– मनीष अग्रहरि

विकसित देशांच्या तुलनेत भारत विकासाच्या बाबतीत भलेही मागे पडत असेल, पण पुजाऱ्यांनी धर्माच्या मदतीने विधी, पूजापाठ आदींना बरेच उंचीवर नेऊन ठेवले आहे. पूजापाठ आणि विधींचा पगडा सामान्यांवर जस जसा वाढू लागला तशी पुजाऱ्यांचीही भरभराट होत गेली.

१९९१ सालापासून देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे युग सुरू झाले. यामुळे लोकांचे स्थलांतर आणि रोजगारही वाढला. अशा परिस्थितीत लोकांचा पूजापाठ आणि धार्मिक विधींवरील विश्वास उडू लागला. यामुळे परिश्रम न करता फुकट खाणाऱ्या पुजाऱ्यांचा धंदा मंदावला. त्यामुळे त्यांनी फसवणुकीसाठी नवे माध्यम आत्मसात केले, जे ऑनलाइन दर्शन, आरती, पूजापाठ आणि पिंडदान, तर्पण, श्राद्धासारख्या विधींच्या रूपात पाहायला मिळत आहे. स्काईप, गुगल, फेसबुक चॅटसारख्या अॅप्लिकेशन्सशी कनेक्ट झालेले हे ऑनलाइन पुजारी ऑनलाइन खिसे कापण्यात तरबेज आहेत.

अर्थ स्पष्ट आहे की पुजारी वर्ग प्रत्येक स्तरावर पूजापाठ कायम ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हद्द म्हणजे सरकारही या कामासाठी मदत करीत आहे. मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्वच उरत नसले तरी ऑनलाइन पूजापाठ पॅकेजद्वारे लाइव्ह पिंडदानातून मोक्ष मिळवून देण्याचा धंदा जोरात आहे. प्रसिद्ध मंदिरांची आरती व दर्शन ऑनलाइन दाखवून आधुनिक पुजारी आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी ऑनलाइन पूजेसाठीची ऑफर देणाऱ्या पुजाऱ्यांपासून सावध राहाणेच योग्य ठरेल.

लाइव पिंडदान

अलिकडेच अलाहाबाद, आताच्या प्रयागराज येथील काही पुजाऱ्यांनी लाइव्ह पिंडदानाची ऑफर सुरू केली. येथील पुजाऱ्यांनी सांगितले, ‘‘व्हिडीओ कॉलिंगद्वारे लाइव्ह पिंडदान करण्यात येते. विधीवेळी एक व्यक्ती मोबाइल घेऊन उभा राहातो. सर्व त्यावर दाखवतो. यामुळे दूर राहणारे यजमानही ते सहज पाहू शकतात. मोबदल्यात आम्ही त्यांच्याकडून बक्कळ रक्कम वसूल करतो.’’

धर्माने बनवले पुजाऱ्यांना धनवान

पुजारी अनेक प्रकारे धर्माच्या नावे पैसे उकळतातच पण, खरी समस्या सुशिक्षित श्रीमंत लोकांच्या विचारसरणीची आहे, ज्यांचे खिसे गरम आहेत आणि धर्माला घाबरून ते पैसे देतात. या श्रीमंत यजमानांना पाहून गरीब समाजही अशाच प्रकारे पुजाऱ्यांसमोर नतमस्तक होतो. हेच कारण आहे की लाइव्ह फसवणूक करणाऱ्या पुजाऱ्यांची मजा होत आहे.

ऑनलाइन पिंडदानाचे अलिकडचेच उदाहरण पाहा. प्रयागराजचे पुजारी विजय पांडेय यांना जयपूरच्या भोलेंद्र राजपूत, विरेंद्र कुमार आणि भैरो सिंह यांनी पिंडदानासाठी २१-२१ हजार रुपये पाठविले. पुजारी आशुतोष पालीवाल यांना मुंबईचे विरेंद्र पांडेय, मोहनीश भार्मा, भयाम द्विवेदी, नवी दिल्लीच्या विकेश, छिंदवाडाच्या विंकेश्वर सिंह चौहान यांनी हजारो रुपये पाठवून ठरलेल्या तिथीला पिंडदान करून घेतले.

हे विचार करण्यासारखे आहे की जिथे एक मजूर दिवसरात्र मेहनत करूनही दरमहा २० हजार रुपये कमावू शकत नाही तिथे पिंडदान करणारे पुजारी फक्त काही तासांत २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा गंडा सुशिक्षित माणसांना घालतात. स्वत: कोणतेही काम न करणारे हे पुजारी विधीच्या नावाखाली सुशिक्षित माणसालाही धर्माची भीती दाखवून कंगाल करत आहेत.

ऑफरवर सरकारची मोहोर

अलिकडेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाळ मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. तेथे भस्म आरतीचे प्रशासक प्रदीप सोनी यांनी दर्शन काउंटरला त्वरित २५० रूपयांचे पास तयार करण्याचे निर्देश दिले होते. म्हणजेच महाकाळ मंदिर प्रशासन भक्तांकडून दर्शनासाठी २५० रूपयांचे शुल्करूपी धन गोळा करण्यात गुंतले होते.

