* प्रतिनिधी
बाळाच्या जन्मानंतर लगेचच आई आणि बाळ दोघांवरही कुपोषणाचा वाईट परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर कुपोषण हे बाळासाठी अत्यंत घातक ठरू शकते. हे रोखणे खूप महत्त्वाचे आहे.
गर्भधारणेनंतर कुपोषणाची कारणे
* स्तनपान हे याचे पहिले आणि मुख्य कारण आहे. स्तनपान करवणाऱ्या आईला दररोज किमान १००० कॅलरीज उर्जेची आवश्यकता असते. बहुतेक महिलांना योग्य आहार तक्त्याबद्दल माहिती नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे त्या डिहायड्रेशन, जीवनसत्व किंवा खनिजांची कमतरता आणि कधीकधी अशक्तपणाच्या बळी ठरतात. याला प्रसूतीनंतरचे कुपोषण म्हणजेच बाळाच्या जन्मानंतरचे कुपोषण म्हणता येईल.
* स्तनपानामुळे आईला जास्त भूक लागते आणि ती अनेकदा पौष्टिक तसेच आरोग्यदायी नसलेले पदार्थ खाते. चवीला चांगल्या लागणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात, ज्यामुळे आई कुपोषणग्रस्त होते.
* बाळंतपणापूर्वी आणि नंतर प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे घेणे खूप महत्त्वाचे असते. फॉलिक अॅसिडसारखी प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात आणि शरीरातून बाहेर टाकली जातात, यामुळे फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे बाळंतपणानंतर महिलांना अनेकदा अशक्तपणाचा त्रास होतो.
* बाळंतपणानंतर कुपोषणामुळे महिला अनेकदा प्रसुतिपूर्व नैराश्याच्या बळी ठरतात. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांच्यात भावनिक बदल होतात, ज्यामुळे नैराश्य येऊ शकते. यामुळे, अनेकवेळा महिला व्यवस्थित खाणे थांबवतात आणि कुपोषणाच्या बळी ठरतात.
* गर्भधारणेदरम्यान जवळजवळ सर्व महिलांचे वजन वाढते. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी त्या योग्यरित्या खाणे थांबवतात आणि कुपोषणाच्या बळी ठरतात. त्यासाठी, गर्भधारणेनंतर हळूहळू वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही अचानक कुपोषणाच्या बळी ठरणार नाही. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच, तुम्ही फक्त १ महिन्यात ४-५ पौंड वजन सहज कमी करू शकता. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त डाएट करू नका.
* बाळाच्या जन्मानंतर, महिलांना अनेकदा नीट झोप येत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात पोषक तत्त्वे शोषली जात नाहीत, ज्यामुळे त्या कुपोषणाच्या बळी ठरतात.
बाळासाठी धोका
गर्भवती महिलेमधील कुपोषणाचा तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर दुष्परिणाम होतो. अशा परिस्थितीत बाळाचा विकास योग्य प्रकारे होत नाही आणि जन्माच्यावेळी त्याचे वजन सामान्यपेक्षा कमी राहाते. गर्भधारणेदरम्यान आईमध्ये कुपोषण, आययूजीआर म्हणजे गर्भाशयाच्या आत वाढ कमी होणे आणि जन्माच्यावेळी कमी वजन, यांचा बाळावर नकारात्मक परिणाम होतो, ज्याचे अनेक प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. जसे की, जन्मजात दोष, मेंदूचे नुकसान, अकाली जन्म, काही अवयवांचा विकास न होणे, बाळामध्ये न्यूरोलॉजिकल, आतडे, श्वसन किंवा रक्ताभिसरण विकार, काही मुले जन्मताच रडत नाहीत. यापैकी ५० टक्के प्रकरणे आययूजीआरमुळे घडतात.
बाळाच्या भावी आयुष्यावर परिणाम
गर्भधारणेदरम्यान आईला पोषणाची कमतरता भासल्यास, बाळाला त्याच्या आयुष्यात खालील आजारांना सामोरे जावे लागू शकते :
ऑस्टियोपोरोसिस, क्रॉनिक किडनी फेल्युअर, टाइप २ मधुमेह, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसांचा आजार, रक्तातील लिपिडची असामान्य पातळी, बिघडलेली एनर्जी होमिओस्टॅसिस (जेव्हा शरीर स्वत:ची एनर्जी लेव्हल म्हणजे ऊर्जेची पातळी नियंत्रित करू शकत नाही), सामान्यपेक्षा कमी वजनाने जन्माला येणारी बाळे योग्यरित्या विकसित होत नाहीत.
