* मीरा उगरा
सकाळी सकाळी चांगली बातमी समजली की, आमचे जुने शेजारी खुराना काकांची सून पूनमने मुलीला जन्म दिला. आईने नाश्ता देताना पप्पांना सांगितले की, ‘‘संध्याकाळीच हॉस्पिटलला जाऊन त्यांचे अभिनंदन करू या.’’
पप्पांनी लगेचच तिला नकार देत सांगितले की, ‘‘मुळीच नाही. त्यांना थोडे स्थिरस्थावर व्हायला वेळ द्या.’’
यावरुन थोडा वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला जायचे ठरले. मी दुसऱ्या दिवशी फोन करुन हॉस्पिटलला भेटायला जायची वेळ विचारली असता काकांनी सांगितले की, ‘‘ वेळ ठरलेली नाही. प्रसूतीच्या केसेसमध्ये हॉस्पिटलवाले जास्त ताणून धरत नाहीत. तुम्हाला वाटेल त्या वेळेत कधीही या.’’
हे ऐकून थोडे विचित्र वाटले, पण आम्ही उगाच नको त्या वेळी जाण्याऐवजी संध्याकाळी ५ वाजता हॉस्पिटलला पोहोचलो.
रिसेप्शनवर रुम नंबर विचारून तेथे गेलो. मात्र, खोलीत पाऊल टाकताच तेथील दृश्य पाहून आम्हाला तिघांनाही आश्चर्य वाटले. खोलीच्या मध्यभागी पलंगावर पूनम तर पलंगाला लागूनच असलेल्या पाळण्यात मुलगी झोपली होती. त्या दोघींच्या सभोवती पूनमचे आईवडील, बहीण, काकू, त्यांचा मुलगा (बाळाचे वडील), मुलगी आणि आत्ये असे सर्व मिळून गप्पा मारत होते.
हा हॉस्पिटलचा रुम आहे की पार्टीचा हॉल, हेच कळेनासे झाले होते. आई काकूंना भेटली आणि त्यांचे अभिनंदन केले. पूनमच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि बाळाला दूरूनच आशीर्वाद दिला. मी आणि पप्पांनीदेखील अभिनंदन करुन आनंद व्यक्त केला. त्यानंतर तेथे खाणेपिणे सुरू झाले. आम्ही कसेबसे खाणे संपवतो तोच आणखी एक दाम्पत्य तेथे आले. आम्ही सर्वांचा निरोप घेऊन निघालो.
कारमध्ये बसताच पप्पा रागाने म्हणाले की, ‘‘या…या मिसेसे खुरानांचे डोके फिरले आहे का? आनंद साजरा करायची एवढी काय घाई होती? घाईच होती तर मग बँडबाजा ही बोलवायचा होता. हे सर्व स्वत:ला सुशिक्षित समजतात. तू पूनमकडे पाहिले होतेस का? किती अशक्त दिसत होती ती. बिचारे बाळही थकलेले दिसत होते आणि हे सर्व पार्टी करत होते. हॉस्पिटलवाल्यांना तर काय म्हणायचे? किती कॅज्युअल, किती केअरलेस?’’.
उत्साहाचा त्रास होऊ नये
एखादा नातेवाईक, मित्र किंवा परिचितांच्या घरी बाळ जन्माला आल्याची बातमी समजताच आपण उतावीळपणे अभिनंदन करायला धावत जातो. क्षणभरही हा विचार करीत नाही की, आपल्या जाण्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणे वागा. आई आणि बाळ घरी आल्यानंतर अभिनंदन करायला जा, ते अशाप्रकारे :
* सर्वात आधी फोन करुन त्यांना सांगा की, तुम्ही १०-१५ दिवसांनंतरच त्यांच्या घरी भेटायला याल, जेणेकरुन तोपर्यंत ते घरी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेले असतील. बाळाचे झोपणे, जागे राहणे, बिछाना, शी, शू सर्व अनिश्चित असते आणि त्यामुळे घरातील लोकांचा दिनक्रमही बिघडलेला असतो. दोन आठवडयांनंतरच तो हळूहळू रुळावर येतो. ज्या दिवशी तुम्ही भेटायला जाणार असाल त्याच्या एक दिवस आधी त्यांना फोन करुन विचारा की, कोणत्या वेळी येऊ, जेणेकरुन त्यांची गैरसोय होणार नाही.
* नवजात बाळाचे स्वागत करायचे म्हणजे भेटवस्तू देणे गरजेचे आहे. बाळाच्या कुटुंबाशी तुमचे घनिष्ट संबंध असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता की, कोणती भेटवस्तू देऊ किंवा एखादी मऊ गादी, टॉवेल किंवा रोजच्या उपयोगातील वस्तू जसे की, बेबी केअर किट वगैरे देऊ शकता.
* तिथे गरजेपेक्षा जास्त वेळ उगाचच बोलत बसू नका. फार तर अर्धा तास बसा. या दरम्यान हलक्याफुलक्या गप्पा मारा. विचारल्याशिवाय उगाचच एखादा सल्ला किंवा निरर्थक गोष्टी उगाळत बसू नका.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही दिवसांपूर्वीच फ्लू, व्हायरल ताप, कावीळ आदी आजारांपासून बरी झाली असेल तर त्या व्यक्तीने आई, बाळाकडे अजिबात जाऊ नये, कारण बरे झाल्यानंतरही संसर्ग दीर्घकाळ राहू शकतो. इतकेच नव्हे तर खोकला, सर्दी झालेल्यांच्या संपर्कात आल्यानेही खोकला, सर्दी होण्याची भीती असते.