कथा * सुवर्णा पाटील

सकाळी सकाळी मधुरा एका सुखद स्वप्नात रमली होती. तिचा पराग तिच्या स्वप्नात आला होता. अगदी मनमोहक हसून तिची मस्करी करत होता. काहीतरी छेड काढून तिला रडवणारा, पण तितक्याच प्रेमाने हळुवारपणे तिची समजूत काढणारा, थोडासा अल्लड पण प्रसंगी सर्वांना सांभाळून घेणारा, सारखा धडपडणारा आणि स्वत:वरच हसणारा…तिही त्याच्यासोबत हसू लागली आणि हसता हसता तिला जाग आली. जाग आल्यावर जाणवले आपण खुप पुढे आलो आहोत. त्या स्वप्नाने तिची सकाळ प्रसन्न केली, पण शेजारीच निजलेल्या लहानग्या रोहनने तिला वास्तवाची जाणीव करून दिली.

आज पराग जाऊन बरोबर एक वर्ष झाले होते. अगदी नजर लागण्यासारखा संसार होता दोघांचा. दोघे राजाराणी आणि त्यात नवीन पाहुण्याची चाहूल. परागला लहान मुलं खूप आवडायची. जेव्हा मधुराने त्याला ती आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा त्याला खूप आनंद झाला

मधुराला ती रात्र आजही आठवते, ‘‘मधू , तू आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट दिले आहेस. हे बघ, मुलगा झाला तर त्याचे नाव रोहन ठेवायचे आणि मुलगी झाली तर अदिती. मी त्यांना खूप मोठे करणार. माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मी परिस्थिती अभावी करू शकलो नाही, ते सर्वकाही मी आपल्या बाळाला देणार.’’ पूर्ण रात्र तो बाळाच्याविषयीच बोलत होता. पण त्या दोघांना माहितीच नव्हते की त्यांच्या या सुंदर स्वप्नांना लवकरच ग्रहण लागणार आहे.

मधुराला नववा महिना लागला होता. पराग तिची खुपच काळजी घेत होता. त्याने तर तिला हेसुद्धा सांगितले होते की तुझे बाळंतपण इथेच करायचे, माहेरी जायचे नाही. त्याला बाळाच्या आगमनाचा एक एक क्षण अनुभवायचा होता, पण झाले वेगळेच. ऑफिसच्या कामासाठी त्याला तातडीने बाहेरगावी जावे लागले. खरंतर त्याला मधुराला एक क्षणही डोळयासमोरून दूर करायचे नव्हते, पण ऑफिसचे ते कामही तेवढेच महत्त्वाचे होते. त्याने मधुराच्या आईला बोलावून घेतले. त्यांच्यावर जबाबदारी सोपवून तो निघाला. पण पावसाळी वातावरण आणि त्यात घाटाचा निसरडा रस्ता यामुळे त्याच्या गाडीला अपघात झाला आणि तो जागीच सर्व स्वप्ने डोळयांत ठेवून गतप्राण झाला.

इकडे मधुराला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. ती पराग येईपर्यंत थांबायचे म्हणत होती, पण तिची परिस्थिती बघून डॉक्टरांनी सिझरचा निर्णय घेतला. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मधुरा शुद्धीवर आली, तेव्हा ती खुपच आनंदात होती.

‘‘आई, तू परागला बाळाची बातमी दिली ना. मग तो अजूनही कसा आला नाही? माझ्यापेक्षा तोच जास्त आतुर होता बाळासाठी.’’

‘‘मधुरा…, तुला कसे सांगू हेच समजत नाहीए. मन घट्ट कर पोरी.’’

‘‘काय झाले आई? तू असे का म्हणत आहे? पराग…परागला काही झाले आहे का? पण कसे शक्य आहे? तो म्हणाला होता की काम झाले, की लगेच येतो. बघ, त्याचा फोन येईल आताच.’’

आईकडून सर्व अपघाताची बातमी समजल्यावर मधुराला खुप मोठा धक्काच बसला. ती दोन दिवस बेशुद्ध होती, पण परागसाठी त्याच्या शेवटच्या इच्छेसाठी, त्याच्या स्वप्नांसाठी तिने स्वत:ला सावरले.

पराग गेला आणि मधुराचे आयुष्यच बदलून गेले. परागचे आईवडील आधीच वारलेले होते म्हणून मधुराला सासरचे असे कोणीच नव्हते. ती आपल्या आईसोबत माहेरी आली. वडिल लहानपणीच वारलेले असल्याने ती व तिची आई, भाऊ वहिनीसोबत राहू लागले. नात्याने वहिनी असली तरी मधुराशी तिचे मैत्रिणीचेच नाते होते. ती तिला दु:खातून बाहेर येण्यास मदत करत होती.

