* कथा * सुधा अमृता
कार्यालयातून घरी परतत असताना वाटेत वहिनी भेटली. ती खूप दु:खी दिसत होती. विचारपूस केल्यावर ती म्हणाली, ‘‘निवेदिता आता या जगात नाही, असा रोमितचा संदेश मुंबईहून आला आहे.’’
हे ऐकून मला धक्काच बसला. मी घरी कसा पोहोचला माझे मलाच समजले नाही. घरी येताच एका खोक्यातून निवेदिताचा फोटो काढून बघत बसलो. तेवढयात श्रद्धा आली, तिने विचारले, ‘‘इतका काळजीपूर्वक कोणाचा फोटो बघतोस?’’
‘‘तुला माहीत नाही श्रद्धा, ही निवेदिता आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कोविड झाल्यामुळे पती आणि दोन मुलांना रडत सोडून तिने हे जग कायमचे सोडले.’’
‘‘खूप वाईट झाले, पण तू निवेदिताला कसं ओळखतोस? निवेदिताचा फोटो तुझ्याकडे कसा?’’
‘‘तू गोविंदपुरीच्या माझ्या वहिनीला तर ओळखतेसच.’’
‘‘हो, हनीमूनवरून परतताना आपण त्यांच्या घरी काही काळ थांबलो होतो.’’
‘‘बरोबर ओळखलेस. निवेदिता तिची भाची होती.’’
‘‘पण याआधी कधी तू निवेदिताबद्दल बोलला नाहीस?’’
‘‘अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित मी तुला अजून सांगितल्या नसतील.’’
‘‘पण मी तुझ्यापासून कधी कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही?’’
‘‘तुला नेमके काय म्हणायचे आहे?’’
‘‘काही नाही. तुम्ही पुरुष कसे असता तेच समजत नाही. आता तुझ्या बोलण्यातून स्पष्ट झाले की, तुझ्या आयुष्यात अशा किती निवेदिता आल्या असतील काय माहीत?’’
‘‘तू पुन्हा चुकीचे बोलतेस.’’
‘‘सत्य कडूच असते. वहिनीची भाची आणि त्रास तुला होतोय आणि तरीही तू म्हणतोस की, तुझा तिच्याशी काहीही संबंध नाही.’’
‘‘पण मी निवेदिताशी कधी नीट बोललोही नाही, हे मी तुला कसं समजावू?’’
‘‘जर मला दुसऱ्या कोणी सांगितले असते तर कदाचित मी त्यावर विश्वास ठेवलाही असता.’’
‘‘तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजेस, कारण तुझा पती इतका मूर्ख आहे की, तो गरज असली तरीही खोटं बोलू शकत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे.’’
‘‘खोटं बोलू नकोस, पण मला माहीत आहे की, वायफळ बोलायची तुझी सवय आहे. त्यामुळेच तू आयुष्यात प्रगती करू शकला नाहीस. कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तू जास्त काळ नीट राहू शकत नाहीस.’’
‘‘बरोबर बोललीस. तुला माझ्यासारखा पती मिळाला, हे तुझे भाग्य समज. मी विवाहित असूनही सरळ जीवन जगतोय, त्यामुळेच मी आजपर्यंत प्रगती करू शकलो नाही.’’
‘‘कदाचित आतापर्यंत तुला निवेदिता न भेटल्याचा पश्चाताप होत असेल.’’
‘‘माझे जाऊ दे, पण निदान त्या गरीब मुलीवर तरी दया कर आणि आता तर ती या जगातही नाही.’’
‘‘अरे वा, तुझ्या या तत्वज्ञानाबद्दल मी काय बोलू? तरीही, मला सांग, तू तिला कसा ओळखत होतास?’’
‘‘तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर ऐक. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा एमएससी केल्यानंतर मला दिल्लीत नोकरी लागली. गाव सोडताना माझ्या वडिलांनी मला एका दूरच्या भावाचा पत्ता देऊन सांगितले होते की, बाळा, हा तुझ्या एका दूरच्या भावाचा पत्ता आहे. त्याच्याशिवाय दिल्लीत माझ्या ओळखीचे कोणीही नाही. ते एक मोठे शहर आहे. गरज पडल्यास त्याच्याकडे जा.
‘‘दिल्लीला पोहोचल्याच्या तिसऱ्या दिवशी मी त्या भावाच्या घरी गेलो. पहिल्याच भेटीत भाऊ आणि वहिनीच्या वागण्याने मी आनंदी झालो. त्यानंतर मी अनेकदा त्यांच्या घरी जाऊ लागलो. वहिनीबरोबर माझे चांगले जमू लागले.’’
