* गरिमा पंकज
बदलत्या काळानुसार लोकांच्या फॅशन आणि लाइफस्टाइल म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल तर झालाच, पण हा बदल नातेसंबंधातही होताना दिसत आहेत. आजची पिढी प्रत्येक गोष्टीत पुढे आहे. त्यांची विचारसरणी, शैली, पेहराव, जीवनशैली आणि राहणीमानातून त्यांच्यातील हे नावीन्य दिसून येते. पण, खेदाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रेम आणि रिलेंशनशिप म्हणजेच नातेसंबंधांच्या पद्धतीही बदलल्या आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलगा, मुलगी किंवा पुरुष आणि स्त्री यांच्यात प्रेमाचा अर्थ वेगळा होता. नात्याची सुरुवात बोलण्यातून होत असे. त्यानंतर, मैत्री होणे, एकमेकांबद्दल आकर्षण आणि ओढ वाटणे, त्यानंतर फिरायला जाणे आणि प्रेमात पडणे, ही एक अतिशय नैसर्गिक आणि भावनिक गोष्ट होती. त्यानंतर दोघं लग्नाचं स्वप्नं पाहायचे आणि संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे वचन द्यायचे. मग आई-वडिलांची ओळख करून देण्याची धडपड सुरू व्हायची. तो काळ असा होता जेव्हा लोक प्रेमासाठी काहीही करायला तयार असत आणि नाती भावनांनी विणलेली होती.
पण, आजच्या डिजिटल युगात सगळेच बदलू लागले आहे. वेगवान आधुनिक पिढीला सर्वकाही बदलण्याची आणि काहीतरी नवीन निवडण्याची सवय आहे. मोठया उत्साहाने विकत घेतलेला मोबाइल एक-दीड वर्षातच नकोसा वाटू लागतो. त्याला बाजूला ठेवून नवीन मोबाइल घेण्याची स्पर्धा सुरू होते. अशाच प्रकारे त्यांना नातीही बदलत राहण्याची सवय लागली आहे. आयुष्यभर एकच नातं कोण वाहून नेणार? कोणास ठाऊक, उद्या तुम्हाला आणखी सुंदर मुलगी भेटू शकते, उद्या तुम्हाला कोणीतरी अधिक शांत, श्रीमंत आणि हुशार मुलगा आवडेल. या कारणामुळेच आजची युवा पिढी नात्यातील कमिटमेंट म्हणजेच समर्पण टाळू लागली आहे.
रोमांचक अनुभव
लोकांना सर्वकाही झटपट हवे आहे आणि जेव्हा त्यांचे मन भरते तेव्हा ते लगेचच स्क्रोल करतात आणि पुढे जातात. डिजिटल युगामुळे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे एकाच्या शोधात वेळ वाया घालवला जात नाही. त्यामुळेच आज रिलेशनशिपच्या ट्रेंडमध्ये बरेच बदल झाले आहेत. आज तरुणाईच्या नात्यात बांधिलकीचा अभाव दिसून येतो. त्यांनी सिच्युएशनशिप म्हणजे परिस्थितीजन्य बदल, या संकल्पनेचा अवलंब सुरू केला आहे.
जस्टिन टिम्बरलेक आणि मिला कुनिस यांचा ‘फ्रेंड्स विद बैनिफिट्स’ हा चित्रपट २०११ मध्ये आला आणि त्यासोबत ‘फ्रेंड्स विद बेनिफिट्स इन रिलेशनशिप’ ही संकल्पना तरुणाईमध्ये लोकप्रिय झाली. त्याच वर्षी, एश्टन कुचर आणि नताली पोर्टमॅन यांनीही तरुणांना नॉन-कमिटल नातेसंबंधांची चव चाखायला दिली, म्हणजेच जास्त ताण न घेता किंवा भावनाप्रधान न होता रोमान्स किंवा प्रेम संबंधांमध्ये पुढे जाणे.
हा एक नवीन आणि रोमांचक अनुभव होता. सार्वजनिक रुपात एखाद्या जोडप्याप्रमाणे एकत्र असल्याचे भासवायचे नाही किंवा कोणत्याही रोमँटिक गप्पा मारायच्या नाहीत, भावनिक ओढ नाही किंवा अन्य काही आपुलकी नाही, फक्त थेट संबंध ठेवायचे आणि जीवनाचा आनंद घेत राहायचा.
या नॉन कमिटल रिलेशनशिपचे नवे रूप नुकतेच समोर आले आहे. जेन, जेड आणि मिलेनियल्सने त्याच्या रोमँटिक संबंधांची व्याख्या करण्यासाठी इतर अनेक गोंधळात टाकणाऱ्या शब्दांमध्ये आपल्याला आणखी एक नवीन शब्द दिला आहे आणि तो म्हणजे सिच्युएशनशिप. हा शब्द २०१९ मध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. रिअॅलिटी टीव्ही शो लव्ह आयलँडची स्पर्धक अलाना मॉरिसनने तिचा डेटिंगचा इतिहास उघड करण्यासाठी याच ‘सिच्युएशनशिप’ शब्दाचा वापर केला होता.
एक नवीन ट्रेंड
तरुण पिढीमध्ये रिलेशनशिपचा एक नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे आणि तो म्हणजे, सिच्युएशनशिप अर्थात परिस्थितीजन्य नाते, ज्यामध्ये नातेसंबंधात काहीही करण्याचे विशेषत: वचन, समर्पण असे कोणतेही दडपण नसते. जोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित असते तोपर्यंतच नाते टिकते.