तिने एके दिवशी नवऱ्याला सांगितले, ‘‘तुम्ही मधुरा ताईंविषयी काय ठरवले आहे.’’

‘‘तुला नेमके काय म्हणायचे आहे?’’

‘‘अहो, त्यांच्यापुढे एवढे मोठे आयुष्य पडले आहे. रोहन अजून लहान आहे. त्या एकटयाने कसे सर्व करतील.’’

‘‘अगं, आपण आहोत ना सोबतीला.’’

‘‘आपण त्यांना जन्मभर थोडी पुरणार आहोत. त्यांनासुद्धा स्वत:च्या हक्काचे घर हवे. हक्काची व्यक्ती हवी, जिच्याजवळ त्या सर्व गोष्टी शेअर करू शकतात. रोहनला आपण कितीही प्रेम दिले तरी त्याच्या वडिलांची जागा आपण घेऊ शकत नाही. मी त्यांना समजावते. तुम्ही व आई दोघे त्यांच्याशी बोला. त्या हो म्हणाल्या तर त्यांना अनुरूप व त्यांना सांभाळून घेणारे असे स्थळ शोधू या.’’

‘‘अगं, हे सर्व खरे असले तरी मुलासोबत तिचा स्विकार कोण करेल? माझ्या मनातही ही गोष्ट होती, पण कसे बोलावे हेच समजत नव्हते. आज तू विषय काढला म्हणून सांगतो. आमच्या ऑफिसचे नविनच बदली होऊन सर आले आहेत, त्यांचे नाव साकेत. स्वभावाने एकदम शांत, कामात तर एकदम हुशार आहेत. वयाने लहान असले तरी हुशारीमुळे ते एवढ्या मोठया पदावर काम करत आहेत. मागच्याच वर्षी त्यांच्या बायकोचे आजारपणात निधन झाले. त्यांना जुळया मुली आहेत. घरी कोणीच नसते. घरी एक आया त्या दोघींना सांभाळते. त्यांचे एक दूरचे मामा आमच्याच ऑफिसला आहेत. ते माझे छान मित्र आहेत. आपल्या मधुराविषयी त्यांना सर्व माहिती आहे. त्यांनीच विषय काढला होता की तुम्ही मधुराच्या पुनर्विवाहाचा विचार केला आहे का? साकेतला तर खूप स्थळं येत आहेत. पण त्यांना अशी मुलगी हवी आहे, जी साकेतच्या मुलींना आईचे प्रेम देऊ शकेल. म्हणूनच ते विचारत होते. आपली मधुरा तर सुंदर आहेच. तिचा प्रेमळ स्वभावही त्यांना माहिती आहे. फक्त प्रश्न आहे तो रोहनचा. त्याचा स्वीकार करायचा की नाही हा निर्णय साकेतचा राहील.’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी मधुरा ताईशी बोलते. राहिला प्रश्न रोहनचा, तर त्याला आपण आपल्यासोबतच ठेऊ या. मलासुद्धा त्याचा खूप लळा लागला आहे.’’

‘‘ठीक आहे, मी बोलतो मधुराशी.’’ मधुराचे भाऊ-वहिनी आणि आईने मधुराला खुप समजावलं. सुरुवातीला तिने साफ नकार दिला, कारण परागच्या आठवणीतून ती अजूनही बाहेर आली नव्हती. पण असे किती दिवस आपण भावाच्या घरी राहणार म्हणून तिने साकेतला भेटण्यास होकार दिला. पण ती रोहनला सोबतच ठेवणार या निर्णयावर ठाम होती. ती या विषयावर साकेतशी बोलणार होती.

आज संध्याकाळी साकेत आणि मधूरा ऑफिसजवळच्या रेस्टॉरंटमध्ये भेटणार होते. मधुरा वेळेवर तिथे आली. तिच्यासाठी आधीच एक टेबल बुक करण्यात आले होते. साकेत अजून आला नव्हता. ऑफिसमधील एक मीटिंग करुन तो येणार आहे असे भावाने सांगितले होते. मधुरा तिथे बसून विचार करत होती, ‘‘मी जे करत आहे ते बरोबर आहे ना? मी परागशिवाय दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही. पण रोहनचे काय, त्याला वडिलांचे प्रेम कसे देऊ?’’ मधुरा तिच्या विचारात असतानाच तिच्या कानावर शब्द पडले.

