* नसीम अंसारी कोचर
आजकाल विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. ज्यांचे नाव यापूर्वी कधी ऐकले नव्हते असे आजार होत आहेत. कोरोना महामारीमुळे लोकांच्या शरीरात इतर अनेक आजार वाढले आहेत. काळी बुरशी, पांढरी बुरशी, रक्त गोठणे यासारख्या समस्या समोर येत असून, त्यावरील उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना रुग्णालयाचा खर्च करणे जवळपास अशक्य झाले आहे.
आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान वाढत असल्याने आजारांवर होणारा खर्चही वाढत आहे. पूर्वी डॉक्टर तपासणी करून, रुग्णाची नाडी तपासून किंवा किरकोळ चाचण्या करून उपचार करायचे, पण आता ताप आला तरी सर्व प्रकारच्या रक्त आणि लघवीच्या चाचण्या लिहून देतात. गंभीर आजार झाल्यास रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना चाचण्या, क्ष-किरण, एमआरआय, थेरपी इत्यादी महागडया उपचारांचा सामना करावा लागतो.
एखादा मोठा आजार माणसाची सर्व बचत खाऊन टाकतो. अशा परिस्थितीत फॅमिली मेडिक्लेम असणे अत्यंत गरजेचे आहे. मेडिक्लेम पॉलिसी अर्थात वैद्यकीय विमा कठीण काळात तणावमुक्त आणि आर्थिकदृष्टया सुरक्षित राहण्यास मदत करतो. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विमा कंपनीच्या जाळयाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विमाधारकावर उपचार केले जातात. या अंतर्गत, विमा कंपनी दाव्याचा काही भाग किंवा संपूर्ण रक्कम रुग्णालयाला देते. त्यामुळे रुग्ण तसेच त्याच्या कुटुंबावर अचानक आर्थिक भार पडत नाही.
सुरक्षित पर्याय
अनपेक्षित वैद्यकीय गरज उद्भवल्यास, त्यावर होणारा प्रचंड खर्च भागवण्यासाठी मेडिक्लेम हा आजचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ज्या व्यक्तीचा मेडिक्लेम असेल त्याला त्याच्या खिशातून पैसे भरण्याची आवश्यकता नसते. जर त्याला कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल केले असेल तर सर्व खर्च मेडिक्लेम कंपनी उचलते.
तुमची मेडिक्लेम पॉलिसी अपघात, गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया इत्यादी बाबतीत रुग्णालयाचा खर्च उचलते, सोबतच रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर वेळोवेळी होणाऱ्या औषधांचा आणि चाचण्यांचा खर्चही करते. सर्व परिस्थिती मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट असते. आज, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मेडिक्लेम सेवा वरदान आहे.