* दीपा अंतुले

पुरूष एकटा असतानाही त्यानं मनातलं बोलू नये याला काय पुरूषार्थ म्हणायचं का? अन् ती नाइटीवाली सुंदरी…तिला बघून आम्ही उत्तेजित होत असतो. आम्हाला आपलं वाटायचं की नाइटी म्हणजे उगाच रोज उठून कुठला पोषाख घालायचा या कटकटीतून मुक्त ठेवण्याचा उपाय म्हणून अंगभर घालण्याचं वस्त्र म्हणून स्त्रिया नाइटी वापरतात. पण नाइटीनं आमच्या आयुष्यात चांगलंच नाट्य निर्माण केलं की हो…

आमची हिडिंबा..चुकलं, जीभ जरा घसरलीच… आमची जीवनसंगिनी सुंदरी तर चोवीस तास साडीतच वावरत असते. गुबगुबित तक्क्याला अभ्रा घालावा अशी दिसते. सहा वार साडीही घट्ट होते किंवा फिट्ट बसते असा भक्कम बांधा आहे तिचा.

आमचे डोळे म्हणजे निर्जीव बटणं नाहीएत हो. ती जिवंत आहेत, त्यामुळे भिरीभिरी फिरून सौंदर्याचा शोध घेत असतात अन् खरं सांगा, सौंदर्याचे पूजक आहेत म्हणूनच तर सौंदर्याची किंमत आहे?

आज सौ. शेजारी गेलीय. ती संधी साधून आपलं मनोगत मांडायला बसलोय आम्ही.

शेवटी सहन करण्याचीही एक मर्यादा असते म्हटलं. सौ.नं तर कडेकोट चौक्या पहारे बसवलेत आमच्यावर. ‘इथं बाल्कनीत का उभे आहात?’, ‘तिथं वर गच्चीवर कशाला गेला होतात?’, ‘खिडकीतून एवढं काय बघताय?’, ‘दारात का उभे आहात?’ असे सतत तिरकस प्रश्न विचारल्यावर आम्हालाही शंका आली की काही तरी विशेष असणारच.

मन तर शंकेखोर अन् अवखळ असतंच ना? आम्हीही शेवटी ते रहस्य हुडकून काढलंच जे आमच्या हिडिंबेनं (सॉरी) आमच्यापासून दडवून ठेवलं होतं.

आता लवकरच रहस्योद्घाटन करतो नाही तर तुम्हीही आमच्यावर भडकाल.

तर झालं असं की अलीकडेच नव्यानं वसलेल्या या आमच्या सुसंस्कृत वस्तीत नेमकं आमच्या बंगल्या समोरच्याच बंगल्यात एक नवीन लग्न झालेलं जोडपं राहायला आलं. जेमतेम चार महिनेच झाले असतील लग्नाला. सुरूवातीला तर दोघांचं नखंही कुणाच्या दृष्टीला पडलं नव्हतं. पण आता मात्र आमचं नशीब उघडलंय. ऐकून आहोत की त्या नवऱ्याच्या धनदांडग्या सासऱ्यानं आपल्या लेकीला अन् जावयाला हा बंगला भेट दिलाय. नवरा साधारण तिशीचा अन् बायको पंचविशीची. नवरा सकाळीच कामावर निघून जातो आणि आम्ही दहा वाजता घर सोडतो. आमची तक्क्यासारखी सौ. जेव्हा स्वयंपाकघरात कामं आटोपत असते, तेव्हा आम्ही पेपर वाचण्याचं निमित्त करून नजरेला स्वैर संचार करू देतो. आमचं आतुर मन त्या समोरच्या बंगल्यातल्या नवयौवना, नवप्रफुल्ल्ता, नवसमर्पिता वगैरे वगैरे असलेल्या सुंदरीजवळ जाऊन पोहोचलं.

आम्ही चाळीशी ओलांडलेले, पण म्हणून काही म्हातारे नव्हतोच. ही सुंदरी खिडकीत, गच्चीवर, दारात, बाल्कनीत कुठंही दिसायची अन् कायम नाइटीत असायची.

नाइटीही एकाहून एक सरस. कधी मिनी नाइटी, कधी वेलव्हेटची तर कधी स्लीव्हलेस, कधी बॅकलेस, तर कधी फुग्याच्या बाह्यांची, कधी अंगासरशी बसणारी, शरीराची वळणं वळसे दाखवणारी, कधी सुंदर गोरे पाय दिसतील अशी खूप घेराची…किती प्रकार होते नाइटीचे. सगळेच तिला शोभून दिसायचे. आमच्या डोळ्यांना अन् मनालाही खूप सुख वाटायचं हो तिला बघताना. कधी तरी मनात यायचं आमच्या सौ.नंही अशीच सुंदर नाइटी घालून आमच्या समोर यावं…पण हे बोलणार कसं? दुसरा प्रश्न समोरच्या सुदर्शनेवर ते शोभून दिसत होतं, आमच्या भक्कम बांध्याच्या पत्नीवर तर काहीच शोभत नाही…नाही…नकोच ते!

आता इतक्या अंतरावरून बघून बघून सवय झाली होती. वाटलं, शेजारधर्म म्हणून जरा जवळ जाऊन ओळख करावी, चौकशी करावी. म्हणून सौ.ला म्हटलं, ‘‘नवीन आलेल्या जोडप्याला एकदा भेटून यावं का?’’

सौ.नं होकार दिला. बरं वाटलं. आम्ही दिवास्वप्नांत दंग झालो. आम्हाला काय काय कविता सुचायला लागल्या. पद्यानं समाधान होईना तेव्हा गद्य ही सुचायला लागलं.

