* गरिमा पंकज

अलीकडेच, क्रिकेटपटू ऋषभ पंतला उत्तराखंडमधील रुडकी येथील नारसन सीमेवर भीषण कार अपघात झाला. त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले, त्या दरम्यान ऋषभ पंत आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत होते, कारण लोक मोठया संख्येने त्याला भेटायला येत होते. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे ऋषभ पंतला विश्रांती घेता येत नव्हती.

खरं तर ऋषभ पंत जखमी झाल्याच्या वृत्ताने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व असल्याने काही खास लोकांव्यतिरिक्त त्याच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी चाहतेही रुग्णालयात पोहोचू लागले. खास लोकांपैकी आमदार, मंत्री, अधिकारी तसेच काही चित्रपट कलाकार त्याची विचारपूस करण्यासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले. पाहुण्यांच्या या गर्दीमुळे जखमी ऋषभ आणि त्याचे कुटुंबीय काहीसे अस्वस्थ झाले.

ऋषभ पंतच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नियोजित वेळेनंतरही लोक त्याला भेटायला येत होते. त्याच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय पथकातील एका सदस्याने सांगितले की, ऋषभला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक होते. त्याला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज होती. अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्याला वेदना होत होत्या.

भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलून त्याची उर्जा वाया जाणार होती, जी तो लवकर बरा होण्यासाठी वापरणे गरजेचे होते. शेवटी डॉक्टरांना सांगावे लागले की, जे त्याला भेटायचे ठरवत आहेत त्यांनी सध्या तरी येऊ नये. त्यांनी ऋषभ पंतला आराम करायला द्यायला हवे.

एक महत्त्वाचा उद्देश

रुग्णालयात येण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ५ अशी होती. या कालावधीत केवळ एक जण रुग्णाला भेटू शकणार होता. ऋषभ पंत प्रसिद्ध असल्याने त्याला भेटण्यासाठी बरेच लोक येत होते. त्यामुळे ही मोठी समस्या बनली होती.

केवळ प्रसिद्ध व्यक्तीच नाही तर आपलेच कोणीतरी, एखादा ओळखीचा किंवा नातेवाईक आजारी पडला तर सौजन्याने आपण त्याला भेटायला, त्याला धीर द्यायला किंवा मदत करायला रुग्णालयात जातो. कोविड-१९ च्या काळात, जेव्हा लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, तेव्हा आपण व्हिडीओ कॉलिंगद्वारे एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो. आजारी व्यक्तीला भेट देण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्याला असे वाटू नये की, तो एकटा आहे. आपण त्याला धीर द्यायला जातो आणि दाखवतो की तो एकटा नसून या कठीण काळात आपण त्याच्यासोबत आहोत.

रुग्णाबद्दलची आपली काळजी काहीवेळा रुग्णाला त्रासदायक ठरते. म्हणून, जर आपल्याला रुग्णालयात एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला जायचे असेल तर आपण या सामान्य शिष्टाचारांची काळजी घेतली पाहिजे.

योग्य वेळी जा

जाण्यापूर्वी रुग्णालयाच्या भेटीची वेळ जाणून घ्या. प्रत्येक रुग्णालयात भेटीची वेळ ठरलेली असते. तो नियम नेहमी पाळला पाहिजे. आपल्याला दिलेल्या वेळेत रुग्णाला भेटायला जावे, डॉक्टरांच्या फेरीवेळी, रुग्णाच्या जेवणाच्या वेळी, रुग्णालयातील साफसफाई करताना रुग्णाला भेटायला जाणे टाळावे.

गर्दी करू नका

आजारी व्यक्तीभोवती शक्यतो गर्दी करू नका. डॉक्टरांच्या भेटीची वेळ झाल्यावर शांतपणे बाहेर जा, फक्त कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांना आजारी व्यक्तीसोबत राहू द्या.

इतरांचीही काळजी घ्या

आजारी व्यक्तीला जास्त बोलण्यासाठी प्रवृत्त करू नका. विनोद करून वातावरण हलके होईल, असा गैरसमज करून घेऊ नका. रुग्णालयात आणखी काही रुग्ण असतात, कदाचित त्यांची परिस्थिती गंभीर असेल, त्यांचाही विचार करा.

