली स्वच्छ हवा, निळंशार पाणी. हातात घेता येतील इतक्या उंचीवरचे ढग, सगळंच अद्भूत होतं. आजही तिथं बुद्धधर्माचा बराच प्रभाव आहे. तिथले लोक, त्यांचं आयुष्य, त्यांची संस्कृती हे सगळं खूप वेगळं आहे. अन् तरीही आपलं आहे. डोंगरात बसलेल्या छोट्या छोट्या वस्त्या, उंच स्तूप, मठ सगळंच कसं अद्भूत.
सुनयनाला वाटलं, गेल्या बावीस वर्षांत ती प्रथमच आपल्या मर्जीनुसार जगतेय. जयची कटकट नाही, त्याचे टोमणेही नाही, किती बरं वाटतंय. तिनं ठरवलं यपुढे मानसीबरोबरच इतरही अनेक प्रवास करायचे. तिची सगळी मरगळ, सगळा थकवा पार नाहीसा झाला होता.
दहा दिवस कसे संपले कळलंच नाही. पूर्ण रिलॅक्स मूडमध्ये ती परतली. तेव्हा प्रवास संपवून राघवही परत आला होता. दोघंही उत्साहानं प्रवासातले आपापले अनुभव एकमेकांना सांगत होते, तेवढ्यात जय भडकून ओरडला, ‘‘असा काय मोठा दिग्विजय करून आला आहात? इतका आनंद कशासाठी? अन् तू गं सुनयना? इतकी फ्रेश अन् सुंदर दिसते आहेस, काय आहे विशेष? त्या फ्रस्टेटेड बायकांची कंपनी खूपच आवडलेली दिसतेय. त्यांच्याचसारखी झालीस की काय तू?’’
कित्ती विकृत आहे हा माणूस? काहीच चांगलं मनात येत नाही का त्याच्या? जयच्या या घाणेरड्या अन् विकृत विचारसरणीला कंटाळलेली सुनयना आता तर त्याचा तिरस्कारच करू लागली. ती त्याला टाळायलाच बघायची. त्याच्या घाणेरड्या बोलण्यामुळे ती फार दुखावली जायची. आता तर त्यांच्या नात्यातला ताण खूपच वाढला होता. तो इतके घाणेरडे आरोप करायचा की तिच्या मनात त्याच्याविषयी चीड अन् चीडच उत्पन्न व्हायची. तो सेक्ससाठी जवळ आला तर ती त्याला झटकून टाकायची. मन असं दुखावलेलं असताना शरीर साथ देत नाही. तिला ते सांगता येत नव्हतं. समजून घेणं जयला येतंच नव्हतं.
सुनयनाच्या वागण्यानं तो अधिकच संतापत होता. एका रात्री तो तिच्यावर बळजबरी करणार तेवढ्यात तिनं त्याला धक्का देऊन दूर लोटलं. संतापलेला जय ओरडायला लागला, ‘‘मला कळंतय तुझं वागणं. त्या बायकांची कंपनी हवीय तुला…मग नवऱ्याची सोबत कशी आवडेल? तुला आता तिच चव चाखायची आहे…मानसीबरोबर मैत्री खूपच वाढली आहे तुझी.’’
‘‘काय बोलताय तुम्ही? काय ते स्पष्ट सांगा ना?’’ सुनयनानं म्हटलं.
‘‘स्पष्ट काय सांगायचं? स्वत:च समजून घे.’’
‘‘नाही जय, मला तुमच्याच तोंडून ऐकायचंय. प्रवासातून परत आल्यापासून बघतेय, सतत तुम्ही टोमणे मारताय, काहीही बोलताय…असं काय बदललंय माझ्यात? का असे वागता?’’ संतापानं लाललाल झाली होती सुनयना.
‘‘तू तर पूर्णपणे बदलली आहेस, मला तर वाटतंय की तू ‘लेस्बियन’ झाली आहेस. म्हणूनच तुला मी, माझा स्पर्शही नको वाटतो.’’
सुनयना अवाक् झाली. जयनं त्यांच्या नात्याच्या पावित्र्याच्याच चिंधड्या उडवल्या होत्या. अगदी निर्लज्जपणे तो आपल्या बायकोला लेस्बियन म्हणतोय? व्वा रे, पुरूष! धन्य तो पुरूष प्रधान समाज, जिथं महिला मैत्रिणींसोबत फिरल्या तर त्यांना लेस्बियन म्हणतात अन् पुरूषांबरोबर बाहेर गेल्या तर त्यांना चारित्र्यहीन ठरवलं जातं. हे असं का? तिचं डोकं भणभणायला लागलं.
हल्ली जय रोजच रात्री उशीरापर्यंत घराबाहेर असायचा. तिनं विचारलं तर म्हणायचा, ‘‘मी माझ्या मित्रांसोबत असतो. पण मी ‘गे’ नाही.’’ अधूनमधून कुणी तरी सांगायचं की त्याचे इतरत्र अनेक स्त्रियाशी संबंध आहेत. त्यांच्याबरोबर तो फिरतो, हॉटेलात अन् सिनेमालाही जातो…अन् इतरही सगळंच! सुनयनाला या गोष्टींवर विश्वास ठेवावा असं वाटत नव्हतं पण एकदा त्याच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग बघितले अन् तिची खात्रीच पटली. खरं तर जयच्या मित्रांनी हे तिला सांगितलं होतं, पण तिनं त्याकडे दुर्लक्षच केलं होतं.
रात्री दारू पिऊनच जय घरी आला होता. दार उघडताच दारूचा भपकारा आला. सुनयनानं त्याला काही विचारण्यापूर्वीच तो ओरडू लागला, ‘‘माझ्यावर पाळत ठेवतेस? हेर लावलेत का माझ्या मागे? स्वत: तर लदाखला जाऊन मजा मारून आलीस अन् मलाच दोष देतेस? स्वत: बदलली आहेस, मला सेक्स सुख देत नाहीस तर मी ते दुसरीकडून मिळवेनच ना? माझे संबंध आहेत स्त्रियांशी…पुरूषांशी नाहीत, तू लेस्बियन झाली आहेस…पण मी ‘गे’ नाही…’’
‘‘जय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही माझा अपमान करता. जिव्हारी लागेल असं बोलता अन् माझ्याकडून शरीर सुखाची अपेक्षाही करता? मी नाही त्यावेळी तुम्हाला साथ देऊ शकत. याचा अर्थ मी लेस्बियन आहे असा नाही होत.’’
जय तर एव्हाना अंथरूणात कोसळला होता. घोरायलाही लागला होता. सुनयनाला कळतच नव्हतं की तो तिला एकटीनं प्रवास करून आल्याची शिक्षा का देतोय की इतर स्त्रियांशी संबंध ठेवायचे म्हणून तिला त्यानं लेस्बियन ठरवली आहे.