‘‘नमस्ते, आपण मधुरा ना! मी साकेत.’’ मधुरा त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण नाव वेगळे असले तरी त्याला पाहताच तिला परागची आठवण झाली. एक क्षणभर तिला आपल्यासमोर परागच आहे असे वाटून गेले. तिच चेहरेपट्टी, बोलण्याची लकबही तशीच, जर परागला भाऊ असता तर तो असाच दिसला असता. फक्त परागमध्ये असलेले मनमोहक हास्य व त्याचे निरागसपण यात नव्हते. कामामुळे म्हणा किंवा पत्नीच्या अचानक निधनामुळे त्यात एक शांतपणा होता. त्याच्या चेहऱ्यावर विद्ववत्तेचे एक वेगळेच तेज होते. तिला आता समजले की पराग व त्याच्यात असलेल्या साम्यामुळेच तिच्या भावाने हे स्थळ सुचवले आहे.

 

navi pahaat marathi story

‘‘हॅलो मधुरा मॅम, आपण काय विचार करत आहात? तुमच्या भावाने मला तुमचा फोटो दाखवला होता. म्हणूनच मी तुम्हाला ओळखू शकलो. तुम्हाला खुप वाट पहावी लागली का?’’

‘‘नाही, मी आता थोडया वेळापूर्वीच आली आहे. मला दादाने तशी कल्पना दिली होती.’’

‘‘चला तर आपण सरळ मुद्दयाचे बोलू या. माझी पत्नी निशा मागच्याच वर्षी आम्हाला सोडून गेली. मला सोबत आहे माझ्या दोन मुलींची. खरंतर मी स्वत: त्यांना सांभाळू शकतो, पण आईच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे मला आता समजले आहे. फक्त या एकाच कारणासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या विषयीची सर्व माहिती मला माझ्या मामानी सांगितली आहे. तुमच्या भूतकाळाविषयी माझे काहीही म्हणणे नाही. जर तुमचा होकार असेल तर मी तुमचा माझ्या मुलींची आई म्हणून स्वीकार करायला तयार आहे. आपल्यात फक्त तेवढंच नाते असेल. बाकी मला कसलीही अपेक्षा नाही. तुमचे काय म्हणणे आहे ?’’

साकेतचा स्पष्टवक्तेपणा मधुराला आवडला. पण त्याने रोहनविषयी कोणतीच भूमिका घेतली नव्हती आणि तिला तर रोहन सोबतच हवा होता. तिने साकेतला सांगितले, ‘‘मला तुमच्या भूतकाळाविषयी सहानुभूती आहे. मी मुलींच्या आईची जागा तर घेऊ शकत नाही, पण त्यांना आईचे प्रेम देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझी एक विनंती होती.’’

‘‘काय जे असेल ते स्पष्ट सांगा. गोष्टी आधीच स्पष्ट असल्या की नात्यांमध्ये नंतर गुंता होत नाही.’’

‘‘तुम्हाला माझ्याविषयी सर्व माहिती आहेच. मग हेसुद्धा माहिती असेल की मला एक लहान मुलगा आहे. तो माझे सर्वस्व आहे. माझ्या पतिची ती शेवटची आठवण आहे. जर मी माझ्या मुलाला भावाकडे ठेवले तर माझे मन त्याच्यातच अडकेल. पण तुम्ही रोहनसह माझा स्वीकार केला तर तुम्हाला खात्री देते की तुमच्या मुलीच्या प्रेमात मी कोणताही कमतरता ठेवणार नाही. त्यांना स्वत:च्या मुलीप्रमाणेच वागवेन. ज्या क्षणी तुम्हाला माझ्या वागण्यात बदल जाणवेल तुम्ही रोहनला पुन्हा भावाकडे पाठवू शकता. माझी काहीही हरकत नसेल.’’

साकेतला मधुराचा प्रामाणिकपणा आवडला. त्याच्या मामांनी सांगितल्याप्रमाणे मधुरा सुंदर तर होतीच, पण त्याचबरोबर तिच्यातील प्रामाणिकपणा, नात्यांना समजून घेणारा भावनिक ओलावा, आवजातले माधुर्य त्याला स्पर्शून गेले. त्याला त्याच्या मुलींच्या आयुष्यात आईच्या भूमिकेसाठी ती अगदी योग्य होती. पण त्याने रोहन व तिच्या नात्याचा विचारच केला नव्हता. मधुराचे बोलणे ऐकून त्याला तिची बाजू पटली होती आणि शेवटी तसे नाही झाले तरी निर्णय घेण्याचा अधिकारही मधुराने त्याला दिला होता. थोडा विचार करुन त्याने मधुराच्या प्रस्तावास मान्यता दिली. मधुराला खुपच आनंद झाला, कारण आता तिच्या रोहनला त्याचे स्वत:चे कुटुंब मिळणार होते, ज्यात त्याच्या हक्काच्या व्यक्ती त्याला भेटणार होत्या.

