* गरिमा पंकज
व्यवसाय लहान असो किंवा मोठा, जर ऑफलाइन ग्राहकांबरोबरच ऑनलाइन ग्राहकांना लक्षात घेऊन व्यवसायाची रणनीती ठरवली तरच जास्तीत जास्त नफा मिळवता येतो, कारण आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये अमर्यादित डेटा आहे. आता बहुतांश कामे ऑनलाइन होत आहेत. त्यामुळेच क्लाउड किचन व्यवसाय हा भारत आणि जगभरातील सर्वात ट्रेंडिंग व्यवसायांपैकी एक आहे.
क्लाउड किचन, ज्याला बऱ्याचदा ‘घोस्ट किचन’ किंवा ‘व्हर्च्युअल किचन’ म्हणून ओळखले जाते, हे एक प्रकारचे रेस्टॉरंट आहे जिथे फक्त अन्नपदार्थांची ऑर्डर स्वीकारता येते. क्लाउड किचन हा ऑनलाइन फूड ऑर्डरिंग सिस्टीमद्वारे ग्राहकांना अन्न पुरवण्यासाठी सुरू केलेला व्यवसाय आहे. झोमॅटो आणि स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशन्सने त्याच्याशी टाय-अप अर्थात करार केला आहे.
२०१९ मध्ये भारतात जवळपास ५,००० क्लाउड किचन होते. ऑनलाइन फूड ऑर्डरिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या सहकार्यामुळे क्लाउड किचनला मोठा आधार मिळाला आहे. आज भारतात ३०,००० पेक्षा जास्त क्लाउड किचन आहेत.
योग्य नियोजन करा
हे काम तुम्ही फक्त ५ ते ६ लाख रुपयांमध्ये चांगल्या पातळीवर सुरू करू शकता. महिलाही या व्यवसायात सक्रिय सहभाग घेत आहेत. अशाच एका क्लाउड किचन ‘द छौंक’च्या सहसंस्थापक मंजरी सिंह आणि हिरण्यमी शिवानी यांच्याशी आम्ही बोललो. कोविड-१९ दरम्यान, जेव्हा लोक त्यांच्या घरात बंदिस्त होते तेव्हा हिरण्यमी शिवानीही त्यांच्या मूळच्या घरी जाऊ शकल्या नव्हत्या. त्यादरम्यान त्यांना क्लाउड किचन सुरू करण्याची कल्पना सुचली. त्या बिहारच्या आहेत. लोकांना घरच्या जेवणाची चव देण्याच्या उद्देशाने, विशेषत: स्वादिष्ट बिहारी खाद्यपदार्थ देण्याच्या उद्देशाने, त्यांनी जुलै २०२१ मध्ये गुरुग्राममध्ये बिहारी खाद्यपदार्थांचे ‘द छौंक’ सुरू केले. त्यांची सून मंजरी सिंग यांनीही त्यांना या कामात साथ दिली आणि दोघींनी मिळून या व्यवसायात पदार्पण केले.
वाढले आहे काम
मंजरी सिंह सांगतात की, सुरुवातीला त्यांनी घरूनच व्यवसाय सुरू केला. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे त्या घरीच जेवण बनवून लोकांपर्यंत पोहोचवत. आज त्यांची दिल्ली/एनसीआरमध्ये ५ आउटलेट आहेत. बहुतेक प्रणाली स्वयंचलित आणि ऑनलाइन आहे. त्यांनी स्विगी, झोमॅटोसोबत करार केला आहे.