‘‘अरे, खूप बोललास, आता लगेचच नायिकेला तुझ्या कथेत हजर कर.’’
‘‘एका संध्याकाळी मी वहिनीच्या घरी गेलो. मी दिवाणखान्यात प्रवेश करताच थांबलो. समोरच्या सोफ्यावर एक मुलगी बसून भरतकाम करत होती. तिचे मोकळे, काळे, घनदाट, लांब केस पाठीवर लटकत होते. खिडकीतून मावळतीचा सूर्य तिच्यावर सोनेरी किरणे उधळत होता.
‘‘मी त्या मुलीला माझ्या वहिनीच्या घरी पहिल्यांदा पाहात होतो. माझा आवाज ऐकून तिने भरतकामातून डोळे वर करून पाहिले आणि दचकली. मी काहीही न बोलता आत गेलो.
‘‘वहिनी स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. मला पाहून ती आनंदी झाली आणि म्हणाली, अनिल, बरं झालं आलास. छोले-भटूरे बनवताना मला तुझी आठवण येत होती. तुला ते खूप आवडतात ना?
‘‘वहिनीच्या प्रेमळ बोलण्यामुळे मला फार बरे वाटले आणि मी म्हणालो, वहिनी, कृपया मला बसायला टेबल दे.
‘‘त्यावर ती म्हणाली, तू इथे या गरमीत बसणार?
‘‘मी म्हणालो, तू एवढया गरमीत छोले-भटुरे बनवू शकतेस तर मी इथे बसून ते खाऊ शकत नाही का?
‘‘वहिनी हसली आणि पदराने कपाळ पुसू लागली, मग मी अचानक विचारले की, बाहेर कोण बसली आहे?
‘‘वहिनीने सांगितले, ती तिची भाची निवेदिता आहे. वहिनीच्या भावाचे निधन झाल्यामुळे आणि घरी दुसरा आधार नसल्यामुळे, तिने आपली वहिनी आणि भाचीला बोलावून घेतले आहे.
‘‘काही वेळाने ती मुलगी स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली.
‘‘माझ्या लक्षात आले की, वहिनीशी मी इतक्या मैत्रीपूर्णपणे बोलताना पाहून तिला आश्चर्य वाटत होते, पण मला बघितले नसल्यासारखे ती भासवत होती. वहिनीने ओळख करून दिली की निवेदिता, हा माझा दीर अनिल आहे.
‘‘निवेदिताने वर पाहिलं आणि मलाही पाहिलं, त्यानंतर लगेच वळून दिवाणखान्याच्या दिशेने गेली.
‘‘त्यानंतर तिने मला फक्त वहिनीच्या घरातील सदस्य म्हणून पाहिले. बारावीचे शिक्षण घेऊन ती गावातून आली होती. दिल्लीत आल्यानंतर ती चांगला अभ्यास करू शकेल आणि तिला एक चांगले स्थळही इथे सहज मिळू शकेल, अशीच काहीशी इच्छा वहिनी आणि निवेदिताच्या आईच्या मनात असल्याचं माझ्या लक्षात आलं.’’
‘‘हे बघ, मी तुला आधीच सांगितलं की, त्या दिवसांत दिल्लीत राहण्याची माझी एकमेव जागा माझ्या वहिनीचे घर होते. त्या वयातही मला उनाडपणा आवडत नव्हता. मोकळया वेळेत मी माझ्या खोलीत बसून प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचायचो आणि थकवा जाणवला की, वहिनीच्या पदराची मायेची उब मला तिच्या जवळ नेत असे. ती अनेकदा मला गमतीने म्हणायची की अनिल, लग्न झाल्यावर तू तुझ्या पत्नीचा असा गुलाम होशील की बिचारीचा जीव संकटात सापडेल. तिच्या या बोलण्यात किती तथ्य होते, हे तू मान्य करशीलच.’’
‘‘स्वत:चं कौतुक सोड, पत्नीचे गुलाम असणारे पुरुष चांगले असतात का?’’
‘‘तुला चांगलं माहीत आहे की, पुरुषांसारखा कणखरपणा माझ्याकडे नाही. मला कधीच राग येत नाही. नोकर मला घाबरत नाहीत. मला कोणाच्याही मनाशी खेळता येत नाही. म्हणूनच एक सुंदर मुलगी माझ्या अगदी जवळ जाऊनही मी तिच्यावर प्रेम करू शकलो नाही.’’