साकेत आणि मधुरामध्ये बाकीची बोलणी झाली. तसा निर्णय फोन करून तिच्या भावासही कळवण्यात आला होता. मधुराचे आयुष्य एका नवीन पर्वाकडे वळण घेत होते. तिने परागच्या सर्व सुंदर आठवणी हृदयाच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे बंदिस्त केल्या आणि रोहनच्या भविष्यासाठी नविन आयुष्यात पाऊल टाकले.

अतिशय साध्या पद्धतीने व जवळच्या लोकांच्या उपस्थितित साकेत व मधुराच्या या नवीन पर्वाची सुरुवात झाली. साकेतचे घर म्हणजे एक आलिशान राजवाडाच होता. प्रत्येक कामासाठी नोकर होता. फक्त मुलींची काळजी घेणं हे एकच काम मधुरासाठी होते. साकेतच्या दोन्ही मुली निधी व परिधी त्याच्या सारख्याच सुंदर होत्या. सुरुवातीचे काही दिवस त्या मधुराशी औपचारिकपणे वागत होत्या, पण मधुराची प्रेमळ वागणूक आणि रोहनची अखंड बडबड यामुळे त्यांची लवकरच गट्टी जमली. त्या मधुराला आई म्हणू लागल्या. साकेतलाही मुलींमधील हा बदल जाणवत होता. त्याचे शांत शांत वाटणारे घर आता खऱ्या अर्थाने घरकुल झाले होते. त्यात एक प्रकारचे चैतन्य आले होते. या सर्वांचे श्रेय मधुराला जात होते, म्हणून त्यानेही रोहनचा प्रेमाने स्वीकार केला.

मधुराचा पूर्ण दिवस मुलांमध्येच जात होता. साकेतही सकाळी ऑफिसमध्ये गेला की संध्याकाळी परत येई. घरी आला की थोडा वेळ मुलांसोबत घालवत असे. मग जेवण झाले की साकेत त्याच्या खोलीत, मुले त्यांच्या खोलीत आणि मधुरा तिच्या खोलीत. दिवसा मधुराला आईच्या भूमिकेत स्वत: विषयी विचार करायला वेळच नव्हता, पण रात्र…रात्र झाली की तिला ती पोकळी जाणवत होती.

ती शारीरिक सुखासाठी आतुर होती असे नव्हे, पण कधी कधी तिला साकेतचा भावनिक आधार हवा होता. तिला तिच्या मर्यादा माहीत होत्या. म्हणूनच तिने कधीही तक्रार केली नाही.

एके दिवशी ती संध्याकाळी नेहमीप्रमाणे साकेतची वाट बघत होती. साकेतला कधीही उशीर होत नसे उशीर होणार असल्यास तो तसे फोन करून कळवत असे. मधुराला काळजी वाटू लागली तेवढ्यात साकेतच्या सहकाऱ्याचा फोन आला, ‘‘मधुरा मॅडम, मी साकेत सरांच्या ऑफिसमधून बोलत आहे. साकेत सर घरी येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.’’

‘‘काय…काय…म्हणताय तुम्ही? साकेत तर नेहमी हळू गाडी चालवतात. कसे शक्य आहे? तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल…’’

‘‘नाही मॅडम, तुम्ही ऐकून तर घ्या…आम्ही साकेत सरांना दवाखान्यात नेत आहोत. तुम्ही पटकन या.’’

मधुराला खूप मोठा धक्का बसला. ती आता आयुष्याच्या अशा वळणावर होती की तिला कोणताही धक्का पचवणे शक्य नव्हते. तिला परागच्या अपघाताची आठवण झाली आणि ती क्षणभर शहारून गेली. पण तिने लगेच स्वत:ला सावरले. मुलांची जबाबदारी आयावर सोपवली. पत्ता विचारून ती दवाखान्यात पोहोचली. साकेतच्या गाडीला दुसऱ्या गाडीने ओव्हरटेक करताना अपघात झाला होता. साकेतचे खुपच रक्त वाहून गेले होते आणि पायालासुद्धा गंभीर इजा झाली होती. साकेतचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मधुरा तर पूर्ण कोलमडून गेली.

ती धावतच त्याच्या बेडजवळ गेली व त्याला बिलगली, ‘‘साकेत…साकेत…तुम्ही माझा आवाज ऐकत आहात ना… मी मधुरा…तुम्ही मला सोडून कुठेही जायचे नाही. मुलं तुमची घरी वाट पाहत आहे. चला लवकर उठा.’’