आज पुरुषांपासून ते महिलांपर्यंत सर्वच डेटिंग अॅप्स वापरत आहेत. लोक अविवाहित राहाणे पसंत करत आहेत आणि जर लग्नानंतरही एकमेकांशी नीट जमले नाही तर ते एकमेकांना झोलत बसण्याऐवजी वेगळे व्हायला ते मागेपुढे पाहात नाहीत. याचा अर्थ सर्वकाही अगदी स्पष्ट, रोखठोक असते. अशा नवीन ट्रेंडमध्ये आणखी एक संज्ञा खूप वेगाने लोकप्रिय होत आहे आणि ती म्हणजे सिच्युएशनशिप.
सिच्युएशनशिप म्हणजे काय?
‘सिच्युएशन’ आणि ‘रिलेशनशिप’ हे दोन शब्द एकत्र करून सिच्युएशनशिप तयार झाली आहे. सिच्युएशनशिपमध्ये रोमँटिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोघे एकत्र येऊ शकतात. दोघेही एकमेकांसोबत बाहेर जाऊ शकतात, बाहेर एकत्र जेवू शकतात. या नात्याला कोणतेही नाव दिले जात नाही. कधीकधी लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात. या नात्यात एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला काहीही सविस्तरपणे न सांगता सोडून जाऊ शकतो.
सोप्या शब्दात, सिच्युएशनशिप हे एक अपरिभाषित नातं आहे, जिथे लोक एकत्र येतात, परंतु त्यांना एका व्यक्तीपुरतेच मर्यादित राहाणे किंवा बांधिलकी जपत बसणे आवडत नाही. म्हणजेच, सिच्युएशनशिप ही एक अशी डेटिंग आहे जिथे दोन लोक कोणत्याही वचनाशिवाय किंवा समर्पणाशिवाय एकत्र राहातात. या नात्याबद्दल त्यांना कोणालाही सांगायचे नसते किंवा त्या नात्याला कोणतेही नाव द्यायचे नसते
एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी २ लोक एकत्र राहातात.
सिच्युएशनशिपमध्ये काहीही परिभाषित नसते. तुम्ही याला प्रवाहासोबत जाणे, असे म्हणू शकता. मन:स्थिती बदलली की जोडीदारही बदलतो, असे या नात्याचे तत्वज्ञान आहे. काही बाबतीत ते योग्य आहे तर काही बाबतीत ते अत्यंत चुकीचे आहे.
सिच्युएशनशिपमध्ये राहाणे का पसंत केले जाते?
नवी पिढी काहीही झाले तरी स्वत:च्या स्वातंत्र्याशी तडजोड करू इच्छित नाही. तरुणांना त्यांचे आयुष्य त्यांच्या इच्छेनुसार जगायचे आहे आणि स्वत:ला स्वतंत्र ठेवायचे आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागते, ज्यामुळे तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. लव्ह रिलेशनशिप म्हणजेच प्रेमाचे नातेसंबंध, हे एक जबाबदारीचे नाते आहे.
म्हणूनच, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वचनबद्धता किंवा जबाबदारी यासारख्या गोष्टी टाळायच्या असतात तेव्हा तो सिच्युएशनशिपमध्ये राहाणे पसंत करतो, कारण यामध्ये जोडीदाराला कोणतेही वचन देण्याची किंवा समर्पणाची गरज नसते. यामध्ये दोघे फक्त प्रेम संबंधातील फायदे वाटून घेण्यासाठी एकत्र येतात.
याशिवाय, जेव्हा एखाद्याचा पहिल्या प्रेमात विश्वासघात होतो किंवा त्याला यश मिळत नाही, तेव्हा त्याला केवळ आनंद मिळवण्यासाठी सिच्युएशनशिपमध्ये यायला आवडते.
सिच्युएशनशिपचे फायदे
लवचिकता : सिच्युएशनशिपमध्ये लवचिकता असते, म्हणजे कोणतेही वचन देण्याची, दिखाव्याची किंवा एकमेकांना प्रश्न विचारण्याची आणि उत्तरे देण्याचीही गरज नसते. या अर्थाने ते चांगले आहे. आपण आपल्या इच्छेनुसार नातेसंबंध तयार करू शकतो. येथे बांधिलकीच्या दबावाशिवाय एकमेकांशी जोडले जाण्याचे स्वातंत्र्य आहे.
कमी दबाव : सिच्युएशनशिपमध्ये, तुमच्यावर कोणतेही ओझे नसते की तुम्हाला तेच करावे लागेल किंवा नातेसंबंध टिकवावे लागतील, म्हणजेच यामध्ये कोणावरही कोणत्याही प्रकारचे दडपण नसते. तुम्ही तुमच्या मर्जीने आणे स्वइच्छेने या नात्यात असता. तुम्ही तुमच्या जोडीदाराला काहीही न सांगता सोडून देऊ शकता. जीवनात इतर प्राधान्यक्रम असलेल्या व्यक्तींसाठी तसेच जे करिअर किंवा जीवनशैलीशी तडजोड करू इच्छित नाहीत किंवा इतर कोणामुळे जीवनाचा उद्देश किंवा जगण्याची पद्धत बदलू शकत नाहीत, त्यांना असे नाते हवेहवेसे वाटते.
तोटे : सत्य हे आहे की, एकत्र राहाण्याच्या दडपणापासून आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यापासून दूर राहाता येत असल्यामुळे सिच्युएशनशिप खूप सुखद वाटत असली तरी, हा एक अत्यंत कठीण मार्ग आहे, ज्यावर काळजीपूर्वक न चालल्यास जखमी होण्याचा धोका असतो. समस्या तेव्हा येते जेव्हा यात गुंतलेल्या दोघांपैकी एकाच्या भावना गंभीर होऊ लागतात आणि त्याला वचनबद्धता, समर्पण हवेहवेसे वाटू लागते.