‘‘निवेदिता सुंदर होती का? फोटोवरून तर तसे वाटत नाही.’’
‘‘हा फोटो अगदी साध्या पोशाखात काढला होता, शिवाय फोटोमध्ये तुला जसे पाहिजे ते दिसत आहे. मला मात्र तिचा गव्हाळ रंग, मोठे डोळे आणि निरागस चेहरा खूप आवडला होता.’’
‘‘अरे, इतक्या लवकर का थांबलास? अजून तिची स्तुती कर.’’
‘‘श्रद्धा, टोमणे मारू नकोस, हे सत्य आहे.’’
‘‘अरे, माझ्या मूर्ख पतीदेवा, तुला थोडासा विनोदही सहन होत नाही. प्रकरण खूप गंभीर आहे, पुढे बोल.’’
‘‘यानंतर काही विशेष नाही, पण हो, कधी कधी धूसर चित्र डोळयांसमोर येतं. जसे पहाटे अर्ध्या झोपेत दिसणारे स्वप्न, ज्याला आकार नसतो तर त्याची नुसती झलक मनात अस्वस्थतेची भावना निर्माण करते. ते चित्र निवेदिताचे असेल असे वाटत असेल तर तू चुकत आहेस. मी सांगू शकत नाही की तुम्हा स्त्रियांच्या बाबतीत हे असे का घडते?’’
‘‘तू त्या वेळी निवेदिताला हा. प्रश्न विचारला असतास तर तुला ते कळले असते.’’
‘‘मी तुला पुन्हा एकदा सांगतो की, मी तिथे गेल्यावर आमची भेट नक्कीच व्हायची, पण आम्ही क्वचितच एकमेकांशी बोलायचो. वहिनी, तिची आई आणि आम्ही सगळेच बहुतेक संध्याकाळी बाहेर खुर्च्यांवर बसायचो. ती तिची खुर्ची काही अंतरावर ठेवायची. का ते माहीत नाही? होय, हे खरं आहे की, जेव्हाही वहिनीने विचारलं तेव्हा ती गाणे गायची. कधी कधी ती गाण्यांमध्ये इतकी रमून जायची की ती एकापाठोपाठ एक गाणीच म्हणत राहायची. तिचं गाणं बंद झाल्यावर आम्ही अनेकदा बोलायला विसरायचो.’’
‘‘ती कशी गायची?’’
‘‘श्रद्धा, मला काय माहीत? जरी सर्वजण तिच्या गाण्याचे कौतुक करत असले, तरी जेव्हा ती गायची तेव्हा तिच्या गाण्यातील वेदना आणि दु:ख माझ्या हृदयात आहे असे मला वाटायचे, पण ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते, भाषा नव्हती. तिची काही गाणी मी गुपचूप रेकॉर्ड केली होती.’’
‘‘ती फक्त तुझ्यासाठीच गाणी गायची, असेच तुला म्हणायचे आहे का?’’
‘‘असा मुर्खासारखा विचार मी कधीच केला नाही. एखाद्या मुलीने डोळे वर करून पाहिले म्हणजे ती काही खास कारणाने माझ्याकडे बघत आहे, असा विचार केल्यास ते माझ्या मूर्खपणाशिवाय दुसरे काय असेल? आणि रेकॉर्डिंगबद्दल बोलायचे तर त्यानंतर माझे मोबाईल फोन अनेकदा बदलले गेले. आता तो आवाज कुठे शोधणार?’’
‘‘तुझे हे बोलणे माझ्या डोक्यात आले नाही. बरं, पुढे सांग.’’
‘‘तिच्या आईला तिच्या लग्नाची खूप घाई होती, पण मी अनेकदा वहिनीला हे बोलताना ऐकले होते की, लग्नाची इतकी काय घाई आहे? मुलगी, निदान बी.ए. होऊ दे. तिला शिकू दे, वेळ आल्यावर लग्न होईलच.
‘‘पण, तिची आई सांगायची की, लग्नासाठी आधीपासून प्रयत्न करावे लागतात. हे मुलीचे लग्न आहे, कुठली थट्टा-मस्करी नाही.
‘‘एक दिवस निवेदिताच्या आईने मला सांगितले की अनिल, तू खूप चांगल्या नोकरीला आहेस. तू निवेदितासाठी तुझ्यासारखाच एखादा मुलगा शोधशील का?
