* सुमन प्रसाद मौर्य आणि सरिता श्रीवास्तव
हिवाळा हा लहान मुलांसाठी अतिशय नाजूक ऋतू असतो. सर्दीची सुरुवात विशेषत: लहान मुलांसाठी संवेदनशील असते, कारण त्यांचे तापमान प्रौढांपेक्षा अधिक वेगाने कमी होते. बाळ जितके लहान असेल तितकेच त्याला रोगांचा त्रास अधिक होऊ शकतो, कारण त्याच्या शरीरात थंडी दूर करून उष्णता निर्माण करण्याची क्षमता नसते आणि त्याच्या शरीरात ऊब निर्माण करण्याइतकी पुरेशी चरबीही नसते.
त्यामुळे बाळाला उबदार तसेच सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे.
बाळाला आवश्यकतेनुसार लोकरीचे कपडे घाला
हवामानानुसार मुलांना लोकरीचे कपडे घालणे फार महत्त्वाचे आहे. त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्यांना आधी सुती कपडे घालावे आणि नंतर त्यावर लोकरीचे कपडे, स्वेटर किंवा जाकीट वगैरे घालावे, कारण बाळाला खूप उबदार कपडे घातल्यावर घाम येत असेल तर तो सुती कपडे तो शोषून घेतो आणि बाळाला आराम मिळवून देतो. तसेच, लोकरीचे कपडे बाळाच्या थेट संपर्कात येत नाहीत, त्यामुळे लोकरीच्या तंतूंमुळे बाळाच्या त्वचेवर कोणताही संसर्ग किंवा पुरळ उठत नाही.
मातांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, जाड लोकरीचे कपडे घालण्याऐवजी त्यांनी बाळाला कमी उबदार असलेले लोकरीचे २ कपडे घालावेत. थंडी कमी झाल्यासारखी वाटली तर त्या त्यातला एक काढू शकतात. यामुळे बाळाचे थंडीपासून संरक्षण होईल आणि त्याचवेळी त्याला अनावश्यक घाम येणे आणि अस्वस्थता सहन करावी लागणार नाही. पायजमा, मोजे इत्यादी उबदार कपडे योग्यप्रकारे त्याच्या पायात घालावेत आणि डोक्याला तसेच त्याच्या हातांनाही चांगल्या कपड्याने झाकावे, जेणेकरून बाळाचे शरीर उबदार राहील.
बाळाला घरातच ठेवा
हिवाळ्याच्या काळात अनेकदा तापमानात अचानक घट होते आणि कधी कधी जोरदार वारे आणि पाऊस यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते. अशा स्थितीत बाळाला घरातच ठेवणे योग्य ठरते. घराचे तापमान योग्य ठेवा, जेणेकरून बाळाला जास्त कपडे घालावे लागणार नाहीत. ६८ डिग्री फॅरेनहाइट ते ७२ डिग्री फॅरेनहाइट हे खोलीचे योग्य तापमान मानले जाते. रात्री झोपताना खोलीचे तापमान ६५ डिग्री फॅरेनहाइट ते ६७ डिग्री फॅरेनहाइट असावे, यामुळे बाळ सुरक्षित राहाते आणि खोलीच्या वातावरणात आर्द्रतेची कमतरता नसते. खोलीचे तापमान खूप गरम झाल्यास, वातावरणात ओलावा आणि ऑक्सिजनची कमतरता असू शकते, ज्यामुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, मातांनी खोलीचे तापमान सामान्यपणे उबदार राहील याची काळजी घ्यावी. खोली गरम करण्यासाठी हीटर किंवा आगीचा वापर करत असाल तर झोपण्यापूर्वी ते बंद करा. हवेच्या अभिसरणाची काळजी घ्या, अन्यथा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
बाळाला घराबाहेर नेताना घ्यायची काळजी
जर काही कारणास्तव बाळाला घराबाहेर नेणे गरजेचे असेल तर त्याला योग्य कपडे घालून घेऊन जा आणि त्याला काही त्रास तर होत नाही ना, हे अधूनमधून तपासत राहा. घराबाहेर असताना बाळाला तुमच्या शरीराजवळ ठेवा. मानवी शरीराच्या उष्णतेमुळे बाळ सुरक्षित राहाते. त्याचे डोके आणि पाय नेहमी झाकून ठेवा, बाळाला पांघरूण घालताना किंवा त्याच्या शरीराला ऊब देताना, त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ नये याची काळजी घ्या. बाळाला कपडे घालतानाही ही काळजी घ्या.
