– शैलेंद्र सिंह

हिमाचल प्रदेशातील एका महिला नेत्याचा बाथरुममधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना मोठा फटका बसला. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय समाजात होणारी बदनामी वेगळीच होती. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तो दोघांच्या मर्जीने बनवण्यात आला असून त्यामागे त्यांचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता हे स्पष्ट झाले. दोघांनी एकमेकांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने हे केले नव्हते. तरीही सोशल मीडियावर तो अचानक व्हायरल झाल्याने त्यांच्यासाठी तो घातक ठरला.

जिव्हाळयाच्या क्षणांचा व्हिडिओ वादाचा मुद्दा बनण्याची ही पहिलीच घटना नाही. काही काळापूर्वी मथुरेतील एका पुजाऱ्याचेही असेच प्रकरण समोर आले होते. त्याचे त्याच्या परदेशी शिष्येसोबतचे सेक्सी क्षणांचे अनेक व्हिडिओ होते, जे त्याच्या स्वत:च्या लॅपटॉपवर होते. एके दिवशी लॅपटॉप खराब झाला.

त्याने तो दुरुस्त करायला दिला तेव्हा तेथून ते व्हिडीओ बनले आणि सीडीच्या माध्यमातून बाजारात पोहोचले. त्यावेळी व्हॉट्सअॅप वापरात नव्हता. त्यामुळे मथुरेतील ती घटना सीडीच्या माध्यमातूनच प्रकाशझोतात आली.

सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये राजकारण्यांसह अनेक बडया लोकांचे सेक्सी क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चेत आले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आहे. असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्वत:च्या जीवाचे बरे-वाईट करून घेण्याचा प्रयत्नही केला.

प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीमध्ये बनवलेले असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते. अशा स्थितीत असे व्हिडिओ किंवा फोटो बनू न देणे आवश्यक आहे.

ब्लॅकमेलिंगचे साधन : २० वर्षीय रेखा यादवने तिचा प्रियकर विशाल गुर्जरला चुंबन देतानाचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ दोघांनी केवळ त्यांच्यातील नात्याची खोली दाखवण्यासाठी बनवला होता. काही वेळाने तो व्हिडिओही डिलीट करण्यात आला, मात्र रेखाची मैत्रीण पूनमने रेखाचे मेमरी कार्ड घेतले. त्यातून पूनमचा स्वत:चा काही डेटा डिलीट झाला, जो खूप महत्त्वाचा होता. जेव्हा तिने तिचा मित्र दीपकला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, असे एक सॉफ्टवेअर आहे ज्यातून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवता येऊ शकतो.

दीपकने पूनमचे मेमरी कार्ड घेतले आणि तिचा डेटा मिळवला. त्यात रेखा यादव आणि तिचा प्रियकर विशाल गुर्जरचा चुंबनाचा व्हिडिओही सापडला. त्यानंतर दीपकने रेखाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

तंत्रज्ञानाचा गैरवापर

सॉफ्टवेअर अभियंता दीपक जाटव सांगतात की, आता असे सॉफ्टवेअर्स आहेत जे मेमरी कार्ड किंवा कम्प्युटर, लॅपटॉपमधून फोटो किंवा व्हिडिओ रिकव्हर करू शकतात, जे खूप पूर्वी डिलीट झाले होते. अशा स्थितीत एकच मार्ग उरतो की, तुमचे नाते कितीही खोलवर असले तरी त्या सेक्सी क्षणांचे फोटो किंवा व्हिडिओ बनवणे टाळावे.

अनेकदा असेही दिसून आले आहे की, जेव्हा परस्पर संबंध तुटतात तेव्हा लोक असे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करतात. सोशल मीडिया हे आता असे माध्यम बनले आहे की अशा गोष्टी देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला वेळ लागत नाही. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्यावेळी अशा घटना समोर येतात. तेव्हा लोकांना वाटते की असे कसे घडले?

सहसा प्रेयसीला विश्वास बसू लागतो की, लग्न होणारच आहे, मग सेक्स करताना व्हिडिओ बनवला तर काय फरक पडतो?

करिअर होते उद्धवस्त

चांगले करिअर घडवत असतानाच अनेकदा जिव्हाळयाच्या क्षणांचे हे फोटो आणि व्हिडिओ समोर येतात. अलीकडे अनेक नेत्यांचे असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता व्हिडिओमधला चेहराही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदलता येतो.

नुकताच गुजरातचा नेता हार्दिक पटेलचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जेव्हा तो तिथल्या सरकारविरोधात मोठी लढाई लढत होता. असे नेते, अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील लोक, समाजसेवक यांची संख्या कमी नाही. सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होणे ही फार मोठया आश्चर्याची गोष्ट नाही.

अशा घटना कायदेशीरदृष्टया चुकीच्या मानल्या गेल्या तरी त्या व्हायरल करणाऱ्यांवर आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, पण हे खूप अवघड काम आहे. शिक्षा होण्यापूर्वीच ज्याचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होतो, तो पुरता कोलमडून जातो.

समाजावर प्रभाव

सोशल मीडियाचे माध्यम समोर आल्यानंतर असे व्हिडिओ आणि फोटो वेगाने व्हायरल होऊ लागले आहेत, ज्याचा समाजावर वाईट परिणाम होऊ लागला आहे. अलीकडच्या काळात लोकांचे मनोधैर्य इतके वाढले आहे की, बलात्कारासारख्या घटनांचे व्हिडिओ त्यांच्याच गळयातील फास बनले आहेत. त्या व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी आधी त्यांची ओळख पटवली आणि नंतर त्यांना तुरुंगात पाठवले. अशा परिस्थितीत हे व्हिडीओ गुन्हेगाराला तुरुंगात पाठवण्याचे साधनही बनले.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही असे व्हिडिओ बनवून पॉर्न साइट्सवर विकण्याचा व्यवसाय करतात. हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून आधी त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ शूट करतात आणि नंतर त्यांची पॉर्न साइटवर विक्री करतात.

अशा परिस्थितीत जिव्हाळयाच्या क्षणांचे बनवलेले हे व्हिडिओ किती धोकादायक असू शकतात याची कल्पना करणे सोपे नाही. यापासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा जिव्हाळयाच्या क्षणांचे व्हिडिओ बनवणे टाळणे. भावनिकता आणि प्रेमाची खोली व्यक्त करण्यासाठी बनवलेले हे व्हिडिओ व्हायरल होऊन कधी गळफास बनतील, हे कळणारही नाही. त्यामुळे अशी लाजिरवाणी परिस्थिती टाळण्यासाठी जिव्हाळयाच्या क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो काढणे टाळणे आवश्यक आहे. जिव्हाळयाचे क्षण तुमचेच असतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...