‘‘त्यावर वहिनी माझी चेष्टा करत म्हणाली की, तू पण खूप चांगल्या माणसाला सांगत आहेस. आपल्यापेक्षा लहान असलेल्यांशीही बोलताना तो घामाने भिजतो, तो आपल्या मुलीसाठी कोणता मुलगा शोधणार? होय, पण त्याच्या नजरेत नक्कीच एक मुलगा आहे.
‘‘पण, वहिनी माझ्याकडे बघून नुसती हसत होती. मी तिथे क्षणभरही थांबू शकलो नाही. मी लगेच उठून बाहेर आलो. माझी वहिनी माझ्याबद्दल काय विचार करते, या विचाराने मी अस्वस्थ झालो.
‘‘मला लाज वाटत होती. मला वाटलं, मी निवेदिताच्या घरी तिच्या आकर्षणापोटी येत नाही हे मी वहिनीसमोर कसं सिद्ध करू? तिला मी कसं सांगू की, मी एवढा स्वार्थी नाही की, मी माझ्या वहिनीच्या निस्वार्थ मायेचा असा दुरुपयोग करेन. निवेदिता यायच्या आधीही मी वहिनीकडे अनेकदा यायचो आणि आताही कधी कधी येतो. निवेदिता आल्यानंतर माझ्या वागण्यात काही बदल झाला होता का?
मी वहिनीला असा विचार करण्याची संधी दिलीच कशी? मी संपूर्ण रस्ताभर या प्रश्नांचाच विचार करत होतो. माझ्याकडून चूक झाली आहे का? माझ्या कोणत्याही कृतीतून नकळतपणे वहिनीच्या स्त्री-मनाच्या नाजूक पटलावर काहीतरी प्रतिबिंब उमटले असेल का? हे कधी घडले? कसे घडले? मला काही समजले कसे नाही?
‘‘घरी आल्यावर मी डोळे मिटून खाटेवर पडलो, पण मन अस्वस्थ होतो. मनाची ही अस्वस्थता वाढतच गेली. शेवटी मी ठरवले की, काहीही झाले तरी वहिनीच्या मनातील संशय दूर केला पाहिजे.
‘‘दरम्यान, एके दिवशी अचानक माझी कॅनॉट प्लेसमध्ये रोमितशी भेट झाली. त्याने माझ्यासोबत एमएससी केले होते. तो अभ्यासात हुशार होता.
आयएएस स्पर्धेत निवड झाल्यानंतर तो राजपत्रित अधिकारी झाला. बोलण्याच्या ओघात जेव्हा मला समजले की, रोमित अजूनही अविवाहित आहे, तेव्हा माझ्या मनाने जणू आनंदाने उडी मारली.
‘‘त्याच्यासमोर प्रस्ताव मांडण्यास उशीर करणे मला योग्य वाटले नाही. सुरुवातीला गंमत म्हणून बोलणे सुरू झाले, पण काही वेळाने रोमित माझ्या बोलण्यावर गंभीर दिसला. त्याला दिल्लीबाहेरचे जीवन जगावेसे वाटले नाही. संधी साधून त्याने मला निवेदिताबद्दल विचारले.
‘‘मुलीला बघायचे ठरल्यावर रोमित म्हणाला, हे काय बोलतोस अनिल? जर मुलगी तुझ्या बघण्यातली आहे आणि तुला ती माझ्यासाठी सुयोग्य वाटत असेल तर ठीक आहे, पण माझी आई मुलगी बघितल्याशिवाय होकार देणार नाही.
‘‘मी म्हणालो नक्कीच… तुला हवं तेव्हा आईला घेऊन ये.
‘‘तो म्हणाला ठीक आहे अनिल, मी पुढच्यावेळी दिल्लीला येताना काही दिवसांची सुट्टी काढून येईन.
‘‘रोमित यापेक्षा जास्त काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला बरंच काही सांगून गेले.
‘‘त्याच रात्री मी माझ्या वहिनीला रोमितबद्दल सगळं सांगितलं. वहिनी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तू खरं बोलतोस का अनिल?
‘‘मी म्हणालो, वहिनी, मी कधी तुझ्याशी खोटं बोललो आहे का?
‘‘वहिनी थोडावेळ माझ्या चेहऱ्याकडे बघतच राहिली, त्यानंतर म्हणाली, ठीक आहे.
‘‘तिला जितका आनंद होईल, असं मला वाटलं होतं, तितका आनंद मला तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, पण निवेदिताच्या आईने अत्यानंदाने माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाली, अनिल, तू हे नाते लवकर जुळव, असे स्थळ सहसा मिळत नाही.