मधुराचा आक्रोश पाहून डॉक्टरानी तिला समजावले, ‘‘ तुम्ही काळजी करू नका. ऑपरेशनच्या भूलमुळे ते बेशुद्ध आहेत, पण तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. तरच या जखमा लवकर भरतील.’’

डॉक्टरांच्या शब्दांनी मधुरा भानावर आली. साकेतला शुद्ध आल्यावरही मधुरा त्याच्याजवळून हलली नाही. साकेत मधुराचे वेगळेच रूप पाहत होता. त्याच्याशी एक अक्षरही न बोलणारी मधुरा त्याची ही अवस्था पाहून खूपच व्याकुळ झाली होती. ती खुपच घाबरलेली दिसत होती, पण तरीही दवाखान्यात ती एका समंजस व्यक्तीप्रमाणे त्याची काळजी घेत होती. त्याने तिला जवळ बोलवले आणि तिचा हात हातात घेऊन प्रेमाने थोपटले, ‘‘ मधुरा, घाबरू नकोस, मी ठीक आहे. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही…तुझा विश्वास आहे ना माझ्यावर…’’

नवीन नात्याचा पहिला स्पर्श…काय होते त्या स्पर्शात आधार, विश्वास, प्रेम…हेच तर हवे होते मधुराला…आणि तिला रडू कोसळले, पण ते रडणे काळजीचे नव्हते, समाधानाचे होते. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यावर साकेत घरी आला. त्याला एक महिन्याची सक्त विश्रांती सांगितली होती. घरी आल्यावर मधुराने मुलांना आधीच बाबांबद्दल सांगितले होते. तसेच त्यांना बरे नसल्याने आपण त्यांची काळजी घ्यायची आहे अशी प्रेमळ समजूतही घातली होती.

साकेतला मुलांचे आश्चर्य वाटत होते. नेहमी खेळण्यासाठी हट्ट करणारी तिन्ही मुले समंजसपणे वागत होती. ही किमया मधुराची आहे हेसुद्धा त्याने ओळखले. मधुराने महिनाभर त्याची लहान मुलासारखी काळजी घेतली. न सांगताही ती त्याच्या सर्व गोष्टी समजून घेत होती. दोघांमध्ये एक वेगळयाच नात्याची कडी विणली जात होती. मुलांकडेही दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घेत होती. महिन्याभरात साकेतच्या तब्येतीत खुपच सुधारणा झाली आणि याचे सर्व श्रेय मधुराचे आहे हे डॉक्टरांनीसुद्धा मान्य केले. साकेत लवकरच ऑफिसला रुजू झाला.

एके रात्री सर्व कामे आटोपून मधुरा तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. तेवढ्यात तिच्या दारावर कोणाची तरी थाप पडली. तिने दरवाजा उघडला .

‘‘साकेत, तुम्ही इथे…तुम्हाला काही हवं होतं का…’’

‘‘मधुरा, नेहमी आम्हाला काय हवे आहे याचाच विचार करतेस तू. तुला काय हवे आहे हे पण कधीतरी सांगत जा.’’

‘‘साकेत, तुम्ही काय म्हणत आहात..?’’

साकेतने मधुराचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले, ‘‘मधुरा, आज काहीच बोलू नको. तुझे डोळे जे नेहमी सांगतात, ते ऐकायचे आहे मला. तू फक्त आई न होता खऱ्या अर्थाने माझी सहचारिणीचे कर्तव्य निभावले. माझ्या या विटामातीच्या घराचे नंदनवन केले. तू मला नेहमी भरभरून देतच आली आहे. आज मला तुला काही द्यायचे आहे, त्याचा स्वीकार करशील का?’’

मधुराचे हात अजूनही साकेतच्या हातात होते. त्यातील प्रेमाची ऊब मधुराला जाणवत होती. तिने डोळयांनीच साकेतच्या बोलण्यास संमती दर्शवली. साकेतने मधुराला हळूच आपल्या जवळ घेतले व म्हणाला, ‘‘मधुरा, आज आपण आपल्या या नविन नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करू या. माझी सखी, अर्धांगिनी होशील ना…’’

साकेतच्या स्पर्शाने मधुरा मोहरली व ती अजूनच साकेतच्या मिठीत शिरली. साकेतने तिला घट्ट मिठीत घेतले. साकेत व मधुराच्या नात्यातील सर्व अनामिक बंध गळून पडले. येणारी नवीन पहाट, नवीन स्वप्ने, नवीन उमेद घेऊन त्यांचे स्वागत करत होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...