* मोनिका अग्रवाल
गृहिणी असणं ही एक शिक्षा आहे का? सर्वांनाच ठाऊक आहे की बदलत्या काळानुसार गृहिणीची भूमिकासुद्धा आता बदलली आहे. परंतु तिच्या जबाबदाऱ्या कमी न होता अधिक वाढल्या आहेत. तसं बघता या आधुनिक काळात घरातील प्रत्येक कामासाठी मशिन उपलब्ध आहेत, परंतु या मशिन स्वयंचलित आहेत का? आजही गृहिणीची धावपळ सुरूच आहे ना?
जबाबदाऱ्या तर पूर्वीही होत्या, परंतु आवाका मर्यादित होता. परंतु आज आवाका अमर्यादित आहे. आज स्त्रिया घरापासून बाहेरच्या जबाबदाऱ्यांसह मुलांच्या अभ्यासापासून सर्वांचं भवितव्य घडवण्यात आणि भविष्यातील बचत योजना तयार करण्यात व्यस्त असतात आणि तेसुद्धा संपूर्ण एकाग्रतेने.
गृहिणीची धावपळ भल्या पहाटेपासून सुरू होते. मग भले ती शहरी असो वा ग्रामीण. रात्री सर्वांनंतर ती विश्रांतीचा विचार करते. रोज पती, मुलं आणि घरातील अन्य सभासदांची देखभाल करण्यात ती इतकी व्यस्त असते की स्वत:ला कायम दुय्यम दर्जावरच ठेवते. ती इतरांच्या अटी, इच्छा आणि आनंदासाठी जगण्याची इतकी अधीन होते की जर एखाद्या कामात काही कमतरता राहून गेली तरी अपराधभावाने ग्रसित होते. परंतु त्यानंतरही तिच्या वाट्याला आप्तस्वकीयांचे टोमणे येतात. तिच्या कामाचं श्रेय आणि सन्मान तिच्या वाट्याला येत नाही.
सन्मानाची अपेक्षा
गृहिणी एक अशी सपोर्ट सिस्टीम आहे, जी प्रत्येकाला जगण्याची उर्जा देते. याचा अर्थ नोकरदार महिला कमी आहे असं नव्हे. स्त्री भले ती घरात काम करत असो वा बाहेर, ती काम करतेच ना. परंतु इथे आपण त्या स्त्री, त्या गृहिणीबद्दल बोलत आहोत, जिला समाजाच्या दृष्टीने महत्व नाही. तिला एकही सुट्टी नसते, तिला पगार मिळत नाही. खरं सांगायचं तर कोणत्याही गृहिणीला पगार अपेक्षित नसतो. परंतु ती आपल्या माणसांची ज्याप्रकारे सेवा करते, त्यांची काळजी घेते, त्या मोबदल्यात सन्मानाची अपेक्षा नक्कीच बाळगते आणि तो तिचा मानवीय अधिकारही आहे.
एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ४० टक्के ग्रामीण आणि ६५ टक्के शहरी स्त्रिया, ज्यांचं वय १५ वर्षं वा त्याहून अधिक आहे, पूर्णपणे घरगुती कार्यात व्यस्त असतात. त्याहून आश्चर्याची बाब ही की आकडेवारीनुसार ६० वर्षांहून अधिक वयाच्या एकचतुर्थांश स्त्रिया अशा आहेत, ज्यांचा सर्वाधिक वेळ या वयातही घरगुती कामं करण्यात जातो.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप अहवालानुसार केवळ भारतातच स्त्रिया दिवसभरातील ३५० मिनिटं बिनपगारी कार्य करण्यात घालवतात. याचा अर्थ या कामासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा मिळत नाही, याउलट पश्चिमी देशांमध्ये घरच्या जबाबदाऱ्या केवळ स्त्रियांच्या वाट्याला येत नाहीत.
नैराश्याला बळी
याच कारणामुळे तेथील स्त्रियांच्या गृहिणीच्या रूपालाही श्रम आणि आर्थिक भागिदारीच्या पक्षामुळे महत्व दिलं जातं. आपल्या येथील राहणीमान आणि सामाजिक रचना अशाप्रकारची आहे की घरी राहाणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला कमी सुविधा येतात. सर्वात महत्वाची बाब ही आहे की आपल्या येथे घरगुती कार्याची पूर्ण जबाबदारी स्त्रियांवर असते. पुरुषांचं योगदान नावापुरतंच असतं. आपल्या येथे घरच्या कामात पुरुषांचा सहभाग दररोज अवघा काही मिनिटं आहे. जसं की एखादा कलाकार एखादी कलाकृती रेखाटण्यासाठी कॅनव्हासची मदत घेतो, त्याचप्रमाणे घरच्या सभासदांच्या जीवनात रंग भरण्याची भूमिका गृहिणी निभावतात. भले कॅनव्हासप्रमाणे ते ठोस स्वरूपात दिसत नाही. कदाचित म्हणूनच हे रूप प्रत्येक ठिकाणी आणि कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित ठेवण्याचाच प्रयत्न केला जातो. किती सहजतेने तिला सुनावण्यात येतं की तू दिवसभर घरात बसून करतेस काय?