उघड आहे की आणखी जास्त वसुलीसाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असेल. इतकेच नाही तर महाकाल मोबाइल अॅपही सुरू करण्यात आले. या माध्यमातून सुरुवातीला ऑनलाइन दर्शन दिले जात होते पण, नंतर लगेचच बुकिंग करण्यासाठी ते बंद करण्यात आले.

अशाच प्रकारे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या चौका लगतच्या काली मंदिरात २०१८च्या नवरात्रीला सजावटीसाठी २,१०० रूपयांची बुकिंग केली जात होती. अन्य एका प्रकरणात राजस्थानच्या पुष्करमधील ब्रह्मा मंदिरात ५,१०० रुपये ऑनलाइन जमा करून अभिषेक करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मंदिरात व्हीआयपींच्या दर्शन व्यवस्थेसाठी बुकिंग सुरू झाले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम मंदिर विकासासाठी वापरली जाईल असा दावा केला जात आहे. आश्चर्य म्हणजे पुष्करमध्ये ज्या वेळी हे सर्व निर्णय घेण्यात आले त्यावेळी मंदिराचे व्यवस्थापन एका सरकारी समितीकडे होते. जिचे अध्यक्ष तत्कालीन जिल्हाधिकारी होते.

मृत्यूनंतरही भीती

खरेतर, हिंदू धर्मग्रंथांनी लोकांना इतके भयभीत केले आहे की मृत्यूनंतर जिथे कुणाचे अस्तित्वच उरत नाही त्या वेळेचा विचार करून लोक घाबरतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार, कुटुंबातील आप्ताने मुखाग्नी दिल्याशिवाय मृत व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. पण पुजाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी नियमात बदल केला आहे जसे की आप्त अंतिम संस्कार करू शकत नसेल तर ब्राह्मण अंतिम संस्कार करू शकतात. यामुळे मृतात्म्याला मोक्ष मिळण्यापासून कुठलीच अडचण येत नाही. अशा प्रकारे ब्राह्मणाच्या मदतीने मोक्ष मिळत असल्याची खात्री गरूड पुराण आणि स्मृती पुराण देते. मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देण्यासाठी देशातील प्रमुख धार्मिक शहरांच्या हायटेक पुजाऱ्यांसोबतच आता अशा बऱ्याच वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स आहेत जे अशा प्रकारांचा खुलेआम प्रचार करीत आहेत.

पुजाऱ्यांसोबत सरकार

केंद्र सरकारने २०१६मध्ये टपाल खात्याच्या माध्यमातून सर्व निवडक टपाल कार्यालयांमधून गंगाजल विकण्याची घोषणा केली होती. जेणेकरून गंगोत्रीसारख्या शहरांतून ऑनलाइन बुकिंग करून कोणतीही व्यक्ती गंगाजल मिळवू शकेल. पाटण्यातील जीपीओसह तत्कालीन मंत्री रविशंकर प्रसाद, मनोज सिन्हा, रामकृपाल यादव यांच्या उपस्थितीत सरकारने गाजावाजा करीत टपाल कार्यालयांमधून गंगाजल विक्री सुरू केली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माध्यमांना सांगितले, ‘‘टपाल खाते ही आपली पुरातन संस्था आहे आणि गंगा ही आपली सर्वोच्च श्रद्धा आहे. संस्थेच्या सहकार्याने श्रद्धेला घरोघरी पोहोचवले जाईल.’’

उल्लेखनीय आहे की वर्तमानात भाजप शासित राज्यात धार्मिक भावनांना खतपाणी घालण्यासाठी सरकार धार्मिक यात्रा व धार्मिक कार्यक्रमांवर कोटयवधी रुपये खर्च करीत आहे. हरियाणा सरकारने गीता महोत्सवासाठी १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्र सरकारने प्रयागराजच्या कुंभासाठी १,१५० कोटी रुपये मंजूर केले. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०१९च्या अर्धधकुंभासाठी २,५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मध्य प्रदेश सरकार तर देशाबरोबरच परदेशातील धार्मिक यात्रांसाठी पैसे देते.

मात्र, पंजाबच्या काँग्रेस सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना’ बंद करून एक चांगली सुरुवात केली आहे. अन्य राज्यातील सरकारनेही पंजाब सरकारचे अनुकरण करणे योग्य ठरेल. एका धर्मनिरपेक्ष देशाने अशा प्रकारे धार्मिक भावनांना खतपाणी घालून जनतेच्या कष्टाचा पैसा लुटू नये. उलट यातून शिल्लक राहिलेल्या निधीचा वापर शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी केल्यास अधिक चांगले होईल. दुसरीकडे लोकांनी पुजाऱ्यांनी पसरवलेल्या ऑनलाइन पूजापाठ, विधींच्या जाळयात अडकण्यापासून दूर राहावे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...