बाळाच्या आहाराची काळजी घ्या
नवजात बाळाचे पहिले अन्न म्हणजे आईचे दूध. त्याला पहिले ६ महिने आईचे दूध द्यावे, कारण बाळासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक आईच्या दुधात योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. त्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबत वरचा आहार द्यावा. सुरुवातीला बाळाला दिलेला आहार सौम्य, द्रवयुक्त आणि कोमट असायला हवा. त्यानंतर, बाळाला हलवा, खिचडी, कुस्करलेले केळे, उकडलेले सफरचंद इत्यादीसारखे घन पदार्थ द्यावेत.
सहाव्या महिन्यानंतर, बाळाचे दात येण्यास सुरुवात झाली की, बाळाचे अन्न जास्त मसालेदार किंवा चटपटीत नसावे. जेवणात वेळोवेळी अर्धा ते १ चमचा तूप देखील द्यायला हवे. बाळावर कितीही जास्त प्रेम असेल तरी त्याला फार खायला देऊ नका, कारण ते बाळाच्या यकृतासाठी चांगले नाही. बाळाला दिवसातून अनेक वेळा रिकाम्या पोटी पाजले पाहिजे. पुरेसा आहार न दिल्यास बाळाला लवकर सर्दी होते आणि ते कुपोषितही होऊ शकते.
बाळाच्या त्वचेची काळजी
हिवाळ्याच्या ऋतूत तापमानात घट आणि वातावरणातील हवेचा वेग कमी झाल्यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडते आणि काही वेळा त्यावर पुरळ उठते. हे टाळण्यासाठी तसेच बाळाची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी त्याला कोमट पाण्याने आंघोळ घाला. वातावरण खूप थंड असेल तर गरम पाण्यात टॉवेल भिजवून बाळाला पुसून (स्पंजने) घ्या. ही प्रक्रिया अशा ठिकाणी करा जिथे वातावरण उबदार असेल आणि हवा शांत असेल. बाळाची त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी त्याला लोशन लावा किंवा तेलाने मालिश करा. यामुळे बाळाची त्वचा मऊ होते, शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहाते आणि त्याच्या शरीरात उष्णताही निर्माण होते. ऑलिव्ह, मोहरी किंवा खोबरेल तेल मालिशसाठी वापरता येते.
आई-वडिलांनी आळस करू नये
थंडीमुळे आई-वडिलांनी बाळाची काळजी घेण्यात निष्काळजी राहू नये. त्यांना किंवा कुटुंबातील इतरांना सर्दी झाली असेल तर बाळाला त्यांच्यापासून दूर ठेवावे, कारण त्याला कोणत्याही आजाराची लागण सहज होते. बाळाला योग् वेळी लसीकरण करणे आवश्यक आहे, लसीकरणामुळे त्याचे विविध प्राणघातक आजारांपासून संरक्षण होते, त्यामुळे हिवाळ्याच्या काळात आई-वडिलांनी अजिबात निष्काळजीपणा करू नये, कारण बाळ संवेदनशील असते आणि वेळेवर लसीकरण केल्याने त्याचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते.
बाळाला अनेकदा सर्दी होते. योग्य काळजी आणि उपचार न केल्यास निमोनियाचा धोका असतो. बाळाच्या नाजूक त्वचेची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. बाळाला काही काळ सूर्यप्रकाशात ठेवणे फार महत्वाचे आहे, कारण त्यातून ड जीवनसत्त्व मिळते, जे बाळाची हाडे मजबूत करते आणि शरीरात योग्यरित्या सुरू झालेला रक्ताचा प्रवाह बाळाला निरोगी बनवतो. त्याची वाढ आणि विकास करण्यास मदत करतो. त्याची त्वचाही निरोगी राहाते.