हे सर्व ऐकावं लागल्यामुळे ती सर्वांसोबत असूनही एकाकीपणा अनुभवते आणि नैराश्य व तणावाला बळी पडते. अपराधभावाशी संबंधित या तिच्या जाणीवा बहुतेक प्रकरणात मुलांचं पालनपोषण वा कुटुंबाच्या देखभालीशी जोडलेल्या असतात. तरीदेखील तिच्या कामाचं मुल्यांकन योग्य पद्धतीने केलं जात नाही.
प्रश्न तोच आहे
ती २४ तासांची आणि आयुष्यभराची अशी नोकर आहे, जी मोफत सेवा प्रदान करते आणि जिची नकेल पतीच्या हातात असते. पती हवा तसा तिचा वापर करतो. भले मग तो शारीरिक असो वा मानसिक स्वरूपात वा अन्य रूपात. हरतऱ्हेने तिच्या भावभावनांशी खेळलं जातं. एकाचवेळी तिचा वापर दासी आणि वेठबिगर मजूरासारखा केला जातो. ती आपल्या पतीची आणि मुलांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी नाईलाजाने राबते. अगदी ती प्रेमापोटी काम करते आणि प्रेम करणं हेसुद्धा आता तिचं एक काम बनलं आहे.
आता प्रश्न तोच आहे की गृहिणीचा आवाज धोरणनिर्मात्यांपर्यंत कसा पोहोचणार? एका गृहिणीने कोणत्या दिशेने पाऊल उचलायचं? कशाप्रकारे आंदोलन करायचं? अशा कोणत्याही आंदोलनाला राजकीय दिशा मिळणं जरूरी आहे. अनेक एनजीओ व स्वयंसेवी संस्था संपूर्ण देशात कार्यरत आहेत, ज्या गृहिणींना आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी सल्ला देण्यासाठी कार्यालयं उघडून बसल्या आहेत. परंतु जोपर्यत कुटुंबात स्त्रीपुरूष समानतेचं समीकरण बदलणार नाही, पितृसत्ताकपद्धती व वर्गीय शोषण आपण मुळापासून उपटून फेकून देणार नाही, तोवर आपण पेन किलरसारखे तात्कालिक उपाय गृहिणीला सुचवत राहाणार.
आता दुसरा प्रश्न हा आहे की गृहिणींचा शत्रू कोण आहे? तिचा पतीच पितृसत्तेचं प्रतिक आहे का? पितृसत्ता कायम राखण्यासाठी राज्यव्यवस्था, भांडवलशाही, साम्राज्यवादाची भूमिका काय राहिली आहे. या राज्यव्यवस्थेशी समझोता करून त्याचाच भाग बनून व याच सूत्राकडून आर्थिक मदत घेऊन गृहिणींचं जीवन सुसह्य बनू शकेल का? पोलीस, जज, मंत्री वगैरे याच शोषणकारी व्यवस्थेचे भाग नाहीत का? विचार करण्यासारखी बाब ही आहे की ज्या स्त्रिया घरात संपूर्ण दिवस मुलांसाठी आणि पतीसाठी राब राब राबतात, इतरही बरीच कामं करतात, त्यांना गैरकमाऊ श्रेणीत ठेवणं योग्य आहे का? याउलट आजच्या गृहिणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं योगदान देत आहेत.
२१वं शतक हे केवळ युनेस्कोने नव्हे तर भारत सरकार, सर्व बुद्धिजींवींनी ‘स्त्रियांचं शतक’ असल्याचं मान्य केलं आहे.
श्रमाचं मोल नाही
गृहिणी जे कार्य करते, त्यातून तिला फायदा मिळाला पाहिजे. तिला श्वास घेण्याचं स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य अर्थात पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. ती केवळ मुलाला जन्म देणारं वा त्याचा सांभाळ करणारं यंत्र वा रोबोट नाही. सर्वप्रथम ती माणूस आहे.
