– डॉ. राजू वैश्य
प्रश्न : माझ्या ३३ वर्षांच्या पुतणीला अलीकडेच ऑस्टियोपोरोसिस झाल्याचं निदान झालं आहे. मला वाटायचं की हा वृद्धांचा आजार आहे, पण हा काय तरुणांनाही होतो का?
उत्तर : लोकांचा हा चुकीचा समज आहे की ऑस्टियोपोरोसिस हा केवळ वृद्धांनाच होतो, पण सत्य हे आहे की माणसांना ९८ टक्के बोन मास वयाच्या ३०व्या वर्षांपर्यंत राहातो, दरवर्षी हाडांचं घनत्त्व कमी कमी होत जातं. रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजनच्या अभावामुळे स्त्रियांची हाडं वेगाने कमकुवत होत जातात. पण कमी वयाच्या लोकांनाही ऑस्टियोपोरोसिसची समस्या होऊ शकते. विशेष करून तेव्हा जेव्हा हार्मोन्सची समस्या असेल. व्हिटामिन डीचा अभाव असेल किंवा एखादं औषध घेत असाल जसं की थायरॉइड किंवा स्टेराइडचं. या समस्येपासून वाचण्यासाठी स्वस्थ आहार घ्या, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटामिन डी असेल. त्याचबरोबर किशोर आणि तरुणांनी कार्बोनेटेड पेय, अल्कोहोल आणि धूम्रपान करणं टाळलं पाहिजे.
प्रश्न : मी २७ वर्षांची तरुणी आहे. माझ्या बोन डेंसिटी टेस्ट (अस्थी घनत्त्व)मध्ये माझ्या हाडाचं घनत्त्व कमी आढळलं आहे. हे नीट करण्यासाठी मला काय करावं लागेल?
उत्तर : धूम्रपान करणं, अधिक मद्यपान करणं, सोडा पॉपचं सेवन, अधिक गोड आणि प्रोसेस्ड आहार घेतल्याने बोन डेंसिटीवर विपरीत परिणाम होतो. याऐवजी हलकं मांस, हलकी डेरीची उत्पादनं, भरपूर भाज्या आणि फळाचं सेवन करा. आर्थ्रायटिसग्रस्त लोकांनी वॉटर ऐरोबिक्स तर वाढवायलाच हवं, पण त्याचबरोबर वजन उचलणं आणि पायी चालणं या गोष्टी आपल्या दिनचर्येत सामील करा. याने तुमची हाडं मजबूत होतील.
प्रश्न : माझी मुलगी दूध पीत नाही. मला वाटतं यामुळे तिची हाडं कमजोर होतील. मी तिला कसा आहार देऊ ज्यामुळे तिला पुरेपूर कॅल्शियम मिळू शकेल?
उत्तर : तुमची मुलगी जर दूध पीत नसेल तर तिला दुधापासून निर्मित पदार्थ जसं की दही, चीज, पनीर इत्यादी खायला द्या. व्हिटामिन डीयुक्त इतर खाद्यपदार्थ खायला द्या. अंडी, पालक, कडधान्य हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असतात.
प्रश्न : माझ्या ४७ वर्षांच्या सासूबाई ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी किती प्रमाणात कॅल्शियमचं सेवन करणं योग्य आहे? जास्त प्रमाणात कॅल्शियमचं सेवन केल्याने काही साइड इफेक्ट होतो का?
उत्तर : ऑस्टियोपोरोसिस असल्यास दररोज ५०० एमजी एलिमेंटल कॅल्शियमचे ३ डोस घ्या. ३ डोस देण्यामागचं कारण म्हणजे आपलं शरीर एका वेळी इतकंच कॅल्शियम पचवू शकतं. म्हणूनच मजबूत हाडांसाठी कॅल्शियमचा त्यांचा कोटा दिवसभरातील आहाराद्वारे देत राहा. गरज पडल्यास याची कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शियम सप्लिमेंट द्या.
प्रश्न : मी ४२ वर्षांचा असून काही महिन्यांपासून सांधेदुखीने त्रस्त आहे. मी शारीरिकरीत्या सक्रिय असून सैरही करतो. पण तरीदेखील वेदना कमी होत नाहीए. कृपया सांधेदुखीची वेदना कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?
उत्तर : सांधेदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. यासाठी दुखापत, एखाद्या गोष्टीचा मनाला धक्का बसणं, आजार, ताणतणाव, बर्साइटिस, टेंडोनायटिस आणि ऑस्टियोपोरोसिसही कारण ठरू शकतं. आर्थ्रायटिसमुळेदेखील सांध्यांमध्ये वेदना होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सांधेदुखीची वेदनादेखील प्रत्येक व्यक्तिमध्ये वेगवेगळी असते. ही वेदना कमी करण्याचे अनेक उपाय आहेत.
आइस थेरेपी : तापमान कमी झाल्याने रक्तप्रवाह कमी होतो ज्यामुळे पेशींची सूज कमी होते. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला वेदना जाणवत असेल तेव्हा दुखत असलेल्या भागावर तुम्ही आइसपॅक लावा. हे एका तासाच्या अंतराने दिवसातून अनेक वेळा १५ मिनिटं तरी लावा. दुसऱ्या दिवशी फक्त ४-५वेळा बर्फ लावा, पण तेही १५ मिनिटांसाठी. हा उपाय सांधेदुखीपासून आराम मिळवून देतो. पण आइसबर्नपासून काळजी घ्या. बर्फ थेट त्वचेवर ठेवू नका, टॉवेल किंवा कपड्यात गुंडाळून मगच ठेवा.
हायड्रो थेरेपी : कोमट पाण्यानेसुद्धा सांधे आणि स्नायूंवरील ताण कमी होतो म्हणूनच कोमट पाण्याने चांगल्या प्रकारे अंघोळ करावी, यामुळे नितंब आणि गुडघ्यांची वेदना कमी होते. दुखणारा भाग पाण्यात बुडवा आणि मालीश करा, यामुळे रक्तप्रवाह वाढेल.
मालीश : गुडघ्यांच्या सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मालीश सर्वात चांगला पर्याय आहे. मालीश कोणा तज्ज्ञ व्यक्तिकडून करून घ्या किंवा मग स्वत:च घरात करा. तुम्ही जर स्वत:च मालीश करत असाल तर वेदना कमी करण्यासाठी दुखणाऱ्या भागावर टोपिकल मेंथोल चोळा. तसंत मालीश करताना तुम्ही आपल्या हृदयाच्या दिशेने हात चालवा.
व्यायाम : अशा व्यायामाची निवड करा ज्यामुळे तुम्ही तुमच्या दुखण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधीच चालूफिरू शकाल आणि सांध्यांची वेदनाही वाढणार नाही. सामान्य व्यायामानेदेखील सांधेदुखीपासून आराम मिळतो. व्यायामामुळे गुडघ्यांची ताकद आणि लवचिकपणा वाढतो, तसंच वेदनाही दूर होते.