कथा * जोगेश्वरी सधीर
खरं तर दीपाली दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीची अडचण
यायला नको होती. पण का कोण जाणे तिच्या आईवडिलांना त्यांच्या समाजातला
कुणी मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या दीपालीचं लग्नाचं वय बघता बघता
निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपॉल होते. त्यांना कुणी योग्य मुलगा दिसतच
नव्हता.
शेवटी दीपालीनं एका गुजराती मुलाशी सूत जमवलं. अरूणचं अन् तिचं
प्रेमप्रकरण तीन चार वर्षं सुरू होतं. दीपालीचे वडील एव्हाना अंथरूणाला खिळले
होते. त्यांनी दीपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली.
दीपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं अन्
त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरूणचं दीपालीवर मनापासून प्रेम होतं. त्यानं
अत्यंत सन्मानानं दीपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण कट्टर
गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण
सासूचा, कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ दीपालीला आवडत नव्हता. अरूणचं
आभाळभर प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालू असायची.
कांतीबेन अन् नारायण भाई हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे
गुजराती कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा. तोकडे, लांडे कपडे
घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी कांतीबेनची
अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं.
अरूण दीपालीला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे. सगळं चांगलं होईल
म्हणून सांगायचा पण हट्टी अन् मानभावी दीपालीला ते मान्य नव्हतं. एक
दिवस चिडून, भांडण करून ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजूत घालून
परत पाठवण्याऐवजी उलट तिला अधिक भडकण्यातच धन्यता मानली.
दीपालीची बहीण राजश्री तर स्वत:च्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली
होती. आता दीपालीच्या बाबतीतदेखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू
केलं. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती दीपालीला सांगायची.
मूर्ख दीपालीनं आई व बहिणीच्या सांगण्याप्रमाणे अरूणचं प्रेम ठोकरलं. बिचारा
अरूण किती वेळ यायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा पण
दीपाली ढम्म होती.. अरूणचं प्रेम तिला कळतंच नव्हतं. तिच्या आईलाही
विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं.
माहेरी दीपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली
कामं करत असायची. आई अन् दीपाली सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या.
घरात अन् बाहेर मनसोक्त हादडायच्या.
शरीराला कोणतीच हालचाल नसल्यानं अन् दिवसभर चरत राहिल्यानं दीपाली
आता चांगलीच गरगरीत झाली होती. अरूणला ओळखणाऱ्या लोकांना दीपालीचा
राग यायचा आणि अरूणची कीव यायची. दीपालीच्या ओळखीतले, नात्यातले
लोकही तिला टाळायला बघायचे. कारण अरूणचा चांगुलपणा त्यांनाही दिसत
होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता, घरी चल म्हणत होता ही गोष्ट
लोकांपासून लपून राहिलेली नव्हतीच.
दीपाली मजेत खातपीत, भटकंत होती. अरूण मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार
दु:खी होता. त्याच्या आईवडिलांनादेखील वाटायचं. मुलाचा संसार बहरावा, आपण
नातवंडं खेळवावीत. पण हट्टी दीपाली सासरी गेलीच नाही. अरूणनंही आता
तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा. अरूणनं दीपालीकडे
घटस्फोट मागितला नाही. त्याचं इतर कुठं प्रेमप्रकरण नव्हतं. आढयतेखोर
दीपाली घरी येत नव्हती. घटस्फोट देऊन अरूणला मोकळंही करत नव्हती.
अरूणचं मात्र दीपालीवर मनापासून अन् खरंखुरं प्रेम होतं. दीपालीशिवाय तो इतर
कुणाचा विचारही करू शकत नव्हता. बिचारा एकटाच आयुष्याचा आला दिवस
ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. एकटाच आपल्या
विचारात दंग असायचा. एक दिवस असाच आपल्या नादात दुकानातून निघून
घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा अपघात झाला. डोक्याला फार
मोठी जखम झाली.
नारायण भाई अन् कांतीबेननं दीपालीला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती
भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण दीपाली काय किंवा तिची बहिण
अन् आई काय कुणीही त्याला बघायला इस्पितळात गेलं नाही. उलट त्या
परीस्थितीत दीपालीच्या आईनं अरूणच्या वडिलांना सांगितलं की दीपाली व
अरूणसाठी वेगळा ब्लॉक करून द्या.
अरूणचा अपघात जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच नशीब. एवढी गंभीर
दुखापतही तो शांतपणे सोसत होता. आईवडिल त्याची सेवाशुश्रुषा करत होते. त्या
सगळ्या गडबडीत दीपालीसाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून, सामानानं परीपूर्ण
करून घेणं, नारायणभाईंना जमलंच नाही.
एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आईवडिल त्याचं वेगळं घर मांडून द्यायलाही
तयार झाले होते. पण निदान दीपालीनं येऊन नवऱ्याला भेटावं. त्याच्याजवळ
बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं
नाही.काही महिने इस्पितळात काढून अरूण घरी आला. या काळात दीपाली
फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी, दुर्बळ झालेल्या
नवऱ्याला, तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अरूणला भेटावं असं तिला
एकदादेखील वाटलं नाही.
अरूणला घरी आणल्यावर त्याचे वडिल त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला
लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात
राहू दे एवढंच त्यांना वाटलं होतं.
पण अरूणला हे कळलं, तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या दीपालीवर आपण
वेड्यासारखं प्रेम केलं, ती दीपाली इतकी आत्ममग्न अन् स्वार्थी असावी हे त्याला
सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं, बोलणं कमी झालंच होतं, ते
आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यांत त्यानं दीपालीला फोन केला नव्हता.
तिनंही फोन केला नाही, येणं तर दूरच!
यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन दीपाली सुखानं नांदेल याची त्याला शाश्वती
वाटेना. दीपालीवरच्या त्याच्या एकतर्फी का होईना, निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे
दिवस जिवंत होता, पण आता त्याच्या मनांत फक्त निराशा होती. आयष्यातून
दीपाली गेली तरी त्याच्या मनांतली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम
पार आटलं, नाहीसं झालं. आता त्याच्या जगण्याला काही अर्थच नव्हता.
हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज
मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोप
लागेना. आईवडिल शेजारच्या खोलीत झोपले होते.
तिरीमिरीत अरूण उठला अन् खोलीतून जिन्याकडे निघाला. अंधारात पायरी
दिसली नाही अन् तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धांत जीवन
ज्योत मालवली.
अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरूणला भेटायला दीपाली गेली
नव्हती, मात्र त्याच्या मृत्युची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व
भाओजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली.
तिच्या निर्लज्जपणानं सगळेच चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन
मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी, आप्पलपोट्या मुलीला बघून
सगळ्यांच्याच मनांत येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश
करून ही बया सासू सासऱ्यांकड संपत्तीतला वाटा कशी मागू शकते? यालाच प्रेम
म्हणतात? असा प्रेमविवाह असतो?