* शोभा कटारे
नाती एका दिवसात बनत नाहीत आणि तुटतही नाहीत. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. जर तुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि चांगला समन्वय असेल तर नात्यातील समस्या सोडवता येतात. जरी काही तक्रार असली तरी ती एकमेकांशी बोलून आणि ऐकून सोडवता येते.
आतल्या आत गुदमरून जाणे, प्रत्येक छोट्या गोष्टीवरून वाद घालणे आणि भांडणं करणे हे कोणत्याही नात्यासाठी, विशेषत: वैवाहिक नात्यासाठी घातक ठरू शकते. अनेकदा असे घडते की, जेव्हा नात्यात रुक्षपणा येतो तेव्हा तुमचा जोडीदार ज्या प्रकारे हसतो किंवा एखादा विनोद सांगतो किंवा तुमच्यावर टिप्पणी करतो तेव्हा तुम्हाला ते त्रासदायक वाटू शकते. म्हणूनच नात्यात थोडीशी गंमत करणे आवश्यक आहे, पण ही गंमत अंतहीन भांडणात बदलू नये याची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे.
राहुल आणि सुनीता यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, पण आता दोघांनाही एकमेकांसोबत राहाणे कठीण होत चालले आहे, कारण सुनीताच्या ज्या गोष्टी आणि सवयी लग्नापूर्वी राहुलला आवडत होत्या, त्या आता त्याला आवडत नाहीत.
सुनीतालाही राहुलबद्दल असेच वाटते, ज्यामुळे त्यांच्यात छोट्या गोष्टींवरूनही वाद आणि भांडणं होतात. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत राहाणे कठीण झाले आहे. अचानक नात्यात रुक्षपणा आला आहे. नाते पुढे न्यायचे की तोडायचे, याचा ते विचार करत आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या कमतरतेमुळे, अनेक जोडप्यांमध्येही असेच घडत आहे. काही काळानंतर, नात्यात रुक्षपणा येऊ लागतो ज्यामुळे तणाव निर्माण होतो आणि दोघेही ब्रेकअप म्हणजे तुटण्याच्या दिशेने वाटचाल करतात. आजकाल, याला ‘मोमेंट’ म्हणजेच असाही एक क्षण, असे म्हणतात.
असाही एक क्षण, म्हणजे काय
‘मोमेंट’ अर्थात असाही एक क्षण म्हणजे नाते तुटण्यापूर्वीचा एक धोक्याचा इशारा, तो जर वेळीच ओळखला नाही तर त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. मग नाते वाचवणे थोडे कठीण होऊ शकते.
लग्न स्वत:च्या मर्जीने असो, म्हणजे प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न असो, दोन्ही परिस्थितींमध्ये जोडप्याला एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण लग्नापूर्वी आणि लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत किंवा दिवसांमध्ये आपण एकमेकांसोबत घालवलेला वेळ चांगला असतो. त्यानंतर आपण गुलाबी रंगाच्या चष्म्यातून नात्याकडे पाहातो आणि त्याचवेळी आपण ‘तुम्ही कोण आहात’ यावर लक्ष केंद्रित करतो, म्हणजेच तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहातो, पण जसजसा वेळ जातो तसतसे आपण एकमेकांच्या सवयी आणि वर्तनाशी परिचित होतो.
मग काही गोष्टी असह्य होतात. त्यानंतर आपण ‘तुम्ही काय आहात’ यावर लक्ष केंद्रित करू लागतो, म्हणजेच आपल्याला कळते की तुम्ही काय आहात? मग आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी, सवयी आणि वागणे आवडत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ लागतात. त्यानंतर हळूहळू नात्यात रुक्षपणा येऊ लागतो.
मग त्या जोडप्याला असे वाटू लागते की, जर हे असेच चालू राहिले तर नाते जास्त काळ टिकवणे खूप कठीण होऊ शकते, कारण ते रोजची भांडणं, वाद आणि मारामारीमुळे अस्वस्थ होऊ लागतात आणि ते टाळू इच्छितात, कारण यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ लागतो, ज्यामुळे अनेकदा ब्रेकअप होतो म्हणजे नाते तुटते.
जर तुम्हाला त्या क्षणी तुमचे नाते तुटण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही या गोष्टी अवलंबू शकता :
चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा
जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बराच काळ राहाता तेव्हा अशी परिस्थिती येते जेव्हा तुम्हाला एकमेकांबद्दल, एकमेकांच्या सवयी किंवा वागणुकीतील काहीतरी आवडत नाही. अशावेळी चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले ठरेल, तरच तुम्ही कोणत्याही नात्यात कोणत्याही अडचणीशिवाय पुढे जाऊ शकता.
एकमेकांशी बोला
तुमच्या व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ काढा आणि समोरासमोर बसून एकमेकांचे ऐका. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तडजोड करा, जेणेकरून तुम्ही वाद आणि भांडणांपासून दूर राहू शकाल आणि तुमचे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवू शकाल.
योग्य निर्णय घ्या
कधीकधी नात्यात अशी परिस्थिती उद्भवते जिथे आपण इच्छा असूनही एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नाही आणि मग काळानुसार तणाव वाढत जातो. अशावेळी, नातेसंबंध काळजीपूर्वक पुढे नेऊ इच्छित असाल किंवा पूर्णपणे मागे हटू इच्छित असाल तर सुज्ञ निर्णय घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
चूक मान्य करा
कोणताही वाद टाळण्यासाठी आणि नाते निरोगी ठेवण्यासाठी, आपली चूक मान्य करणे हा एक चांगला पर्याय आहे. हे नाते सुधारण्यासाठी मदत करते, सोबतच नाते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी, एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे एकमेकांबद्दलची ओढ वाढते.
सीमा निश्चित करा
विशिष्ट वेळेनंतर, वैवाहिक नात्यात प्रत्येक छोट्या गोष्टीत हस्तक्षेप केल्याने अनेकदा गुदमरल्यासारखे वातावरण निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एकमेकांना स्पेस म्हणजे जागा देणे आणि प्रत्येक संभाषणात हस्तक्षेप करणे टाळणे गरजेचे आहे.
योग्य सल्ला घ्या
तुमचे नाते वाचवण्यासाठी, एखाद्या समुपदेशकासोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बसा आणि तुमचे नाते कसे वाचवायचे, याबद्दल सल्ला घ्या. हे लोक तुमचे लक्ष अशा काही गोष्टींवर केंद्रित करू शकतात ज्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही, यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नाते टिकवण्याचे फायदे काय आहेत आणि तुटण्याचे तोटे काय आहेत, याचा विचार करा.