जेव्हा रुग्ण महिला असेल

आजारी महिलेला भेटणार असाल तर विशेष काळजी घ्या, विचारल्याशिवाय आत प्रवेश करू नका. तिच्या जवळ जास्त वेळ बसू नका, उपचारादरम्यान तिला अनेक वैद्यकीय उपकरणे लावली असतील, ज्यामुळे तिची स्थिती अवघडल्यासारखी झाली असेल, अशा परिस्थितीत तुमच्या उपस्थितीत महिलेला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना थोडेसे अवघडल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला मदतीसाठी जरी जावे लागले तरी काही क्षण बसा आणि बाहेर या. तुम्ही बाहेर असलेल्या तिच्या कुटुंबियांशी बोलू शकता.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत योग्य वर्तन

रुग्णालयातील कर्मचारी जसे वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर, वॉर्ड सिस्टर, रिसेप्शनिस्ट इत्यादींशी चांगले वागले पाहिजे, कारण ते सर्व रुग्णांची काळजी घेतात. त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नका. उपचारानंतर रुग्णाला बसवलेल्या उपकरणांशी छेडछाड करू नका. विनाकारण डॉक्टरांशी बोलू नका. ओळख वाढवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरांचा वेळ वाया घालवू नका.

रुग्णाच्या खोलीला सहलीचे ठिकाण बनवू नका

बऱ्याचदा आपल्यापैकी अनेकजण एकत्र रुग्णालयात जातात. सोबत रुग्णासाठी फळे तसेच इतर खाद्यपदार्थ घेऊन जातात. यामुळे एक प्रकारे रुग्णाची खोली आपण एखाद्या सहलीच्या ठिकाणासारखी बनवतो. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आजार सामान्य असो किंवा गंभीर, अनेकदा इतर लोकांच्या संसर्गामुळे रुग्णाला सर्वात जास्त नुकसान होते.

रुग्णाला एकावेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी भेटायला जाऊ नये. जर रुग्णाला काही खायला किंवा प्यायला द्यायचे असेल तर आधी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांना विचारा. तुम्ही घरूनच काहीतरी तयार करून चहा, नाश्ता वगैरे, रुग्णांसाठी नाही तर त्याची काळजी घेत असलेल्या कुटुंबीयांसाठी नेल्यास बरे होईल.

स्वच्छतेची काळजी घ्या

रुग्णाला भेटायला जाण्यापूर्वी, आपले हात साबणाने किंवा हँडवॉशने चांगले धुवा. बहुतेक संक्रमण किटाणूंनी भरलेली नखं आणि हातांमधून होते. स्वत:ला सॅनिटाइज केल्यानंतरच भेटायला जा, मास्क घालून जा, परवानगी मिळाल्यानंतरच रुग्णाच्या जवळ जा, अन्यथा कुटुंबातील सदस्यांशी बोलून त्याच्या आरोग्याबद्दल जाणून घेणे चांगले.

नकारात्मक बोलू नका

अनेकदा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त रुग्णाला भेटायला गेल्यावर लोक नकारात्मक बोलू लागतात. रुग्णासमोर आजारपणाचा खर्च, जीवन-मरण इत्यादी बोलणे चुकीचे आहे. चिंता व्यक्त करताना, आपण अशा एखाद्या कॅन्सर रुग्णाबद्दल बोलतो ज्याचा मृत्यू झालेला असतो. ते ऐकून कॅन्सर रुग्णाचे काय होत असेल, याची कल्पना करा.

कोणत्याही आजाराने त्रस्त रुग्णाशी नेहमी सकारात्मक आणि उत्साहवर्धक बोला.

रुग्णाला तुमचा सल्ला आणि मार्गदर्शनाची नाही तर तुमचे प्रेम आणि प्रोत्साहनाची गरज आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यक्ती आधीच त्याच्या आजाराने त्रस्त आहे. त्याला आणखी त्रास देणे योग्य नाही.

तुमच्या ज्ञानावर नियंत्रण ठेवा

रुग्णाच्या आजारासाठी कोणत्या प्रकारचे उपचार दिले जात आहेत याबद्दल बोलताना, आपण इतर संभाव्य उपचार पर्यायांबद्दल बोलू शकता, पण गरजेपेक्षा जास्त ज्ञान पाजळू  नका. त्याला कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नका. अनेकदा इंटरनेटवर आजाराबद्दल अपूर्ण माहिती मिळवून रुग्ण आणि डॉक्टरांसमोर आपण आपले ज्ञान पाजळतो.

हे लक्षात ठेवले पाहिजे की, जो रोग आणि उपचारासाठी डॉक्टरांनी बरीच वर्षे अभ्यास केला आहे, त्यांच्यासमोर आपले ज्ञान पाजळणे चुकीचे आहे. एखादा उपाय किंवा औषधाबद्दल सल्ला देऊ नका. तसेही रुग्णाशी जास्त बोलू नये, कारण यामुळे त्याला थकवा जाणवतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...