*समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा
- माझ्या कपाळाच्या दोन्ही बाजूला काळसर डाग आहेत. कृपया उपाय सांगा?
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसनाचा वापर उत्तम आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, २ चमचे बेसन यांचं चांगलं मिश्रण करून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून सुकू द्या. असं दिवसातून एकदा नियमित करा. काळसर डाग नाहीसे होतील.
- सकाळी उठल्यावर माझा चेहरा नॉर्मल भासतो. पण दुपारपर्यंत लाल होतो. हे कशामुळे होतं?
ऊन, काळजी, चॉकलेट व मसालेदार खाणं वगैरे यामुळे असे त्वचेचे आजार होतात. यावर उपाय म्हणजे रोज चेहरा नीट साफ करा व आहारांकडे विशेष लक्ष द्या. उन्हात जायचं असल्यास १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा, जे तुमच्या स्कीनचं युव्हीए व युव्हीबीपासून संरक्षण करेल. जास्तवेळ उन्हात राहायचं असेल तर २ तासांनी परत सनस्क्रीन लावा. भरपूर पाणी प्या.
- माझ्या कपाळावर व ओठांभोवती काळपटपणा आला आहे. यावर उपाय काय?
ओठांच्या काळपटपणासाठी आधी ओठांना माइश्चराइज करण्याची गरज आहे. यासाठी भरपूर पाणी प्या. रात्री झोपण्याआधी बेंबीत ई-व्हिटामिन तेलाचे ३ थेंब टाका. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी गुलाबाच्या पानांची पेस्ट लावणे हा अचूक उपाय आहे. नियमित वापर केल्यास ओठांचा रंग हलका गुलाबी व चमकदार होतो. हवं असल्यास या पेस्टमध्ये तुम्ही थोडंसं ग्लिसरीन टाकू शकता.
- मी १९ वर्षांची आहे. एक वर्षापूर्वी मी भुवयांवर पियरसिंग केलं होतं. पण मला आता त्यात काही घालायचं नाही. मी हे कॉस्मेटिक सर्जरी करून बंद करू शकते का? यात किती खर्च येईल?
नक्कीच. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या रिकाम्या जागा भरू शकता. यात कमीतकमी रू. १०-३० हजार रुपये खर्च आहे.
- मी ४५ वर्षांची आहे. माझे केस खूप तेलकट आहेत. आठवड्यातून मी ३-४ वेळा शाम्पूने केस धुते. पांढऱ्या केसांसाठी डाय करते. परंतु १५-२० दिवसात परत भांगाच्या आसापास पांढरे केस दिसू लागतात. मी माझ्या केसांबद्दल चिंतीत आहे. केस दिर्घकाळ काळे राहावे यासाठी सोपा उपाय सांगा?
तेलकट केसांसाठी पाण्यात १ चमचा व्हिनेगर, २-३ थेंब लव्हेंडर इसेंशियल तेल टाकून केस धुवा. कलर्ड केसांसाठी असा कोणताही स्थायी उपचार नाही. पण जर तुम्ही प्रोफेशनल सलूनमध्ये जाऊन वर टचअप केला तर फायदा होईल.
केस सौम्य शाम्पूने धुवा. जमल्यास जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या वाटून १ चमचा भिजवलेल्या मेथ्या बारीक करून मिश्रण तयार करा. ते २-३ तास डोक्याच्या त्वचेवर लावा व नंतर शाम्पू करा.
- मी २५ वर्षांची आहे. माझे केस खूप गळतात. असा काहीतरी घरगुती उपाय सांगा, ज्यामुळे केस गळणं कमी होईल?
केस गळण्यामागे चुकीची जीवनशैली, सुंतलित आणि पौष्टिक आहाराचा अभाव, प्रदूषित वातावरण आणि हार्मोन्समधील बदल अशी बरीच कारणं असतात. सोबतच एखादा आजार वा औषधाच्या सेवनामुळेही केसगळती होऊ शकते. आधी तुम्ही तुमचे केस गळण्याची कारणं जाणून घ्या. मग त्यानुसार उपाय करा.
घरगुती उपाय म्हणून आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मसाज करा आणि दही लावा, केसगळती थांबवण्यासाठी दही हा घरगुती उपाय आहे. दह्यामुळे केसांना पोषण मिळते. केस धुण्याच्या कमीत कमी ३० मिनिटं आधी दही लावा. दही सुकलं की केस धुवून टाका.
दुसरा उपाय म्हणून कोमट ऑलिव्ह तेलात १ चमचा मध आणि १ चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट करा आणि अंघोळीआधी केसांना लावा. एका तासाने केस शॉम्पूने धुवा. यामुळे केसगळती थांबते.
- मी २९ वर्षांची आहे. माझी समस्या ही आहे की माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं आली आहेत आणि माझी त्वचासुद्धा फिकट पडली आहे. चेहऱ्यावरचं तेज परत मिळवण्यासाठी उपाय सांगा?
डोळ्यांखालच्या काळ्या वर्तळांमुळे वय जास्त दिसतंच शिवाय चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. बऱ्याच काळासाठी चुकीचा आहार, संगणकाचा अतिवापर, त्वचेमध्ये पाण्याची कमतरता, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ही वर्तुळं घालवण्यासाठी बदामाच्या तेलाने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा. हवं तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अंडरआय क्रिमचाही वापर करू शकता.
तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. वाटलं तर तुम्ही दहीसुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. दही त्वचेच्या आत लपलेली घाण दूर करून चेहऱ्यावरचे डाग, मुरमं नष्ट करते.