* पूनम अहमद
स्वधाचा उत्साह तिच्याकडे बघूनच लक्षात येत होता. अनिमेशसोबत फर्स्ट डेटवर जायचे होते. काय घालू, कशी तयार होऊ आठवडाभर हाच विचार डोक्यात घोळत होता. तिची इच्छा होती की तिने खूप स्मार्ट दिसावे. हँडसम अनिमेशची नजर तिच्या सौंदर्यावर खिळून राहिली पाहिजे. एवढया दिवसांनंतर प्रकरण फर्स्ट डेटपर्यंत येऊन पोहोचलं होतं.
अनिमेशने तिला पवई, मुंबई येथील एका शानदार रेस्टॉरंटमध्ये बोलावले होते. संडेलाच दोघांचेही ऑफिसेस बंद असत. दोघेही लंचला भेटणार होते.
खूप विचार करून स्वधाने एका मॉलच्या फॅशन हाउसमधून अतिशय आधुनिक आणि रिव्हिलिंग ड्रेस खरेदी केला. गुडघ्याच्या वर असलेला स्लिव्हले, ऑफ शोल्डर वन पीस घालून ती अनिमेशला भेटायला आली होती.
अनिमेशने मोकळेपणाने तिचे स्वागत केले आणि मग हलक्या फुलक्या गप्पा दोघांमध्ये सुरू झाल्या. बसल्यावर स्वधाचा ड्रेस इतका छोटा होता की ती स्वत:च तो वारंवार सावरत होती आणि त्यामुळे तिला अनकंफर्टेबलही वाटत होते. वेटरला ऑर्डर देतानाही ती कधी गळयाकडून ड्रेस वर करत होती तर कधी ड्रेस गुडघ्यावरून खाली खेचत होती. तो ड्रेस फारच रिव्हिलिंग होता.
अनिमेशच्या नजरेतून स्वधाची ही असहजता सुटली नाही. लंच करताना गप्पा गोष्टी तर होत होत्या पण जसे स्वधाला वाटत होते तसे काहीच घडले नाही. अनिमेश पुन्हा कधी सेकंड डेटवर गेलाच नाही. तशी वेळच आली नाही. तो आपल्या मित्रांना सांगत होता, ‘‘अरे, ती तर सारखे आपले कपडे वर खालीच करत होती. तिचे संपूर्ण लक्ष स्वत:च्या ड्रेसकडेच होते. काय गरज होती इतके अंगप्रदर्शन करण्याची? एवढी पण काय घाई?’’
जेव्हा स्वधाच्या कानांपर्यंत ही बातमी येऊन पोहोचली तेव्हा तिला फार वाईट वाटते.
तुम्हीसुद्धा तुमच्या पहिल्या डेटवर जात असाल तर आपले कपडे निवडताना फार सावधगिरीने निवडा. तुमचे कपडे हे आधुनिक तर असावेत पण त्याचबरोबर शालीन आणि मर्यादेत असावेत. तुमचा मित्र तुमच्या व्यक्तिमत्त्वाने, स्वभाव, वर्तनाने प्रभावित झाला तर ते उत्तम. भविष्यात त्याच्यासमोर कितीतरी प्रकारचे ड्रेसेस घालण्याची संधी तुम्हाला मिळेलच, पण फर्स्ट डेटवर आपलं आब राखलं जाईल असेच कपडे परिधान करा.
बेपर्वा राहू नका
अनन्याला सुजीतने फर्स्ट डेटसाठी तयार केले होते. कॉलेजच्या एक वर्षाच्या परिचयानंतर ती त्याच्यासोबत डिनरला जाण्यासाठी तयार झाली होती. कोणालाही न कळवता ती सुजीतसोबत बनारसच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये गेली. अनन्याला मनातून सुजीत आवडत होता. कॉलेजमध्ये खूप मुली सुजीतवर मरत होत्या. सुजीत बोलण्यात एकदम पटाईत होता. थोडयाच वेळात ऑर्डर वगैरे देऊन झाल्यावर सुजीत अनन्याच्या अगदी शेजारीच येऊन बसला. कधी तिचा हात पकड तर कधी कंबरेवरून हात फिरव असे करू लागला.
सुरुवातीला तर अनन्याला यात काही वावगे वाटले नाही, पण जेव्हा सुजीतचे हात आपली मर्यादा सोडू लागले तेव्हा मात्र अनन्याने त्याला थांबवले. तेव्हा सुजीत म्हणाला, ‘‘अरे, डेटवर आलो आहोत ना, अजून तर बरेच काही व्हायचे बाकी आहे. नर्व्हस का होतेस?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अगं, डिनरनंतर माझ्या फ्लॅटवर जाऊ. आज घरात कोणीच नाहीए. मस्ती करू, मग नंतर रात्री मी तुला घरी सोडीन.’’
‘‘नको नको, आधीच आपण घरापासून १४ किलोमीटर दूर आहोत, इथून आपण सरळ घरीच जायचे.’’
