* मिनी सिंह

देशात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले. ते अशावेळी जाहीर झाले जेव्हा देशात लग्नाचा हंगाम असतो. लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. परंतु काही जोडपी अशीही आहेत ज्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्येही यावर पर्याय शोधून त्यांनी लग्नगाठ बांधली. ऑनलाइन लग्न केले. यात मेहंदी, संगीत आणि इतर सर्व विधीही ऑनलाइनच झाल्या. लोकांनाही ऑनलाइन आमंत्रण दिले. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून लग्न ऑनलाइन करण्यात आले.

नवरा एकीकडे आणि नवरी दुसरीकडे

उत्तर प्रदेशातील शहर बरेलीमध्ये असाच एक अनोखा, ऑनलाइन लग्न सोहळा पहायला मिळाला. नवरा सुषेनचे असे म्हणणे आहे की, भलेही येत्या काही दिवसांत लॉकडाऊन संपेल, पण आम्हाला तोपर्यंत लग्नासाठी वाट पाहत रहायचे नव्हते. म्हणूनच, एक जबाबदार नागरिक या नात्याने आम्हाला असे वाटले की सामाजिक अंतर राखण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

हे लग्न शादी डॉट कॉमद्वारे करण्यात आले. शादी डॉट कॉमने ‘वेडिंग फ्रॉम होम सर्व्हिस’ सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत सर्व पाहुणे लग्नात ऑनलाइन सहभागी झाले आणि फेरेही ऑनलाइनच घेण्यात आले. इतकेच नाही तर या लग्नात सनई-चौघडयांचीही ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली होती. हे लग्न इतर लग्नांप्रमाणेच सामाजिक अंतर राखून आयोजित करण्यात आले होते.

भारतात जिथे लग्नाची तयारी अनेक महिन्यांपूर्वीपासून सुरू होते, तिथे केवळ दोन तासांत लग्न होणे आश्चर्याची गोष्ट आहे.

परंतु कोरोनाच्या महामारीने आयुष्यच बदलून टाकले. याच बदलामुळे भारतीय लग्नाचे रुपही बदलले. तेच लग्न जिथे नवरा- नवरीसोबत वऱ्हाडी, वाजंत्री आणि न जाणो किती मित्रमैत्रीणी सहभागी होत असत. कितीतरी महिने आधीपासूनच तयारी सुरू केली जायची आणि नंतर हळद, मेहंदीसारख्या बऱ्याच विधी झाल्यावर तो खास दिवस उजाडायचा ज्या दिवशी नवरा-नवरी कायमचे एकमेकांचे होऊन जायचे. परंतु आता कोरोना युगाने लग्नाचा हॉल, मंडप, केटरिंगची संकल्पना अशी काही बदलली आहे की, लग्नात सामाजिक अंतर आणि ऑनलाइन वेडिंगसारख्या अनेक संकल्पना नव्याने जोडल्या गेल्या आहेत.

आज अनेक जोडपी व्हिडीओ कॉलिंग अॅप्सद्वारे लग्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणांहून अशी काही जोडपी चर्चेत आली ज्यांनी व्हर्च्युझअल वेडिंगचा मार्ग स्वीकारला. अशा प्रकारे लग्न करणाऱ्या काही जणांनी सांगितले की, वाजंत्री, वरातीसह लग्न करायची इच्छा होती, पण आता ते नाही तर निदान ऑनलाइन सनई-चौघडेही चांगले आहेत.

स्वत:हूनच नटत आहे नवरी

लग्नाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच नवरा आपल्या चेहऱ्यावर खास लक्ष देत असे, नवरी महागातले महाग प्री ब्रायडल पॅकेज घेत असे. आता मात्र कोरोनाच्या या काळात वर आणि वधूचा तोच चेहरा मास्कखाली झाकलेला पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर लग्नात सहभागी होणारे मोजके नातेवाईकही मास्क लावलेलेच पहायला मिळतात. आता लग्नासाठी नवरी एखाद्या पार्लरमध्ये नाही तर स्वत:कडे असलेल्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करुन स्वत:च किंवा आपल्या नातेवाईकांच्या मदतीने तयार होत आहे.

कुटुंबातील माणसे बनली फोटोग्राफर

आतापर्यंत लग्नसोहळयाव्यतिरिक्त प्री-वेडिंग, मेहंदी आणि हळदीसाठीची फोटोग्राफी तसेच व्हिडीओग्राफी केली जात होती, पण आता जी लग्नं होत आहेत, तिथे फक्त नवरा-नवरीचे बहीण-भाऊ किंवा मग जवळचे नातेवाईकच फोटो काढताना किंवा व्हिडीओ शूटिंग करताना दिसत आहेत. या कोरोना काळाने दोन्ही बाजूंकडचा मोठा खर्च कमी केला आहे आणि फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरसोबत बसून त्यातील खास फोटो निवडण्यासाठीचा वेळही वाचवला आहे.

घरच झाले लग्नाचा हॉल

लग्नाच्या दिवशी वरात हॉलमध्ये येताच सर्वत्र आनंदाच्या वातावरणाची निर्मिती होते. इकडे सनई-चौघडे वाजतात आणि तिकडे नवरीच्या हृदयाची धडधड वाढते. पण आता लग्नसोहळे अतिशय शांततापूर्ण वातावरणात होत आहेत. वाजंत्री नाही, वरात नाही. नवरा काही मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना घेऊन नवरी मुलीच्या घरी येऊन तिच्याशी लग्न करतो आणि तिला घेऊन जातो. आता कुटुंबीयांना लग्नपत्रिका छापायाची किंवा पाहुण्यांचे आदरातिथ्य करायची गरज नाही. लग्नात दोन्ही बाजूंकडील लाखो रुपयांची बचत होत आहे. यामुळे हुंडयाची परंपराही मोडीत निघत असल्याचे पहायला मिळत आहे. मास्क लावलेले नवरा-नवरी पवित्र बंधनात बांधले जात आहेत.

तसे तर ऑनलाइनने आपल्या जीवनात खूप आधीपासूनच प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे. इंटरनेटच्या या युगात खूप काही बदलले, पण आयुष्य जगण्याची पद्धत आहे तशीच आहे. सध्या ज्या प्रकारे ऑनलाइन होणाऱ्या लग्नाला विरोध होत आहे, तसाच तो फारपूर्वी गॅस आणि कुकरलाही झाला होता. जेव्हा गावात एखाद्याच्या घरी टीव्ही आला तेव्हाही विरोध करण्यात आला होता. मुले संस्कार विसरतील म्हणून पालक त्यांना बाहेरगावी अभ्यासासाठी पाठवायला तयार नव्हते. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना कालपर्यंत विरोध केला जात होता त्याच आज सामान्य होऊन गेल्या आहेत. अशाच प्रकारे, ऑनलाइन लग्नही सामान्य गोष्ट आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...