* बीरेंद्र बरियार ज्योति

स्पर्म डोनरच्या वाढत्या प्रभावाने भंपक डॉक्टर्स आणि तांत्रिकांच्या ठकवणुकीच्या धंद्याला जोरदार फटका बसला आहे. मुलाला जन्म न देऊ शकणाऱ्यांबाबत पुरुषांच्या नावाला काळिमा, पुरुषी ताकदीचा अभाव आणि न जाणे नको त्या अफवा पसरवून हे अपत्यहीन लोकांना फशी पाडत असतात.

स्पर्म डोनरमुळे आई बनण्याचं सुख प्राप्त केलेली पाटणाची एक महिला सांगते की संततीप्राप्तीसाठी तिने आणि तिच्या पतीने पाटणा, दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, वगैरेंच्या डझनभर भंपक सेक्स स्पेशालिस्टकडून उपचार करून घेतले परंतु अपत्य झालं नाही. चार वर्षं त्या लोकांकडून उपचार करवून जवळपास ४ लाख रुपये खर्च केल्यानंतरही संततीप्राप्तीचं स्वप्नं पूर्ण झालं नाही. जेव्हा पाटणा येथून एका नातलगाने इनफर्टीलिटी क्लीनिकविषयी सांगितलं तेव्हा तिथे उपचार घेतल्यावर त्यांना मुलगा झाला.

वाढली मागणी

स्पर्म डोनर्सचा प्रभाव वाढल्याने हळूहळू का असेना परंतु ढोंगी बाबाबुवा, मांत्रिक आणि तांत्रिकांची दुकानं बंद होऊ लागली आहेत. समाजात गेल्या काही वर्षांपासून स्पर्म डोनर्सची मागणी वाढत आहे आणि संततीच्या अपेक्षेने लोक स्पर्म डोनर्सची सेवा घेऊ लागले आहेत. डोनर्स बक्कळ कमाई करण्यासोबतच अनेक अपत्यहीन लोकांच्या घरात पाळणा हलवण्यास कारणीभूत ठरले आहेत. अनेक लोक स्पर्म डोनेशनला घाणेरडा धंदा म्हणत दूषणं देतात, तर अनेक लोक याला आजच्या काळाची मागणी सांगत यांचं कौतुक करत आहेत. पुरुषांमध्ये प्रजननक्षमतेच्या अभावाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये स्पर्म डोनर अनेक घरांमध्ये पुरुषांच्या नपुंसकत्वावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत आणि अनेक संसार मोडण्यापासून वाचवत आहेत. सोबतच बाळाच्या आकांक्षेपायी अनेक लोकांना भंपक डॉक्टर्स, बाबाबुवा आणि तांत्रिकांच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचवत आहेत.

इनफर्टीलिटी क्लीनिक आणि डॉक्टरांच्या माध्यमातून स्पर्म डोनेशनच्या कार्यात शेकडो तरुण सहभागी आहेत, जे शिक्षण आणि कोचिंगसोबत स्पर्म डोनरचं कामही करत आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू यांसारख्या शहरातून निघून आज अनेक डोनर छोट्या शहरात पोहोचले आहेत.

पाटणाच्या एका मोठ्या इनफर्टीलिटी क्लीनिकच्या डॉक्टरांनुसार पाटणासारख्या शहरात जवळपास शंभराहून जास्त स्पर्म डोनर काम करत आहेत, जे सर्व कायदेशीररित्या स्पर्म बॅँक वा इनफर्टीलिटी सेंटरद्वारे रजिस्टर्ड आहेत. या सर्व व्यवहारात अतिशय गुप्तता बाळगली जाते. स्पर्म घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला एकमेकांविषयी काहीच माहीत नसतं. स्पर्म देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं.

अपत्यहीनांसाठी फायदेशीर

स्त्रियांमध्ये वांझपणा आणि पुरुषांमध्ये प्रजननक्षमता नसूनही अशी दाम्पत्य संततीप्राप्तीचं सुख अनुभवू शकतात. इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर हिमांशू राय सांगतात की ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या नगण्य असेल वा मग ते खूप महागडे उपचार करण्यास सक्षम नसतील तर अशा स्थितीत डोनर स्पर्मद्वारे महिलांना गर्भधारणा करवून घेता येईल. यामुळेच आज डोनर स्पर्मची मागणी खूप वाढली आहे. दुसरीकडे भाड्याने गर्भ (सरोगेट मदर) घेऊन पुरुषांच्या शुक्राणूद्वारे गर्भधारणा करून संततीसुख प्राप्त करता येतं.

