* सुनीता शर्मा

बदलत्या सामाजिक रूढींमुळे वैवाहिक जीवनातील पवित्र मूल्येही कमी होत चालली आहेत. त्यामुळेच गेल्या दशकात घटस्फोटांच्या संख्येत आश्चर्यकारक वाढ झाली आहे.

काही दशकांपूर्वी घटस्फोट घेण्यासाठीचा पुढाकार आणि हिंमत फक्त पुरुष वर्गात असायची, पण आजच्या स्त्रीक्रांती म्हटल्या जाणाऱ्या युगात घटस्फोटासाठी पुढाकार घेण्याचे धाडसही स्त्रियांमध्ये येऊ लागले आहे. आजची आर्थिकदृष्टया स्वतंत्र, खुल्या विचारसरणीची, सजग स्त्री पतीच्या अवास्तव मागण्यांपुढे अजिबात तयार नाही.

हेच कारण आहे की, सडत चाललेले लग्न आणि बिघडलेल्या नात्याच्या गुदमरून टाकणाऱ्या दुर्गंधीतून बाहेर पडून मोकळया आकाशात श्वास घेण्याचे धाडस करून ती स्वत:हून वेगळे राहण्याचा निर्णय घेत आहे. आजच्या स्त्रीला तिचे व्यक्तिमत्व विकसित करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे आहे.

लग्नाच्या बंधनात ज्याप्रमाणे दोन शरीरं आणि दोन जीव एकत्र येतात आणि त्यांची सुख-दु:खं आपापसात वाटली जातात, त्याचप्रमाणे घटस्फोटाच्या रूपात घडलेल्या या शोकांतिकेचे दुष्परिणाम दोघांवरही तितकेच जाणवतात.

साधारणपणे, घटस्फोटित महिलेच्या दु:खाची चर्चा लोकांच्या ओठांवर दीर्घकाळ राहाते, परंतु पुरुषांना आतून रडताना क्वचितच कोणी पाहिले असेल. स्वत:वर  झालेल्या अत्याचाराचा उल्लेख वाटेल तिथे करून स्त्रीला सहानुभूती मिळवता येते, पण पुरुष हे अश्रू पिऊन मूक बसण्याच्या प्रयत्नात अधिकच एकाकी होत जातो. त्याच्या पत्नीने त्याला नाकारले आहे, एवढेच नाही तर त्याला तिच्या आयुष्यातून हाकलून दिले आहे, हे स्वीकारणे त्याच्यासाठी सोपे नसते.

घटस्फोटानंतरचे पहिले ६ महिने

मानसशास्त्रज्ञांच्या मते, ‘‘जर पत्नीने घटस्फोट घेतला तर पतीचा अहंकार दुखावला जातो. माणूस कितीही गर्विष्ठ आणि हट्टी असला तरीही तो थोडासा संवेदनशील असेल तर त्याच्यासाठी घटस्फोटानंतरचे पहिले ६ महिने अत्यंत वेदनादायी ठरतात.’’

भारतीय वातावरणात, पुरुष अशा प्रकारे वाढले आहेत की, त्यांना लहानपणापासूनच आज्ञाधारक राहण्याची सवय लावली जाते तर ज्या स्त्रीला त्याने आपल्या जीवनात आणले तीच त्याला महत्त्व न देता निघून गेली, हे स्वीकारणे त्याच्या पौरुषत्वासाठी खूप कठीण होऊन बसते.

पुरुष शारीरिकदृष्टया स्त्रीपेक्षा बलवान असला तरी भावनिकदृष्टया तो अत्यंत दुबळा आणि एकटा पडतो, त्यामुळेच घटस्फोटासारखा निर्णय स्त्रीला तिच्या कुटुंबाच्या जवळ आणतो तर पुरुष घटस्फोटानंतर कौटुंबिक संबंधांपासून दूर जातो. त्याचा नात्यांवरचा विश्वास उडतो.

मनोधैर्याचे खच्चीकरण

प्रत्येक व्यक्तीच्या आत एक मूल दडलेले असते. हे मूल घटस्फोटित पुरुषाला हे मान्य करू देत नाही की त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. हे सत्य नाकारण्यासाठी तो रुसणे, रागावणे, अगदी स्वत:वर प्राणघातक हल्ला करणे, असा बालिशपणा करून सर्वांना स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. कालांतराने, जेव्हा त्याचे मन हे मान्य करते की त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे, त्यानंतर त्याचा राग वाढत जातो. हा राग कधी कधी त्याला स्वत:चे नुकसान करण्यासारखे निर्णय घेण्यास भाग पाडतो.