‘‘प्रश्नच येत नाही, माझ्या फ्लॅटवरच जायचे,’’ असे म्हणून सुजीतच्या चेहऱ्याचा रंग थोडा पालटला, तेव्हा अनन्याच्या लक्षात आले की तिच्याकडून चूक झाली आहे.
इथून घरी कसे जाता येईल याचा विचार ती करू लागली. फर्स्ट डेटवर तिला असेच वाटले होते की बस खायचेप्यायचे, गप्पा मारायच्या आणि एकमेकांना ओळखायचे, पण सुजीतचा इरादा योग्य नव्हता.
सुजीतने विचारले, ‘‘कोणाला घरी सांगून तर आली नाहीस ना?’’
अनन्याच्या तोंडून खरे उत्तर आले, ‘‘नाही,’’
‘‘गुड,’’ असे म्हणून सुजीत जेव्हा हसला तेव्हा ते काही अनन्याला आवडले नाही. रात्री ९ वाजता अनन्या सुजीतच्या बाईकवर बसून हॉटेलमधून निघाली. सुजीतने तिचे ऐकलेच नाही. तो तिला आपल्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. जिथे आधीपासूनच २ मुले वाट पाहत उभी होती. ते सुजीतला पाहून म्हणाले, ‘‘किती उशीर केलास, आम्ही तर कधीपासून वाट पाहत आहोत.’’
सुजीत बाईक पार्क करत म्हणाला, ‘‘आधी ओळख तर करून घ्या, अनन्या हे माझे मित्र – रवी आणि अनुप.’’
त्या दोघांनी ज्या नजरेने अनन्याकडे पाहिले, ती मनातल्या मनात चरकली. तिला त्या मुलांचे हेतू काही योग्य वाटले नाहीत आणि ते नव्हतेही.
अनन्या लगेच म्हणाली, ‘‘मी आता घरी जात आहे.’’ त्यावर तिघेही एकत्रच बोलले, ‘‘नाही नाही वर जाऊया.’’
जवळूनच २-३ लोक जात होते. त्याचवेळी अनन्या त्यांना बाय करत त्या अनोळखी लोकांसोबत चालायला लागत एकदम रस्त्यावर आली आणि ऑटो पकडून तडक आपल्या घरी निघून आली.
पूर्ण रस्ताभर एका मोठया दुर्घटनेतून वाचल्यामुळे तिच्या डोळयातून अश्रूंच्या धाराच लागल्या होत्या. ती आज वाचली होती.
म्हणजे डेट काही वाईट अनुभव ठरणार नाही
कधीही ही चूक करू नका की तुम्ही फर्स्ट डेटवर जात आहात आणि तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा घरातल्या कोणालाही हे माहीतच नाही. आपल्या मित्राचा परिचय, फोन नंबर आणि घरचा पत्ता हे सांगूनच जा. तुमच्या घरच्यांपैकी कुणाला तुम्ही कुठे आहात, कोणासोबत आहात हे माहिती असणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास बोलता बोलता आपल्या मित्राला हे सांगा की तुम्ही घरी सांगून आला आहात. फर्स्ट डेट एखादा वाईट अनुभव देणारी नसावी, हे जरूर लक्षात ठेवा.
फर्स्ट डेट खरंतर अशी वेळ असते, जेव्हा तुम्ही एकमेकांना जाणून घेत असता. पारंपरिक पद्धतीने मुलगाच पहिल्या डेटचा खर्च करतो. पण आता काळ बदलला आहे. मुलीला जर मुलाला इम्प्रेस करायचे असेल तर ती बिल येताच तिचा शेअर भरण्याची ऑफर करू शकते.
फर्स्ट डेटवर काय गिफ्ट घ्यावे हा विचार स्ट्रेसफुल असू शकतो. जे काही भेट म्हणून द्याल त्याने तुमची प्रतिमा चांगली राहील याची काळजी घ्या. छोटेसेच गिफ्ट घ्या. फार महागातले नको, पण हे दर्शवणारे हवे की तुम्ही त्याला किती चांगल्याप्रकारे ओळखत आहात. आपली पसंती चांगली ठेवा. गिफ्ट छोटे असावे, वजनदार नसावे. काहीतरी सिम्पल द्या, देताना चेहरा रिलॅक्स ठेवा तेव्हाच तुम्ही त्या क्षणांचा मनापासून आनंद घेऊ शकता. जर त्याला वाचनाची आवड असेल, तर तुम्ही एखादे पुस्तक भेट म्हणून घेऊन जाऊ शकता. पुस्तक खरेदी करताना विवादास्पद विषय टाळा आणि पुस्तक आकाराने लहान असू द्या. क्रिएटिव्हिटी इम्प्रेस करतेच. असे गिफ्ट द्या, जे आपसांत शेअर करू शकाल जसे की एखाद्या कॉन्सर्ट, प्रदर्शन किंवा नाटकाचे तिकिट.