‘‘थोडयाच दिवसांत निवेदिताचे लग्न ठरले. सर्व नातेवाईकांमध्ये निवेदिताची आई माझे कौतुक करायची आणि प्रत्युत्तरात ते सर्वही माझे कौतुक करायचे. एवढं मोठं काम माझ्यासारख्या मुर्ख माणसाकडून होईल, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती.
‘‘लग्नाची सर्व तयारी झाली होती. अचानक निवेदितानेच गोंधळ घातला. ती लग्न न करण्यावर अडून बसल्याचे मला समजले.
‘‘वहिनी मला म्हणाली, आता तूच जाऊन निवेदिताची समजूत काढ.
‘‘हे ऐकून मी स्तब्ध झालो आणि मग विचारले की, निवेदिताला अचानक काय झालं? मी तिला काय समजावू?
‘‘हे ऐकून वहिनी म्हणाली, अनिल, तू समजावलंस तरच काहीतरी होऊ शकतं. तिचं तुझ्यावर प्रेम आहे, हे तुला कळायला हवं.
‘‘मी वहिनीच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. माझा चेहरा पडला होता. मी काळजीत पडलो. लग्नाचं प्रकरण इतकं पुढे सरकलं होतं की मला माघार घ्यायला लाज वाटली असती. मी कुणाला तोंडही दाखवू शकणार नव्हतो.
‘‘वहिनीच्या सांगण्यावरून मी तिच्याकडे गेलो. ती दुसऱ्या मजल्यावरील खोलीत खिडकीजवळ उभी राहून रडत होती. मी तिला हाक मारली. इतक्या दिवसांत मी पहिल्यांदाच तिच्याशी समोरासमोर बोललो.
‘‘मी म्हणालो, निवेदिता, लग्नाची बोलणी खूप पुढे गेली आहेत. आता तू सगळयांना खाली मान घालायला लावणार आहेस का?
‘‘तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. मग ती लगेच म्हणाली, आणि माझे प्रेम, माझ्या भावना?
‘‘मी विचारले तुला या नात्यात काही अडचण आहे का?
‘‘तिचा गोल चेहरा लाजेने आणखी खाली गेला. तिने ओढणीचे टोके गुंडाळायला सुरुवात केली.
‘‘मी पुन्हा म्हणालो, तू या सर्वांचा पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करू शकत नाहीस का?
‘‘तिने डोळे वर करून काही क्षण माझ्याकडे पाहिले. मग ती म्हणाली, हे तू काय बोलतोस?
‘‘निवेदिताचा प्रश्न ऐकून मी थक्क झालो. मग ती म्हणाला की, तुझी आई, आत्ये सर्वांची हीच इच्छा आहे… दुसरीकडे रोमितही वाट पाहात बसला होता…
‘‘बोलणे अर्धवटच राहिले. माझा कंठ दाटून आला. अचानक मलाच सर्व काही निरर्थक वाटू लागले.
‘‘ती म्हणाली, मला हे सर्व माहीत आहे, पण तुझेही तेच म्हणणे आहे का?
‘‘मी जबरदस्तीने हसलो आणि म्हणालो, माझे म्हणणे मी नक्कीच सांगेन.
‘‘माझं उत्तर ऐकून ती म्हणाली, तुझा नकार का आहे? उगाच मित्रासमोर तुला मान खाली घालावी लागणार नाही.
‘‘मी म्हणालो नाही, तसं काही नाही. जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे.
‘‘ती म्हणाली, ‘‘माझं भलं? पण ते कशात आहे?
‘‘यानंतर निवेदिताने मला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि पटकन खोलीतून बाहेर पडून पायऱ्या उतरून खाली निघून गेली.
‘‘लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. घरभर गोंधळ सुरू होता. मी व्यस्त आहे हे दाखवण्यासाठी मी इकडे तिकडे फिरत राहिलो, पण मला काहीही करण्यात रस नव्हता. वरात दारात आली होती. त्याचवेळी वहिनीला शोधत मी दुसऱ्या मजल्यावरील त्याच खोलीत पोहोचलो.
‘‘लाल रंगाची खूपच सुंदर साडी नेसलेली निवेदिता, कपाळावर लाल बिंदी आणि पायात पैजण घालून गुडघ्यांमध्ये चेहरा खाली करून बसली होती. त्यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. अचानक तिने मान वर केली. ती काही वेळ माझ्या तोंडाकडे बघतच राहिली. मी पाहिले की तिचे दोन्ही डोळे खूप लाल झाले होते. लग्नाच्या रात्री सगळया मुली रडतात, असं मी ऐकलं होतं. कदाचित तीही रडली असावी. तिचे लाल डोळे मला खूप आवडले.