असा पुरुष भविष्याबाबत उदासीन होतो. सत्याचा सामना करण्यास घाबरतो आणि स्वत:हून अमली पदार्थ किंवा मद्याच्या आहारी जातो. तासनतास स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन स्वत:मध्येच हरवून जातो, जगापासून पळून जाऊ इच्छितो. त्याचे मनोबल ढासळते आणि कार्यक्षमता जवळजवळ शून्य होते.

अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे पुरुष या मानसिक छळामुले नैराश्याच्या प्रचंड अधीन जातात आणि स्वत:चे बरे-वाईट करून घेतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी एकटेपणा टाळून आपल्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांत जास्त वेळ घालवला पाहिजे.

वर्षं उलटत जातात

समजूतदार आणि स्वाभिमानी पुरुष या मानसिक छळातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत ते अनेकदा मानसशास्त्रज्ञांकडेही जातात. ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपले जीवन सुरळीतपणे करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण जीवनातील निराशा आणि आत्मविश्वासाचा अभाव कायम असतो. ते प्रत्येक नात्याकडे संशयी नजरेतून पाहतात आणि त्यांच्या मनातील स्त्रियांबद्दलचा आदर कमी होतो.

घटस्फोटाच्या क्षणांची कडू चव आणि लग्नाचे काही सोनेरी क्षण अजूनही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जिवंत असतात, जे कधी कधी वेदना वाढवतात. ते कोणत्याही प्रकारचे भावनिक नाते टाळतात आणि हा नको असलेला घटस्फोट त्यांच्या मनात भविष्यातील नातेसंबंधांबद्दल एक विचित्र भीती निर्माण करतो.

नवीन जीवनाची सुरुवात

घटस्फोटित महिलेला तिच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून जितके प्रेम, आदर आणि काळजी आवश्यक असते तितकेच पुरुषांनाही ते हवे असते. अशा नाजूक काळात एखाद्या मित्राने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याला मनापासून मदत केली तर तो या मानसिक तणावावर मात करू शकतो आणि पूर्ण आत्मविश्वासाने आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो.

नैराश्यातून पूर्णपणे बाहेर पडायला त्याला सुमारे दीड-दोन वर्षे लागतात. अनेकदा जागरूक पुरुषही उपचारासाठी येतात. जसजसा पुरुषातील आत्मविश्वास पुन्हा येऊ लागतो तसतशी त्याची कार्यक्षमताही वाढू लागते आणि त्याच्या आयुष्याप्रती असलेल्या आशा पुन्हा पल्लवित होतात.

अशा परिस्थितीत सामाजिक आणि कौटुंबिक मागण्यांमुळे पुरुष पुन्हा लग्न करण्यास तयार होतो, पण घटस्फोटित पुरुषाला पुन्हा संसार करणे फार कठीण असते, कारण स्त्रिया पुरुषांवर जास्त संशय घेतात. कसून चौकशी केल्याशिवाय त्यांना घटस्फोटित पुरुषाशी लग्न करायचे नसते.

जीवन कधीच संपत नसते

भूतकाळ विसरून भविष्याकडे पाहा. ‘परिवर्तन किंवा बदल हेच जीवनाचे प्राथमिक सत्य आहे’ या बोधपर सूत्राचे पालन करा. तुमच्या उणिवा सुधारा आणि पुन्हा नव्या नात्याच्या दिशेने पाऊल टाका. तुम्हाला पुन्हा लग्न करायचे नसले तर तुमच्या चांगल्या कर्माने आयुष्याला नवा आयाम द्या.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यासारखे कायदे पतींना अधिक घाबरवतात आणि ते सामान्य जीवन जगू शकत नाहीत. घटस्फोटित पुरुषांना कुटुंब आणि मित्रांच्या पार्टीसाठी फक्त औपचारिक आमंत्रण दिले जाते. त्यांना कोणी येण्यासाठी आग्रह करत नाही. त्यांची आई आणि बहीणही त्यांनाच दोष देऊ लागतात तर वडील आणि भाऊ स्वत:ला दूरच ठेवतात. अनेकदा असे पुरुष दुसरी स्त्री शोधण्यासाठी ऑनलाइन शोध सुरू करतात आणि त्यामुळे अडचणीत येऊ शकतात, त्यातून बाहेर पडणे सोपे नसते.

घटस्फोटित पुरुषाने लग्न केले तरी  त्याच्या नव्या पत्नीला तिने त्याच्यावर खूप मोठे उपकार केल्याचा अभिमान वाटतो. ती माहेरहून येताना कमी आणते आणि जास्त मागते. समाजात अजूनही इतक्या घटस्फोटित स्त्रिया नाहीत की, आपल्या आवडीची कोणीतरी सहज मिळेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...