पुरुषांमध्ये प्रजननक्षमता कमी असण्याची अनेक सारी कारणं आहेत. डॉ. सोनिया मलिक सांगतात की आजच्या धावपळीच्या जीवनात पुरुषांमधील प्रजननक्षमता कमी होऊ लागली आहे. आजार, व्यसनाधिनता, कामाचा तणाव, अनियमित आहार, तंग कपडे आणि वाढतं प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे प्रजननक्षमता कमी होऊ शकते. दुसरीकडे मोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या अधिक वापरानेही पुरुषांची प्रजननक्षमता कमी होत आहे. यांच्या अति वापरामुळे ऑक्सीडेंटिव्ह स्टे्रस वाढतो आणि ऑक्सिजनची कमतरता भासते, ज्यामुळे डीएनए डॅमेज होते. यामुळे स्पर्म काउंट कमी होतो आणि शुक्राणूंमध्ये अडथळा येतो. हे सर्व टाळून वा कमीत कमी वापर करून आणि नियमित व्यायाम करून पुरुष आपली प्रजननक्षमता कायम राखू शकतात.

सुरक्षित व गोपनीय

इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट २० ते २६ वर्षांच्याच तरुणांचे स्पर्म घेतात, ज्यामध्ये बहुतेक इंजिनीअरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी असतात. इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट सांगतात की, प्रत्येकाचे स्पर्म घेतले जातातच असं नाही. केवळ विद्यार्थ्यांचेच स्पर्म घेतले जातात आणि त्यातही १०-१२ जणांची स्पर्म टेस्ट केल्यानंतर अवघ्या १-२ जणांचेच स्पर्म पूर्णपणे अस्सल आढळून येतात. डोनेशनसाठी आता युवकांना बोलावण्याची गरज भासत नाही. आपले स्पर्म डोनेट केलेले विद्यार्थीच इतर विद्यार्थ्यांना पाठवतात.

पाटणामध्ये जवळपास ८०० स्पर्म सॅम्पल विकले जातात. स्पर्म देणारे इंजिनीअरिंग वा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना रू. ४ ते ५ हजार रुपये मिळतात, याउलट सामान्य विद्यार्थ्याला प्रति डोनेशन रु. १ ते दीड हजार दिले जातात. कोणत्याही एका डोनरकडून महिन्याला ४-५ वेळाच डोनेशन घेतलं जातं.

डॉक्टरांचं मत आहे की वयस्क आणि नोकरपेशे लोक खूप तणावात असतात वा दीर्घ काळापासून कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या अधीन असतात, ज्यामुळे त्यांचे स्पर्म उपयुक्त नसतात.

इनफर्टीलिटी क्लीनिकचे संचालक सांगतात की स्पर्म डोनेशनच्या कामात पूर्णपणे गोपनीयता बाळगली जाते. डोनरला हे सांगितलं जात नाही की त्याचा स्पर्म कुणाला दिला जाईल आणि स्पर्म घेणाऱ्यालाही हे सांगितलं जात नाही की त्याला कुणाचा स्पर्म देण्यात आला आहे. आता तर रक्तगट जुळल्यावरच स्पर्म दिला जातो जेणेकरून पुढे अडचण येऊ नये.

सोपी व्हावी संततीप्राप्ती

महिला डॉक्टर जगदीश्वरी मिश्रा सांगतात की, विवाहानंतर जेव्हा मूल होत नाही, तेव्हा बहुतेकदा दोष स्त्रियांच्या माथी मारला जातो. पुरुष स्वत:ची चाचणी करून घेत नाहीत आणि दुसरं नंतर तिसरं लग्न करत जातात. हे थांबवण्याची गरज आहे. अशिक्षित वर्ग स्त्रियांना मूल न झाल्यास बाबाबुवा, मांत्रिकतांत्रिकाकडे घेऊन जातो, परंतु  त्यानंतरही मूल होत नाही तेव्हा डॉक्टरांकडे नेतात. बहुतांशी प्रकरणांत चाचणी केल्यास दिसून येतं की स्त्रीमध्ये समस्या नसते तर तिच्या पतीमध्येच शारीरिक कमतरता आहे. तेव्हा डॉक्टरांनी पत्नीसोबत तिच्या पतीचीही चाचणी केली पाहिजे आणि कुणामध्ये कमतरता आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. आज वैद्यकशास्त्र आणि उपचार इतके विकसित झाले आहेत की कोणतंही दाम्पत्य संततीसुखापासून वंचित राहू शकत नाही.

डॉक्टर दिवाकर तेजस्वी सांगतात की स्पर्म डोनेशनचा वाढता प्रभाव समाजासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अपत्यहीन पतिपत्नी मुलाच्या आकांक्षेपायी विनाकारण भटकत बसत नाहीत, शिवाय ते फसवणुकीला बळी पडण्यापासून बचावतात. जर डोनर स्पर्मविषयी उत्तम पद्धतीने जागरूकता मोहीम राबवण्यात आली, तर यामुळे संपूर्ण समाजाचं भलं होऊ शकतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...