गोरी गोरी सुंदर नारी

तू रंभा, पद्मिनी, अप्सरा

तू चपला, चंचला, मधुभाषिणी

तू रूपगर्विता, नवसमर्पिता

मृदुहासिनी…वगैरे वगैरे वगैरे.

सायंकाळ होऊ लागली तशी आम्ही दोघं त्या बंगल्याकडे निघालो. घराचा स्वामीही त्यावेळी भेटणारच होता. आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौ. दारावरची घंटी म्हणजे घंटीचं बटण दाबलं. घंटीचा आवाज कर्कश्श होता. विजेचा २० वॉटचा पिवळा, आजारी उजेड पाडणारा दिवाही लागला. आतून तेवढाच भस्साडा अन् रूक्ष आवाज ऐकायला आला. ‘‘जरा बघा बरं कोण आलंय…सदान् कदा कसे येतात तडमडायला लोक कुणास ठाऊक!’’

दार उघडलं. दारात तोच गृहस्वामी उभा होता. सभ्य, सुसंस्कृत भासणारा. हात जोडून नमस्कार केला. सौजन्यानं आत घेतलं. सोफ्यावर बसवलं. नजर आतल्या दारावरून हलत नव्हती, आमची पण. तरीही अधूनमधून त्या सुदर्शन पुरूषाकडे बघंत आम्ही राजकारण, समाजकारण, त्यांची नोकरी, व्यवसाय, घरातली, सासरची एकूण मुलं माणसं अशी सगळी चौकशी करून चुकलो. अर्थात् घरात कधीच आम्हाला बोलायची संधी नसते, त्या गोष्टीचा वचपा काढला अन् सौ.जी तोंड फुगवून गप्प बसली होती, तिच्या वाटयाचंही आम्हालाच बोलावं लागत होतं. एवढ्या वेळात ती नाइटी सुंदरी इकडे फिरकलीच नव्हती. आम्ही सौ.ला हळूच कोपरानं ढोसलं. म्हटलं, ही चतुराईनं गृहस्वामिनीचा विषय काढेल, ‘‘त्यांना बोलवा ना,’’ म्हणेल. पण आमच्या म्हशीचा आवाकाच मुळात तेवढा नव्हता. ती तत्परतेनं म्हणाली, ‘‘निघूयात? बराच उशीर झालाय. तुमच्या पत्नीला भेटायला पुन्हा केव्हा तरी येऊ.’’

अस्सा संताप झाला म्हणताए आमचा…अहो निघूयात काय? त्या नाइटी सुंदरीचं अजून दर्शनही झालं नाहीए, म्हणे निघूयात. मग आम्ही काय फक्त बाल्कनीतून तिचं दर्शन घ्यायचं का?

छे, आता आपणच काही तरी करायला हवं. आमच्या आतल्या आवाजानं आम्हाला गळ घातली, धीर दिला अन् आम्ही अत्यंत शालीनतेनं, सोज्वळपणे त्या भल्या गृहस्थाला म्हटलं, ‘‘असं बघा, भेटायलाच आलो आहोत, म्हटल्यावर तुम्हा दोघांना जोडीनं भेटूनच घरी निघावं म्हणतो, ‘काय हो?’? शेवटचं ‘काय हो’ आमच्या सौ.साठीच होतं.’’

बायको खाऊ की गिळू नजरेनं आमच्याकडे बघत होती. त्याचवेळी त्या भल्या गृहस्थाकडे हसून बघण्याचाही प्रयत्न करत होती. एकदंरीतच खूप फनी दिसत होती.

गृहस्वामीला आमची इच्छा पूर्ण करावीशी वाटली…आत वळून त्यानं हाक मारली, ‘‘रंजना, बाहेर येतेस का?’’

दाराच्या पडद्याआड हालचाल जाणवली. आम्ही सावरून बसलो. हृदयाची धडधड वाढली. त्या सौंदर्यवतीला बघायला दोन डोळे पुरतील ना?

दारातून प्रगट झाली एक बुटकी, जाडजूड, भडक गुलाबी रंगांच्या साडीतली, रूंद चेहरा, बसकं फताड नाक अन् मिचमिचे डोळे असलेली आकृती.

‘‘ही नाही, ही नाही.’’ आम्ही अनवधानानं बोलून गेलो.

‘‘ही रंजना, माझी पत्नी…’’

आमच्या सौ.च्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. आपल्यासारख्याच त्या स्त्रीविषयी तिच्या मनांत प्रेमाचा उमाळा दाटून आला. आमचा चेहरा मात्र निराशेनं काळा ठिक्कर पडलेला.

आणखी काही वर्षात ही नववधू आमच्या सौ.ची झेरॉक्स होणार…आमच्या सौ.ला तरी हा आकार घ्यायला इतकी वर्षं लागली. ही तर अगदी लवकरच. सासऱ्यानं घर देऊन ही भवानी त्याच्या गळ्यात बांधली होती.

निर्लज्ज चिवटपणे आम्ही बोलून गेलो, ‘‘आम्ही तर दुसऱ्याच कुणाला तुमची पत्नी समजत होतो…’’

‘‘अच्छा…ती होय? माझी चुलत बहीण आली होती. अमेरिकेत असते. रजेवर आली होती. आजच चारच्या फ्लाइटनं तिला सोडून आलो.’’ त्यानं हसत अगदी सहज सांगितलं.आम्ही कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत घरी परतलो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...