कुटुंब सदस्यांना भावनिक आधार देणं, देखभाल करणं, मैत्रीभाव जपणं, अहंकार बाजूला ठेवणं, इतरांचे आदेश मानणं, जखमांवर मलमपट्टी करणं, लैंगिक सुख देणं, घर आवरणं, जबाबदारीची जाणीव तसंच त्याग, महत्त्वकांक्षी नसणं, दुसऱ्यांसाठी आत्मत्याग करणं, सर्व गोष्टी सहन करणं आणि मदत करणं, माघार घेणं, सक्रिय राहून प्रत्येक संकटावर उपाय शोधणं, एका सैनिकाप्रमाणे सहनशक्ती आणि शिस्त बाळगणं हे सर्व कंगोरे मिळून गृहिणीची कार्यक्षमता बनवतात. या अर्थाने गृहिणीच्या श्रमांचं मोल नाही हे तितकंच खरं आहे.
नैतिकतेची आवश्यकता
असं नाहीए की आजची गृहिणी जागरूक नाही, याउलट स्त्रीमुक्ति आंदोलनामुळे गृहिणी जागृत झाल्या आहेत, कायदे बदलले आहेत. भारतीय स्त्री मग भले ती गृहिणी असतो वा नोकरदार स्त्री असो, आपल्या विकासाच्या टप्प्यांदरम्यान जिथे ती अनेक सामाजिक धार्मिक रूढीपरंपरा, कुप्रथा, क्रुर चालीरिती आणि अंधश्रद्धेच्या जंजाळातून मुक्त झाली आहे, तिथे दुसरीकडे तिच्यासमोर नवीन काळातील नवीन आव्हानं उभी ठाकली आहेत, जी पारंपरिक कुप्रथांहून अधिक घातक सिद्ध होत आहेत. जसं की नवीन रूपात स्त्री देह व्यापार, कन्या भ्रुणहत्या, लैगिंक शोषण, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचर, कुपोषण, हिंसाअपराध, हत्या, विस्थापित होणं, स्त्रियांचं बाजारीकरण, कौटुंबिक कलह यांसारखे अनेक भयानक प्रश्न स्त्रीसमोर उभे राहिले आहेत. सोबतच अनेक जुनाट बुरसटलेल्या परंपरा, रूढी, कुप्रथासुद्धा आजवर कायम आहेत, ज्या गृहिणी सक्षमीकरणात मोठा अडथळा आहेत. या कुप्रथांना खुद्द गृहिणीच कारणीभूत आहेत. अनेक गृहिणी अशा आहेत ज्या बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये बदल घडवू इच्छित नाहीत आणि परिणामी वादाचे प्रसंग निर्माण होतात. अधिकार कसा जपावा हे तर गृहिणीला चांगल्याप्रकारे माहीत असते. परंतु स्त्रीपुरुष समन्वय नेमका कसा करावा किंवा कसा घडवून आणला जाईल हे मात्र अजूनही कोडे आहे. आजारावर उपचार केले गेले, परंतु थेरपीची पद्धत योग्य दिशेने नसेल तर आजार बळावणारच.
हे तर ‘जनगणमन अधिनायक जय हो’सारखं झालं, जिथे जन म्हणजे लोकांबद्दल बोललं गेलं, गण म्हणजे गृहिणींना सभेमध्ये आणलं गेलं, परंतु ‘मन’ मात्र दुर्लक्षित राहिलं. याउलट आपल्या सर्वांना ठाऊक आहे की महिला (गृहिणी) ‘मना’शी निगडित आहेत. गृहिणी आजही आपल्या वर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्यास धजावत नाहीत. शारीरिक असो वा मानसिक ती आजही बलात्काराला घाबरते. पूर्वीपेक्षा ती अधिक निर्भीड बनली आहे हे खरं आणि आजही ती गर्दीला घाबरत नाही पण त्या गर्दीतून कधी कोण एकांताचा गैरफायदा घेत तिचं शारीरिक शोषण करेल याची भीती तिला सतावते. बलात्काऱ्यांपासून सुरक्षा करण्यासाठी/लढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या स्प्रे वा जेलची आज गरज नाही, आवश्यकता आहे ती नैतिकतेची. मानसिक उभारीची कमतरता आहे हे मात्र नक्की.
परिवर्तन खूप जरूरी
पितृसत्ताक व्यवस्था बळकट करणं हा यामागे हेतू नाही, गृहिणींचा विश्वास समानतेवर आहे. समाजातील कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये. प्रत्येकाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून महत्त्व आहे. प्रत्येकाने समान नागरिक असलं पाहिजे. अजून परिवर्तनाचा दिर्घ संघर्ष बाकी आहे. एका नव्या प्रगत दिशेने प्रवाहमान होण्याचा प्रयत्न आहे.
एकीकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रंम्प यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडत असताना दुसरीकडे अमेरिकेतील समस्त महिला वर्गाने मिरवणूक काढून आपल्या राजकारणातील समभागाची जाणीव यानिमित्ताने करून दिली होती. परिणामी ट्रंम्प असं कोणंतही पाऊल उचलत नाहीत, जे महिलांविरोधात असेल.