* सोमा घोष
२३ वर्षीय अभिनेत्री पायल मेमाणेने अनेक मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची इच्छा होती. त्यासाठी तिला घरच्यांचाही खूप पाठिंबा मिळाला. हसतमुख आणि विनम्र पायल लावणी आणि कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मराठी इंडस्ट्रीत रियालिटी शो ‘अप्सरा आली’मधून पदार्पण केले, ज्यात तिच्या नृत्याचे खूपच कौतुक झाले आणि तिला अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सध्या सोनी मराठीवरील ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ या मालिकेत ती एका ट्रान्सजेंडरची दत्तक मुलगी दिशाची भूमिका साकारत आहे. ही तिची सर्वात मोठी आणि मुख्य भूमिका आहे, जी साकारताना ती खूपच आनंदी आहे. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान तिच्याशी गप्पा मारता आल्या. त्या खूपच मनोरंजक झाल्या. त्याच गप्पांमधील हा काही खास भाग.
अभिनयात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
अभिनयात येण्याची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाली. मी एक नृत्यांगना आहे आणि लहानपणापासूनच माझ्या आईलाही नृत्याची खूप आवड होती. म्हणूनच तिने मला लहान वयातच नृत्याची शिकवणी लावली. हळूहळू शाळा आणि महाविद्यालयात मी माझ्या या कलेचे सादरीकरण करू लागले.
तुला कुटुंबाचा कितपत पाठिंबा मिळाला?
माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. माझे वडील पुण्यात नोकरी करतात. माझ्या यशामुळे त्यांना अत्यानंद होतो. माझ्या चित्रिकरणात काही अडचण आल्यास दोघेही तिथे येऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहातात. सुरुवातीला पुण्यातून ऑडिशनसाठी मुंबईला आईसोबत ६ वाजता जायचे आणि संध्याकाळी पुण्याला परत यायचे. वडिलांनी माझ्यावर कधीच कुठले निर्बंध लादले नाहीत, उलट मला खूप प्रोत्साहन दिले, कारण मुंबईत राहाणे महागडे असते. आता या मालिकेमुळे मला एकटीलाच राहावे लागत आहे, पण माझे आई-वडील रोज फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी करतात. चांगले काम मिळवण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते. कसदार अभिनय करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली, कारण मी एक नृत्यांगणा आहे, अभिनेत्री नाही.
तू या क्षेत्रात कशी आलीस?
मी २०१८ मध्ये एका डान्स शोमध्ये भाग घेतला होता. तो माझा पहिला शो होता, नंतर टीव्हीवरील मालिकांसाठी मी ऑडिशन दिले आणि हळूहळू अभिनयात उतरले. नृत्यातून मी या क्षेत्रात प्रवेश केला. मला टीव्हीवरील मालिकांमधील अभिनयाबद्दल फारशी कल्पना नव्हती. कॅमेऱ्यासमोर कसे उभे राहायचे तेच कळत नव्हते. सुरुवातीच्या काळात मी अनेक मालिकांमध्ये अतिशय छोटया भूमिका साकारल्या. त्यामुळे मला हळूहळू अभिनय समजू लागला आणि त्यानंतर आता ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ ही मालिका माझी मुख्य भूमिका असलेली प्रमुख आणि मोठी मालिका आहे.
लावणी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे, तुला त्यातून काय शिकायला मिळते?
लावणी हा महाराष्ट्राचा जुना नृत्य प्रकार आहे. मराठीत त्याला ‘तमाशाचा फड’ म्हटले जाते. पूर्वी लावणी गावोगावी सादर केली जात असे, परंतु आज ती मनोरंजनाचे माध्यम झाली आहे. यात अदांना नजाकतीने सादर केले जाते आणि ही कला सादर करणारे खूप मोठमोठे कलाकार आहेत. मलाही लावणी करायला खूप आवडते. लावणीकडे आनंदी राहण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते.
या मालिकेमधील तुझा अनुभव कसा आहे?
मला ही मालिका करताना खूप छान वाटते, कारण यात माझी भूमिका खूप भावनिक आहे. यामध्ये माझी आई ट्रान्सजेंडर आहे आणि जग तिच्यासोबत खूप वाईट वागते. आईवर होणारा अन्याय दूर करून तिला न्याय मिळवून देण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा आहे. आईची कोणतीही समस्या मी माझी समस्या मानते. यात माझ्यासोबत सर्व अनुभवी आणि दिगग्ज कलाकार आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. आमची टीम खूप चांगली आहे.
