* डॉ. गौरव गुप्ता

नेहमीच आपण लोकांना हे सांगताना ऐकतो की मुलं तर आता मुलांप्रमाणे वागतच नाहीत. अनेक मुलं अशा काही गोष्टी बोलतात की कुटुंबातील लोकांना दुसऱ्यांच्या समोर लाजिरवाणं वाटतं. उदा :

खासगी गोष्ट बोलणे

अनेक मुलं कुटुंबातील खासगी गोष्टी उदा. आईवडिलांच्या आपसातील संबंधांच्या गोष्टी किंवा दुसरी एखादी गोष्ट अशा प्रकारे बोलतात की आईवडिलांना शरमिंधा वाटते.

याबाबत अनेक प्रचलित घटनांची पुनरावृत्ती होणे चुकीचं ठरणार नाही. काही मित्र घरात गप्पा मारत होते, इतक्यात लाइट गेला. एक जण लाइटची व्यवस्था करण्यासाठी आत गेला. यादरम्यान तिथेच बसलेला एक मित्र ५ वर्षांच्या मुलाला विचारू लागला,  ‘‘बाळा, तुला काळोखात भीती तर वाटत नाहीए ना?’’

तो पटकन म्हणाला, ‘‘मी बाबांसारखा डरपोक नाहीए. मला जेव्हा कधी भीती वाटते, तेव्हा मी आईजवळ जाऊन झोपतो. पण बाबांना तर रोज रात्री भीती वाटते आणि तेही आईजवळ येऊन झोपतात.’’

सांगायलाच नको, सर्वजण खोखो करून हसले आणि मुलांचे आईवडील लाजेने लाल झाले.

इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलणे

मुलं केवळ खासगी गोष्टीच नव्हे, काही अशा गोष्टीही दुसऱ्यांच्यासमोर बोलतात, ज्या कधी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याबाबत बोललेल्या असतात.

एका घराची घंटी वाजली, तेव्हा ७ वर्षांचा मुलगा धावत दरवाजा उघडायला गेला आणि मग तिथूनच ओरडला, ‘‘आई, काका आलेत.’’

आईने विचारलं, ‘‘कुठले काका?’’

तो म्हणाला, ‘‘आई, तेच काका, जे गेल्यानंतर तू नेहमी बाबांना सांगतेस की तुमचा हा भिकारी मित्र नेहमी जेवणाच्या वेळी टपकतो. खादाड कुठला. नकोही म्हणतो आणि खातही जातो.’’

तुम्हाला कळलंच असेल, त्या व्यक्तीसमोर आईला किती लाज वाटली असेल.

अनेकदा मुलं कुटुंबातील सदस्यांची आपसात झालेल्या भांडणांची इतरांसमोर पोलखोल करून घरच्यांना लाज आणतात.

अशा स्थितींपासून वाचण्यासाठी मुलांसमोर केवळ त्या गोष्टींचीच चर्चा करा, ज्या त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत.

शिव्या देणे

काही मुलं शिव्या द्यायला शिकतात. अर्थात, मुलांना तेवढी समज नसते, ना ही त्यांना माहीत असतं की शिव्या देणे वाईट गोष्ट आहे. त्यामुळे ती कोणासमोरही शिव्या देऊ लागतात.

अशावेळी आईवडिलांनी आपली मुलं कुठून शिव्या घालायला शिकत आहेत, याकडे लक्ष ठेवावे. याला ते स्वत: तर जबाबदार नाहीत ना. अनेक कुटुंबांत रागात शिव्या घालणे सामान्य गोष्ट आहे.

घराच्या आर्थिक स्थितीची पोलखोल करणे

घरात अनेक प्रकारच्या समस्या असतात, पण लोक समाजात आपला एक स्तर बनवून राहतात. अनेकदा मुलं घरातील आर्थिक स्थितीची पोलखोलही करतात.

उदा. घराची स्थिती ठीक नाही, तर एखाद्या खास फंक्शनसाठी आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीची साडी किंवा दागिने मागून घातलेत. पार्टीत कोणीतरी कौतुक केल्यानंतर आपण हे सांगू लागलात की आपली साडी आणि दागिने किती किमती व चांगले आहेत. पण आपल्या मुलाने सर्वांसमोर हे सांगितलं की, आईजवळ पैसे नव्हते. तेव्हा आपल्याला किती लाजिरवाणं वाटेल, हे आपणच जाणू शकता.