गर्भधारणेपूर्वी, दरम्यान आणि नंतर पोषणाच्या कमतरतेचे परिणाम काही असे असू शकतात. मुलाची शाळेत कामगिरी चांगली नसते, तो योग्यरित्या अभ्यास करू शकत नाही, त्याचा योग्य विकास होत नाही, मूल शारीरिकदृष्ट्या कमकुवत असते आणि त्याच्यात शक्ती नसते.
कुपोषण कसे टाळावे?
संतुलित आहार घेतल्यास कुपोषण टाळता येते. गर्भधारणेदरम्यान महिलांनी पुरेशा प्रमाणात फळे, भाज्या, पाणी, फायबर, प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन करावे. ज्या महिला गर्भधारणेचे नियोजन करत आहेत, त्यांनी प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे घेणे सुरू करावे, निरोगी आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. गर्भधारणेदरम्यान पौष्टिक पदार्थ खावेत. बाळाच्या जन्मानंतरही जीवनसत्त्वे घ्यावीत. यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहातील.
पौष्टिक गरजा
लोह : शरीरात हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह खूप गरजेचे आहे. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमध्ये आढळते आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेते. जर शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असेल तर शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. जर एखाद्या महिलेने लोहाचे योग्य सेवन केले नाही तर हळूहळू हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ लागते आणि तिला अशक्तपणा येतो. तिच्या शरीरात रोगांशी लढण्याची ताकद राहात नाही.
प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे : गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून बाळाला पुरेशी जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील. परंतु, काही प्रकरणांमध्ये जन्मानंतर प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे आवश्यक नसतात. त्यामुळेच तुम्ही आणखी किती काळ जीवनसत्त्वे घेणे गरजेचे आहे, याबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा.
ओमेगा ३ फॅटी अॅसिड : बाळाच्या जन्मानंतर, विशेषत: स्तनपान करवणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करावे. जवसाच्या बिया, सोयाबीन, अक्रोड आणि भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड पुरेशा प्रमाणात आढळते.
कॅल्शियम : महिलांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रमाणात कॅल्शियमची आवश्यकता असते. यासाठी दुग्धजन्य पदार्थ, गडद हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांसाठी खास टीपा :
नुसत्या कॅलरीज घेणे टाळा : बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात, महिला बाळाची काळजी घेण्यात खूप व्यस्त होतात. अशा परिस्थितीत, त्या निरोगी आहाराकडे लक्ष देत नाहीत आणि जाणूनबुजून किंवा नकळत उच्च कॅलरीजचे पदार्थ खातात. या काळात गाजर, फळे, भाज्या, कमी चरबीयुक्त दही, उकडलेले अंडे, कमी चरबीयक्त चीज, द्राक्षे, केळी, मनुका, काजू यांचे सेवन करावे.
थोड्या प्रमाणात वारंवार खा : एकाचवेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या प्रमाणात वारंवार खात राहा. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. जड अन्न पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. परंतु यावेळी, आईला पुरेशी झोप मिळत नाही, ज्यामुळे जड अन्न पचवणे कठीण होते. म्हणून, हलका आहार घ्या, जेणेकरून शरीरात योग्य प्रमाणात ऊर्जा राहील.
डिहायड्रेशन टाळा : बाळंतपणादरम्यान शरीरातून बरेच द्र्वपदार्थ बाहेर पडतात, म्हणून या काळात हायड्रेशनची विशेष काळजी घ्या. डिहायड्रेशनमुळे आईला अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.
बाळंतपणानंतर पोषण आणि वजन कमी होणे : बाळंतपणानंतर, महिलांना अनेकदा लगेच वजन कमी करायचे असते, ज्यामुळे त्या योग्य आहार घेत नाहीत. स्तनपान केल्याने वजन आपोआप कमी होते, परंतु स्तनपान करणाऱ्या आईला दररोज ३०० अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करा आणि अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टाळा.