ही भूमिका तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?
खूप जास्त मिळतीजुळती आहे, कारण माझी आई कविता मेमाणे माझ्यासाठी खूप खास आहे. सध्या मी चित्रिकरणासाठी घरापासून दूर राहात असल्यामुळे मला माझ्या आईची खूप आठवण येते. ज्याप्रमाणे मालिकेमधील दिशा आईचे रक्षण करणारी, तिची काळजी घेणारी आहे, तशीच मी माझ्या आईची खूप काळजी करते. तिला कोणी काही बोलले किंवा तिला काही झाले तर त्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो.
हिंदी चित्रपट आणि वेबमध्ये काम करण्याची तुझी इच्छा आहे का?
संधी मिळाली तर मला नक्कीच तिथे काम करायला आवडेल. हिंदी चित्रपट आणि वेबमध्ये काम करण्याची माझी खूप इच्छा आहे.
हिंदी वेब सीरिजमध्ये खूप अंतर्गत दृश्य असतात. तू ती किती सहजतेने करू शकतेस?
अंतर्गत दृश्य करण्यासाठी एखाद्याचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक असते. तुमची सादरीकरणाची पद्धतही योग्य असायला हवी. कथेची गरज असेल तर अशी दृश्ये करायला काही हरकत नाही, पण चित्रपटाला मसालेदार फोडणी देण्यासाठी अंतर्गत दृश्य करायची असतील तर ते मला मान्य नाही.
हिंदी चित्रपटात काम करायचे झाल्यास कोणत्या सहकलाकार किंवा दिग्दर्शकासोबत तुला काम करायला आवडेल?
अभिनेता विकी कौशल हा माझा बालपणीचा क्रश आहे. मी त्याची खूप मोठी चाहती आहे. चित्रपट कुठलाही असो, तो माझा सहकलाकार असेल तर मला खूप आवडेल. याशिवाय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आहे.
तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?
मी फॅशनेबल आणि खवय्यी दोन्ही आहे. आईने बनवलेले मांसाहारी पदार्थ मला खूप आवडतात. मी जंक फूड फार खात नाही. गोड पदार्थांमध्ये मला रसगुल्ले किंवा गुलाबजाम खूप आवडतात.
मला फॅशन आवडते. मी स्वप्निल शिंदे आणि मनीष मल्होत्रा यांना फॉलोअप करते. माझ्या लग्नात मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घालायला मला आवडेल.
‘महिला दिन’निमित्त तुझा संदेश काय आहे?
अजूनही मुलींना मुलांइतके स्वातंत्र्य मिळालेले नाही. गावाकडच्या मुलींना अजूनही संपूर्ण शिक्षण मिळत नाही. दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी, असा विचार करून आईवडील तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करायला बघत नाहीत. त्यामुळे मुलीचे घर ना तिचे माहेर असते ना सासर, कारण माहेरी तिला दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी तर सासरी दुसऱ्याच्या घरून आलेली मुलगी समजले जाते. मुलीचे खरे घर नेमके आहे तरी कुठे? मला सर्वांकडूनच या प्रश्नाचे उत्तर खरोखर हवे आहे. शहरात नाही, पण गावात महिलांसाठी शिक्षण आणि जनजागृती गरजेची आहे.
आवडता रंग – काळा, लाल, पांढरा.
आवडता पोशाख – वन पीस, जीन्स-टी शर्ट.
आवडते पुस्तक – चेतन भगतचे ‘द गर्ल इन रूम 105’.
आवडते पर्यटन स्थळ – काश्मीर, पॅरिस.
वेळ मिळाल्यास – नृत्याचा सराव, कुटुंबासह वेळ घालवणे.
आवडते परफ्यूम – जाराचे आर्किड.
स्वप्नातील राजकुमार – सहकार्य करणारा, चांगली व्यक्ती आणि प्रेमळ.
जीवनातले आदर्श – जीवनात चांगली व्यक्ती बनणे.
सामाजिक कार्य – अनाथ मुलांसाठी काम.
स्वप्न – खूप मोठी आणि चांगली अभिनेत्री बनणे.