निवेदिता उभी राहिली आणि जड अंत:करणाने म्हणाली, हीच तुझी इच्छा होती ना? तिच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.
‘‘मग मी तिथे थांबूच शकलो नाही. मान खाली घालून मी गुन्हेगारासारखा बाहेर आलो. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आले. यानंतर मला त्या घरात राहावंसं का वाटलं नाही माहीत नाही.’’
‘‘त्यानंतर काय झाले?’’
‘‘श्रद्धा, त्यानंतर काही झाले नाही.’’
‘‘तू निवेदिताला पुन्हा भेटला नाहीस का?’’
‘‘नाही.’’
‘‘ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे.’’
‘‘श्रद्धा, तुला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. लग्नाच्या ८ दिवसानंतर रोमित आपल्या पत्नीसह मुंबईला परतला. कदाचित त्याला फारशी रजा मिळाली नसावी. इथे माझी बदलीही लखनऊला झाली. त्यानंतर आपलं लग्न झालं आणि मीही कामात व्यस्त झालो. तेव्हापासून आपण एकत्र आहोत. लखनऊनंतर माझी कानपूरला बदली झाली, नंतर घाटमपूर आणि आता १२ वर्षांनी मी पुन्हा दिल्लीला आलो आहे. या १२ वर्षात रोमित आणि वहिनीने अनेकवेळा पत्र लिहून त्यांना फोन करण्याची विनंती केली, पण रोमित आणि वहिनीकडे जाण्याची इच्छा अर्धवटच राहिली.’’
‘‘आपल्याला दिल्लीत येऊन एक महिना झाला आहे. या महिनाभरात एकदाही तू वहिनीच्या घरी का गेला नाहीस?’’
‘‘मी वहिनीच्या घरी गेलो नाही, असा अंदाज तू कसा लावलास?’’
‘‘याचा अर्थ तू वहिनीच्या घरी जातोस.’’
‘‘नाही, हे रोज कसे शक्य आहे?’’
‘‘तू कदाचित रागावली असशील, पण इथे आल्याच्या चौथ्या दिवशीच मी त्या मायाळू वहिनीला भेटायला गेलो होतो. तिथे गेल्यावर मलाही निवेदिताची आठवण आली, पण मी वहिनीकडे तिचा उल्लेख टाळला.
‘‘गप्पांच्या ओघात वहिनीने सांगितले की, निवेदिता तिच्या पतीसोबत खूप आनंदी आहे. दिल्लीला आल्यावर तिला माझी आठवण येते. ते ऐकून मी निश्चितच समाधानी झालो.
‘‘त्यानंतर मला इच्छा असूनही वहिनीच्या घरी जाता आले नाही, पण योगायोगाने आज सेक्टर ३ च्या वळणावर वहिनी भेटली आणि…’’
निवेदिताच्या निधनाची दु:खद बातमी तिने सांगितली.
‘‘अनिल, मला निवेदिताला बघता आले नाही, याची खंत वाटते.’’
‘‘तिला बघून तू काय करणार होतीस?’’
‘‘ते बघितल्यावर आणि भेटल्यावरच सांगता आले असते. तू तिला एकदाही आपल्याकडे बोलावले नाहीस. वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू खरंच खूप मोठा मूर्ख आहेस…’’
‘‘श्रद्धा, यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? कदाचित तू बरोबर आहेस. आता बिचाऱ्या रोमितचे काय होणार, हा विचार मनात येतोय. मला त्याला पत्र लिहायचे आहे, पण खूप विचार करूनही शब्द सापडत नाहीत. असे शब्द ज्यांच्या मदतीने रोमित निवेदिताने अर्धवट सोडलेल्या फुलांचे संगोपन करू शकेल आणि त्यांच्या सुगंधाने स्वत:ला सुगंधित करू शकेल.
‘‘कोणत्याही शब्दकोषात असे शब्द नाहीत का, जे मृत व्यक्तीला जिवंत करू शकतील?’’
‘‘श्रद्धा, तू माझी चेष्टा करतेस का मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करण्याइतकी ताकद माझ्या शब्दांत नाही, पण माझ्या बोलण्याने तिघांच्या ओठांवरचे हिरवलेले हास्य परत आणलं तरी माझ्यासारख्या मूर्ख माणसासाठी ते खूप महान कार्य असेल.