मोठ्या आवाजात बोलणे

अनेक मुलांना लगेच राग येतो आणि ती जोरजोरात ओरडून बोलू लागतात. घरात आई सहन करत त्यांचं बोलणं मानते. त्यामुळे ती बाहेरही तसंच वागू लागतात.

समजा, आई कोणाकडे तरी डिनरसाठी गेली असेल किंवा कोणाला आपल्या घरी आमंत्रित केलं असेल. पाहुण्यांसमोर आईने आपल्या मुलांना एखाद्या कामासाठी नकार दिला. अशावेळी ती आपलं तेच खरं करण्यासाठी ओरडू लागली, तर लज्जित होण्यापासून वाचण्यासाठी आईला त्यांचं बोलणं मान्यही करावं लागतं, शिवाय पाहुण्यांसमोर तिची इमेज खराबही होते.

शॉपिंगसाठी हट्ट करणे

जर मूल मॉल किंवा एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये काही खरेदी करण्यासाठी हट्ट करत असेल आणि आईवडील घेऊन देण्यास नकार देत असतील, तेव्हा ते रडू लागते आणि वाट्टेल ते बोलू लागते. अनेकदा तर मूल एवढं उत्तेजित होतं की ते आपल्या आईला सर्वांसमोर बोलू लागते की तू घाणेरडी आहेस, मला काही घेऊन देत नाहीस आणि जमिनीवर लोळू लागतात. अशावेळी आईवडिलांचा चांगलाच तमाशा बनतो.

अपशब्द बोलणे

अनेक मुलं एवढी उध्दट असतात की घर आणि बाहेरच नाही, तर शाळेत शिक्षक व इतर मुलांनाही अपशब्द बोलायला मागे-पुढे पाहत नाहीत. जाडा, भिकारी, वेडा, चोर यांसारख्या अपशब्दांचा विचार न करता वापर करतात.

मुलांचे वागणे असे ठीक ठेवा

आईवडिलांसाठी मुलाला जन्म देण्यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्या चांगल्या देखभालीची असते. कुटुंबाला मुलाची पहिली शाळा म्हटली जाते. या शाळेत मुलाने काय शिकावं, हे संपूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असते.

लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावा

मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मुलाच्या जीवनातील पहिली ६ वर्षे त्याच्यासाठी ब्लू प्रिंट असतात. अशावेळी आईवडिलांसाठी खूप आवश्यक आहे की त्यांनी मुलांना चांगल्या सवयी लावाव्या.

वाईट संगतीपासून दूर ठेवा

आपल्या मुलाच्या शाळेतील आणि आजूबाजूच्या मित्रांवर नजर ठेवा. जर एखाद्या मुलाचं वागणं वाईट असेल किंवा त्याच्या घरातील वातावरण खराब असेल, तर अशा मुलांसोबत आपल्या मुलाला राहू देऊ नका.

जर आपलं मूल एखादी चुकीची गोष्ट बोलत असेल, तर त्याला विचारा की हे सर्व तो कुठून शिकला. जर शेजारीपाजारील एखाद्या मुलाकडून शिकला असेल, तर त्याच्या आईवडिलांना याबाबत जरूर सांगा. जर शाळेतून शिकून आला असेल, तर पेरेंट्स-टीचर मीटिंगमध्ये या गोष्टीवर जरूर चर्चा करा.

मुलासोबत वेळ घालव

आईवडील आपल्या खासगी जीवनात एवढे व्यस्त असतात की त्यांच्याजवळ आपल्या मुलासाठी वेळच नसतो. आपण कितीही व्यस्त असलात, तरी आपल्या मुलासाठी वेळ जरूर काढा. त्यांच्या संगतीचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, मुले आपल्या आईवडिलांकडे पाहूनच शिकत असतात.

आपलं वागणं घरातील इतर लोकांसोबत कसं आहे, याचा परिणाम आपल्या मुलावर खोलवर होतो.

शक्य असेल, तर आपल्या घरातील प्रौढांना आपल्यासोबतच ठेवा. त्यामुळे आपण डे केयरच्या मोठ्या फीपासूनही वाचू शकता आणि मुलंही आईवडिलांकडून सतत शिकत राहतील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...